स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे ह्या वक्तव्यात किती सत्यता आहे हे आज मी जाणते आहे. माझ्या स्वभावाचा असा एक पैलू प्रकर्षाने वयाच्या ह्या ५३ व्या वर्षात पोहोचल्यावर जाणवतो आहे. खंत नाही पण माझ्या ह्या लेखनांतून कदाचित कोणाला त्याचे सहाय्य होऊ शकते. परवा एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलतांना ती सहज म्हणली की आजकाल कुठले न कुठलेतरी तणांव आपल्या रोजनिशीमधे स्थान ग्रहण करून आहेत. त्यातून थोडे दूर जायचे असेल.. मनःशांती शोधत असशील... काही कारणाने येणारी उदासी पळवायची असेल तर फक्त डोळे मिटून बस व जसे ध्यान करतो (मला कधीच ध्यान करणे जमले नाही. चंचल मनांस कसे ते जमावे.. ) तसे फक्त जेव्हढे शक्य आहे तितके खोल खोल बालपणांत डोकावून बघ. खूप हलके वाटते. नकळत आपल्या चेहर्यावर हसू उमटेल व मन हलके नक्कीच होईल.
मी तसेच करून बघितले. खऱंच खूप छान वाटले. अर्थात आयुष्यात उलटी उलटी पावले टाकत माझ्या शाळेच्या दिवसांपर्यंत जाऊन एक थांबा आला. त्याला कारण तसेच आहे. आजकाल खूप कार्यक्रम दूरचित्रवाणी वर येतात जे ज्ञानवर्धक आहेतच, मार्गदर्शक पण आहेत. सुरवातीला जसे म्हटले की स्वतःची मदत स्वतःच केली पाहीजे हे 'साम' टीव्ही वर बालाजी तांबे सांगत होते. त्याचे बोलणे खूप छान वाटते. सगळ्यांतून जे आपल्याला आवडेल तेच घेणे असे माझे तत्व आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटेलच असे नाही... मग ते कोणीही कोणालाही सांगत असो. आमच्या लहानपणी नागपुर आकाशवाणीवर दर रविवारी सकाळी ९ वाजता मुलांसाठी एक कार्यक्रम येत असे. त्यात कुंदाताई आणि अरविंद मामा असे दोघे असत. त्यांची खरी नांवे वेगळीच होती. पण आम्ही बालमंडळी त्यांना ह्याच नावाने जाणत होतो. दोघेही छान लाडिक-लाडिक आवाजात खूप गोड बोलत. एकदा मी कार्यक्रमाबद्दल पत्र लिहीले आणि त्यांना खूप भेटावेसे वाटते असे लिहीले होते. आवाजावरून दोघांची ही काहीशी प्रेमळ व्यक्तिमत्वं माझ्या डोळ्यासमोर होती. एका कार्यक्रमात माझ्या पत्राचा उल्लेख तर कुंदाताईंनी केला पण मला भेटण्याचे आश्वासन मात्र दिले नाही. त्या ७-८ वर्षाच्या वयात मी खूप हिरमुसले. ही गोष्ट लहानशी होती पण मनात घर करून राहिली. ह्याचाच परिणाम की मला रेडिओ स्टेशनवर काम करावेसे वाटू लागले. तोपर्यंत माझ्या बारीक आवाजाची तारीफ ऐकून माझे (हं!! हं...!!) हे विचार पक्के होऊ लागले. एकदा आई बाबांना म्हटले असेल बोलता बोलता... पण फारसे लक्ष दिले गेले नाही. मी ८-९वीत असतांना नागपुर रेडिओ स्टेशनसमोरून सायकलवरून खूप चकरा मारत असे. पण उगीचच कोणी बरोबर असेल तर जाता येईल... कुठे तरी आत्मविश्वासाची कमीच असेल त्या वयात..ओफऽऽऽ त्या रेडिओ स्टेशनच्या आवारांत सायकल नेण्याची हिम्मत काही झाली नाही. गाणे शिकावे, पेटी वाजवायला तरी यावी म्हणून ते पण प्रयत्न झाले. पण स्वप्न स्वप्नंच राहिले. नंतर कॉलेज संपले, लग्न झाले, संसारात पडले. बाकी छंद खूप जोपासले. पण ह्या मात्र गोष्टी मागे पडल्या. जे आहे त्यात आनंद मानून पुढचा प्रवास चालू आहे. आयुष्याच्या नवीन वळणांवर नवीन नवीन शिकतेच आहे. तरीही...... रेडिओवर आजकालच्या भाषेत जॉकी चे बोलणे ऐकले की नागपुर रेडिओ स्टेशन समोरची सायकलवरची मी आणि झी टीवी वर 'सारेगम' कार्यक्रम सुरू झाला की उगीचच हातात गाण्याच्या क्लासची वही घेऊन जाणारी मी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
पुढे पाऊल टाकण्यास थोडा विचार करणारा स्वभाव आणि त्या वेळी कदाचित मनाचा खंबीरपणा व ध्येय मजबूत करता आले नसेल पण किती खरे आहे नं की स्वतःची मदत स्वतःच करावी लागते. (जरासे उशीरा ध्यानी आले किंवा पटले ह्याला इलाज नाही..)
उलटी पावले टाकतांना ह्या थांब्यावर हे आठवले. अजून अशाच आठवणी खूप असतील त्या पुन्हा कधी...!!!!
दीपिका जोशी
Its never late Deepika ajunahi swapna purna karta yeil MMKW chya platformvar. Nivedan ani Singing sathi navin talent:)
उत्तर द्याहटवादीप्स.....अगदी मनापासून लिहिलं आहेस.
उत्तर द्याहटवातर काय..... कुवेतला रेडीयो मिर्ची सुरु करायचं का :)
आयडिया बुरा नहीं है री.... चलो लगते हैं काम पर...
उत्तर द्याहटवा