मंगळवार, ११ जानेवारी, २०११

आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलॅंड - भाग १

२००९ साली लडाखला गेले होते. लेहच्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसलेली असताना समोर पडलेले मासिक सहजच उचलले. उघडले...आणि नजरबंदी झाल्यासारखी त्यातल्या फोटोंकडे पहात राहिले. अरुणाचल प्रदेश मधल्या तवांगचे  अतिशय नयनरम्य फोटो होते. तिथे बसल्याबसल्याच ठरवून टाकलेइथे जायचेच! 


२०१० च्या वार्षिक सुट्टीत सन्दकफू या हिमालयातल्या एका शिखरावर पर्वतारोहणासाठी जायचे ठरवले होते. पण प्रकृतीच्या काही कुरबुरीमुळे ते रद्द करावे लागले!  मग लगेच आठवण झाली ती तवांगची! लगेच फोन लावला तो ईशा टूर्सच्या आत्माराम परबला! त्याच्याबरोबर Valley of Flowers, ली-बद्रिनाथ-केदारनाथ आणि श्रीनगर-लेह-कारगील-द्रास-मनाली अशा दोन अविस्मरणीय टूर्स केल्या होत्या. त्यामुळे विचार केला आधी त्याला विचारावे की तो काही ऑर्गनाईझ करू शकेल कामाझी इच्छाशक्ती फारच प्रबळ होती...कारण नेमक्या माझ्या सुट्टीच्या दिवसातच तो अरुणाचल-आसाम-नागालॅन्ड्-मेघालय अशी टूर काढतो आहे ही सुवार्ता कानी पडली. आत्मारामला माझी आणि चिन्मयची ( माझ्या लेकाची) सीट कन्फर्म करायला सांगितली आणि चिन्मयला ताबडतोब हे सुवर्तमान कळवले!


यथावकाशप्रवासाच्या तारखाईटनरीइतर सहप्रवाश्यांची नावेसोबत आणावयाच्या वस्तूंची यादीमुम्बई-गोहत्ती विमानप्रवासाची तिकीटे हे ईशा टूर्सने ई मेलद्वारे पाठवले. ईशान्येकडच्या या सात राज्यांमधे जाण्यासाठी भारतीय नागरिकांनादेखील परवाना घ्यावा लागतो. (०१ जानेवारी २०११ पासून हा परवाना काढण्याची गरज नाही). ते ही काम पार पडले. आणि २ महिने ज्याचा धोशा लावला होता...त्या प्रवासाचा दिवस उजाडला!


गुवाहाटीला सकाळी ११.३० वाजता विमान पोहोचले. तिथून १८० कि.मी. वर असलेल्या नामेरी नॅशनल पार्क मध्ये पहिला मुक्काम होता. आमचा एकंदर २० जणांचा ग्रूप होता.  या पुढचा सर्व प्रवास क्वालीस गाड्यांतून होता. ४ जण एका गाडीत या हिशोबाने ५ क्वालीस एअरपोर्टच्या बाहेर आधीच आलेल्या होत्या. आमची ग्रुप लीडर होती नावाप्रमाणेच नेहमी चेहर्‍यावर स्मितहास्य असणारी स्मिता रेगे. सगळ्यांचे सामान गाड्यांत रचून झाल्यावर आम्ही कूच केले. शहरातले रस्ते अगदीच लहान...दुपदरी होते. त्यामुळे बाहेर पडेपर्यंत जरा वेळ लागला. शहरही तसं मागासलेलंच वाटत होतं. हळूहळू शहर मागे पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची शेते आणि चहाचे मळे दिसायला लागले. मधेच लहानलहान गावेही लागत होती. कुडाची मातीने सावरलेली घरेआजूबाजूला सुपारी आणि केळीची झाडे बघून असे वाटायला लागले की चुकून कोकणातल्या एखाद्या गावात तर आलो नाही ना! 


हवेत सुखद गारवा होता. आमचा driver ज्याला सगळेजण 'कोलीदाम्हणत होते तो अतिशय safe and matured driving  करत होता. आमच्या गाडीत चिन्मय आणि माझ्या व्यतिरिक्त श्री. वसंत गोंधळेकर आणि आशा दावडा हे दोन सहप्रवासी होते. त्यापैकी गोंधळेकर काकांना मी आधीपासून ओळखत होते. मागच्या वर्षीच्या लेहच्या trip मध्ये ते ही आमच्यासोबत होते. गोंधळेकर काका हे एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व. वय वर्षे ७६.  देवदयेने तब्बेत उत्तम. जगातले अर्धे देश आणि जवळजवळ सगळा भारत फिरून झालेला.  एवढंच नाही तर ३-४ वर्षांपूर्वी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवांवर जाऊन आले होते. दोन्ही ध्रुवांवर जाऊन आलेली माझ्या माहितीतली ही पहिली व्यक्ती! फोटोग्राफीचा छंद गेली ४० वर्षे जोपासला होता.  आमच्या दुसर्‍या सहप्रवासी आशाताई या ही उत्तम फोटोग्राफर! निसर्गाची आणि वन्यजीवनाची खूप आवड असलेल्या!  माझी आणि चिन्मयची फोटोग्राफी शिकायची इच्छा पूर्ण होणार असं वाटायला लागलं! गोंधळेकर काकांकडे अतिशय उत्तम कॅमेरा आणि टेलिस्कोपिक लेन्सेस होत्या. आशाताई आणि चिन्मय या दोघांचे advanced SLR कॅमेरे होते. माझ्याकडे मात्र एक गरीब बिचारा Panasonic चा Digicam  होता. या तिघांच्या advanced cameras ने बुजून न जाता मीही धडाकेबाज फोटोग्राफी करायचे आणि शिकायचे ठरवले! अहो,  गोंधळेकरकाकां सारखे गुरू आणि सहप्रवासी मिळायलाही भाग्य लागतं!


 आमची गाडी मस्त चालली होती. बाहेर दुतर्फा चहाचे मळे दिसत होते. एवढ्यात काकांनी कोलीदाला गाडी थांबवायला सांगितली. आमच्या प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याकडे बघून त्यांनी बाहेरच्या मळ्यांकडे बोट दाखवले. काकांनी एक महत्त्वाची टीप दिली. ते म्हणालेहा सूर्यप्रकाश बघा कसा सोनेरी आहे. अशा सोनेरी प्रकाशात फोटो नेहमी चांगले येतात. बाहेर बघितलेतर खरंचसुंदर सोनेरी सूर्यप्रकाशात चहाचे मळे  न्हाउन निघत होते. चाय बागानांचे फोटो घेऊन पुढे निघालो.



मधेच एका ठिकाणी चहापानाचा विश्राम घ्यायचे ठरले. ज्या हॉटेलच्या बाहेर गाड्या थांबल्या त्याचा एकंदर अवतार काही स्वागतार्ह नव्हता. कळकट भिंतीबसण्यासाठी बाकडी टाकलेलीलोक पितळेच्या परातीत भाताचे ढीग खात होते. इथे चहा प्यायचाअसा आमच्या चेहर्‍यावरचा प्रश्न पाहूनगल्ल्यावरचा माणूस लगबगीने पुढे झाला आणि त्याने आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूस जाण्याचे विनंती केली.  आम्ही सर्वजण त्याने सांगितल्याप्रमाणे मागे गेलो. तिथले दृष्य पाहून थक्क झालो. मागे एक सुंदर तलाव होता. त्याच्या काठावर एक बांबूची लांबलचक झोपडी...गवताचे छप्पर असलेली. तलावाच्या मागे भाताचे शेत होते. आणि सगळीकडे एक सुखद नीरव शांतता. हे दृष्य पाहून आम्हा सगळ्यांचा प्रवासाचा शीण चहा घ्यायच्या आधीच नाहीसा झाला. तलावाचं पाणी इतकं सुस्पष्ट आणि नितळ होतं की आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब आरशात पडल्याइतकी स्पष्ट होती.



आमच्या टूर लीडर, स्मिताने आम्हाला चहा तयार असल्याचे सांगितले. त्या लांबलचक झोपडीमध्ये  सॅण्डविचेस आणि आसामचा ताजा चहा घेऊन साधारण अर्ध्या-पाऊण तासाने म्हणजे ४.३० वाजता बाहेर आलो. बाहेर संधिप्रकाश पसरला होता. Driver ने सांगितले की इथे संध्याकाळी ५ वाजता अंधार पडतो. नामेरी नॅशनल पार्क अजून ३ तासांवर होते. पुन्हा प्रवास सुरू. थोड्या वेळात पूर्ण अंधार झाला. रस्त्यावर आणि आजूबाजूला कुठेही दिवे नाहीत. रस्त्यावरच्या गाड्यांचा जेवढा असेलतेवढाच उजेड! पूर्णतः अनोळखी परिसर आणि काळोखयामुळे इतका वेळ रम्य वाटणारा प्रवास आता भयाण वाटायला लागला. थोड्या वेळाने आम्ही NH 52  सोडून नामेरी पार्कच्या रस्त्याला वळलो.  या रस्त्याला आजूबाजूला फक्त जंगल! रस्ताही कच्चा. आमचा driver  अनुभवी असल्याने आणि त्याला रस्त्याची आणि त्यावरील खडड्यांची पूर्ण माहिती असल्यानेआम्ही सगळे सुखरूप नामेरी पार्क मधील एको रिसॉर्टला संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो!



या इको रिसॉर्ट मध्ये विटा आणि सिमेंटचा कमीतकमी वापर केला होता. बहुतेक सर्व रूम्स म्हणजे  self contained tents होते. मला आणि चिनूला मात्र बांबूने बनवलेली मस्त एक मजली झोपडी मिळाली होती. वर जाऊन बघितलं आणि तबियत खूष झाली. साधीस्वच्छ खोली. बांबूच्या भिंती आणि त्याचेच चटईसारखे विणलेले छत. एव्हाना थंडी चांगलीच वाढली होती. बेडवर ठेवलेले उबदार quilts  जेवणाचा मोह सोडून सरळ झोपून जावे का...असा विचार करायला लावत होते. पण भूकही सपाटून लागली होती. त्यामुळे fresh  होऊन जेवायला गेलो. गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊनसगळेजण गप्पा मारत बसलो. थंडीचा कडाका जरा वाढल्यावर रूम मध्ये आलो. क्विल्टमध्ये शिरलो. दिवा बंद केल्यावर कळले की छ्पराला असलेल्या विणीतून मस्त चंद्रप्रकाश येतो आहे.  त्या चंद्रप्रकाशाकडे बघता बघता कधी झोप लागली कळलंच नाही! सकाळी कुठल्याही alarm  शिवाय जाग आली. काल जेव्हा इथे आलोतेव्हा अंधार होता,  त्यामुळे  दिवसा उजेडी हा परिसर कसा दिसतो हे बघायची उत्सुकता होती. खिडकीचा पडदा बाजूला सारून बघितलेतर सगळीकडे मस्त जंगल होते.



आम्हाला breakfast च्या आधी तिथून १८ कि.मी. वर असणार्‍या 'जिया भोरोलीया नदीवर बोटिंगला जायचे होते. या नदीत राफ्टिंगही होते. पण  राफ्टिंगसाठी आवश्यक तेवढे पाणी नसल्याने, आम्ही बोटिंग करणार होतो. पटापट तयार होऊन गाडीतून नदीवर पोहोचलो. ही नदी नामेरी नॅशनल पार्कला दोन भागात विभागते. स्वच्छमोकळी ताजी हवाउबदार सूर्यप्रकाशदूर क्षितीजाजवळ दिसणार्‍या पर्वतरांगा आणि दोन्ही काठांवर वनराई मिरवणारी नागमोडी वळणांची 'जिया भोरोली' ! इतकं सुंदर दृष्य मनःपटलावर आणि कॅमेरावर साठवून घेत होतो.  कयाकमध्ये बसून प्रवास सुरू झाला.  पाण्याला चांगलीच ओढ होतीपण भीतीदायक नव्हती. आजूबाजूची वनश्री न्याहाळतभरपूर फोटो काढत १३ कि.मी. चा प्रवास कधी संपला ते कळलं नाही. 











थंडी खूप होती. रिसॉर्टवर परतून गरमगरम पाण्याने अंघोळ करायची असा विचार करत असतानाच काही तांत्रिक कारणांमुळे गरम पाणी मिळणार नाही हे शुभवर्तमान कळले. मोठ्या धैर्याने थंडगार पाण्याने आंघोळ केली. गरमागरम नाश्ता करूनसामान घेऊन पुढच्या प्रवासासाठी गाडीत येऊन बसलो. खरं तर नामेरीचा हा निसर्गरम्य परिसर आणि आमची चंद्रमौळी झोपडी इतक्यात सोडून जायचे अगदी जिवावर आले होते. पण काय करणार...अरुणाचल प्रदेश साद घालत होता.

क्रमशः

अश्विनी देवस्थळी

६ टिप्पण्या:

  1. तू लदाख ला बसून ठरवलेस की अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालैड बघायचे... मी तर तू लिहीलेले वाचून इथेच बसून ठरवले की पुढची सुट्टी येताच आसाम ला प्रयाण..... नक्की जाऊ.. लिहीले पण छान आहेस..

    उत्तर द्याहटवा
  2. अश्विनी...... छान लिहिते आहेस.
    फ़ोटो तर अगदी वेड लावणारे आहेत. पुढचे भाग येऊ दे लवकर :)

    उत्तर द्याहटवा
  3. अश्विनी...लिखाण आणि फोटोज दोन्हीही भारी आहेत...अजून वाचायला नक्कीच आवडेल...अशीच लिहिती रहा.

    उत्तर द्याहटवा
  4. जयश्री आणि वैशाली, पुढचा भाग लिहायला घेतला आहे!

    सर्वांना प्रतिक्रियेबाबत धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा