मी सौ.मुग्धा सरनाईक. एक अस्सल मुंबईकर. माहेर माझं पार्ला आणि सासर माझं अंधेरी. पण फॉरेनला जायचं केव्हातरी...असं स्वप्नं मनात बाळगणारी. प्रेमळ सासू सासरे, नेहमीच प्रोत्साहन देणारे आई वडील, आजी आजोबा यांच्या आशीर्वादाने मला कुवेतला यायची संधी लवकरच मिळाली आणि ती म्हणजे ऑक्टोबर २००५ मधे.
गौतम ने कुवेतची जॉब ऑफर स्वीकारली आणि मी HSBC मुंबईमधे नोकरीच्या चढत्या आलेखावर पेपर्स टाकले. बर्याच लोकांनी वेड्यात काढलं. “अगं एवढा चांगला जॉब सोडून कुठे चाललीस....आणि ते ही कुवेतला ?” प्रश्न तोच... पण आश्चर्य, धक्का, ही काय अवदसा आठवली...अशा वेगवेगळ्या भावनांनी विचारलेला. पण डॅशिंग नसेल तर तो निर्णय कसला ! मी आणि गौतम दोघंही आमच्या निर्णयावर ठाम होतो.
मला गौतम ने पूर्व कल्पना दिली की त्याला आधी कुवेतला जाऊन दोन-तीन महिने रहावं लागेल आणि त्याचा वर्क व्हिसा झाल्यानंतरच माझा डिपेंडंट व्हिसा होईल. तरी सहा महिने तरी कुवेतला यायची अपेक्षा करु नकोस. मलाही बॅंकेत तीन महिने नोटीस पिरियड होताच. पण कसलं काय...!! नोटीस पिरियडवर असतांनाच कळलं की बॅंकेची शाखा उघडतेय कुवेतमधे. मग काय.... मला मिळालीच ऑफर आणि गौतमच्या मागोमाग मी स्वत:च्या वर्क व्हिसावर कुवेतला यायचं तिकिट काढलं सुद्धा.
आता परदेशी जायचं....तिथे काय मिळेल, काय नाही.... या विचारात मी भरपूर खरेदी केली. फेअरवेल पार्टीज झोडल्या. शेवटी एकदाचा माझा परदेशवारीचा दिवस उजाडला. दिवस कशाला....रात्रंच ! कारण कुवेतच्या फ्लाईट्स रात्रीच असतात. एअरपोर्टवर सोडायला अख्खं सासर आणि माहेर ! एअरपोर्टवर आल्यावर “मी फॉरेनला जातेय” ची खुमखुमी उतरली कारण तिथे बसस्टॅंडसारखी गर्दी होती. तेव्हा लक्षात आलं की हल्ली कोणीही उठून परदेशी जातं. So there’s nothing great in going abroad! आणि आकाशात आधीच उडालेलं मनाचं विमान खाली उतरलं.
बॅगा घेऊन चेक-इन काऊंटरला गेले. त्या स्टाफने बॅगांचं वजन केलं आणि बोलला, “एक बॅग परत करुन या. जाणारचं नाही.” माझ्या सर्व सामानाचं वजन ६५ किलो झालेलं आणि तो म्हणाला, “जास्तीत जास्त ३५ किलो जाईल.” मी म्हटलं, “नाही हो, मी पहिल्यांदाच चाललेय म्हणून खूप सामान आहे.” तर बोलला, “काय सगळा संसार घेऊन जाताय वाटतं.” माझ्या सुदैवाने तो मराठीच होता. मग बोलला, “जर बॅग न्यायचीच असेल तर १२००० रुपये भरा.... जास्त सामानाचे.” मग काय मी माझी बार्गेनिंग पॉवर वापरली आणि १२००० ऐवजी ५००० रुपये भरुन बॅगा चेक-इन केल्या.
कुवेत एअरवेजचं एअरक्राफ्ट मोठं होतं आणि थोडं रिकामं पण. खरं तर जाम कंटाळा आला नुसतं बसून. मनात म्हटलं, लोक अमेरिका, कॅनडाचा लांब प्रवास कसा करतात देव जाणे. विमानातच उल्हासाने मी माझं घड्याळ कुवेतच्या वेळेप्रमाणे लावलं. सकाळी साडे सातला मी विमानातून उतरले आणि परदेशात पहिलं पाऊल टाकलं. व्हिसा आणि बॅगा घेऊन बाहेर आले. गौतम माझ्या ऑफिसच्या मेसेंजर सोबत माझी वाट बघत होता. त्या मेसेंजरचं नाव काय होतं माहित आहे....मिस्टर सालेह. मला मज्जा वाटली. कानावर पडलेलं पहिलं अरेबिक नाव ! मनात म्हटलं, ह्याला लोक मस्तपैकी “ए, साल्या” म्हणून हाक मारत असणार आणि हसू आलं.
मग रस्त्यावरचा प्रवास सुरु झाला. रस्त्यात मोठे मोठे व्हिला दिसत होते. मधेच छान छान मुली गाड्या चालवतांना दिसत होत्या. चकाचक रस्ते, मोठ्या गाड्या आणि व्हिला पाहून मी जाम खुश झाले. घरी DVD Player ची वेलकम गिफ्ट माझी वाट बघत होती. घरातून बाहेर दिसणारा भव्य रिंग रोड, सुसाट वेगाने जाणार्या गाड्या, माझं छान आटोपशीर घर बघून मी खुश झाले. नुसत्या हॉटेलात अनुभवलेल्या एअरकंडीशनर, बाथ टब सारख्या गोष्टी घरात पाहून यापुढील लाईफस्टाईल कशी असणार याचा अंदाज आला.
तर अशी झाली माझी पहिली कुवेतवारी. एक दोन महिन्यातच आम्ही कुवेतमधे वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक पातळीवर सेटल झालो. आपल्या माणसांची कमी महाराष्ट्र मंडळाने भरुन काढली. खूप छान मित्र मैत्रिणी मिळाले. ऑफिसमधली वाढती जबाबदारी, सर्व देशीय सहकार्यांबरोबर मिळणारा कामाचा अनुभव, माझा रोज एक तरी अरेबिक शब्द शिकण्याचा हव्यास... हे सगळं आव्हानात्मक वाटत होतं. त्याच बरोबर घर सजवण्याचा अनुभव, नवरा ऑफिसच्या कामासाठी टूरवर गेल्यावर सगळं एकटीनं मॅनेज करणं, हे पण जबाबदारीची जाणीव करुन देणारं होतं. चार वर्ष करियर लाईफ एन्जॉय करुन आता मी होममेकरचं लाईफ तितक्याच ग्रेसफुली एन्जॉय करतेय. माझ्यातील सुप्त कलागुणांची जाणीव नव्याने मला होतेय. वेळ + प्रयत्न + इच्छाशक्ती = Creativity हे गणित मी सोडवतेय.
खरंच, कुवेत हे माझ्या आयुष्यातील सोनेरी पर्व आहे आणि ते जितकं मोठं असेल तेवढी मी स्वत:ला भाग्यवान समजेन.
मुग्धा सरनाईक.
Mugdha,
उत्तर द्याहटवाMast jamalaay lekh!