लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

हिरवळ - बिन पावसाच्या प्रदेशातील


On the occasion of Kuwait's National day

२००० साली भारतातील १८ वर्षाची शासकीय नोकरी सोडून स्वतःला ग्लोबल जगाला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. हातात अमेरिकेचा एच वन बी व्हिसा  असताना अचानक आलेल्या कुवेत मधील नोकरीच्या संधीला होय म्हणालो. 

कारण हि तसेच होते. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामुळे महिन्याच्या शेवटाला कराव्या लागणाऱ्या गोळाबेरजेला कंटाळलो होतो. त्यात अमेरिकेत भराव्या लागणाऱ्या भरमसाठ करांची कल्पना होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतला चुलत भाऊ म्हणाला होता "एकदा अमेरिकेत आलास कि तू कुठेच जाणार नाहीस .. त्यापेक्षा गल्फ मध्ये काही वर्षे काढून नंतर इकडे ये".

आता इथे कुवेत मध्ये एक तप उलटून गेले. आता उलट अशी म्हणायची वेळ आलीय कि "कुवेत मध्ये एकदा पाय ठेवला कि इथून पाय निघणे अशक्य आहे"..... कुवेत एवढे स्वास्थ देते.

मुंबईतून निघताना डोक्यात बरेच प्रश्न रेंगाळत होते -
-- बायको मुलांना आपल्याजवळ येण्यात किती वेळ लागेल ?
-- तुलनेने छोटे पगाराचे दिनार मधील आकडे ...आपल्या हाती काही उरेल का ?
-- वाळवंटात आपले मन रमेल का ?
-- इतकी वर्षे शासकीय नोकरीत घालवल्यावर परदेशातील नोकरीत आपला तग लागेल का ?
-- ब्यांकेचे कर्ज , मित्रांची उधारी 
-- कौटुंबिक आयुष्य, घरगुती जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण , आणि एकंदरीतच आपले भविष्य ... असे अनेक प्रश्न 

मला आठवतो १४ मे २००० चा दिवस. ऑफिसच्या गाडीत बसून कुवेत विमानतळावरून निघाल्यावर रणरणत्या उन्हात तापून गरम झालेल्या गाडीत लागलेली जळजळीत धग... पण खर सांगू .. जशी पाच मिनिटात ती क्याम्री गाडी एअर कंडीशनर्ने थंड करून टाकली, तसेच काही, माझ्या डोक्यातले सारे प्रश्न एक एक करत कधीच लोप पावले.

मी मुळचा कोकणातला. त्यामुळे कुवेत मधील सुंदर समुद्र बघून प्रथम दर्शनीच एकदम हायसे वाटले. या  समुद्रासार्खीच विशाल हृदयाची काही माणसे अगदी सुरुवातीलाच भेटली आणि या शहराने मला नकळतच कधीच आपलेसे करून टाकले काही समजले नाही.

कामावरच्या कुवेती मुदीरने (म्यानेजर) माझ्या मुलाखती दरम्यान दिलेल्या शब्दाला जागत कुटुंबासाठीचा व्हिसा एका महिन्यातच माझ्या हाती दिला. गल्फमध्ये ड्रायविंग लायसेन्स मिळवणे किती अवघड आहे याचे बरेच किस्से कानी आले होते, पण तीन महिन्याच्या आतच ड्रायविंग लायसेन्स हाती आले.

मुंबईत रोजच तीन चार तासांचा बस ट्रेन चा प्रवास, त्यातून होणारी जीवाची घालमेल ... आणि आता ऑफिस साठी फक्त २० मिनिटांचा प्रवास .. आणि तोही सुरेख गल्फ रोड चा आस्वाद घेत. 

सुरुवातीला विशिष्ट पेहराव आणि विशिष्ट अशी भाषेची लकब यामुळे परके  वाटणारे ऑफिस मधील कुवेती   सोबती काही दिवसातच मऊशार हिरवळीसारखे वाटू लागले.

कोकणातल्या एका खेडेगावात बालपण गेलेले. आईवडील आणि भावंडासोबत फक्त कष्टाचे दिवस बघितलेले. एस एस सी ला बोर्डात, अभियान्त्रीकेची पदवी विशेष प्राविण्यासह ... भारतातल्या अठरा वर्षांच्या नोकरीत एकच  खंत मनाला निराशा द्यायची ... एवढे शिक्षण घेऊन सुध्धा मी माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थेर्य देऊ शकत नव्हतो.

आज कुवेतमधील एका तपाच्या वास्तव्यानंतर मी स्वतःला खरोखर धन्य मानतो आणि कुवेत बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आयुष्यातली बहुतेक सारी स्वप्ने फक्त आणि फक्त कुवेत मुळेच शक्य झाली. ब्यांकेचे कर्ज फेडले, मित्रांची देणी दिली, गावात घर झाले, जे मला शक्य झाले नव्हते ते अमेरिकेतील शिक्षणाचे स्वप्न मुलांच्या मार्फत पुरे केले ... आणि असे बरेच काही ...

कधी कधी वाटते ... या कुवेतचे आणि आपले काही तरी पूर्व जन्मीचे कृनानुबंध असावेत ... त्या शिवाय काय कुवेत ने माझ्या आयुष्याला एवढा आधार दिलाय?

दिलीप सावंत 

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

याची देही याची डोळा … … … अनुभवली वारी

पांडुरंग … … कमरेवर हात ठेऊन आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी आसुसलेला सावळा विठ्ठल! ह्या विठू माऊलीचं रूप लहान असताना अगदी जवळून काकड आरतीच्या वेळी निवांतपणे न्याहाळले आणि मनात साठवून ठेवले होते. दर वर्षी जून जुलैमध्ये सुट्टीत भारतात गेलो की पंढरपूरची वारी, दिवे घाटातले फोटो, वारकऱ्यांचे अनुभव आणि आयुष्यात एकदातरी वारी करावी अशा प्रतिक्रिया ऐकायचो. 

गेल्यावर्षी सुट्टी संपवून परत कुवेतला येतांना मी आणि सौ ने ठरवलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनीही पायी पंढरपूरची वारी करायची. डिसेंबर मध्ये पुढील वर्षाचे सुट्टीचे नियोजनही आषाढी एकादशीची तारीख बघून केले. माझ्या मित्राची (श्री गिरीश टेमगिरे;पुणे) आई नित्य नेमाने वारी करत असे, त्यांच्याकडे आमची इच्छा बोलून दाखवली तर त्यांनी खूपच प्रोत्साहन दिले, एवढे करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांच्या दिंडीत आमचे नाव नोंदवले आणि दिंडीतल्या नेहमीच्या सगळ्यांना आम्ही येणार असल्याचे आणि आमची योग्य काळजी घेण्याचेही सांगितले.
 
झालं ! आधीच इथे दिवस फार झर झर सरतात,त्यातून वारीचे वेध लागले होते, बघता बघता एप्रिल मे कधी आला कळलंच नाही. वारीची तयारी म्हणजे खूप चालण्याचा सराव, आम्ही रोज चालण्याचे खूप ठरविले पण… … कुवेतचे बेभरवश्याचे हवामान! ह्या वर्षी इथे उन्हाळ्यात जास्तच धुळवड झाली आणि सराव काही झाला नाही. सुट्टीच्या नेहमीच्या खरेदी बरोबर ह्या वर्षी वारीची खास खरेदी झाली, अगदी राहुटी (तंबू) घेण्याचे ठरले पण त्याची सोय असते हे कळल्यावर बारगळले. बेडिंग, विविध प्रकारची ब्यान्डेजेस,मलम असे सगळे घेतले. मित्राला (गिरीशला) फोन करून वारीचा संपूर्ण प्रोग्राम, काय आणायचे ? काय नाही? हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पण एकच उत्तर, "अरे सगळी सोय केली आहे,तुम्ही भारतात आलात की पुण्याला या, मग तुम्हाला दिंडी चालकांशी भेटवतो, काही काळजी करू नका". वारी साठी आम्ही या वर्षी मुलांची शाळा चार दिवस बुडवली आणि भारतात दाखल झालो. मुलांना आईच्या ताब्यात दिले, मुलगा "ओम" मोठा असल्याने आणि आजीची सवय असल्याने त्याची काहीच काळजी नव्हती (किंबहुना, मनसोक्त हुंदडायला मिळणार म्हणून तो खूष होता) पण मुलगी देवी (वय ६ वर्षे) प्रथमच आम्हा दोघांना सोडून राहणार होती. वारीला निघण्याच्या आदल्या रात्री देवीने अगदी काकुळतीने "तुमच्या पैकी एकाची वारी रद्द नाही का करू शकत?" असे विचारले कशीबशी तिची समजूत घातली आणि वारीच्या आधी दोन दिवस पुण्याला जाऊन आमचे दिंडी चालक श्री शिवाजीराव कराळे (त्यांना सगळे अण्णा संबोधतात) ह्यांची भेट घेतली. अनिवासी भारतीयांच्या (बिघडलेल्या) सवयींमुळे अण्णांना आमचे पायी वारीला येणे जरा 
अप्रूप वाटले. त्यांनी कल्पना दिली की नुसतेच ठरवले म्हणून वारी पूर्ण करण्या एवढी सोपी नाही, चालायचा सराव आहे का? कुठेही ,कसेही राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची आणि शरीर विधी उरकण्याची तयारी आहे का? नसेल तर यायचा अट्टाहास नको. आम्ही दोघांनी मनाची पूर्ण तयारी केली होती ( तनाची करू शकलो नव्हतो) त्यांना आमचा इरादा पक्का असल्याचे सांगितले. अण्णांनी एक सल्ला दिला की,तुम्ही हडपसरहून वारीत या, कारण आळंदी ते पुणे आणि मग पुणे ते सासवड हे सलग दोन्हीही टप्पे मोठे आहेत तुम्हाला एकदम झेपणार नाहीत आणि कदाचित तुम्ही वारी मधेच सोडून द्याल . तसेही दिंडी तर्फे पुण्यात राहण्याची सोय नसल्याने आम्ही मामांकडे हडपसरला रहाणार होतो. मग ठरलं, आम्ही हडपसरहून वारीत यायचे. आमचे कपडे, बेडिंग असे जड मोठे सामान ट्रकमध्ये टाकण्यासाठी अण्णांकडे सुपूर्द करून आम्ही मामांकडे आलो.

११जुनला दुपारी ४ वाजता आळंदीत मंदिराचा कळस हलला, वारीस प्रस्थानाची अनुमती मिळाली आणि ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन लाखो वैष्णव निघाले सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला. ११ आणि १२ जूनचा मुक्काम होता आळंदीतच, आणि १३, १४ जूनचा पुण्यात भवानी पेठेत. आम्ही आधीच येऊन हडपसरला राहिल्याने कधी एकदा आधीचे मुक्काम संपून दिंडी हडपसरला येते? आणि आमची वारी सुरु होते ? असे झाले होते. अण्णांनी सांगितले होते १५ जूनला सकाळी ९ वाजता हडपसर गाडीतळावर आपल्या दिंडीत सामील व्हा. अण्णांना हल्ली एवढे चालणे झेपत नसल्याने ते ट्रक मध्ये बसून वारी आणि वारीचे नियोजन करतात. दिंडीतल्या एका दोघांचे भ्रमणध्वनी त्यांनी दिले होते, आमचा साधारण ९० जणांचा छोटा ग्रुप (कराळे ग्रुप) दिंडी क्रमांक १० (रथाच्या पुढे) चा एक भाग होता. वारीत सुरुवातीला मानाचा नगारा असतो, त्याच्या मागे मानाच्या २७ दिंड्या असतात ( माऊलींच्या रथा पुढच्या ) नंतर माऊलींच्या पादुका घेऊन आळंदी देवस्थानाची दिंडी असते आणि रथाच्या मागे साधारण २०० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीचा क्रमांक एका उंच दंडाला लावलेल्या पाटीवर दर्शविलेला असतो, पण आमच्या दिंडीला काही कारणाने अशी पाटी नव्हती . एकूण काय, एवढ्या लाखो लोकांमधून, कोणीही माहितीचे नसतांना, आपली दिंडी शोधणे हे एक दिव्यं होते. गिरीशचे भाऊ ,वहिनी हे दरवर्षी सासवड पर्यन्त चालत जातात मग ठरले की सासवड पर्यंत त्यांचे बरोबर जायचे आणि सासवडला ते आमची दिंडीतल्या लोकांशी भेट घालून देतील.

१५ जूनचा दिवस उजाडला, एक मोठे ध्येय समोर होते, मनात धाक धुक होती. मी वारकरयांचा पोशाख , पांढरा गुरुशर्ट, लेंगा आणि टोपी घालून तर गीता सोयीनुसार पंजाबी ड्रेस घालून तयार झालो. आत्तापर्यंत हडपसरचे रस्ते वाहनांसाठी बंद केल्याचे कळले होते. आमचे तीन मामा मोटारसायकल काढून जमेल तेवढे सोडतो म्हणून आम्हाला घेऊन निघाले. थोडे अंतर पार केले, प्रचंड जनसमुदाय माउलींच्या दर्शनासाठी गाडी तळाकडे जात होता, रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. पुढे गाडी जाणे मुश्कील झाले. आम्ही वेळेत गाडीतळावर पोहोचू की नाही?.... भर भर चालत एकदाचे गाडी तळावर पोहोचलो. अलोट गर्दी , मामांनी गीताला सांगितले मधूचा हात अजिबात सोडू नकोस नाहीतर परत शोधणे मुश्कील होईल. एवढ्यात ! नगारयाचा आवाज, माऊली! माऊली! S.....S....S चा घोष आमच्या कानावर आला, दुतर्फा गर्दी केलेल्या बघ्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पावित्रा घेतला. आम्हाला सासवड मध्ये दिंडीची गाठ घालून देणारे मित्राचे बंधू श्री प्रदीप टेमगिरे भेटलेच नाहीत. भक्तांचा सागर म्हणजे काय ते आवक होऊन बघत होतो, ह्या लाटेत आपणही सामील व्हायचे आहे तेही आपली दिंडी आणि त्यातले कोणीच परिचयाचे नसतांना.... बघता बघता माऊलींच्या रथा पुढच्या २७ दिंड्या निघून गेल्या आम्हाला आमची रथा पुढची दिंडी क्रमांक १० काही दिसली नाही आणि आम्ही मामाला सोडून कधी ह्या भक्तीच्या लाटेवर सवार झालो हे आम्हालाही समजले नाही. आम्ही दोघांनी आमची दिंडी शोधत पुढे जाण्याचे ठरवले, सारखा श्री प्रदीप टेमगीरेंना फोन करत होतो पण भेट काही होत नव्हती. आपली माणसे शोधत, कोठेही न थांबता आम्ही दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकीला पोहोचलो, आता मात्र आम्ही नगारयाच्या बरेच पुढे आलो होतो. आमचे मित्र श्री प्रदीप आम्हाल शोधात येत होते, माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी वडकीला विसावा होता मग आम्हीही तिथेच विसावलो. एक मुलगी आणि तिचा सहकारी ह्या विसाव्याला झर झर संस्कार भारतीची रांगोळी घालतांना दिसले. काही मिनिटात त्यांनी माऊलींच्या पालखीच्या मार्गात रांगोळीच्या सुंदर पायघड्या घातल्या. त्यांच्याशी बोलल्यावर समजले, ते आळंदी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक दर्शनाच्या विसाव्याला अशा रांगोळ्या घालणार आहेत आणि खरंच आम्ही वारीत प्रत्येक विसाव्याला, वारीच्या पुढे पोहोचून रांगोळ्या घालण्याची त्यांची धावपळ आणि सुंदर रांगोळ्या बघितल्या. आमचा उत्साह आणि सगळा माहोल बघून माझ्या दोन मामा, आणि माम्यांनी मुलांसह सासवड पर्यन्त यायचे ठरविले आणि ते वड्कीला आम्हाला भेटले. केवळ भ्रमणध्वनी मुळे काही वेळाने श्री प्रदीप ह्यांची गाठ भेट झाली आणि आता आपली दिंडी आणि त्यातले सहचारी भेटणार ह्या विचाराने जीव भांड्यात पडला ! आम्ही श्री प्रदीप ह्यांचे बरोबर दिवे घाट चढायला सुरवात केली. उन्हाचा तडाखा, घाटाचा चढ आणि अनुभवाअभावी पाठीवर घेतलेली जड स्याक, क्यामेरे...चालणे कठीण वाटत होते पण वारीचे वारे डोक्यात भिनले होते. दिवे घाटातले वारकऱ्यांच्या गर्दीचे दरवर्षी वृत्तपत्रात येणारे फोटो डोळ्यापुढे आले, कित्येक पत्रकार , वृत्त वाहिन्यांची ही दृष्ये टिपण्या साठी चाललेली धडपड आणि आज आम्ही स्वतः या वारीत असल्याचे जाणवून स्वतःचेच कौतुक वाटत होते. मध्ये कोठेही न थांबता आम्ही घाट माथा गाठला. उन्हामुळे खूपच दमछाक झाली होती, जरा वेळ विश्रांती घेऊन पुढे सासवड कडे निघालो. काही लोक सासवड कडून उलटे दिवेघाटाकडे जात होते, असे कळले की माऊलींचे स्वागत करून गावात आणण्या साठी काही सासवडकर जात होते. वारीचा आज आणि उद्याचा असे दोन मुक्काम सासवडला होते. आम्ही अजूनही आमच्या दिंडीत सामील झालो नव्हतो, श्री टेमगिरे कुटुंबीय सासवडहून पुण्याला परतणार होते आणि रात्रीच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी आमची दिंडी शोधणे भाग होते. संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते. पुन्हा एकदा नगरा दुमदुमला, माऊली! माऊली! गजर झाला , सासवडकरांची दर्शनासाठी धूम उडाली आणि श्री प्रदीप ह्यांनी आम्हाला आमच्या दिंडी क्रमांक दहा (रथाच्या पुढे)च्या हवाली केले. दिंडीतल्या सहाचरयांनी क्षणात मला एका लाईन मध्ये येण्याच्या आणि गीताला महिलांच्या लाईन मध्ये जाण्याच्या सूचना केल्या, जागा करून दिली आणि आम्ही एका शिस्तबद्ध, तालात , माऊलींचा गजर करत जाणारया दिंडीचा भाग झालो. पांडुरंग! पांडुरंग!! ... … … लाखो लोकातून आपली दिंडी शोधून त्यात सामील होण्याचे एक मोठे दिव्य श्री टेमगिरेन मुळे शक्य झाले होते. आता पुढचे पंधरा दिवस पंढरी पर्यन्त हेच आमचे कुटुंब असणार होते.

वारी मुक्कामाच्या ठिकाणी आली की माऊलींच्या रथा पुढच्या आणि काही मागच्या दिंड्या एखाद्या ठरलेल्या मोठ्या पटांगणात जमतात. सासवड मध्ये पुरंदर हायस्कूल च्या पटांगणात आम्ही पोहोचलो, हजारो ग्रामस्थ दर्शन आणि आरती साठी गोल रिंगण करून बसले होते. रिंगणाच्या बाहेर माऊलींच्या पालखीचा मार्ग असतो आणि त्या बाहेर दिंडीतील वारकरी उभे राहतात. सासवड हे आमच्या साठी पहिलेच मुक्कामाचे ठिकाण होते. आम्हाला माऊलींचे आगमन , आरती आणि काय, काय प्रथा असतात ह्याचे कुतूहल होते. आम्ही पटांगणात जाऊन जागा घेतली एवढ्यात पालखी आली. हजारोंच्या मुखातून पुन्हा माऊली! माऊली! चा गजर झाला, सगळे लोक पालखीला हात लावायला आणि मग पालखीच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी धडपडत होते. माऊलींची पालखी आळंदी देवस्थान आणते. देवस्थानाचे चोपदार वारीची शिस्त राखत असतात, किंबहुना वारीचे असे अलिखित नियम आहेत जे सगळे वारकरी पाळतात. ह्या हजारो लोकांनी भरलेल्या पटांगणात चोपदारांनी त्यांचा चांदीचा दंडक उंचावला मात्र.........सगळे पटांगण शांत! एका दिंडीच्या वारकरयांनी पुन्हा पखवाज आणि झांजा वाजवण्यास सुरवात केली, कुणा दिंडीचे काही गाऱ्हाणे असल्यास असे करतातअसे समजले. ह्या दिंडीचे गाऱ्हाणे होते की सासवड मध्ये आगमनाच्या वेळी काही तरुण ग्रामस्थांनी अपशब्द बोलून काही वारकऱ्यांना धक्का बुक्की केली होती. चोपदारांनी त्यांची कार्यवाही केली ,मग हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तू आणि व्यक्ती ह्यांची घोषणा झाली, माऊली आपला मुक्काम कधी , किती वाजता तेथून हलविणार हे घोषित केले शेवटी माऊलींची आरती. आता सगळ्यांची आपआपल्या मुक्कामी पोहोचण्याची गडबड सुरु झाली. सासवडचा आमच्या दिंडीचा मुक्काम होता शिक्षकांच्या 'गुरुकुल' वसाहतीतील दाते ह्यांच्या बंगल्यात. चला! पहिला मुक्काम तर छान बंगल्यात होता. भजन झाल्यावर जेवून सगळ्यांनी पथाऱ्या पसरल्या. जास्तच थकल्यामुळे आणि केवळ सतरंजीवर झोपायची सवय नसल्याने झोप लागत नव्हती. माझ्या आणि सौ गीताच्या मनात एक क्षण विचारही आला " कशा साठी हे श्रम करत तंगडतोड करायची? बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना शेतात काम करण्याची, चालायची, वारीची सवय आहे. आपण बघू जर पाय बरे झाले तर पुढे......... नाहीतर सरळ उद्या सकाळी घरी निघू". पुरुष आणि महिलांची राहण्याची सोय वेगळी वेगळी असते, आम्ही एकमेकांना थकल्या बद्दल आणि परत जाण्याबद्दल काहीही बोललो नाही. पांडुरंगाने आम्हाला वारी घडवण्याचे मनावर घेतले होते, सकाळी लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ केली आणि सगळा शीणवटा गेला, आपण काल तीस किलो मीटर चाललो हे अजिबात जाणवत नव्हते. सगळ्यानी सांगितले वारीची हीच खासियत आहे, तुम्ही फक्त प्रपंच मागे टाकून वारीला निघा ...पुढची सगळी काळजी पांडुरंग घेतो, तो रात्री येऊन भक्तांची सेवा करतो..पाय चेपून देतो. खरचं आमचे पुढे जाणे अनाकलनीय होते. वारीचा मुक्काम सासवडला दोन दिवस होता, दुसऱ्या दिवशी ह भ प श्री बाबा महाराज सातारकरांचे प्रवचन अगदी समोर बसून ऐकण्याचा योग आला. संध्याकळी हरिपाठ आणि भजन हे नित्यनेमाने होत असे. दिंडीतल्या सगळ्यांची भजने, हरिपाठ, अभंग,ञानेश्वरी , गीता, संतवचने, गोष्टी असे सगळे तोंडपाठ ऐकल्यावर आपल्या खुजेपणाची जाणीव वेळो वेळी होत होती. सासवड मध्ये दाते कुटुंबियांनी अतिशय आगत्याने सगळ्यांची उत्तम सोय केली होती. काही सोबती तेथून परत गेले तर काही जण तिथून वारीत सामील झाले.

माऊलींनी सकाळी जेजुरी कडे प्रस्थान केले. सगळे वारकरी वारीच्या रस्त्यावर जाऊन दुतर्फा वाट बघतात आणि आपल्या दिंडीचा नंबर आला की वारीत सामील होतात, आम्ही जेजुरीकडे निघालो. सकाळचा आणि दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी डोंगरावरचे खंडोबाचे मंदिर दृष्टीपथात आले, आम्ही जेजुरीत पोहोचलो. रस्त्यात दुतर्फा भाविकांची गर्दी होती, जेजुरीकरांनी भंडारा उधळत ढोल ताश्यांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. माऊलींची आरती झाल्यावर पुढे तीन चार कि .मी चालल्यावर एकदाचा मुक्काम आला. राहुट्या टाकून झाल्या होत्या, आम्ही डीझेल जनरेटर आणि वायरिंग केले,राहुट्यांमध्ये बल्ब लावले. कोणी दात्याने ह्याच वर्षी आमच्या दिंडीला जनरेटर दिला होता , त्यामुळे लाईट आणि मुख्य म्हणजे भ्रमणध्वनी पुनर्भारीत करणे शक्य झाले होते. जेजुरीचा मुक्काम पंढरपूरच्या हमरस्त्याला लागून होता, आजू बाजूस इतरही दिंड्यांच्या राहुट्या होत्या. सगळा माहोल बघून विवंचनेत पडलो, उद्या सकाळचे काय? शरीरविधी उरकायचे कुठे? एक दोघे जाऊन परिसराची टेहाळणी करून आलो. हरिपाठ . भजन ,भोजन केले आणि अंथरूण पसरले. राहुटीमध्ये हा पहिलाच मुक्काम, ढेकाळलेली जमीन, पातळ , आपल्या शरीरापुरते अंथरूण आणि वारकरयांमुळे सतत वाहता रस्ता , झोप लागणे कठीण होते. वारीच्या दिंड्यांमध्ये नसलेले भाविक आपल्याला झेपेल तसे आणि त्या वेळी चालतात, असे जाणाऱ्यांची संख्याही दिंड्यांमधून जाणारया वारकरयान एवढीच असेल. पहाटे तीन वाजता उठून सगळे विधी उरकले, थंडगार पाण्याने ट्यांकर खाली अंघोळ केली,बेडींग आणि राहुट्या गुंडाळून ट्र्क मध्ये टाकले. ट्रकला सगळे समान घेऊन साडेचार पर्यंत निघणे भाग असते नाहीतर एकदा दिंड्या निघाल्या की रस्ते वाहनांसाठी बंद करतात आणि ट्रकला तर पुढे जेवणाच्या मुक्कामी जाऊन स्वयंपाक करायचा असतो. आपले समान गेले की प्लास्टिक पेपर च्या इरल्यावर उघड्यावर पडून नाहीतर बसून उजाडायची वाट बघायची आणि पाच साडे पाच वाजता पुन्हा निघायचे पुढल्या मुक्कामाच्या........ आता वाल्हे गावाच्या दिशेने.

हरिनामाचा गजर, हरिपाठ म्हणत, रस्ता काटत होतो, ठीक ठिकाणी चहा , नाश्ता, फळे ह्यांचे वाटप चालू होते. वारीस दिंडीतून येणारे वारकरी केवळ दिंडीतील आहार घेतात अशा वाटपांकडे ते जात नाहीत. दिंडीत नसलेल्या वारकऱ्यांची जेवणा-खाण्याची सोय होते, पण जागो जागी खूप प्रमाणात होणाऱ्या वाटपांमुळे अन्नाची नासाडी होते असे वाटते, ह्यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. वारीच्या संपूर्ण मार्गालाच जत्रेचे स्वरूप आलेले असते, गावागावातील लोक दर्शनासाठी उभे असतात, फेरीवाले, उपहार गृह जशी जशी वारी पुढे जाते तसे तसे पुढे जाऊन दुकानं थाटतात. बाटलीबंद पाणि आणि उर्जाचे थंड ताक ह्याने रणरणत्या उन्हात आमची तहान भागवली. संध्याकाळी आम्ही वाल्हे गावात पोहोचलो, वाल्मिकी ऋषी झालेल्या वाल्याकोळ्याचे हे गाव. माऊलींची पालखी गावातून प्रदक्षिणा घालून मुक्कामाच्या ठिकाणी आली. आम्ही वाल्मिकी ऋषींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.आमच्या राहुट्या ह्या ठिकाणापासून अजून दोन तीन कि. मी लांब एका खडकाळ टेकडीवर होत्या, ही जागा मस्त होती, विस्तीर्ण टेकडीवर दिंड्या लांबलांब उतरल्याने , सकाळची चिंता नव्हती. राहुट्या, जनरेटर सगळी जमवाजमव करून हरिपाठ , भजन सुरु झाले, सोसाट्याचा वारा आणि उडणारा फोफाटा जेवतांना त्रास होत होता. आमच्याकडचे बाटलीबंद पाणि संपले , दिवसभराची चाल कमी झाली म्हणून की काय ? परत चार पाच कि. मी पायपीट करून पाणि आणले. दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपलो आणि तीन-चार तासात उठ्लोही, भागच होते! 

सकाळी मुक्कामापासून हमरस्त्या पर्यंत अंतर कापून वारीत सामील झालो. आता आजचा मुक्काम लोणंद , जेवणा अगोदर नीरयाला पोहोचलो, नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले. आम्ही पुणे जिल्हा पार करून सातारा जिल्ह्यात आलो होतो. संध्याकाळी लोणंदला पोहोचलो. इथे दोन दिवस मुक्काम होता. राहुट्या रस्त्याच्या जवळ आणि आजूबाजूला वेड्या बाभळीचे रान होते. दुसऱ्या दिवशी उठून आमच्या दिंडीतील श्री घाडगे ह्यांच्या ओळखीने माऊलींच्या पादुकांचे छान दर्शन घेतले, आळंदीच्या मंदिरातील मुख्य विणेकरी श्री नरहरी बुवा ह्यांचे प्रवचन व नंतर त्यांच्या बरोबर प्रसाद घेण्याचा योग इथे आला.

लोणंद हून निघालो तरड गावाला आज आम्ही चांदोबाचा निंब येथे पहिले उभे रिंगण बघणार होतो. चांदोबाचा निंब जसे जवळ आले तसे रस्त्यात खूप गर्दी वाढू लागली. वारीची पहिले उभे रिंगण , सगळे दिंडीकरी रस्त्यात दोन्ही बाजूला उभे राहिले , वारकऱ्यांचे खेळ, फुगड्या झाले, देवस्थानचे चोपदार येऊन व्यवस्था बघून गेले. माऊली! माऊली! गजर झाला आणि माऊलींचा अश्व वारीच्या सुरुवाती पासून माऊलींच्या पालखी पर्यंत आला, मन झुकवून दर्शन घेतले, प्रसाद खाल्ला आणि परत सुरुवातीला गेला अन पुन्हा एकदा अशीच चक्कर मारली. ह्या अश्वाला हात लावण्यासाठी आणि नंतर त्याच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी आणि बघे ह्यांची एकच धूम उडाली.

तरड गावच्या पुढचा मुक्काम होता फलटणला श्री लोंढे पाटील यांच्या बंगल्यात. आत्तापर्यंत रणरणत्या उन्हात चालून चालून रापलो होतो, नाकाची, कानाची, हातावरील त्वचा करपून निघत होती, तळ पायाला फोड आले होते. बंगल्यात पोहोचल्यावर कित्येक दिवसांनी घरात आलो आहोत असे वाटत होते, घराची खरी किंमत कळत होती. चार भिंतींच्या आत विधी आणि अंघोळ करण्याचे सुख काही औरच होते. श्री लोंढे पाटलांनी खूपच छान सोय आणि पाहुणचार केला, आम्ही सगळे अंघोळी करून पाणि संपवून निघालो, त्यांच्या घरच्यांना मात्र पाणि येण्याची वाट बघावी लागणार होती.

ह्याच्या पुढचे वारीचे मुक्काम होते बरड आणि नंतर नातेपुते. बरडहून नातेपुतेला जातांना आम्ही सातारा जिल्हा पार करून सोलापूर जिल्ह्यात आलो होतो. रस्त्यात आपल्या ९० वर्षे वयाच्या आईला खांद्यावरून वारी घडवणारा आजच्या युगातील श्रावणबाळ भेटला.

नातेपुते ते माळशिरस च्या मुक्कामात सदाशिव नगरचे पहिले गोल रिंगण होते. प्रत्येक दिंडी धावत धावत रिंगणात प्रवेश करत होती , धावायची सवय नसल्याने आमची दमछाक झाली, मग खेळ, फुगड्या, उंच उड्या, मनोरे ह्या सगळ्यात वृद्ध वारकरीही भाग घेत होते, एवढे चालून आल्यावर त्यांच्यात कुठून शक्ती आणि जोर येतो? असा प्रश्न आम्हाला पडला. रिंगणाच्या मध्ये पालखी असते आणि त्याच्या बाजूला फक्त दिंड्यांच्या विणेकरयांना प्रवेश असतो. माऊलींच्या अश्वाने रिंगणात फेऱ्या मारल्या माऊली! माऊली! चा गजर झाला, पायीची धूळ मस्तकी लावली आणि वारकऱ्यांच्या अन विणेकरयांच्या खेळांना अजून जोर चढला.

माळशिरसचा मुक्काम संपवून आम्ही वेळापूरच्या दिशेने निघालो, वाटेत खुडूस फाट्याला अजून एक गोल रिंगण झाले. वेळापूरच्या प्रवासात धावाबावी येथे जोरदार पावसाने आम्हाला गाठले, प्रत्येकजण डोक्यावर प्लास्टीकचे इरले घेऊन चालत होता , सगळ्यांची इरली सारखीच होती त्यामुळे आपल्या दिंडीतल्या लोकांना ओळखणे कठीण जात होते, पण पाऊस लवकर थांबला. धावबावी ह्या ठिकाणी रस्त्यावर उतार आहे प्रत्येक दिंडी वरती थांबते आणि मग सगळे एकदम माऊलीमाऊलीचा गजर करत उतारावरून धावत येतात.

वेळापूर नंतर मुक्काम होता भन्डी शेगाव ह्या प्रवासात ठाकूरबुवाची समाधी येथे गोल रिंगण झाले. ह्याच मार्गात माऊलींची आणि संत सोपानदेव (सोपान काका) ह्यांची भेट होते. संत सोपानदेवांच्या पादुका पालखीतून काढून त्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घडवतात. मध्यंतरीच्या मुक्कामात महिलांच्या राहुटीत सकाळी उठल्यावर एका आजींच्या अंथरुणा खाली सापडलेले वाळवीचे वारूळ, पहाटे तीन वाजता अंघोळ करतांना अण्णांच्या पायावर विंचू सापडणे अश्या घटनाही अनुभवल्या.

झालं!!! आता पांडूरंगाच्या भेटीचे वेध लागले होते , भन्डी शेगाव ते वाखरी एकच मुक्काम बाकी होता. वाखरीच्या मार्गावर बाजीरावाची विहीर येथे उभेगोल रिंगण होते. आम्ही पुन्हा रिंगणात धावलो, फुगड्या खेळलो. इथेच झी २४ तास च्या वार्ताहराने आम्हाला प्रतिक्रिया विचारण्या करता हेरले आणि आम्ही कुवेतहून येऊन वारी करतो आहोत हे कळल्यावर आमची मुलाखत घेण्यासाठी झी २४ तास, ए बी पी माझा, आय बी एन लोकमत , टी व्ही ९, आणि सकाळ वृत्तपत्र ह्यांनी गर्दी केली. ही मुलाखत २८ जून ला दूरदर्शनवर दाखविली गेली आणि बातमी सकाळ (सोलापूर) वृत्तपत्रात आली. आमच्या दिंडीतील सगळे म्हणाले, बघा पांडुरंगाने वारी घडविली आणि गौरवही केला, खरचं आहे!

आमच्या दिंडीचा, वारीचा शेवटचा टप्पा....वाखरी, पण आता हे अंतर खूप लांब वाटत होते. वाखरीचा मुक्काम आला आणि पांडुरंगाने आम्हास वारी घडवल्याचे खूप समाधान वाटले, एक ईप्सित त्याने आमच्या कडून पूर्ण करून घेतले होते. पंढरपूर वाखरी पासून साधारण ३ कि.मी आहे,आमच्या दिंडीची पंढरपुरात मुक्कामाची सोय नसल्याने आम्ही वाखरीतच रहाणार होतो. दशमीच्या दिवशी आम्ही तुळजापूर, अक्कलकोट येथे गाडीने जाऊन आलो, गाडीने प्रवास करणे काही वेगळेच वाटत होते. २९ जूनला माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल झाली. आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी चालत जाऊन पंढरपुरात मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले, साधारण ७ लाख भक्त तिथे होते, त्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन होणे शक्य नव्हते. पांडुरंगाला भक्तांची आस लागलेली असते त्यामुळे तो ही दर्शन देण्यासाठी गाभाऱ्यात न राहता कळसावर येऊन बसतो असे म्हणतात. द्वादशीला उपवास सोडून आम्ही मुंबईकडे निघालो, गाडी आल्यावर आमचे हे मोठे कुटुंब निरोप देण्यासाठी जमा झाले, सगळ्यांचेच डोळे पाणावले, पुढच्या वर्षी नक्की परत या! निदान एक दोन टप्पे तरी करा! सगळे सांगत होते… … बघूया पुढची आषाढी एकादशी १८ जुलैला आहे… …
… … … पुढे पांडुरंगाची इच्छा!!! 
 
मधुसूदन.ज्यो.मुळीक , सौ गीता मधुसूदन मुळीक

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

अनाथांची माय



माय म्हणजे माई----- सौ .सिंधूताई सपकाळ. मी  सहावीत सातवीत असताना आमच्या शाळेत (राजर्षि शाहू    छत्रपती  विद्यानिकेतन    जि.प.कोल्हापूर ) त्यांना भाषणासाठी बोलावले होते. तेव्हा मी  त्यांना पहिले होते. तेव्हाच त्यांची संघर्षमय  कहाणी  ऐकली  होती.

त्यानंतर आता  खूप वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुताई  सपकाळ आमच्या चर्चेत आल्या.आम्हाला त्याच्या अनाथाश्रमासाठी काही देणगी द्यायची होती.कुवैतहूनच आम्ही त्यांचा पत्ता  मिळवला  होता.१८  ऑगस्ट ला  इंद्रायणीने  पुण्याला गेलो.ऑफिसमध्ये गेलो.तिथे  एक काका होते,त्यांनी बसायला सांगितले.आम्ही इकडेतिकडे बघत बसलो.पुरस्कारांचा खच पडला होता.ते नीट ठेवण्यासाठी  तिथे पुरेशी जागाही नव्हती .तेव्हा मला खूप हसू आले की,आपल्याला कधी काळी मिळालेले हातावर मोजण्या इतके पुरस्कार शोकेस मध्ये ठेवतो आणि तेही सर्वबाजूने लोकांना दिसतील असे.

एक छोटा मुलगा व  एक छोटी मुलगी बागडत आमच्या जवळ येऊन पावणे  आले पावणे आले असं ओरडत आत जाऊन आईला निरोप देऊन आले,व आई तयार होऊन येते आहे असा निरोप आम्हाला देत होते.मी उत्सुकतेने त्या मुलीला नाव विचारले तर तिने स्नेहल सिंधुताई सपकाळ असे सांगितले.तेव्हाच मला त्यांच्या मनात सिंधुताई  किती महत्वाच्याआहेत   ते कळले .कारण त्याच माईंनी   त्यांना  त्यांच्या नकळत्या वयापासून जीव लावला होता.संगोपन केले होते.थोड्या वेळाने आमचे चहापान  झाले.अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुताई बाहेर आल्या.आम्ही उभयतांनी त्यांना नमस्कार केला.हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी विचारले,का रे बाळांनो , काय  काम  काढलंत?कुठून आलात ?वगैरे वगैरे. आमचा येण्याचा  उद्देश कळताच त्यांना खूप आनंद झाला.कौतुक वाटले.आतून एक बाळ खूप रडत  असल्याचा आवाज आला.ते काही केल्या रहात नव्हत.एका मोठ्या मुलीने त्याला माईंकडे  आणून दिले. इतक खवळलेल ते बाळ त्यांच्या मांडीवर येताच हसायला लागलं.हुंकार  देऊन देऊन त्यांच्याशी बोलू लागलं.तेव्हा माईंनी त्या मायलेकरांची करूण कहाणी सांगितली,त्या दोघी  आत्महत्त्या करायला निघाल्या  होत्या.एका हितचिंतकाने फोन करून ही बातमी माईंना सांगितली.ताबडतोब माई तिथे पोहोचल्या आत्महत्तेपासून परावृत्त करून त्या दोघींना आश्रमात घेऊन आल्या.

मग आम्ही त्यांच्या बरोबर नविन आश्रम बघायला गेलो.त्यांनी पावतीवर सौ. सिंधुताई अशी सही केल्यामुळे मी त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारले.तेव्हा त्यांनी ते हयात असल्याचे सांगितले.पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच नव्यराने एके काळी त्यांना मुलगी झाली म्हणून घरातून हाकलले होते, गाईच्या गोठ्यात फेकून दिले होते. इवल्याश्या जीवाची नाळ दगडाने तोडून, त्या गाईच्या गोठ्यात राहिल्या. ज्या गायीच्या दुधाने बाळास जीवदान मिळाले, आणि ज्या गोठ्याने त्यांना आश्रय दिला त्याची आठवण म्हणून दीडशे गाईंचे गोसंरक्षण केंद्र सुरु केले. ह्या केंद्राचा कार्यभार त्यांचा नवरा सांभाळत आहे. तसेच त्यांची ती मुलगी सौ.ममता सध्या एका आश्रमाची जबाबदारी सांभाळत आहे.

गप्पांच्या ओघात आम्ही आश्रमाच्या जवळ आलो. अमेरिकेत भाषणा साठी गेले असताना तेथील लोकांनी दिलेल्या देणगीतून हा आश्रम उभा राहिल्याचे त्यांनी सांगितले. सन्मती बाल संगोपन ची ही वास्तू  तयार  झाल्यावरही मुलांना ह्या आश्रमात आणणे सोपे नव्हते, महाराष्ट्र राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची मदत दिली नव्हती पण परवानगी साठी मात्र एक  अट घातली आणि त्यानुसार माईंनी सरकारला लिहून दिले की, मी सरकारकडे कुठलेही अनुदान मागणार नाही, असा हा अजब सरकारी न्याय! आश्रमाच्या दारात त्या दिसताच आश्रमाचे कर्मचारी माईना सलाम करत होते. आश्रमात चाळीस -पंचेचाळीस मुले होती, त्यांनी लगेच रांग लावून घेतली आणि सिंधुताई गाडीतून उतरताच एक एक जण त्यांच्या पुढे नतमस्तक होत होते. हे दृश्य बघून खरंच डोळे पाणावले. चार माजली आश्रम सुनियोजित वाटला. लहान, मोठ्या मुलांच्या वेगवेगळ्या अभ्यासिका, तसेच बंक बेड सारखी त्यांची झोपायची सोय, संपूर्ण आश्रमाला असलेले कम्पाउन्ड , त्यात त्या मुलांची खेळायची सोय, मोठ्ठा देव्हारा आणि सतत तेवत राहणारा मोठा नंदादीप. आपली आई भाषणासाठी कुठे कुठे जाते, ती घरी सुखरूप परत येऊ दे म्हणून ही मुलंच  दिवा लावून प्रार्थना करतात असे त्यांनी सांगितले. पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांचे कपडे आश्रमात असलेल्या महिला धुतात शाळेत जाणारया मुलांना डबा करून देतात, पाचवी पासूनच्या मुलांना स्वावलम्बनाचे धडे म्हणून त्यांचे त्यांना काम शिकवले जाते. इथे टी.व्ही नाही तसेच लहान मुलांचा अभ्यास घेण्याची  जबाबदारी तेथीलच एका मोठ्या मुला कडे दिली जाते. त्यांच्या आश्रमातून शिकलेली बरीच मुले मोठ्या हुद्यापर्यंत पोहोचली  आहेत. आश्रमातील मुलींची  लग्ने लावून माई थांबत नाहीत, मुली जावयाचे सर्व वर्षसण, बाळंतपण एक खरीखुरी आई आपल्या लेकीसाठी करते किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर जास्तच या माई आपल्या लेकींसाठी करतात.

एक मुलगी तर लग्न होऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन परत आश्रमात आली आहे.या आश्रमाचा कार्यभार सांभाळण्यासाठी ते सेवा देत आहेत.याच्याही पुढे जाऊन ती मुलगी म्हणते की,या आश्रमाने मला एव्हढे  दिले की,मी सासरी रमू शकले नाही.त्यांचे भाषण चालू असताना हळूच व्यासपीठावर लहान अर्भक आणून ठेवतात ,असाही त्यांचा अनुभव आहे.तसेच आश्रमाच्या दारात रात्री अपरात्री बाळ आणून ठेवतात असं ही त्यांनी सांगितले.एकदा त्यांना एक तासाचे बाळ सापडले.ते काळेनिळे पडले होते.त्याला पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेऊन जगविले.तसेच एक बाळ मेलेल्या आई च्या कुशीत सापडले.त्यांच्या या ३२ वर्ष्यांच्या कारकीर्दीत त्यांनी सांभाळ केलेल्या मुलांपैकी एकही मूल दगावलेले नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

सद्ध्या सिंधुताई ६५ वर्ष्यांच्या आहेत.पण त्यांचे हे कार्य तिथे जाऊन बघणाऱ्यांना खरच अचंबा  वाटण्यासारखे आहे.स्वतःची करुण कहाणी आणि मनाची दांडगी हिम्मत यांच्या जोरावरच हा सर्व डोलारा त्यांनी उभा केला आहे.

शेवटी सिंधुताई सपकाळ सर्वांना कळकळीने सांगतात की,"मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा !!!"

सौ गीता. मधुसूदन. मुळीक  

शुक्रवार, ८ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग- ८)

वाड्यात आमच्या बिल्डींग मधले इतर शेजारी होते लेले, दिवाण, भिडे आणि रामचंद्र व वसंत पळसुले हे बंधू. दिवाणांकडच्या एका घटनेने आम्हा भावंडांना नवीन काम लावून दिले. त्यांच्या प्रकाशचे लग्न होते, ते सगळे बाहेर गावी असताना रात्री त्यांचे घर फोडले, बराच ऐवज चोरीस गेला. ह्या चोरी नंतर वाड्यातले कोणीही घर बंद ठेवून गावाला निघाले की आम्हाला "सुपारी" द्यायचे. अहो "सुपारी" झोपायची, घर सांभाळायची. सुरुवातीला अण्णा जायचा. तो नोकरीला लागल्यावर मी जायला लागलो. असे जवळ जवळ सगळ्यांच्या घरात मी झोपलो आहे. ह्यात पण व्यक्ती तितक्या प्रकृती! काही जण सांगायचे, 'घरात फ्रीज मध्ये फळं आहेत, खा तुला हवी तर', काही जण फ्रीजला कुलूप लावायचे, असे बरेच अनुभव आले.

हनुमान स्टोअरवाले 'भिडे' हेही आमचे शेजारी, त्यावेळी हनुमान स्टोअर हे स्टेशनला लागून असलेले प्रसिद्ध दुकान होते. त्यांच्याकडे सगळ्या वस्तू मिळायच्या आणि अशी दुकानं डोंबिवलीत तेंव्हा फार थोडी होती. भिड्यांचा राजू फार तडतड्या होता, बाबांना खूप घाबरायचा. त्याने मस्ती केली की त्याचे बाबा त्याला उचलून दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून 'खाली टाकेन' म्हणून लटकवत धरायचे. राजूच्या आई खूप साध्या होत्या, त्यांना भिडे काका कायम अक्का (अक्काबाई) म्हणूनच बोलायचे.

वाड्याच्या गेट जवळ, एका छोट्या लाकडी खोपटात तारे काका रहायचे. वाकेन पण मोडणार नाही! अशा स्वभावाचा हा माणूस. ते सुतारकाम करायचे, परिस्थिती कठीण म्हणावी अशीच. त्यांचा घटस्फोट झाला असावा, ते वाड्यात आणि बायको अंबरनाथला रहायची. तारे काकांनी हट्टाने मुलींचा ताबा घेतला होता. पिंकी आणि मनी ह्या मुली, पिंकी माझ्या पेक्षा ५-६ वर्षांनी लहान आणि मनी त्याहून. तारे काकांना कसला ताठा होता माहित नाही, ते त्यांच्याच तोऱ्यात असायचे. बिचाऱ्या मुली! ना बालपण अनुभवता आले ना कधी त्यांचे लाड झाले. त्या शाळेतही गेल्या नाहीत, पण बहुदा घरी त्यांच्या त्या शिकत असाव्यात, त्यांना लिहिता वाचता यायचे. पिंकी अगदी लहान असल्यापासून घरातली सगळी काम करायची, आणि मनी तिला मदत करायची. परिस्थितीने दोघींना लहानपणीच खूप मोठं केलं होतं. दसरा दिवाळीलाही ना गोड धोड, ना नवीन कपडे, दया यायची आणि आम्हीच फराळाचे वगैरे द्यायचो. त्या दोघी आमच्याकडे टी.व्ही. बघायला यायच्या, त्याही घाबरत घाबरत, त्यांना तारे काकांनी खूप धाकात ठेवले होते. आम्ही काही खायला दिले तर भीतीने खूप आग्रह केला तर घ्यायच्या, पण खुश व्हायच्या. त्यांना इतर मुलां प्रमाणे कपडे, खेळणीच काय, मुलभूत असे शिक्षण, आईचे प्रेमही मिळाले नाही. त्यांची आई शिक्षिका होती, चार पाच वेळा त्यांना भेटायला आल्याचे बघितले होते. असे म्हणू नये, पण मुलींचे सुदैव ! पुढे तारे काका आजारी पडले आणि त्यातच गेले. मुलींचे दिवस फिरले, आई त्यांना आपल्याकडे घेऊन गेली. मुलींना शाळेत घातले, बहुदा पिंकी ने बाहेरून दहावी केली असावी. दोन तीन वर्षात तिचे लग्न झाल्याचे कळले.

अजून अशीच एक लक्षात राहिलेली व्यक्ती म्हणजे, सुरवातीच्या भागात उल्लेख केलेल्या मालकांच्या बंगल्याच्या जिन्याखालचा भाडेकरू 'मल्लू'. तो लक्षात आहे एका अजब घटनेमुळे. मंडळी, माणसाचं मरण कसं, कधी, कुठे येईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात. अगदी ते ही अनुभवलं ह्या वाड्यात. झालं काय तर ह्या मल्लूची म्हातारी आई आली होती गावाहून, कन्नडहून. वाड्यात आमची बिल्डींग, मध्ये विहीर आणि पलीकडच्या बाजूला नारळाच्या झाडाचा पार होता. मल्लूची आई उन्हाला ह्या पारावर बसली होती. एका नारळाने तिचा घात केला, तो झाडावरून पडला तो बरोबर तिच्या डोक्यावर, आणि मल्लूची आई तिथल्या तिथे गेली. काय काय पाहिलंय? मालकांचा नोकर मोहन, त्याचे रोज दारू पिऊन बायकोशी भांडण, ह्या भांडणाला वैतागून एक दिवस तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले, आणि तशी पेटलेली जोर-जोरात ओरडत घरातून अंगणात धावत आली. सगळेच घाबरले, तिचा दीर कृष्णा आणि मोहन ने तिला पकडून विझवले. पुढे ती वाचली, मोहनचे पिणे ही थोडेफार कमी झाले. मुलं शिकली, नोकरी व्यवसायाला लागली.

मंडळी माझ्या सदराच्या ह्या सरत्या भागात काही गोष्टी नव्याने आठवत आहेत. विहिरीत गळ टाकायची मजा! वाड्यातल्या विहिरीत बादली पडली की हा गळ टाकून ती शोधायची. बरेचदा बादली गळाला लागयचीही. विहीरीचं पाणी खराब झालं म्हणून पंप लावून पूर्णपणे उपसलेलीही बघितली आहे, तेंव्हा विहिरीचे जिवंत झरे बघितले होते आम्ही भावंडांनी शेण गोळा करून घरा मागचे अंगण सारवले आहे. मालकांच्या काकी, त्यांचे काहीश्या आजाराने कायम उचक्या देणारे वयोवृद्ध काका, लेले आजी त्यांच्या घरात आलेले बुवा, वसंत काकांचे रमी आणि ब्रिजचे डाव त्यांच्या सौ. शीला वाहिनींचे भजनी मंडळ, आमच्या बरोबर वरती राहणारे पळसुले काका, त्यांचे अचानक जाणे, मुलाने कलेवराचेही काढलेले फोटो, वाड्यातले खूप जुने भाडेकरू अध्यापक, घर काम मागायला येणारी, शेवग्याच्या शेंगा विकणारी जंगली, मोहन खोबरे आणि आगरथडे ही कुटुंब सगळे काही आठवते आहे.

वाडा माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग तर आहेच पण त्याच बरोबरीने आमच्या मागची अंबिका बिल्डींग आणि त्यातले गुर्जर, आशा मावशी, बच्चा काका ह्यांचाही सहभाग मोठा आहे. खूप इच्छा असूनही जाणीवपूर्वक हे सदर मी वाड्यापुरतं मर्यादीत ठेवले आहे. ह्या "वाडा आठवणींचा" ने मला पुन्हा एकदा बालपणात नेले. साधारण तीस वर्षापूर्वीचा काळ, व्यक्ती मी आत्ता नव्याने अनुभवल्या. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या एका साधारण माणसाचे बालपण कागदावर उमटले. माझे मला समाधान मिळाले.

माझ्या या साप्ताहिक सदर लिहिण्याच्या प्रयत्नाला खूप जणांचा हातभार लागला. सौ ने त्रागा न करता लिहिण्यास फुरसत दिली, टंकलेखन केले, 'काही ही काय लिहिता' म्हणून पाय ओढले नाहीत. भावंडांनी, वाड्यातल्या काही शेजाऱ्यांनी खूप प्रोत्साहन दिले, काही आठवणी जाग्या करून दिल्या. मंडळाने माझे सदर प्रकाशित करण्याचा धोका पत्करला. विशेषतः कार्यकारी समितीतील सौ. दीपिका जोशी आणि सौ. स्मिता काळे ह्यांनी लेखनातील चुकून राहीलेल्या चुका दुरुस्त केल्या, वाचकांनी लेखी, फोनकरून, समक्ष भेटून प्रतिक्रिया दिल्या, प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे.

धन्यवाद!

(समाप्त)

मधुसूदन मुळीक
















शुक्रवार, १ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग-७)

मंडळी हल्ली आपण आपल्या आजू बाजूला कित्येक "कोषातली" कुटुंब बघतो. "कोषातली" म्हणजे, मी आणि माझं कुटुंब असे. स्वतःला आपल्याच कोषात गुरफटून घेतलेली. अशा लोकांनी स्वतःला आपल्याच कुटुंबातल्या तीन चार जणांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं असतं. आनंद उपभोगायचा, दुख वाटून घ्यायचं तेही अगदी आपल्याच कुटुंबात. आजू बाजूचे कसे आहेत?, कोणाची विचारपूस करावी हे काहीही नाही. कधी कधी विचार येतो, ह्यांना असं वाटतं का? की आपल्याला कोणाचीच गरज नाही आणि कधी लागणारही नाही, की खरंच त्यांना कोणाची गरज लागतच नाही! कधी कोणाकडे भेटले की देखल्या देवा दंडवत, "काय कसे काय?" पण भरभरून बोलणं, मन मोकळं करणं, काही गोष्टी सांगणं, विचारणं, सल्ला देणं/ घेणं नाहीच. आपण बरं अन्आपलं घर बरं, अशी कुटुंब हल्ली सर्रास दिसतात. असेच एक कुटुंब आमच्या वाड्यातही होतं बरंका! पळसुलेंचे शेजारी, वेदक. कुटुंबमोठं असुनही ह्याचं वागणं कोषातलं. बघा हं त्यांच्याकडे कोण कोण होतं ! भाऊ, त्यांची पत्नी भाभी, भाऊंचे लहान बंधु भाई; (भाईंची पत्नी आम्हीवाड्यात रहायला जाण्यापूर्वी बरीच वर्षे आधी गेल्याचे समजले होते) ह्या दोघांची मुलं मीना, अशोक, वंदना, शोभा, रंजना, दीपक, साधना, विवेक, मिलिंद, विकास, मेधा. हा क्रम चुकला असण्याची दाट शक्यता आहे कारण, एकतर हे सगळे वेदक "कोषातले" होते त्यामुळे फार बोलणे, घरी येणे जाणे नसायचे. दुसरे म्हणजे ही सगळी भावंडं माझ्या पेक्षा खूप मोठी होती, मला ह्या सगळ्यांची नावं लक्षात राहिली याचेही काहींना नवल वाटेल. वेदकांचे भाऊ कडक शिस्तीचे होते. घरात एवढी मुलं पण घरात कोणी खेळतंय, दंगा मस्करी चालू आहे असं कधीच बघितलेले आठवत नाही. वाड्यातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, मुलं कधी कोणाशी खेळायला आली आहेत, गप्पा मारत आहेत, कध्धीच नाही. कोण कितवीत आहेत, काय शिकत आहेत, कुठे नोकरी करतात सगळेच गूढ, कोषातले असल्याने कोणी भानगडीतही पडायचे नाही. त्यातल्या त्यात मेधा,विकास आणि मिलिंद ही धाकटी भावंडं कधी कधी बघून हसायची, जुजबी बोलायची. कोणाच लग्न ठरलं, नोकरी लागली अशा गोड बातम्याही घराच्या बाहेर गेल्या नाहीत. त्या काळी एखादा मुलगा अमेरिकेत शिकायला जातो म्हटल्यावर कोण गाजा वाजा व्हावा, पण वेदकांचा विवेक अमेरिकेत जाऊन जुना झाल्यावर बातमी फुटली. वेदकांच्या एका गोष्टीची खबर सगळ्यांना लागायची आणि वाड्यातली सगळी मुलं जमा व्हायची ती म्हणजे कलही लावणे. त्यांच्याकडे नेमाने कलही वाला यायचा, घरातली पितळेची भांडी, ताटं, डबे बाहेर अंगणात अवतरायची आणि कलही लावून चकाचक व्हायची. नुसत्या आठवणीनेही कोळशाचा आणि नवसागराचा वास आता सुद्धा जसाच्या तसा आला नाकात! पुढे हे सगळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत बंगला बांधून तिथे राहायला गेले, ते ही गुपचूप.

त्याकाळच्या वाडा संस्कृती मधले असे हे ‘कोषातले’ कुटुंब, कदाचित घरातल्या एवढ्या माणसांमुळे त्यांना बाहेरच्यांची कधी गरजच वाटली नसावी.

वाड्यातली सगळी कुटुंब तशी सुखवस्तू, मध्यम वर्गातली होती. भाटकरांचे कुटुंबही त्यातलेच. सुरेश, महेश,मंजू आणि अंजू ही त्यांची मुलं. भाटकर मामा रेल्वेत नोकरीला होते, त्यावेळी त्यांना काळजी वाटावी अशी होती ती केवळ त्यांची मुलगी अंजू. अंजूला सगळा वाडा "आवा" म्हणायचा. आवाला थोडंफार ऐकू यायचं पण बोलता यायचं नाही, ती मुकी होती. वाड्यातल्या सगळ्यांनी आवाला सांभाळून घेतले होते. तिची खाणा खुणांची भाषा लहाना थोरांना अवगत होती. आत्ता वाटतं, किती भाव,भावना, विचार असतात आपल्या मनांत, कसे व्यक्त करायचे एवढे सगळे शब्दांविना फक्त समोरच्याला कळतील अशा काही मोजक्या खाणाखुणांनी? तिनेही जमेल तेवढ्या भावना अशाच मांडल्या असतील, पण कित्येक भावना अव्यक्त राहिल्या असतील, कित्येकदा तिच्या हातवाऱ्यांकडे दुर्लक्षही केलं असेल. अशा कोंडलेल्या अवस्थेत, तिला घरात कोणी ओरडलं, फटकारलं की ती जोर जोरात भोकाड पसरून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरातून एकेका पायरीवर थबकत खाली उतरायची. अंगणात मधोमध उभी राहून मनसोक्त रडायची. मग आम्ही तिला विचारायचो काय झाले? कधी कधी सांगायची, कधी आमच्यावरही ओरडायची. आमच्या घरात नाहीतर ओट्यावर बसायची आणि शांत झाली की जायची परत घरात. तिला बोललेले (खुणांनी) सगळे कळायचे, ती मतिमंद नव्हती, काही वर्षे ती विशेष मुलांच्या शाळेतही जायची. गणवेश घालून शाळेत जातांना खूप ऐटीत मानेला , वेणीला झटका देत सगळ्यांच्या घराकडे, ‘आपल्याला कोणी बघतंय का?’ बघायची. शाळेत काही वस्तू केल्या की हौशीने आणून दाखवायची. आमच्या कडे रोज टी.व्ही. बघायला यायची. त्यावेळी भाटकर मामांना काळजी वाटावी अशी फक्त आवा होती असं मी आधी म्हणालो ते एवढ्यासाठी की पुढे पुढे त्यांच्या काळज्या वाढतच गेल्या.

साधरण काय होतं, आई वडील मुलांसाठी खूप कष्ट करतात, मुलांना काही कमी पडू नये म्हणून मन मारत दिवस काढतात. पुढे मुलं मोठी होऊन जमेल तेवढे शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागतात आणि कुटुंबाचे दिवस बदलतात, एखादं मूल अगदीच असामान्य निघाले तर दिवस फिरतातही. भाटकर मामांच्या बाबतीत घडले मात्र उलटेच, परिस्थिती बिघडतच गेली. कधी कधी देवही कसा एकाच कुटुंबाला वेठीस धरतो, नाही? सुरेश, महेश, मंजू ही वयाने अगदी एका मागोमाग, कोणीच फारसं शिकलं नाही. जेमतेम दहावी झाले असावेत. नंतर मोठा मुलगा सुरेश ह्याला कुठेतरी खाजगी नोकरी लागली. पैसा हातात आल्यावर सिगरेट दारूचे व्यसन लागले. कालांतराने व्यसनांपायी पगार कमी पडू लागला. घरात भांडणं तर रोजचीच झाली. हे सगळे बघून शेजारीपाजारी आपोआप दुरावले. सुरेश नंतर जुगारही खेळू लागला, अशातच त्याने नोकरीच्या ठिकाणी काही अफरातफर केली, पकडला गेला, कैद झाली. सुटून आल्यावर दारूच्या पूर्णपणे आधिन झाला आणि एक दिवस कीटक नाशक पिऊन सगळं संपवलं. हे सगळं होत असतांना एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे मंजूच लग्नं झालं. पण........ त्याच सुमारास भाटकर मामींना संधीवाताने ग्रासलं. त्यांचे सांधे आखडायला लागले, हालचाल करणे कठीण होऊ लागलं. खूप औषधोपचार केले पण कशाचाच गुण आला नाही, कशातरी पाय ओढत त्या चालायच्या,त्या एक एक पायरी उतरून शौचालयात यायच्या, पुढे पुढे तर त्या बसून जिना उतरायच्या, त्यांना बघून वाईट वाटायचं. सगळे भाटकर मामींच्या तब्येतीची काळजी करत असतांना, पुढचा धक्का ........ भाटकर मामा गेले. त्यांच्या जागेवर रेल्वेत महेशला नोकरी लागली. भाटकर मामींचा संधिवात वाढतच होता. त्या पाठीतही वाकल्या, चालणं जवळ जवळ बंदच झालं. महेश रेल्वेत स्थिरावला, लग्न केले.जरा बरे दिवस यावेत तर त्याचे, बायकोचे आणि भाटकर मामींचे एकमेकांशी पटेनासे झाले. रोज भांडणं, ह्या सततच्या भांडणामुळे महेश वेगळा राहू लागला. तरीही त्याचे आणि बायकोचे पटेना, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. महेशने दुसरे लग्न केलं. परत ये रे माझ्या मागल्या... सद्य परिस्थिती फारच करुणास्पद आहे. मोठी मुलगी मंजू हिचे पती संसार अर्ध्यावर सोडून गेल्याचे कळले. भाटकर मामी स्वतः उठून बसू शकत नाहीत, अंथरुणाला खिळून आहेत. आवा आता थकली आहे, खूप अशक्त झाली आहे, तिचेही वय पन्नाशीला आलंय. महेश वेगळाच राहतो. घरातली आवक म्हणजे बहुदा भाटकर मामांचे निवृत्ती वेतनच असावी. ज्या आवाला लहानपणी आईने हटकलं असेल तीच आवा आई होऊन त्याचं सगळं करते आहे. आम्ही वाडा सोडून बरीच वर्षे झाली, पण घर अजूनही ठेवले आहे. वाड्यात हल्ली जेव्हा जातो, आवा नेहमीप्रमाणे बाल्कनीत उभी राहून शून्यात बघत असते. मला बघितल्यावर निरपेक्ष आनंदाने हसते, तिच्या भाषेत, कसा आहेस? बायको, मुलं कशी आहेत? विचारते. खूप वाईट वाटतं तिच्याकडे बघून, दया येते, पुढे हिचे काय होणार असेही वाटते. खूप इच्छा होते वरती जाऊन आवाला, भाटकर मामींना भेटायची पण खरं सांगायचे तर त्या भग्नावस्थेतल्या घरात जाऊन भाटकर मामींना बघण्याचे धाडस होत नाही.

ह्या भागात एवढेच, तशीही अक्षरं पाणावली आहेत आणि मति सुन्न झाली आहे.

(ह्या भागातील काही नांवे बदलली आहेत)


(क्रमशः)


मधुसूदन मुळीक 

शनिवार, १२ मे, २०१२

काटकोन त्रिकोणाची महत्वपूर्ण भुजा - केतकी थत्ते


नाटकामध्ये वादग्रस्त भूमिका साकारणारी, वादातीत मस्त केतकी ! एका बाजूला डॉ. मोहन आगाशेंसारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मी तर दुसरीकडे अनुभवी, हरहुन्नरी संदेश कुलकर्णी यांच्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवू पहाणारी सर्वात छोटी कलाकार म्हणजे केतकी. तिच्या सौन्दर्याची मोहिनी फक्त मराठी जनमनावर पडली असे नाही तर कुवेतमधल्या दिग्गज कलाकारांवरही (Sr. Painter & Sculptor, आधुनिक विचारसरणीचे व पाश्चिमात्य वेशभूषा परिधान केलेले) हिची अशी काही छाप पडली की त्यांनी पूर्वपरवानगी घेवून हिच्यासह साऱ्या ग्रुपचे फोटो काढले, आपल्याबद्दलची माहिती दिली. झाले असे की Hotel Le Royal च्या बाहेर का.त्रि.च्या ग्रुपबरोबर पार्क केलेल्या गाडीची प्रतिक्षा करत आम्ही उभे होतो. तेथेच कॅफेच्याबाहेर हे उपरीनिर्दिष्ट कलाकार विचार विमर्षात गर्क होते पण जसे त्यांनी केतकीला 
पाहिले, त्यांना वेधून घेतले केतकीच्या आकर्षक भारतीय पेहेरावाने ! ही नजर होती कौतुकभरली, एका विशुध्द कलाकाराला हवे हवेसे काही गवसलेली ! अगदी निर्मल ! त्यानंतर झालेल्या संभाषणात आधुनिक भारतीय पेहेराव व दागदागिन्यांमुळे ते कसे प्रभावित झाले याबद्दल ते भरभरून बोलू लागले आणि अर्थातच एक भारतीय म्हणून, मराठी कलाकाराचे कौतुक झालेले पाहून माझे मराठमोळे मन खूपच सुखावले, केतकीच्या या कौतुकाने मला झालेल्या आनंदात तुम्हा सर्वांनाही सहभागी करून घ्यावे म्हणून येथे लिहावेसे वाटले.

मोकळ्या स्वभावाची, Ice Cream व थंडगार दहीवडे खाल्ल्यावरही कोणतेही आढेवेढे न घेता सुश्राव्य गाणे म्हणणारी केतकी, प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद लुटणारी. रूप असूनही रुपगर्विता नसलेली, दिलखुलास बोलणारी, छोट्यांमध्ये छोटी होऊन जाणारी केतकी, सा रे ग म प मध्ये अंतिम पंचरत्नात निवड झालेली, मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत व Spanish या पंचभाषांवर प्रभुत्व असणारी सकलकलासंपन्न केतकी ! तिचे कौतुक न करण्याचा करंटेपणा कसा करावा ? तिचा वाढदिवस आज १२ मे ला आहे तेव्हा तिचे वर्णन करणारी व तिला शुभेच्छा देणारी ही कविता.........



नावासारखा केतकी वर्ण 
लाभली रूपसंपदा देखणी 
अभिनयकौशल्याला लाभे
ओघवती अस्खलित वाणी 

बालनाट्यानी अंकुरले गेले बीज
तयाचा वेलू गेला रुपेरी पडद्यावरी
मराठी, हिंदी, संगीत रंगभूमीसह
प्रायोगिक नाटकातही असे मातब्बरी

भावगीत असो, असो भारुड
वा बैठकीची खडी लावणी
तालासुराचे अचूक ज्ञान
करतेस मैफिल दिवाणी 


A. R. रेहेमानच्या संगीताची
असे अपूर्व तुजवर मोहिनी 
त्यामुळेच तर तमिळ भाषेतही 
रंगवते रागिणी मधुर स्वरांनी 

कधी भरतनाट्यमच्या पदन्यासांनी
Jazz, सालसा, ballroom dance नी
प्रेक्षकांवरती साऱ्या टाकते भुरळ
कलागुणांच्या आकर्षक आविष्कारांनी

ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
या बोलांची येते प्रचिती तुझ्या दर्शनानी
कलागुणांच्या नित्यनूतन उन्मेषांनी
विराजमान व्हावेस रसिकांच्या मनी

हीच ईच्छा आज तुझ्या वाढदिवसादिनी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.......

-अर्चना देशमुख


शुक्रवार, ११ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ४)


वाड्यातल्या मागच्या भागातल्या आठवणी होत्या, नित्यनेमाने येणाऱ्या चतुष्पादांच्या आणि आता वाड्यातले "बाहेरचे".

मंडळी तुम्हाला असे नाही का वाटत की, हल्ली हे बाहेरचे, भूत, आत्मे यांचे ग्लैमर जरा कमी झालंय? अहो पूर्वी किती कथा ऐकायचो? हल्ली कोणी ह्या विषयावर बोलतही नाही. कित्येक जणांना चकवा, मुंजा असे शब्द देखील माहित नसतील.

आठवा आपल्या मे महिन्याच्या, दिवाळी, गणपतीच्या सुट्ट्या, आपली चुलत, आते, मामे भावंडं कुठल्या कुठल्या गावाहून यायची नाहीतर आपण जायचो त्यांच्या कडे, नुसतं भेटायला नाही हं! मस्त आठ पंधरा दिवस हक्काने रहायला. अंगणात, गच्चीत गादीवर पडल्या पडल्या गप्पा रंगायच्या, ह्या “बाहेरच्यांबद्दल” कधी कधी मामा,काका,काकू,आत्या हे ही ह्यांच्या कथा रंगवून रंगवून सांगायचे.

आमच्या वाड्यातही होते बरं का हे "बाहेरचे"! अर्थात हे सगळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून ऐकलेले.

एकदा म्हणे, तिन्ही सांजेला एक बाई वाड्यात आली, छान हिरवी साडी नेसून, नटून थटून. शेजारच्या काकू ओट्यावर काही निवडत बसलेल्या. ती बाई आली आणि काकूंना कुठलासा पत्ता विचारला. त्यांनी तिला सांगितले....अशी जा.. मग उजवीकडे वळ वगेरे. त्यांना काही तरी वेगळे जाणवले त्यांनी परत त्या बाई कडे पहिले तरती गायब!!

अशीच वाड्यातली दुसरी "बाहेरची" म्हणजे विहीरीवरची. आमचे एक शेजारी होते त्यांना दम्याचा त्रास होता. खोकल्याची जास्त उबळ आली की ते रात्री अपरात्री बिछान्यात उठून बसायचे. एके रात्री त्यांना खोकल्याची खूप उबळ आली अन ते उठून वाऱ्यावर खिडकी जवळ बसले. खिडकीतून बाहेर बघितले तरएक बाई विहिरीच्या रहाटा जवळ उभी राहून त्यांना बोलवत होती. असं म्हणतात त्यानंतर त्यांची तब्येत बरीच खालावली, त्यांना इस्पितळात भरती करावे लागले आणि काही दिवसांतच ते गेले.

असे विषय जेंव्हा निघायचे तेंव्हा वातावरण हळू हळू गूढ व्हायचे, प्रत्येकाकडे सांगायला अशा ऐकीव घटना असायच्या. वाड्यात ऐकलेल्या आणि अजूनही स्मरणात असलेल्या अजून दोन गोष्टी.

एकदा म्हणे दोन मित्र शेगावला जायला निघाले, जातांना सावधगिरीचा इशारा म्हणून त्यांच्या मित्राने तिथल्या भूताबद्दल सांगितले. ही जोडगोळी भर दुपारी शेगाव स्थानकात उतरली, टांग्यात बसली आणि मुक्कामी निघाली. दोघांच्याही मनांत ऐकलेल्या भूताबद्दल धाकधूक होतीच! थोडावेळ गेल्यावर, एकाने धीर करून टांगेवाल्याशी बोलायला सुरुवात केली."काय हो, इथे म्हणे एक टांगा चालविणारे भूत आहे, त्याचे हात पाय उलटे आहेत आणि ते खूप लांब लांब होतात.’’हे ऐकताच टांगेवाल्याने आपला लांब हात संपूर्ण फिरवून मागे टाकला आणि विचारले, "असा का?"….मंडळी आम्ही सुन्न व्हायचो अशा गोष्टी ऐकून.

दुसरी गोष्ट बरेचदा ऐकली, काही डोंबिवलीकरांनीही ती ऐकली असेल. तेंव्हा सांगायचे की, मुंबई कडून कर्जत कडे जाणाऱ्या शेवटच्या लोकलच्या, महिलांच्या डब्ब्यात एक श्वेतांबरा येऊन बसते. बायकांशी बोलण्याच्या ओघात आपले नांव पत्ता सांगते आणि गाडी मुंब्र्याच्या खाडीवर आली की खाडीत उडी घेते. एवढंच नाही तर म्हणे काही बायका तिने सांगितलेल्या पत्त्यावर सांगत गेल्या की, तुमच्या मुलीने गाडीतून उडी मारली, तर म्हणे घरचे सांगायचे, ती बऱ्याच वर्षापूर्वीच. मग ह्याच बायका तापाने फण फणायाच्या. ती श्वेतांबरा म्हणजे म्हणे, मंदा पाटणकर तिने खाडीत उडी मारून आपला प्रवास कायमचा संपवला होता. मोठ्ठं झाल्यावर जेंव्हा कधी शेवटच्या कर्जत लोकलला चढायला मिळून उभा रहायला दरवाज्याची जागा मिळाली तेंव्हा आवर्जून पाहिलं, पण कोणीच उडी मारली नाही. कदाचित मंदा पाटणकरला मुक्ती मिळाली असावी, नाहीतर लोकलच्या गर्दीला ती कंटाळली असावी.

विशेषतः कोकणातून येणाऱ्या पाहुण्यांकडे असे बरेच किस्से असायचे. रात्रीच्यावेळी असे किस्से ऐकले आणि काळोखात, मिणमिणती मेणबत्ती घेऊन शौचालयात जायची वेळ आली की झालं! त्यातून ती मेणबत्ती आतजाईपर्यंत चारदा विझायची, मग आईला नाहीतर ताईला ताकीद द्यायची तुम्ही बाहेर उभे रहा. हे सगळे आठवले की आता हसू येते.

कधी कधी फजितीही झाली बरंका! आमच्या बाहेरच्या खोलीला एक खिडकी आहे, अगदी जुन्या प्रकारची, म्हणजे मोठी खिडकी, मध्ये एक उभा गज आणि आडवे चार पाच गज. कोणाचाही संपूर्ण हात ह्या गजामधून आत येईल असे. एके रात्री घरातले सगळे गाढ झोपले होते. मला झोप लागत नव्हती, पडल्या पडल्या चुळबूळ चालू होती. तेवढ्यात माझं लक्ष खिडकीकडे गेलं, खिडकीत कोणीतरी माणूस उभा होता. पटकन चादर डोक्यावर घेतली, परत थोडा कोपरा बाजूला करून बघितले तर तो माणूस तिथेच उभा. बरेचदा बघितलं तरी तो तिथेच, आता तर त्याने हात खिडकीतून आत घातला, थोड्यावेळाने हात हलवू लागला. मला खूप भीती वाटत होती, ओरडायला आवाजही फुटत नव्हता, काय करू सुचत नव्हते, घामाघूम झलो........पण आडनिडं वय होतं, स्वतःलाच आपण घाबरतोय ह्याची आणि त्यातून आई, अण्णांना सांगायची लाज वाटत होती. तो माणूस काही चोरत नाही ना ! तसाच चादर थोडी बाजूला करून बघत राहिलो. काही वेळाने उजाडू लागलं आणि मोठ्ठा निःश्वास टाकला. अहो, खिडकीच्या बाजूच्या बारवर हैंगरला एक पांढरा शर्ट टांगला होता! एक डुलकी काढली आणि कोणालाही काहीही न सांगता सकाळी उठून शाळेत गेलो. त्या रात्रीनंतर सगळे हैंगर आत, खिडकी पासून लांब सरकवून झोपायची संवय मात्र लागली.

अशा "बाहेरच्यांच्या" गोष्टी ऐकून आम्हीही निगरगट्ट झालो, इतके की पुढे दहावीत वगेरे असतांना ह्या "बाहेरच्यांना" आम्ही पछाडलं, खरंच! कसं माहित आहे? "प्लान्चेट"...................

आम्ही भावंड, त्यांचे मित्र, त्यांची भावंडं असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, खूप सहली काढल्या. कधी कधी कोणाच्यातरी डोक्यात यायचं चला प्लान्चेट करूया! मग सगळेजण रात्री एखाद्याच्या घरी जमायचो. मोठ्ठा चित्र काढायचा कागद घेऊन त्यावर ए ते झेड अक्षरं, बाजूला शून्य ते नऊ आकडे लिहायचे, बरोबर मधोमध "बाहेरच्या" पाहुण्यांसाठी आणि आजू बाजूला "हो"-"नाही" चे गोल काढायचे. उदबत्ती आणि काचेचा ग्लास हे सामान. भूताच्या गोष्टी ऐकून ऐकून पक्कं माहित झालेलं की देवगण वाल्यांना भूत काही करत नाही. त्यामुळे प्लान्चेट सफल संपूर्ण करण्यासाठी तीन देवगणवाले, त्यातला एक मी. प्लान्चेट सुरु करताना काचेच्या ग्लासमध्ये उदबत्तीचा धूर भरायचा, तो ग्लास कागदावर मधे उपडा टाकून तीन सारथ्यांनी उजव्या हाताची दोन बोटं ग्लासवर अलगद ठेवायची. मग त्यातल्या एकाने अतिशय नम्रपणे ह्या "बाहेरच्याला" आवाहन करायचे की तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची ( खूपच गहन...)उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी "हो" वर जा. मंडळी... ग्लास अलगद फिरत "हो" वर जायचा! एकदा का हा परलोकवासी "हो" वर गेला की झाली त्याची परवड सुरु. मग मुख्य सारथी सगळ्यांतर्फे प्रश्न विचारायचा. प्रश्न काय माहित आहे? अमुक अमुक मोठेपणी कोण होणार? कुठला अभियन्ता होणार? नोकरी करणार की धंदा? कुठल्या गावाला?आमच्या मोठ्या बहिणी, मैत्रिणींची लग्न ठरवली प्लान्चेटने. आम्ही विचारायचो, त्यांच्या भावी नवऱ्याचे नाव काय? स्पेलिंग करून दाखवा, कुठल्या गावाचा असेल? काय शिकलेला असेल? वगैरे वगैरे. आम्ही ग्लासमध्ये कोणा कोणाला बोलाविले माहित आहे? ताजे ताजे गेलेले आत्मे लवकर यायचे, त्यामुळे राजीव गांधी, किशोर कुमार, संजीवकुमार,इंदिरा गांधी, संजय गांधी असे, पंडित नेहरू, गांधीजी हे यायचे पण जरा वेळ लावायचे. असं करून ह्यातली भीती पार निघून गेली होती, प्रश्न तरी किती आणि काय विचारणार मग आम्ही ह्या बाहेरच्यांची फिरकी घ्यायचो, त्यांची लफडी, अंडी पिल्ली बाहेर काढायचो, आमच्यातले काही जण गंभीर... बाकी नुसते हसून लोट पोट. असं करता करता ग्लास पडायचा मग सगळे गंभीर ("बाहेरचा" सुटला तर?) कित्येक जणांना बोलावलं पण कोणाच्या नातेवाईकांना मात्र नाही, आले आणि गेलेचं नाही तर काय घ्या?

असंच एका रात्रि, प्लान्चेटसाठी गिऱ्हाईक शोधता शोधतामित्र म्हणाला, "अरे आमचा खडूस, म्हातारा मालक हल्लीच गेलाय", सगळे खूष ! ताजा, ताजा.......झालं त्यांना बोलावलं, ते लगेचच आले, ते पेशाने वकील होते, भाडेकरूंना खूप त्रास द्यायचे आणि आत्ता आमच्या ग्लासमध्ये. मग हवे नको ते विचारून त्यांची उलट तपासणी घेतली. बराच वेळ असं ग्लासमध्ये कोंडून फिर फिर फिरवलं, नंतर ग्लास चा वेग खूप वाढला आणि झाली की हो गडबड ....ग्लास थांबायलाच तयार नाही. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली.वकील साहेब खूपच भडकले होते आणि आम्ही सगळे चिडीचूप्प, हसणं एकदम बंद. सारथ्यांनी खूप विनवण्या केल्या, आम्ही चुकलो, माफ करा वगैरे वगैरे. थोड्यावेळाने स्वारी शांत झाली आणि सांगितल्या प्रमाणे "गेलो" हे कळण्यासाठी मधल्या गोलावर थांबली. ह्या प्रसंगानंतर आम्ही परत प्लान्चेट केलं नाही. प्लांन्चेट म्हणजे प्लान ऑफ चीटिंग.

तर असे हे, माझ्या आठवणीतले वाड्यातले "बाहेरचे" विश्व.

मधुसूदन मुळीक

गुरुवार, ३ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ३)


आमचा वाडा हे एक मोठ्ठं कुटुंबच होतं. इतक्या सगळ्या माणसांच्या सहवासात लहान वयातच इतके अनुभव आले! आज, आमच्या वाड्यात नित्य नेमाने येणाऱ्या लोकांबद्दल. वाड्यात जवळ जवळ रोज येणारे असे काही प्राणी होते. प्राणी ह्या साठी की त्यात मनुष्य आणि चतुष्पाद असे दोन्ही होते.

एक पांढऱ्या रंगाची गाय, तिची वेळ ठरलेली ती बरोबर बारा वाजण्याच्या सुमारास वाड्यात यायची आणि तळमजल्यावरच्या प्रत्येक घरासमोर जाऊन उभी रहायची. सगळेच तिला किमान पोळी तरी द्यायचे. बघा ! म्हणजे रोज गोग्रास घातल्याचे पुण्य. असे बरेच वर्षे चालू होते, नंतर अचानक, तिचे न येणे आम्हा सगळ्यांनाच हूर हूर लावून गेले.

दुसरी अजूनही चांगली स्मरणात राहिलेली, मीठा पिठाचा जोगवा मागणारी जोगवीण !

मीठा पिठाचा जोगवा

द्या ग बायांनो लवकरी

मला बाई जायाच, गुरुवारी

तुळजापूरच्या दरबारी

तुळजापुरला जाईन

आईचं हळदी कुंकू घेईन

आई अंबेला चढवीन

लवकर माघारी येईन

हिरवी नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत लाल कुंकू, हळदीचा मळवट, हातात टोपली, खांद्यावर तेलासाठी टांगलेली बाटली आणि वाड्यात शिरताच लावलेला टिपेचा स्वर ! अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर येते. आम्ही वाड्यात राहायचो तोपर्यंत तिला बघितले. आता खूपच म्हातारी झाली असेल किंवा नसेलही कदाचित. तिला एकदातरी तुळजापूरला जाता आले असेल कि नाही कोण जाणे?

वाड्याच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे एक जुनाट, मोडकळीस आलेला वाडा होता, त्यात काही भाजीवाले, मोलकरणी, पेपरवाले राहायचे. त्यांच्यातल्याच एका कुटुंबातला माणूस, अतिशय किरकोळ शरीरयष्टी, डोक्यावर खूप बारीक केस, अंगात बाह्यांचा बनियन आणि खाकी रंगाची अर्धी चड्डी, तेव्हा त्याच्या चाळीशीत असावा, सकाळ झाली की वाड्याच्या गेट समोर उभा राहायचा आणि सतत कुणाशीतरी जोरात आवाज न फुटता बोलायचा आणि नुसते हातवारे करायचा. हे असं सतत, म्हणजे झोप सोडून का..य.. म..... असे म्हणतात की तो तमाशात ढोलकी खूपच छान वाजवायचा आणि दुसऱ्या फडातल्या माणसांनी दुश्मनीमुळे खाण्यातून काही दिले आणि त्याची वाचा कायमची गेली.

अशीच एक, पाठीत पार वाकलेली गुजराती म्हातारी यायची. तिचा वेश शबरी सारखा असायचा. पांढरी साडी, कपाळाला आणि कानाच्या पाळ्यांना पांढरा गंध आणि खांद्याला गाठोडे. ती वाड्याच्या मध्ये उभी रहायची आणि अगदी पोट तिडकीने विनवणी करायची,

दे माये, गरीब म्हातारीला भाकर तुकडा दे माये

तुझ्या लेकरा बाळाला खूप आयुष्य लाभेल माये

आम्हाला तिची खूप दया यायची.

वाड्यात असाच रोज येणारा मातीवाला पांडू ! साधारण ४०-४५ वय, बरेचसे दात पडलेला, बारीक पण पिळदार शरीराचा पांडू. तो डोंबिवली बाहेरच्या टेकडीवरून लाल माती आणून विकायचा. डोक्यावर मातीने भरलेली गोणी, एका खांद्यावर अडकवलेले फावडे, बनियन आणि अर्धी खाकी चड्डी असा त्याचा अवतार. हाताच्या बोटांना आणि तळपायाला पडलेल्या भेगा, पायाच्या टर्र फुगलेल्या नसा, तो खूप मेहनत करायचा. तो आला की त्याला आम्ही पाणी आणि काही खायला द्यायचो. कधी कधी मात्र तो मोसंबी / नारिंगी घेतल्यासारखा वाटायचा. बरेच वर्षापूर्वी तो गेल्याचे कानावर आले. स्वतः जगवण्याची आणि मुलांना शिकवण्याची धडपड शांत झाली.

वडारी समाजातल्या काही बायका पाट्याला टाकी लावायला यायच्या, त्यांची मुलं बरोबर फिरता फिरता आजूबाजूच्या वाड्यात भिक मागायची. ती मुलं आली की मोठी मुलं, वाड्यातल्या कुत्रीला त्यांच्यावर छु ...करायची.

एक बोहारीण, ती जुन्या कपड्यांवर भांडी द्यायची. खरे पाहता तिला द्यायला कुणाकडे रोज जुने कपडे निघणार? , तरीही ती नित्यनेमाने यायची. पाणी मागून प्यायची. कधी कोणी कपडे द्यायला काढले की सगळ्या महिला एकीने सौदा करायच्या. लहान डबा नको, एक साईज मोठा डबा दे! म्हणून अडून बसायच्या. आठवले की वाटते, आता बहुदा असे व्यवसाय बंदच झाले असतील.

आमचे सख्खे शेजारी हर्डीकर, त्यांची एक मुलगी मुंबईत रहायची आणि नोकरीही तिथेच करायची. रोजचा डबा मात्र जायचा घरून. त्यांचा डबेवाला यायचा बरोब्बर सकाळी नऊ वाजता. कितीही ऊन, पाऊस काहीही असले तरीही डबेवाल्याची वेळ कधी चुकायची नाही. कधी डबा नसेलच तर आम्हा मुलांना सांगितलेलं असायचं, मग आम्ही वाड्याच्या गेटमध्येच डबेवाल्याची वाट बघायचो, तो आला की लगेच सांगायचे "आज डबा नाही". कोणाच्याही वेळेची खोटी होऊ नये, हे तेव्हाच समजलेलं. हा डबेवाला नुसते जेवण नाही न्यायचा, माय लेकी डब्यातून एकमेकींना चिठ्या कधी कधी एखादी लहान वस्तूही पाठवायच्या.

अशी ही माणस, त्यांचे कष्ट, जगण्यासाठी रोजची चाललेली सच्ची धडपड आम्ही बघत आलो, लहानपणापासून. त्यामुळे लोकांबद्दल काही वाटणे, त्यांची दया येणे, त्यांना मदत करणे अशा भावना तयार झाल्या. हल्लीच्या मुलांना अशी सच्ची माणसं, अशी परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला दिसतच नाही. आपण आणि आपले चौकोनी कुटुंब. सगळे स्वतःचे आणि जे काही करायचे ते स्वतःसाठीच. कधी कधी वाटते , हल्लीच्या ह्या व्यावहारिक जगात, भावना आधीच बोथट झालेली ही मुलं भावनाच नाही ना हरवून बसणार?

क्रमशः
 मधुसूदन मुळीक

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

वाडा आठवणींचा (भाग-२)

आम्ही ह्या गांधी वाड्यात राहायला आलो १९६९ साली; मला हे एकदा न्ह्वे अनेकदा ऐकविण्यात आलंय. जसं जसा मी मोठा होत गेलो, तसं तसं वेळोवेळी शेजाऱ्यां कडून ऐकलंय "मधूची आई, मधु केवढा मोठ्ठा (म्हणजे मोटा न्हवे!!!) झाला... नाही? दोन महिन्यांचा होता इथे आलात तेव्हा". आम्ही चार भावंडं विजय (अण्णा), सुनंदा (मोठी ताई ), सुषमा (छोटी ताई) आणि मी शेंडेफळ. माझं नाव मधुसूदन पण वाडा आणि ओळखीचे डोबिवलीकर ह्यांच्या साठी मी मधुच, आणि आमची आई "मधुची आई"; थोडी अतिशयोक्ती केली तर, साने गुरुजींच्या श्याम नंतर मधुच! आणि श्यामच्या आई नंतर मधूची आईच!!

वाड्यात सगळ्या भाडेकरूंना दोन दोन खोल्या आणि तिन्ही घरांना मिळून मोठ्ठा ओटा. आम्ही राहायचो तळमजल्यावरच्या एक नंबरच्या घरात. मी म्हणे, बालपणी कधी रांगलोच नाही, एकदम बसायलाच लागलो आणि चालाण्याआधी फिरायचो कसा माहीत आहे? बसून मांडी घालायची, दोन्ही हात खांद्याच्या पातळीत सरळ पुढे धरायचे आणि मग असेच मांडी घातलेल्या अवस्थेत पुढे पुढे सरकायचे. हे उपद्व्याप बघण्यासाठी सारे शेजारी माझ्या मागे. ते सांगतात, मी असा वेगाने ओटाभर फिरायचो आणि पार्श्वभाग सोलून निघायचा. आम्ही सगळीच भावंडे लहानपणापासून तब्ब्येत राखून, त्यामुळे वाड्यातल्या सगळ्यांना भारी कौतुक, जो तो यायचा आणि घरी खेळायला न्यायचा.

आमच्या या दोन खोल्यांच्या घरात आम्ही चार भावंडं, आई, वडील, आणि आजी असे सातजण राहायचो. आत्ता विचार केला तर वाटत, कसे राहायचो आपण? आणि बरं जागा लहान पडते असं कधीच जाणवले नाही. अर्थात तेव्हा आम्ही लहानही होतो म्हणा, पण तळमजल्यावरचे घर, सगळेजण बोलके (जरा जास्तच माणसाळलेले), उत्साही, आई आणि बहिणींना विविध छंद , सगळ्या बिऱ्हाडांच्या किल्ल्या, घरी नसलेल्यांचे किराणा सामान / ग्यॅस सिलिंडर ह्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. त्यावेळी प्रायव्हसी, मुलांचा अभ्यास ह्याचे अवडंबर नव्हते. आमचे वडील एका जर्मन कंपनीत नोकरीला होते. त्यांना शिफ्ट असायच्या आणि उरलेल्या वेळेत ते प्लंबिंगचा व्यवसाय करायचे. त्यामुळे सगळ्यांना मुक्तांगण, त्यांच्या दुपारच्या आणि रात्र पाळीला रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे.

अहो पूर्वी वाडासंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली नव्हती, तेव्हा किती सोशल लाईफ होतं बघा, वाड्यात कोणीही, कधीही, कुणाहीकडे जायचं. मदतीसाठी किंवा कामासाठीच नाही हं! अगदी सहज, “काय चाललंय? जेवण झालं का? येता का जरा बाहेर? जरा दोन कांदे द्या हो”, इतक्या सहजपणे. वेळप्रसंगी मदत तर आपोआप यायची.. ती मागावी लागायची नाही. मुलांना शिस्त लावणे, रीतीभाती शिकवणे, कौतुक करणे वेळप्रसंगी ओरडणे, पाठीत धपाटा घालणे हे त्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता शेजारच्यांकडून नकळत व्हायचे. गंमत होती की नाही? घरी गोड धोड केलं की वाटीभरून शेजारी दिल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नसे. वाड्यात कुणाकडचेही कार्य म्हणजे वाड्याचेच व्हायचे. शेजारचे काका, काकू, मामा, मामी अगदी सहजपणे, ‘’मधु जरा दुकानातून काडेपेटी आणून देना, पोस्टातून चार कार्ड आणणं. कधीही कुणाचेही काम करतांना; आपण ह्यांची कामं का करायची? हे आपल्यालाच का सांगतात? असा प्रश्न आम्हा भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मनाला कधीही शिवला नाही. सगळेचजण एकमेकांना अशी मदत करायचे. असे आपण हल्ली करु शकतो का? मुलांना काही कळण्याआधीच पालकांच्या मनात वरचे दहा प्रश्न येतात आणि मग मुलं कित्येक अनुभवांपासून वंचित राहतात.

मला आठवतंय आम्ही मुलं काकवा, मावश्यांना उडदाच्या पापडांचे पीठ खलबत्यात कुटून द्यायचो आणि लाट्या हक्कानं खायचो, कुणाहीकडे कुरडया केल्या की चिक खायला जायचो, बदल्यात कुरड्या, चिकवड्या, बटाट्याचा खीस ह्या वाळवणांची राखणं करायचो. वाड्यातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून सगळ्यांना वाटायचो.

आमच्यापेक्षा मोठ्ठे म्हणजे माझा भाऊ, बहिणी, त्यांचे मित्र ह्यांनीच आम्हा मुलांना विहिरीत पोहायला शिकवलं. शिकवणं म्हणजे, अक्षरशः घाबरून पळणाऱ्या मुलांना उचलायचे आणि तसेच रडत ओरडत असतांना विहिरीत फेकून द्यायचे, खाली बाकीचे तयारच असायचे. असे आम्ही पोहायला, सायकल चालवायला कधी शिकलो कळलंच नाही. हो! आणि हे सगळे करण्यावर पालकांचाही आक्षेप नसायचा हे विशेष.

अशा या आमच्या वाड्यात सगळे सण साजरे व्हायचे, म्हणजे होळी, धुळवड, गणपती, दसरा, दिवाळी वगैरे. आमच्या मालकांकडचा गणपती हे सर्व डोंबिवलीकरांचे मोठे आकर्षण होते. त्यांचा एक मुलगा जे जे कला महाविद्यालयाचा कलाकार आहे, ते मोठ्ठी आरास करायचे. त्यांनी केलेली ताज हॉटेल, हिमालय याची आरास माझ्या अजूनही स्मरणात आहे. आरास बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची आणि मग रांगा लावणे, प्रसाद देणे ही कामे वाड्यातली मुलं करायची. साहजिकच अशा प्रसंगातून आम्ही बरेच काही शिकलो.

पूर्वी हल्लीसारखी, अशी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शाळा नसायची, ती सकाळचे वर्ग आणि दुपारचे वर्ग अशी दोन वेळा असायची, त्यामुळे सकाळी शाळेतून आलो की अभ्यास करून संध्याकाळी खेळण्यासाठी मोकळे आणि दुपारची शाळावाले संध्याकाळी खेळून रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करायचे. वाड्यातल्या मैदानात आम्ही भरपूर खेळायचो. कधी कधी तर लगोरी, डबाऐसपैस, आट्यापाट्या हे खेळ आम्हा मुलांच्या आयाही आमच्या बरोबर खेळायच्या, खरंच खूपच मजा यायची. छोट्या ताईला भातुकली खूप आवडायची. ती आम्हा मुलांना गोळा करायची आणि आम्ही काड्याकुडया गोळाकरून मातीच्या छोट्या चुलीवर भात करायचो, खरा खरा ! आंब्याच्या दिवसात, वाड्यातल्या झाडाचे आंबे तोडून रस करायचो, प्रत्येकाने स्वतःची ताट, वाटी आणि पोळ्या घरून आणायच्या आणि मग मस्त अंगत पंगत. खरंच आम्ही नशीबवान म्हणूनच असे बालपण मिळाले, हल्लीच्या मुलांकडे बघून वाटते ह्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नाही, की ह्यांनी काय गमावले आहे.

(क्रमशः)


मधुसूदन मुळीक

रविवार, २२ एप्रिल, २०१२

श्रीमती सुधा गुप्ता

श्रीमती सुधा गुप्ता   पूर्वाश्रमीच्या पुष्पा गोविंदराव  शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रात नंदूरबार येथे झाला. मुंबई ला बी.ए. पर्यंतचे शिक्षण व नंतर थोडे दिवस पोस्ट-टेलिग्राफ खात्यामधे टेलीफोन ऑपरेटर म्हणुन मुंबईतच नोकरी करून लग्नानंतर त्या कुवेत ला आल्या व परिवारासोबत कुवेतला स्थायिक झाल्या. १९७३ नंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले.

१९५९ साली स्थापन झालेल्या व साधारण १०० सदस्य असलेल्या Kuwait Ladies Association मधे त्यांनी कोषाध्यक्षा म्हणून काम सुरू केले. ह्यात महीन्यात एकदा सर्व महिला भेटत, खेळ व निरनिराळ्या स्पर्धांचे त्यात आयोजन केले जात असे. तसेच ही संस्था kidney transplant वगैरे संबंधित रोग्यांना पैशाने पण मदतीचा हातभार लावित असे.

श्रीमती गुप्ता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय (Ladies International League (LIL), ज्यात १४ देशांच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी Co-Chairperson चे पद भूषविले होते.

श्रीमती सुधा गुप्ता ह्यांचा महाराष्ट्र मंडळ कुवेत सुरू करण्यात मोलाचा वाटा आहे.

त्या तीनदा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. मंडळातील सभासदांच्या मुलांना संस्कृत व मराठी भाषचे ज्ञान असावे म्हणुन सतत प्रयत्नशील होत्या. महाराष्ट्राच्या परंपरा जपल्या जाव्यात असे त्यांचे नेहीमी सांगणे असे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अंध संस्थांना, लातूर भूकंप पीडितांना मदतीचा हातभार महाराष्ट्रमंडळाकडून लावण्यात आला होता.

१९९८ पासून त्या Indian Women’s Association च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी अडचणीत असलेल्या बऱ्याच भारतीय कामगार स्त्रियांना मदत केली होती. कधी कोणाला खाऊ घालणे तर कधी कोणा गरजवंताला भारताचे तिकीट काढण्यास मदत करणे, अपंगांना सहाय्य तर त्यांचे अविरत चालूच होते.

Indian Women’ League मधे पण त्यांनी काम केले होते.

त्याचबरोबर त्यांचा बाकी भाषीय मंडळांशी पण जवळचा संबंध होता. उपकार ह्या उत्तर प्रदेश च्या मंडळाचे पण कोषाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.

अशा मंडळांमधे त्यांना सत्यनारायण पूजा करायला बसण्याचा मान मिळाला होता.

कुवेत मधे येणाऱ्या प्रतिष्ठित भारतीय मंडळींमधे अटल बिहारी बाजपेयींना भेटणाऱ्या मंडळींमधे त्यांचा समावेश होता.

अशा ह्या प्रतिभाशाली श्रीमती सुधा गुप्ता ह्यांना १६ जानेवारी २००५ साली देवाज्ञा झाली.

त्यांना महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून विनम्र आदरांजली.
(शब्दांकन दीपिका जोशी)

श्रीमती सुधा गुप्ता
श्रीमती सुधा गुप्ता





श्री रामचंद्र गुप्ता

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

वाडा आठवणींचा (भाग पहिला)

नमस्कार, महाराष्ट्र मंडळ कुवेतचा प्रतिभाकुंज हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम, ह्यामुळे अनेक चित्रकार, कवी, लेखक प्रकाशमान झाले. माझा ह्यात लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. मंडळी कुवेतमध्ये नवरे लोकांना रोजची दोन मुख्य कामे असतात. एक म्हणजे रोजीरोटी साठी जाणे आणि दुसरे घरी आले कि मुलं आणि बायको ह्यांची अनुक्रमे विविध शिकवण्या वर्ग / वाढदिवस / ममंकुच्या कार्यक्रमांचा सराव, सौंदर्य प्रसाधनगृह / किटी पार्टी ह्यांना ने-आण करणे. ह्यातून माझीही सुटका नाही, त्यामुळे मनात असूनही लिखाणास जरा वेळच झाला. माझी इच्छा आहे 'वाडा आठवणींचा' हे साप्ताहिक सदर द्यायची, त्यासाठी मी माझी पत्नी सौ. गीता हिची मदत घेणार आहे (आणि तसे तिने सध्यातरी कबूल केले आहे) मी हस्तलिखित देणार आणि ती त्याचे शुद्धलेखन, टंकलेखन करून प्रतिभाकुंजला पाठविणार. बघूया आपला उत्साह.

(माझा लिहायचा, सौ चा टंकलेखनाचा आणि तुमचा वाचण्याचा) कितीसा टिकतोय?


                                                   वाडा आठवणींचा (भाग पहिला)

आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, अगदी हृदयात कोरला गेलेला काळ असतो, तो बालपणीचा. तो कसाही असो, कितीही सुखात, दुखात पण तो काळ अगदी स्वच्छ आठवतो. आणि जसे जसे वय वाढते तसा-तसा त्याबद्दलचा जिव्हाळा आणखीच वाढत जातो. हाच काळ मला घट्ट धरून ठेवायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करतो आहे त्याला शब्दात पकडण्याचा. बघा तुम्हीही जरा...भूतकाळात गेलात, आणि आठवले ना बालपण? आपले जुने घर, शेजारी, शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक, तुमची खेळणी? आणि तुमच्या एक लक्षात आलंय का? कि आपल्याला सुरवातीचे म्हणजे इयत्ता पहिली ते साधारण चौथी पाचवी ह्यावेळचे मित्र, वर्गशिक्षक ह्यांची नावे, चेहेरे खूप चांगले लक्षात आहेत आणि तेच जास्त जवळचे वाटतात पण तसे महाविद्यालय आणि त्यापुढचे नाहीत. म्हणूनच हा वाडा आठवणींचा. माझे सगळे बालपण ह्या वाड्यातच गेलं. डोंबिवली पूर्वेला प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ असलेला गांधी वाडा. तेव्हा डोंबिवली खूप छान होती. गर्दी रहदारी इमारती सगळेच कमी होते. वाड्यासमोर एक मोठी बाग होती आणि बागेला लागून रेल्वे लाईन. आमचा वाडा म्हणजे एका मजल्यावर तीन अशी तीन मजली बिल्डींग, मालकांचा बंगला, बंगल्यात तळमजल्यावर तीन भाडेकरू आणि बंगल्याच्या जिन्याखाली एक ब्रम्हचारी भाडेकरू, मोठ्ठं मैदान आणि एकाबाजूला चौकोनी विहीर. मोठ्ठं मैदान असल्याने आमचा वाडा हा आजूबाजूच्या मुलांचा खेळाचा अड्डाच होता. विहीरही साग्रसंगीत होती बरं का! दोन बाजूला रहाट, कपडे धुवायचा मोठ्ठा दगड, मोरी, त्यावर सिमेंट चा पत्रा आणि कडेला शौचालय. मालकांच्या बंगल्याला पहिल्या मजल्यावर छोटी बाल्कनी होती, त्यावरचा रहाट बरोबर यायचा विहिरीवर. वाड्यात गुलमोहर, रातराणी, पांढरा आणि हिरवा चाफा, बकुळ, तगर, अनंत, प्राजक्त, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, जाम,शेवगा इतकी सगळी झाडं. मालकांची (गांधी आडनांव नावापुरतेच, अजूनही त्यांचा उल्लेख मालक म्हणूनच) छोटी आणि तळमजल्यावरच्या बिराडांच्या स्वतःच्या छोट्या छोट्या बागा. हे सगळे इतके तपशीलवार ह्यासाठी कि पुढे पुढे हे सगळे येणार आहेत आपल्या भेटीला. तर मंडळी आज ह्या वाड्याबद्दलच, आपण पुढेपुढे भेटणार आहोत ह्या वाड्यातील माझ्या बालपणाला आणि एकेका शेजाऱ्याला.

मला हे लिहिताना खरच माझ्या बालपणात आणि वाड्यात गेल्यासारखं वाटतंय. अहो किती लहान झालो, मी ह्या प्रस्तावनेतच. तुम्हीही वाचा आणि जा हरवून तुमच्या बालपणात.


क्रमशः


मधुसूदन मुळीक