भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२
मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२
याची देही याची डोळा … … … अनुभवली वारी

गेल्यावर्षी सुट्टी संपवून परत कुवेतला येतांना मी आणि सौ ने ठरवलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनीही पायी पंढरपूरची वारी करायची. डिसेंबर मध्ये पुढील वर्षाचे सुट्टीचे नियोजनही आषाढी एकादशीची तारीख बघून केले. माझ्या मित्राची (श्री गिरीश टेमगिरे;पुणे) आई नित्य नेमाने वारी करत असे, त्यांच्याकडे आमची इच्छा बोलून दाखवली तर त्यांनी खूपच प्रोत्साहन दिले, एवढे करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांच्या दिंडीत आमचे नाव नोंदवले आणि दिंडीतल्या नेहमीच्या सगळ्यांना आम्ही येणार असल्याचे आणि आमची योग्य काळजी घेण्याचेही सांगितले.
झालं ! आधीच इथे दिवस फार झर झर सरतात,त्यातून वारीचे वेध लागले होते, बघता बघता एप्रिल मे कधी आला कळलंच नाही. वारीची तयारी म्हणजे खूप चालण्याचा सराव, आम्ही रोज चालण्याचे खूप ठरविले पण… … कुवेतचे बेभरवश्याचे हवामान! ह्या वर्षी इथे उन्हाळ्यात जास्तच धुळवड झाली आणि सराव काही झाला नाही. सुट्टीच्या नेहमीच्या खरेदी बरोबर ह्या वर्षी वारीची खास खरेदी झाली, अगदी राहुटी (तंबू) घेण्याचे ठरले पण त्याची सोय असते हे कळल्यावर बारगळले. बेडिंग, विविध प्रकारची ब्यान्डेजेस,मलम असे सगळे घेतले. मित्राला (गिरीशला) फोन करून वारीचा संपूर्ण प्रोग्राम, काय आणायचे ? काय नाही? हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पण एकच उत्तर, "अरे सगळी सोय केली आहे,तुम्ही भारतात आलात की पुण्याला या, मग तुम्हाला दिंडी चालकांशी भेटवतो, काही काळजी करू नका". वारी साठी आम्ही या वर्षी मुलांची शाळा चार दिवस बुडवली आणि भारतात दाखल झालो. मुलांना आईच्या ताब्यात दिले, मुलगा "ओम" मोठा असल्याने आणि आजीची सवय असल्याने त्याची काहीच काळजी नव्हती (किंबहुना, मनसोक्त हुंदडायला मिळणार म्हणून तो खूष होता) पण मुलगी देवी (वय ६ वर्षे) प्रथमच आम्हा दोघांना सोडून राहणार होती. वारीला निघण्याच्या आदल्या रात्री देवीने अगदी काकुळतीने "तुमच्या पैकी एकाची वारी रद्द नाही का करू शकत?" असे विचारले कशीबशी तिची समजूत घातली आणि वारीच्या आधी दोन दिवस पुण्याला जाऊन आमचे दिंडी चालक श्री शिवाजीराव कराळे (त्यांना सगळे अण्णा संबोधतात) ह्यांची भेट घेतली. अनिवासी भारतीयांच्या (बिघडलेल्या) सवयींमुळे अण्णांना आमचे पायी वारीला येणे जरा
अप्रूप वाटले. त्यांनी कल्पना दिली की नुसतेच ठरवले म्हणून वारी पूर्ण करण्या एवढी सोपी नाही, चालायचा सराव आहे का? कुठेही ,कसेही राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची आणि शरीर विधी उरकण्याची तयारी आहे का? नसेल तर यायचा अट्टाहास नको. आम्ही दोघांनी मनाची पूर्ण तयारी केली होती ( तनाची करू शकलो नव्हतो) त्यांना आमचा इरादा पक्का असल्याचे सांगितले. अण्णांनी एक सल्ला दिला की,तुम्ही हडपसरहून वारीत या, कारण आळंदी ते पुणे आणि मग पुणे ते सासवड हे सलग दोन्हीही टप्पे मोठे आहेत तुम्हाला एकदम झेपणार नाहीत आणि कदाचित तुम्ही वारी मधेच सोडून द्याल . तसेही दिंडी तर्फे पुण्यात राहण्याची सोय नसल्याने आम्ही मामांकडे हडपसरला रहाणार होतो. मग ठरलं, आम्ही हडपसरहून वारीत यायचे. आमचे कपडे, बेडिंग असे जड मोठे सामान ट्रकमध्ये टाकण्यासाठी अण्णांकडे सुपूर्द करून आम्ही मामांकडे आलो.
११जुनला दुपारी ४ वाजता आळंदीत मंदिराचा कळस हलला, वारीस प्रस्थानाची अनुमती मिळाली आणि ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन लाखो वैष्णव निघाले सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला. ११ आणि १२ जूनचा मुक्काम होता आळंदीतच, आणि १३, १४ जूनचा पुण्यात भवानी पेठेत. आम्ही आधीच येऊन हडपसरला राहिल्याने कधी एकदा आधीचे मुक्काम संपून दिंडी हडपसरला येते? आणि आमची वारी सुरु होते ? असे झाले होते. अण्णांनी सांगितले होते १५ जूनला सकाळी ९ वाजता हडपसर गाडीतळावर आपल्या दिंडीत सामील व्हा. अण्णांना हल्ली एवढे चालणे झेपत नसल्याने ते ट्रक मध्ये बसून वारी आणि वारीचे नियोजन करतात. दिंडीतल्या एका दोघांचे भ्रमणध्वनी त्यांनी दिले होते, आमचा साधारण ९० जणांचा छोटा ग्रुप (कराळे ग्रुप) दिंडी क्रमांक १० (रथाच्या पुढे) चा एक भाग होता. वारीत सुरुवातीला मानाचा नगारा असतो, त्याच्या मागे मानाच्या २७ दिंड्या असतात ( माऊलींच्या रथा पुढच्या ) नंतर माऊलींच्या पादुका घेऊन आळंदी देवस्थानाची दिंडी असते आणि रथाच्या मागे साधारण २०० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीचा क्रमांक एका उंच दंडाला लावलेल्या पाटीवर दर्शविलेला असतो, पण आमच्या दिंडीला काही कारणाने अशी पाटी नव्हती . एकूण काय, एवढ्या लाखो लोकांमधून, कोणीही माहितीचे नसतांना, आपली दिंडी शोधणे हे एक दिव्यं होते. गिरीशचे भाऊ ,वहिनी हे दरवर्षी सासवड पर्यन्त चालत जातात मग ठरले की सासवड पर्यंत त्यांचे बरोबर जायचे आणि सासवडला ते आमची दिंडीतल्या लोकांशी भेट घालून देतील.
१५ जूनचा दिवस उजाडला, एक मोठे ध्येय समोर होते, मनात धाक धुक होती. मी वारकरयांचा पोशाख , पांढरा गुरुशर्ट, लेंगा आणि टोपी घालून तर गीता सोयीनुसार पंजाबी ड्रेस घालून तयार झालो. आत्तापर्यंत हडपसरचे रस्ते वाहनांसाठी बंद केल्याचे कळले होते. आमचे तीन मामा मोटारसायकल काढून जमेल तेवढे सोडतो म्हणून आम्हाला घेऊन निघाले. थोडे अंतर पार केले, प्रचंड जनसमुदाय माउलींच्या दर्शनासाठी गाडी तळाकडे जात होता, रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. पुढे गाडी जाणे मुश्कील झाले. आम्ही वेळेत गाडीतळावर पोहोचू की नाही?.... भर भर चालत एकदाचे गाडी तळावर पोहोचलो. अलोट गर्दी , मामांनी गीताला सांगितले मधूचा हात अजिबात सोडू नकोस नाहीतर परत शोधणे मुश्कील होईल. एवढ्यात ! नगारयाचा आवाज, माऊली! माऊली! S.....S....S चा घोष आमच्या कानावर आला, दुतर्फा गर्दी केलेल्या बघ्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पावित्रा घेतला. आम्हाला सासवड मध्ये दिंडीची गाठ घालून देणारे मित्राचे बंधू श्री प्रदीप टेमगिरे भेटलेच नाहीत. भक्तांचा सागर म्हणजे काय ते आवक होऊन बघत होतो, ह्या लाटेत आपणही सामील व्हायचे आहे तेही आपली दिंडी आणि त्यातले कोणीच परिचयाचे नसतांना.... बघता बघता माऊलींच्या रथा पुढच्या २७ दिंड्या निघून गेल्या आम्हाला आमची रथा पुढची दिंडी क्रमांक १० काही दिसली नाही आणि आम्ही मामाला सोडून कधी ह्या भक्तीच्या लाटेवर सवार झालो हे आम्हालाही समजले नाही. आम्ही दोघांनी आमची दिंडी शोधत पुढे जाण्याचे ठरवले, सारखा श्री प्रदीप टेमगीरेंना फोन करत होतो पण भेट काही होत नव्हती. आपली माणसे शोधत, कोठेही न थांबता आम्ही दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकीला पोहोचलो, आता मात्र आम्ही नगारयाच्या बरेच पुढे आलो होतो. आमचे मित्र श्री प्रदीप आम्हाल शोधात येत होते, माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी वडकीला विसावा होता मग आम्हीही तिथेच विसावलो. एक मुलगी आणि तिचा सहकारी ह्या विसाव्याला झर झर संस्कार भारतीची रांगोळी घालतांना दिसले. काही मिनिटात त्यांनी माऊलींच्या पालखीच्या मार्गात रांगोळीच्या सुंदर पायघड्या घातल्या. त्यांच्याशी बोलल्यावर समजले, ते आळंदी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक दर्शनाच्या विसाव्याला अशा रांगोळ्या घालणार आहेत आणि खरंच आम्ही वारीत प्रत्येक विसाव्याला, वारीच्या पुढे पोहोचून रांगोळ्या घालण्याची त्यांची धावपळ आणि सुंदर रांगोळ्या बघितल्या. आमचा उत्साह आणि सगळा माहोल बघून माझ्या दोन मामा, आणि माम्यांनी मुलांसह सासवड पर्यन्त यायचे ठरविले आणि ते वड्कीला आम्हाला भेटले. केवळ भ्रमणध्वनी मुळे काही वेळाने श्री प्रदीप ह्यांची गाठ भेट झाली आणि आता आपली दिंडी आणि त्यातले सहचारी भेटणार ह्या विचाराने जीव भांड्यात पडला ! आम्ही श्री प्रदीप ह्यांचे बरोबर दिवे घाट चढायला सुरवात केली. उन्हाचा तडाखा, घाटाचा चढ आणि अनुभवाअभावी पाठीवर घेतलेली जड स्याक, क्यामेरे...चालणे कठीण वाटत होते पण वारीचे वारे डोक्यात भिनले होते. दिवे घाटातले वारकऱ्यांच्या गर्दीचे दरवर्षी वृत्तपत्रात येणारे फोटो डोळ्यापुढे आले, कित्येक पत्रकार , वृत्त वाहिन्यांची ही दृष्ये टिपण्या साठी चाललेली धडपड आणि आज आम्ही स्वतः या वारीत असल्याचे जाणवून स्वतःचेच कौतुक वाटत होते. मध्ये कोठेही न थांबता आम्ही घाट माथा गाठला. उन्हामुळे खूपच दमछाक झाली होती, जरा वेळ विश्रांती घेऊन पुढे सासवड कडे निघालो. काही लोक सासवड कडून उलटे दिवेघाटाकडे जात होते, असे कळले की माऊलींचे स्वागत करून गावात आणण्या साठी काही सासवडकर जात होते. वारीचा आज आणि उद्याचा असे दोन मुक्काम सासवडला होते. आम्ही अजूनही आमच्या दिंडीत सामील झालो नव्हतो, श्री टेमगिरे कुटुंबीय सासवडहून पुण्याला परतणार होते आणि रात्रीच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी आमची दिंडी शोधणे भाग होते. संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते. पुन्हा एकदा नगरा दुमदुमला, माऊली! माऊली! गजर झाला , सासवडकरांची दर्शनासाठी धूम उडाली आणि श्री प्रदीप ह्यांनी आम्हाला आमच्या दिंडी क्रमांक दहा (रथाच्या पुढे)च्या हवाली केले. दिंडीतल्या सहाचरयांनी क्षणात मला एका लाईन मध्ये येण्याच्या आणि गीताला महिलांच्या लाईन मध्ये जाण्याच्या सूचना केल्या, जागा करून दिली आणि आम्ही एका शिस्तबद्ध, तालात , माऊलींचा गजर करत जाणारया दिंडीचा भाग झालो. पांडुरंग! पांडुरंग!! ... … … लाखो लोकातून आपली दिंडी शोधून त्यात सामील होण्याचे एक मोठे दिव्य श्री टेमगिरेन मुळे शक्य झाले होते. आता पुढचे पंधरा दिवस पंढरी पर्यन्त हेच आमचे कुटुंब असणार होते.
वारी मुक्कामाच्या ठिकाणी आली की माऊलींच्या रथा पुढच्या आणि काही मागच्या दिंड्या एखाद्या ठरलेल्या मोठ्या पटांगणात जमतात. सासवड मध्ये पुरंदर हायस्कूल च्या पटांगणात आम्ही पोहोचलो, हजारो ग्रामस्थ दर्शन आणि आरती साठी गोल रिंगण करून बसले होते. रिंगणाच्या बाहेर माऊलींच्या पालखीचा मार्ग असतो आणि त्या बाहेर दिंडीतील वारकरी उभे राहतात. सासवड हे आमच्या साठी पहिलेच मुक्कामाचे ठिकाण होते. आम्हाला माऊलींचे आगमन , आरती आणि काय, काय प्रथा असतात ह्याचे कुतूहल होते. आम्ही पटांगणात जाऊन जागा घेतली एवढ्यात पालखी आली. हजारोंच्या मुखातून पुन्हा माऊली! माऊली! चा गजर झाला, सगळे लोक पालखीला हात लावायला आणि मग पालखीच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी धडपडत होते. माऊलींची पालखी आळंदी देवस्थान आणते. देवस्थानाचे चोपदार वारीची शिस्त राखत असतात, किंबहुना वारीचे असे अलिखित नियम आहेत जे सगळे वारकरी पाळतात. ह्या हजारो लोकांनी भरलेल्या पटांगणात चोपदारांनी त्यांचा चांदीचा दंडक उंचावला मात्र.........सगळे पटांगण शांत! एका दिंडीच्या वारकरयांनी पुन्हा पखवाज आणि झांजा वाजवण्यास सुरवात केली, कुणा दिंडीचे काही गाऱ्हाणे असल्यास असे करतातअसे समजले. ह्या दिंडीचे गाऱ्हाणे होते की सासवड मध्ये आगमनाच्या वेळी काही तरुण ग्रामस्थांनी अपशब्द बोलून काही वारकऱ्यांना धक्का बुक्की केली होती. चोपदारांनी त्यांची कार्यवाही केली ,मग हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तू आणि व्यक्ती ह्यांची घोषणा झाली, माऊली आपला मुक्काम कधी , किती वाजता तेथून हलविणार हे घोषित केले शेवटी माऊलींची आरती. आता सगळ्यांची आपआपल्या मुक्कामी पोहोचण्याची गडबड सुरु झाली. सासवडचा आमच्या दिंडीचा मुक्काम होता शिक्षकांच्या 'गुरुकुल' वसाहतीतील दाते ह्यांच्या बंगल्यात. चला! पहिला मुक्काम तर छान बंगल्यात होता. भजन झाल्यावर जेवून सगळ्यांनी पथाऱ्या पसरल्या. जास्तच थकल्यामुळे आणि केवळ सतरंजीवर झोपायची सवय नसल्याने झोप लागत नव्हती. माझ्या आणि सौ गीताच्या मनात एक क्षण विचारही आला " कशा साठी हे श्रम करत तंगडतोड करायची? बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना शेतात काम करण्याची, चालायची, वारीची सवय आहे. आपण बघू जर पाय बरे झाले तर पुढे......... नाहीतर सरळ उद्या सकाळी घरी निघू". पुरुष आणि महिलांची राहण्याची सोय वेगळी वेगळी असते, आम्ही एकमेकांना थकल्या बद्दल आणि परत जाण्याबद्दल काहीही बोललो नाही. पांडुरंगाने आम्हाला वारी घडवण्याचे मनावर घेतले होते, सकाळी लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ केली आणि सगळा शीणवटा गेला, आपण काल तीस किलो मीटर चाललो हे अजिबात जाणवत नव्हते. सगळ्यानी सांगितले वारीची हीच खासियत आहे, तुम्ही फक्त प्रपंच मागे टाकून वारीला निघा ...पुढची सगळी काळजी पांडुरंग घेतो, तो रात्री येऊन भक्तांची सेवा करतो..पाय चेपून देतो. खरचं आमचे पुढे जाणे अनाकलनीय होते. वारीचा मुक्काम सासवडला दोन दिवस होता, दुसऱ्या दिवशी ह भ प श्री बाबा महाराज सातारकरांचे प्रवचन अगदी समोर बसून ऐकण्याचा योग आला. संध्याकळी हरिपाठ आणि भजन हे नित्यनेमाने होत असे. दिंडीतल्या सगळ्यांची भजने, हरिपाठ, अभंग,ञानेश्वरी , गीता, संतवचने, गोष्टी असे सगळे तोंडपाठ ऐकल्यावर आपल्या खुजेपणाची जाणीव वेळो वेळी होत होती. सासवड मध्ये दाते कुटुंबियांनी अतिशय आगत्याने सगळ्यांची उत्तम सोय केली होती. काही सोबती तेथून परत गेले तर काही जण तिथून वारीत सामील झाले.
माऊलींनी सकाळी जेजुरी कडे प्रस्थान केले. सगळे वारकरी वारीच्या रस्त्यावर जाऊन दुतर्फा वाट बघतात आणि आपल्या दिंडीचा नंबर आला की वारीत सामील होतात, आम्ही जेजुरीकडे निघालो. सकाळचा आणि दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी डोंगरावरचे खंडोबाचे मंदिर दृष्टीपथात आले, आम्ही जेजुरीत पोहोचलो. रस्त्यात दुतर्फा भाविकांची गर्दी होती, जेजुरीकरांनी भंडारा उधळत ढोल ताश्यांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. माऊलींची आरती झाल्यावर पुढे तीन चार कि .मी चालल्यावर एकदाचा मुक्काम आला. राहुट्या टाकून झाल्या होत्या, आम्ही डीझेल जनरेटर आणि वायरिंग केले,राहुट्यांमध्ये बल्ब लावले. कोणी दात्याने ह्याच वर्षी आमच्या दिंडीला जनरेटर दिला होता , त्यामुळे लाईट आणि मुख्य म्हणजे भ्रमणध्वनी पुनर्भारीत करणे शक्य झाले होते. जेजुरीचा मुक्काम पंढरपूरच्या हमरस्त्याला लागून होता, आजू बाजूस इतरही दिंड्यांच्या राहुट्या होत्या. सगळा माहोल बघून विवंचनेत पडलो, उद्या सकाळचे काय? शरीरविधी उरकायचे कुठे? एक दोघे जाऊन परिसराची टेहाळणी करून आलो. हरिपाठ . भजन ,भोजन केले आणि अंथरूण पसरले. राहुटीमध्ये हा पहिलाच मुक्काम, ढेकाळलेली जमीन, पातळ , आपल्या शरीरापुरते अंथरूण आणि वारकरयांमुळे सतत वाहता रस्ता , झोप लागणे कठीण होते. वारीच्या दिंड्यांमध्ये नसलेले भाविक आपल्याला झेपेल तसे आणि त्या वेळी चालतात, असे जाणाऱ्यांची संख्याही दिंड्यांमधून जाणारया वारकरयान एवढीच असेल. पहाटे तीन वाजता उठून सगळे विधी उरकले, थंडगार पाण्याने ट्यांकर खाली अंघोळ केली,बेडींग आणि राहुट्या गुंडाळून ट्र्क मध्ये टाकले. ट्रकला सगळे समान घेऊन साडेचार पर्यंत निघणे भाग असते नाहीतर एकदा दिंड्या निघाल्या की रस्ते वाहनांसाठी बंद करतात आणि ट्रकला तर पुढे जेवणाच्या मुक्कामी जाऊन स्वयंपाक करायचा असतो. आपले समान गेले की प्लास्टिक पेपर च्या इरल्यावर उघड्यावर पडून नाहीतर बसून उजाडायची वाट बघायची आणि पाच साडे पाच वाजता पुन्हा निघायचे पुढल्या मुक्कामाच्या........ आता वाल्हे गावाच्या दिशेने.


लोणंद हून निघालो तरड गावाला आज आम्ही चांदोबाचा निंब येथे पहिले उभे रिंगण बघणार होतो. चांदोबाचा निंब जसे जवळ आले तसे रस्त्यात खूप गर्दी वाढू लागली. वारीची पहिले उभे रिंगण , सगळे दिंडीकरी रस्त्यात दोन्ही बाजूला उभे राहिले , वारकऱ्यांचे खेळ, फुगड्या झाले, देवस्थानचे चोपदार येऊन व्यवस्था बघून गेले. माऊली! माऊली! गजर झाला आणि माऊलींचा अश्व वारीच्या सुरुवाती पासून माऊलींच्या पालखी पर्यंत आला, मन झुकवून दर्शन घेतले, प्रसाद खाल्ला आणि परत सुरुवातीला गेला अन पुन्हा एकदा अशीच चक्कर मारली. ह्या अश्वाला हात लावण्यासाठी आणि नंतर त्याच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी आणि बघे ह्यांची एकच धूम उडाली.

ह्याच्या पुढचे वारीचे मुक्काम होते बरड आणि नंतर नातेपुते. बरडहून नातेपुतेला जातांना आम्ही सातारा जिल्हा पार करून सोलापूर जिल्ह्यात आलो होतो. रस्त्यात आपल्या ९० वर्षे वयाच्या आईला खांद्यावरून वारी घडवणारा आजच्या युगातील श्रावणबाळ भेटला.
नातेपुते ते माळशिरस च्या मुक्कामात सदाशिव नगरचे पहिले गोल रिंगण होते. प्रत्येक दिंडी धावत धावत रिंगणात प्रवेश करत होती , धावायची सवय नसल्याने आमची दमछाक झाली, मग खेळ, फुगड्या, उंच उड्या, मनोरे ह्या सगळ्यात वृद्ध वारकरीही भाग घेत होते, एवढे चालून आल्यावर त्यांच्यात कुठून शक्ती आणि जोर येतो? असा प्रश्न आम्हाला पडला. रिंगणाच्या मध्ये पालखी असते आणि त्याच्या बाजूला फक्त दिंड्यांच्या विणेकरयांना प्रवेश असतो. माऊलींच्या अश्वाने रिंगणात फेऱ्या मारल्या माऊली! माऊली! चा गजर झाला, पायीची धूळ मस्तकी लावली आणि वारकऱ्यांच्या अन विणेकरयांच्या खेळांना अजून जोर चढला.
माळशिरसचा मुक्काम संपवून आम्ही वेळापूरच्या दिशेने निघालो, वाटेत खुडूस फाट्याला अजून एक गोल रिंगण झाले. वेळापूरच्या प्रवासात धावाबावी येथे जोरदार पावसाने आम्हाला गाठले, प्रत्येकजण डोक्यावर प्लास्टीकचे इरले घेऊन चालत होता , सगळ्यांची इरली सारखीच होती त्यामुळे आपल्या दिंडीतल्या लोकांना ओळखणे कठीण जात होते, पण पाऊस लवकर थांबला. धावबावी ह्या ठिकाणी रस्त्यावर उतार आहे प्रत्येक दिंडी वरती थांबते आणि मग सगळे एकदम माऊलीमाऊलीचा गजर करत उतारावरून धावत येतात.
वेळापूर नंतर मुक्काम होता भन्डी शेगाव ह्या प्रवासात ठाकूरबुवाची समाधी येथे गोल रिंगण झाले. ह्याच मार्गात माऊलींची आणि संत सोपानदेव (सोपान काका) ह्यांची भेट होते. संत सोपानदेवांच्या पादुका पालखीतून काढून त्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घडवतात. मध्यंतरीच्या मुक्कामात महिलांच्या राहुटीत सकाळी उठल्यावर एका आजींच्या अंथरुणा खाली सापडलेले वाळवीचे वारूळ, पहाटे तीन वाजता अंघोळ करतांना अण्णांच्या पायावर विंचू सापडणे अश्या घटनाही अनुभवल्या.
झालं!!! आता पांडूरंगाच्या भेटीचे वेध लागले होते , भन्डी शेगाव ते वाखरी एकच मुक्काम बाकी होता. वाखरीच्या मार्गावर बाजीरावाची विहीर येथे उभेगोल रिंगण होते. आम्ही पुन्हा रिंगणात धावलो, फुगड्या खेळलो. इथेच झी २४ तास च्या वार्ताहराने आम्हाला प्रतिक्रिया विचारण्या करता हेरले आणि आम्ही कुवेतहून येऊन वारी करतो आहोत हे कळल्यावर आमची मुलाखत घेण्यासाठी झी २४ तास, ए बी पी माझा, आय बी एन लोकमत , टी व्ही ९, आणि सकाळ वृत्तपत्र ह्यांनी गर्दी केली. ही मुलाखत २८ जून ला दूरदर्शनवर दाखविली गेली आणि बातमी सकाळ (सोलापूर) वृत्तपत्रात आली. आमच्या दिंडीतील सगळे म्हणाले, बघा पांडुरंगाने वारी घडविली आणि गौरवही केला, खरचं आहे!
आमच्या दिंडीचा, वारीचा शेवटचा टप्पा....वाखरी, पण आता हे अंतर खूप लांब वाटत होते. वाखरीचा मुक्काम आला आणि पांडुरंगाने आम्हास वारी घडवल्याचे खूप समाधान वाटले, एक ईप्सित त्याने आमच्या कडून पूर्ण करून घेतले होते. पंढरपूर वाखरी पासून साधारण ३ कि.मी आहे,आमच्या दिंडीची पंढरपुरात मुक्कामाची सोय नसल्याने आम्ही वाखरीतच रहाणार होतो. दशमीच्या दिवशी आम्ही तुळजापूर, अक्कलकोट येथे गाडीने जाऊन आलो, गाडीने प्रवास करणे काही वेगळेच वाटत होते. २९ जूनला माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल झाली. आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी चालत जाऊन पंढरपुरात मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले, साधारण ७ लाख भक्त तिथे होते, त्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन होणे शक्य नव्हते. पांडुरंगाला भक्तांची आस लागलेली असते त्यामुळे तो ही दर्शन देण्यासाठी गाभाऱ्यात न राहता कळसावर येऊन बसतो असे म्हणतात. द्वादशीला उपवास सोडून आम्ही मुंबईकडे निघालो, गाडी आल्यावर आमचे हे मोठे कुटुंब निरोप देण्यासाठी जमा झाले, सगळ्यांचेच डोळे पाणावले, पुढच्या वर्षी नक्की परत या! निदान एक दोन टप्पे तरी करा! सगळे सांगत होते… … बघूया पुढची आषाढी एकादशी १८ जुलैला आहे… …
… … … पुढे पांडुरंगाची इच्छा!!!
मधुसूदन.ज्यो.मुळीक , सौ गीता मधुसूदन मुळीक
शनिवार, १ सप्टेंबर, २०१२
अनाथांची माय
माय म्हणजे माई----- सौ .सिंधूताई सपकाळ. मी
सहावीत सातवीत असताना आमच्या शाळेत (राजर्षि शाहू छत्रपती
विद्यानिकेतन जि.प.कोल्हापूर ) त्यांना
भाषणासाठी बोलावले होते. तेव्हा मी त्यांना
पहिले होते. तेव्हाच त्यांची संघर्षमय कहाणी ऐकली होती.
त्यानंतर आता खूप वर्षांनी पुन्हा एकदा
सिंधुताई सपकाळ आमच्या चर्चेत आल्या.आम्हाला
त्याच्या अनाथाश्रमासाठी काही देणगी द्यायची होती.कुवैतहूनच आम्ही त्यांचा पत्ता मिळवला
होता.१८ ऑगस्ट ला इंद्रायणीने
पुण्याला गेलो.ऑफिसमध्ये गेलो.तिथे
एक काका होते,त्यांनी बसायला सांगितले.आम्ही
इकडेतिकडे बघत बसलो.पुरस्कारांचा खच पडला होता.ते नीट ठेवण्यासाठी तिथे पुरेशी जागाही नव्हती .तेव्हा मला खूप हसू
आले की,आपल्याला कधी काळी मिळालेले
हातावर मोजण्या इतके पुरस्कार शोकेस मध्ये ठेवतो आणि तेही सर्वबाजूने लोकांना दिसतील
असे.

मग आम्ही त्यांच्या बरोबर नविन आश्रम बघायला गेलो.त्यांनी पावतीवर सौ. सिंधुताई
अशी सही केल्यामुळे मी त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारले.तेव्हा त्यांनी ते हयात
असल्याचे सांगितले.पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच नव्यराने एके काळी त्यांना मुलगी झाली म्हणून घरातून हाकलले होते,
गाईच्या गोठ्यात फेकून दिले होते. इवल्याश्या जीवाची
नाळ दगडाने तोडून, त्या गाईच्या गोठ्यात राहिल्या. ज्या गायीच्या दुधाने बाळास जीवदान
मिळाले, आणि ज्या गोठ्याने त्यांना
आश्रय दिला त्याची आठवण म्हणून दीडशे गाईंचे गोसंरक्षण केंद्र सुरु केले. ह्या केंद्राचा कार्यभार त्यांचा नवरा सांभाळत आहे. तसेच
त्यांची ती मुलगी सौ.ममता सध्या एका आश्रमाची जबाबदारी सांभाळत आहे.
गप्पांच्या ओघात आम्ही आश्रमाच्या जवळ आलो. अमेरिकेत भाषणा साठी गेले असताना तेथील
लोकांनी दिलेल्या देणगीतून हा आश्रम उभा राहिल्याचे त्यांनी सांगितले. सन्मती बाल संगोपन
ची ही वास्तू तयार झाल्यावरही मुलांना ह्या आश्रमात आणणे सोपे नव्हते, महाराष्ट्र राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची मदत दिली नव्हती पण परवानगी साठी
मात्र एक अट घातली आणि त्यानुसार माईंनी सरकारला
लिहून दिले की, मी सरकारकडे कुठलेही अनुदान मागणार नाही, असा हा अजब सरकारी न्याय! आश्रमाच्या दारात त्या दिसताच आश्रमाचे कर्मचारी माईना
सलाम करत होते. आश्रमात चाळीस -पंचेचाळीस मुले होती, त्यांनी लगेच रांग लावून घेतली आणि सिंधुताई गाडीतून उतरताच
एक एक जण त्यांच्या पुढे नतमस्तक होत होते. हे दृश्य बघून खरंच डोळे पाणावले. चार माजली
आश्रम सुनियोजित वाटला. लहान, मोठ्या मुलांच्या
वेगवेगळ्या अभ्यासिका, तसेच बंक बेड सारखी
त्यांची झोपायची सोय, संपूर्ण आश्रमाला
असलेले कम्पाउन्ड , त्यात त्या मुलांची
खेळायची सोय, मोठ्ठा देव्हारा आणि
सतत तेवत राहणारा मोठा नंदादीप. आपली आई भाषणासाठी कुठे कुठे जाते, ती घरी सुखरूप परत येऊ
दे म्हणून ही मुलंच दिवा लावून प्रार्थना करतात
असे त्यांनी सांगितले. पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांचे कपडे आश्रमात असलेल्या महिला
धुतात शाळेत जाणारया मुलांना डबा करून देतात, पाचवी पासूनच्या मुलांना स्वावलम्बनाचे धडे म्हणून त्यांचे त्यांना
काम शिकवले जाते. इथे टी.व्ही नाही तसेच लहान मुलांचा अभ्यास घेण्याची जबाबदारी तेथीलच एका मोठ्या मुला कडे दिली जाते.
त्यांच्या आश्रमातून शिकलेली बरीच मुले मोठ्या हुद्यापर्यंत पोहोचली आहेत. आश्रमातील मुलींची लग्ने लावून माई थांबत नाहीत, मुली जावयाचे सर्व वर्षसण, बाळंतपण एक खरीखुरी आई
आपल्या लेकीसाठी करते किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर जास्तच या माई आपल्या लेकींसाठी
करतात.
एक मुलगी तर लग्न होऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन परत आश्रमात आली आहे.या आश्रमाचा
कार्यभार सांभाळण्यासाठी ते सेवा देत आहेत.याच्याही पुढे जाऊन ती मुलगी म्हणते की,या आश्रमाने मला एव्हढे दिले की,मी सासरी रमू शकले नाही.त्यांचे भाषण चालू असताना हळूच व्यासपीठावर
लहान अर्भक आणून ठेवतात ,असाही त्यांचा अनुभव
आहे.तसेच आश्रमाच्या दारात रात्री अपरात्री बाळ आणून ठेवतात असं ही त्यांनी सांगितले.एकदा
त्यांना एक तासाचे बाळ सापडले.ते काळेनिळे पडले होते.त्याला पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये
ठेऊन जगविले.तसेच एक बाळ मेलेल्या आई च्या कुशीत सापडले.त्यांच्या या ३२ वर्ष्यांच्या
कारकीर्दीत त्यांनी सांभाळ केलेल्या मुलांपैकी एकही मूल दगावलेले नाही हे त्यांचे वैशिष्ट्य
आहे.
सद्ध्या सिंधुताई ६५ वर्ष्यांच्या आहेत.पण त्यांचे हे कार्य तिथे जाऊन बघणाऱ्यांना
खरच अचंबा वाटण्यासारखे आहे.स्वतःची करुण कहाणी
आणि मनाची दांडगी हिम्मत यांच्या जोरावरच हा सर्व डोलारा त्यांनी उभा केला आहे.
शेवटी सिंधुताई सपकाळ सर्वांना कळकळीने सांगतात की,"मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा !!!"
सौ गीता. मधुसूदन. मुळीक

मंगळवार, १० एप्रिल, २०१२
आमची दुबई सफर
सुट्टीतली भटकंती म्हटले की अगदी लहान थोरांच्या अंगात उत्साह संचारतो, आम्ही दुबईची तयारी अगदी डिसेंबर २०११ पासून केली होती. दुबईचे तिकीट, अटलांटिस, बुर्ज खलिफा, डॉल्फिन शो, सगळ्यांचे आरक्षण करून ठेवले होते आणि वाट बघत होतो, ओमची परीक्षा संपण्याची. परीक्षा संपली मात्र आणि आम्ही १७ मार्चला फ्लाय दुबई ने निघालो. अगमनोत्तर विसा घेऊन कधी एकदा आगमन कक्षातून बाहेर पडतो असं झालं होतं. आत्तापर्यंत जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष अनुभवलं, विसा मिळविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अमिराती लोक चांगले सहाय्य करतात (मुख्य म्हणजे खडूसपणे अरेबिकच न बोलता व्यवस्थित इंग्रजी बोलतात) अर्ध्या तासात आम्हाला विसा मिळालेही.
बरेच दिवस एकाच परिघात फिरून फिरून कंटाळा आला होता. त्यामुळे भ्रमंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर किंबहुना पडतानाच हुरूप आला होता. पोहोचल्याबरोबर प्रथम उत्सुकता होती ती म्हणजे हॉटेल अटलांटीस. एवढ्या मोठ्या प्रशस्त हॉटेलमध्ये राहायला मिळणार याचाच खूप आनंद होता.
हॉटेल कडे जाण्याचा रस्ता खूप छान होता, आणि समोर हॉटेलची प्रशस्त, सुंदर वास्तू, पोर्च मध्ये गाडीतून उतरताना आम्हालाच जरा बुजल्यासारखे वाटले. हॉटेलचा स्वागत कक्ष आणि तिथली सजावट बघूनच थक्क झालो. हॉटेलला पूर्व पश्चिम असे दोन भाग आहेत, आम्ही मुद्दामहून अक्वावेन्चर च्या जवळचा पश्चिमेकडचा मागून घेतला. रूम चे दार उघडले आणि मुले समोर दिसणारा समुद्र आणि तरणतलाव बघून खूपच खुश झाली. रूम मधला टीव्ही चालू केला तर आमच्या नावाने स्वागतपर मेसेज येत होता. मुख्य खोलीतून बाथरूम मध्ये जायचा दरवाजा खूपच सुरेख होता, तो एक छान वार्डरोब वाटत होता. खरा तो सरकवायचा दरवाजा होता, ही कल्पना मला खूप आवडली. मग ताजेतवाने होऊन भटकंती सुरु झाली. पर्यटकांची बरीच गर्दी त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती बघायला मिळाल्या. अम्बेसेडर लगून मधले मोठे मोठे माशांचे टैंक आणि अगणित रंगीत मासे, डोळे थक्क करणारे माशांचे प्रकार पाहिले. ह्या माश्यांना बघणारी जगभरातून आलेली आणि प्रेक्षणीय पेहेराव केलेली माणसेही पहिली ( लोकांनी बघावे म्हणून ते किती कष्ट घेतात, न बघून अन्याय का करा?) खूप एन्जॉय केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच आधी Lost चेम्बर बघितले मग एक्वावेन्चरला गेलो, तिथे मस्त मुलां बरोबर मुलं होऊन मनमुराद पाण्यात खेळलो, कसे बसे मुलांना बाहेर काढले. अरे एक राहिलेच, अटलांटिसच्या भागात आम्हाला कावळे दिसले. कुवेतचे कावळे आणि बगळे (थव्याने फिरणारे बुरखाधारी स्त्रिया आणि दिशदाशावाले पुरुष) नाहीत, तर भारतात दिसतात ते पक्षी, काय आश्चर्य! कधी पाहिलेत कुवेतला कावळे?
नंतर आमचा मुक्काम हलवला हॉटेल प्रीमियर ईनमध्ये. तिथेही छान सोय होती. विशेष म्हणजे रोजचा स्वयंपाकाचा ताण नव्हता. दररोज हॉटेलात खायचं-प्यायचं मजाच चालली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं. लगेचच तयार होऊन मिर्दीफ मध्ये सिटी सेंटर मॉल मध्ये आयफ्लाय साठी गेलो. ह्याच्यात तुम्हाला शून्य गुरुत्वाकर्षण अनुभवता येते. एका मोठ्या ट्यूब मध्ये खालून जोरात हवेचा दाब सोडतात आणि त्यावर तुम्ही तरंगायचे, ह्यासाठी आधी तुम्हाला छोटेसे प्रशिक्षण देतात. आम्ही तिघेही घाबरलो.
आमच्या अहोंनी मात्र ते केले.आम्ही घाबरत घाबरत त्यांचे शुटींग करत होतो. तिथून जवळच हत्ता रोड वर Dragon मार्ट आहे, सगळे चीनचे समान मिळते खऱ्या अर्थाने पिन ते कार, प्रचंड मोठा मॉल आहे. वेळ कमी पडल्याने पुन्हा सावकाश येऊ म्हणून स्वतःला समजावून बाहेर काढले. अल करामा भागात जाऊन यथेच्छ अगदी मुंबईमध्ये मिळते तसे भोजन केले.
सकाळीच डॉल्फिन शो साठी निघालो. ११.०० चा शो होता. परिसर खूपच सुंदर होता. मध्ये मध्ये फोटो काढणं चालूच होतं. डॉल्फिन शो आधी बघितले असल्याने, फार काय वेगळे असणार? असे वाटले होते पण दुबईक्रीक मधला डॉल्फिनेरीयमचा शो खरच छान आहे. ह्या शोची, वी आई पी तिकिटे आधी इंटरनेट वरून बुक केल्याने अगदी समोरच्या खुर्च्यावरून बघता आला, खूप मजा आली.
मग मोर्चा दुबई मॉलकडे वळविला. तिथले मत्स्यालय आणि झू बघितले आणि मग बुर्ज खलिफा च्या मार्गी लागलो. जगातली अत्युच्च इमारत बुर्ज खलिफा बघायला खूप उतावीळ झालो होतो. हातातील सर्व सामानासह प्रत्येकाचे स्क्यानिंग होऊन आत प्रवेश देण्यात येत होता. इमारत बघताना बांधकाम कौशल्य, विज्ञानाची प्रगती ह्या सगळ्याचे नवल वाटत होते. जायच्या वाटेवर दुबईच्या प्रगतीचा आलेख चित्र रूपाने दाखविला आहे. आम्ही एकशे चोविसाव्या मजल्यावरील प्रेक्षागारातून दुबईचे दृश्य पहिले पण सौदी कडून कुवैतला आलेले धुळीचे वादळ एव्हाना तिथेही पोहोचले होते, त्यामुळे थोडी निराशा झली. इमारत बघून खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर तिथेच खाली सांगीतिक कारंजी पहिली. शो होता पाच मिनिटांचा पण त्यासाठी प्रतीक्षा केली ४५ मिनिटांची.
एक ठिकाण, त्याबद्दल ह्यांनी डिस्कवरी टीव्ही वर ऐकले होते ते चिल-औट बार, हे ठिकाण दुबईमध्ये फारसे प्रसिद्ध नसल्याने शोधण्यास बराच वेळ गेला, पण इच्छयाशक्ती इतकी दांडगी कि शेवटी मिळालेच. हा बार पूर्णपणे बर्फाचा बनविलेला आहे, म्हणजे भिंती, सोफे, टेबल, डीश, आतल्या शोभेच्या वस्तू, फ्रेम सगळे सगळे. तिथे प्रत्येकी साधारण पाच केडी प्रवेश फी घेतात आणि मोबदल्यात तुम्हाला थंडीचे कपडे(तात्पुरते) आणि आत चहा / कॉफी / सरबत (फळांचे) देतात. खूप वेगळा अनुभव होता तो!! एव्हढ्या मेहनतीने शोधले पण काहीतरी नवीन बघायला मिळाल्याने मजा आली. हे ठिकाण किंग झायेद रस्त्यावर अल क़ौज़ भागात टाईम्स स्क़्वेअर मॉल मध्ये आहे आणि हा मॉल, मॉल ऑफ एमिरेट्सच्या थोडा अलिकडे आहे. नंतर मॉल ऑफ एमिरेट्सच्या स्कीदुबई मध्ये गोठेस्तोवर बर्फात खेळलो, तिथे डोक्याची टोपी सोडून बाकी थंडीचे कपडे आणि बूट प्रवेशफीच्या रकमेत मिळतात. टोपी चार पाच केडीला विकत मिळते म्हणून जाताना इथूनच घेतलेली बरी.
सर्वात थरारक अनुभव म्हणजे संध्याकाळची डेझर्ट सफारी. आत्तापर्यंत जे छायाचित्रात बघितले होते ते वाळवंट प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले. तोच रंग तश्याच रेतीत तयार झलेल्या लाटा, विश्वासच बसत नव्हता. रेतीच्या प्रचंड टेकड्या, त्यावरून जाणारी आमची गाडी आणि आमच्या गाडीच्या मागे येणारा वीस पंचवीस गाड्यांचा कारवा दृश्य खरंच बघण्यासारखं!! पण छातीत धड-धड वाढवणारं! म्हणजे मजा आणि धड-धड यांचे काही वेगळेच मिश्रण. दीड दोन तासांची मस्ती करून झाल्यावर कॅम्पला गेलो. तिथे मुलांनी उंटावरून फेरी मारली अरेबिक पोशाख घालून मनसोक्त छायाचित्रे काढली. मग चहापाणी झालं त्यानंतर तानुरा आणि बेली नृत्य, बरोबर बुफेचा आस्वाद! परत रात्री साफारीवाल्याने आणून हॉटेलवर सोडले.
सकाळ झाली आणि आम्ही परत निघालो पुढच्या मोहिमेवर, आज अल आईन. हे अबुदाबितले एक शहर आहे. दुबईहून साधारण दीड तास गाडीने प्रवास करून तिथे पोहोचलो. आधी अल आईन चे प्राणीसंग्रहालय बघितले, छान आहे. तिथला गोरिला खूपच रुसला होता. काही केल्या आमच्याकडे तोंड करत नव्हता. (त्याचे ही बरोबर होते म्हणा रोज रोज किती जणांना दर्शन देणार?) आम्ही जरा नजरेआड झालो कि हळूच तिरक्या डोळ्यांनी बघायचा आणि जरा समोर गेलो कि परत तोंड फिरवायचा, देवी ओम खूप हसले. पुढे ग्रीन मुबझ्हरा नावाचे ओएसिस आणि गरम पाण्याचा झरा पहिला, छान गरम पाणी आहे जरा वेळ पाय टाकून बसलो आणि थकवा घालवला.
नंतर जबील हाफित डोंगर चढून वर गेलो, ह्याची उंची १३०० मीटर आहे, एवढा उंच डोंगर तोही वाळवंटा मधे बघून नवल वाटले. प्रथमच गल्फमध्ये घाट अनुभवला, डोंगरमाथ्याहून संपूर्ण अल आईन चे विहंगम दृश्य दिसते. परतीच्या वाटेवर अल आईन राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आणि राजवाडा पहिला.
हॉटेल मध्ये परत येऊन जरा ताजेतवाने झालो तर क्रुझ डिनर साठी गाडी आली. मरीना क्रुझ मध्ये हा डिनर घेतला. हे जरा कंटाळवाणेच होते.
बाकी राहिलेले एक आकर्षण म्हणजे वंडर बस. वंडर बस खरोखरच वंडरफुल होती. अर्धा तास जमिनीवर व एक तास तीच बस, बर आणि डेरा दुबई मधल्या खाडीत असा दीड तासाचा तो प्रवास होता. बसमध्ये एक गाईड होता तो सगळी माहिती देत होता. वंडर बसची कल्पना खूप छान वाटली.
आता राहिली होती खरेदी, जुना, नवा गोल्ड सुक पाहिले, खरेदीही केली, पण माहिती साठी एक गोष्ट; तिथे करणावळ जास्त आहे, साधारण १ ग्रामला कमीतकमी १ केडी. आता निघायचा दिवस आला, मग ड्रॅगन मार्टला गेलो, पण कोण निराशा ( आणि ह्यांचे फावले) शुक्रवार असल्याने जेमतेम काही दुकाने उघडली होती आणि बाकीची संध्याकाळी उघडणार होती. जमेल तशी आणि तेवढी खरेदी केली आणि घाईघाईने हॉटेलला परतलो कारण लगेचच सामान उचलून चेक इनला धावायचे होते.
सर्व गाशा गुंडाळून मग परतीचा प्रवास चालू झाला. एक आठवडा कसा गेला कळलेच नाही. खूप मजा आली. पुढच्या चाकोरीबद्ध जीवनासाठी फ्रेश होऊन आलो.
![]() |
सौ. गीता मधुसूदन मुळीक |
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११
शनिवार, ३ सप्टेंबर, २०११
वाळवंटातलं फार्म हाऊस
FARM HOUSE म्हटलं की डोळ्या समोर येतं ते लांबच लांब हिरवगार शेत, टुमदार घर, मोकळी अशी जागा आणि शुद्ध हवा. अस एखादं FARM HOUSE बघायला भारतात मिळणं हे काय नवीन नाही. पण हे मी असं म्हटलं की कुवेत ला सुद्धा बघायला मिळालं तर ते एखादं आश्चर्य वाटावं इतपत अशक्य वाटतं. कुवेत म्हणजे वाळवंट हे इतकं डोक्यात पक्क बसलंय की असं काही कुवेत ला बघायला मिळेल असं कधी वाटलंच नाही.
FARM HOUSE आम्हाला बघायला मिळालं ते आमचा मित्र राहुल गोखले मुळे. राहुलच्या मित्राचं कुवेतला farm house आहे. ते बघायची आम्हांला संधी मिळाली. १०० acre ची जागा पण काम करायला फक्त तिकडे १२ माणसे आहेत. वाळवंटाच्या जमिनीत एकाच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिके वाढवली आहेत. तिकडे आम्हांला वांगी, भोपळा, दुधी भोपळा, कोबी, cauliflower, पालक, मुळा, बटाटा अशी बर्याच प्रकारची फळझाडे, हिरव्या पाले भाज्या बघायला मिळाल्या.
पालक पण जमिनी पासून एक फूट वरती उगवलेला . वांग्याचं फुल वांगी रंगाचं खूप मोहक होतं. एका कोबीच्या झाडाला चार-चार मोठे कोबी एकदम लागले होते; कोबीचा आकार एवढा मोठा की 'मोठा' हा शब्द पण कमी वाटत होतां. खरंतर भव्यच.
सहा फूट उंच सूर्यफुलाची झाडे एवढी कडक आणि सरळ होती की वाकवायचा प्रयत्न केला तरी ती वाकली गेली नाहीत. फुले पण सूर्यासारखीच भव्य होती.
सगळ्या भाजीत आवडती भाजी बटाटा - जमिनीत प्रत्यक्ष बघताना मजा वाटली . मक्या ची झाडे पण तितकीच छान. शेतातल्या कोवळ्या मक्याची चव तर काय अफलातून.
"चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" असे म्हणणार्या आजीची गोष्ट आठवली तो महाकाय असा लाल भोपळा बघून. ती तेव्हा ही खरी वाटली होती आणि परत एकदा आता सुद्धा विश्वास ठेवावासा वाटला. हिरवे कच्चे tomato बघून कच्च्या tomatochi भाजी किती छान होईल हा विचार मनात आल्या वाचून राहिला नाही.
तिकडे cattle farming, fish farming सुद्धा बघायला मिळाले. त्यांनी बकर्या, शेळ्या पाळलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बदके त्या बरोबर Turkey हा पक्षी पण बघायला मिळाला. आता पर्यंत मोराला पिसारा फुलवताना बघितला होता, पण Turkey हा पक्षी पण पिसारा फुलवतो हे पहिल्यांदा बघितले. Turkey सुद्धा मोरा सारखाच कर्कश ओरडतो. ही एक निसर्गाची वेगळी अशी विसंगती. दोन्ही पक्षी दिसायला सुंदर पण आवाज मात्र कर्कश.
Cattle ना जो चारा दिला जातो तो म्हणजे मक्याची सुकलेली झाडे किंवा चारा ते शेतात पिकवतात. सुकलेली झाडे फेकून देण्या पेक्षा शेळ्यांना खायला देवून त्याचा उपयोग केला जातो.
शेतातून शुद्ध अशा हवेत फिरताना मजा येत होती. खूप दिवसा पासून इच्छा होती शेतात बसून कांदा-भाकरीच गावरान जेवण जेवावं. म्हणून दुपारचे जेवण आम्ही शेतात बसून घेतले. जेवण नेहमीचंच पण त्या दिवशी त्या जेवणाची चव काय वेगळीच होती.
एक समाधान मिळाले की मुले अभ्यास करताना ज्या सगळ्या गोष्टी शिकत आहेत त्या थोड्या प्रमाणात का होईना मी त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकले. पुस्तकी माहिती पेक्षा प्रत्यक्ष बघितलेल्या गोष्टी जास्त चांगल्या लक्षात राहतात ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
सौ. श्रुति हजरनीस
बुधवार, २५ मे, २०११
आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलॅंड - भाग २
आमच्या या १३ दिवसांच्या टूरचे मुख्य आकर्षण होते, अरुणाचल प्रदेशमधील तवांग. नामेरीहून आम्ही निघालो, ते साधारण ३६५-३८० कि.मी. वर असलेल्या तवांगला जायलाच. परंतु हा सर्व प्रवास डोंगराळ प्रदेशातून होता. रस्तेही कच्चे आणि खराब होते. त्यामुळे नामेरीपासून १८० कि.मी. असलेल्या दिरांग या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता. आम्ही आसाम-अरुणाचलच्या बॉर्डरवरील भालूकपॉन्ग या गावी पोहोचलो. दुपारचे साधारण १२ वा़जले होते. पुढच्या प्रवासात हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने आम्ही इथे जेवून घेतले. इथे आमची Inner Line Permits तपासण्यात आली. सगळ्या गाड्यांची नोंदणी करण्यात आली, आणि आम्ही अरुणाचलमध्ये प्रवेश केला. इतका वेळ दूर दूर दिसणारे डोंगर आता जवळ दिसायला लागले. हळूहळू चढावाला सुरुवात झाली. नागमोडी वळणाचे रस्ते सुरू झाले. त्यामुळे गाडीचा वेग बराच मंदावला. सुरूवातीला चांगले असणारे रस्ते आता आपले खरे स्वरूप दाखवायला लागले. अरुणाचल प्रदेशात पाण्याचे स्त्रोत विपुल प्रमाणात आहे. डोंगरातून हे पाणी ओहोळ, झरे या स्वरूपात सारखे रस्त्यांवर येत असते. हे पाणी आपल्याबरोबर माती, लहान दगड घेऊन येते. त्यामुळे रस्त्यावर कायम चिखल होतो. कितीही चांगले रस्ते काही काळानंतर खराब होतात. आपले BRO (Border Road Organisation) हे रस्ते नीट ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असते. आधी एवढ्या अवघड डोंगररांगातून रस्ते तयार करणं हे शिवधनुष्य पेलल्यासारखे आहे. BRO ला त्यासाठी शेकडो सलाम! एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला दरी, मधोमध रस्ता. सगळीकडे हिरवीगार गच्च झाडी दिसत होती. मधे मधे रानकेळी फोफावल्या होत्या. पोपटी हिरव्या पासून गर्द हिरव्या रंगाच्या विविध छटा बघायला मिळत होत्या. जिथे नजर टाकावी तिथे हिरवा शेला ल्यायलेले डोंगर दिसत होते.
जसे जसे आम्ही वर जात होतो, तशा पलिकडच्या डोंगररांगा नजरेस पडायला लागल्या. आजचा प्रवास जरी १८० कि.मी.चाच असला, तरी त्याला ८ तास लागणार होते. २-३ तास प्रवास झाल्यावर चिन्मयने सहजच आमच्या driver ला विचारले, दिरांग नक्की कुठे आहे? आमचा driver अगदी सहज म्हणाला, ' ये सामने का पहाडी है ना, ये पार करनेका, उसके बाद और दो पहाडी आएगा...वो भी चढके उतरने का, उसके बाद एक पहाड चढने का...बस...दिरांग आ जायेगा | ' हा भयंकर पत्ता ऐकल्यावर काकांनी विचारले..'आगे का रस्ता भी ऐसा ही है?' तेव्हा अगदी उत्साहाने कोलीदा (आमचा driver) वदले...'नही, नही...इससेभी खराब है!' रात्री पाठीच्या कण्याची काय हालत होणार आहे याचा अंदाज बांधत सगळे गप्प झाले!
या सर्व रस्त्यावर आपल्याला एरवी दिसतात तसे धाबे वगैरे काहीही नव्हते. गावेही फारशी लागत नव्हती. आर्मीचे कॅम्प्स मात्र बर्याच ठिकाणी होते. वाटेत न्याकमडाँग वॉर मेमोरिअल बघायला थांबलो. त्या वॉर मेमोरियलच्या बाहेरचा बोर्ड वाचून डोळ्यात पाणी आले.
आम्ही प्रवास करत असलेला अरुणाचल प्रदेश मधील सगळा भाग १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनच्या ताब्यात गेला होता. चीनची बॉर्डर जवळ असल्याने, आणि अतिसंवेदनाशील भाग असल्याने त्या भागांमध्ये फोटो काढण्याची परवानगी नव्हती.
सुर्यास्त लवकर झाला, त्यानंतरचा प्रवास काळोखात असल्याने, कंटाळवाणा वाटायला लागला. कोलीदा मजेत गाडी चालवत होता. मी आणि चिनू काहीतरी बोलत होतो. मग हळूहळू आशाताई आणि गोंधळेकर काकाही त्यात सामिल झाले. पुढचा एक- दीड तास मस्त गप्पा रंगल्या. बोलण्याच्या नादात दिरांग कधी आले ते कळलेच नाही. संध्याकाळचे ७ वाजले होते. हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा पाठीचे पार भरीत झाले होते. हॉटेलची रूम एकदम मस्त होती. खूप मोठ्ठा राउंड बेड, भरपूर उश्या, उबदार क्वील्ट्स. सामान रूममध्ये टाकून जेवणासाठी बाहेर आलो. हॉटेलचे आवार सोडले तर बाकी सर्व मिट्ट काळोख होता. पण वाहत्या पाण्याचा खळाळता आवाज येत होता, त्यावरून नदी जवळच आहे एव्हढे समजत होते. रात्र जशी वाढत होती, तशी थंडीदेखील वाढत होती. जेवणाची व्यवस्था बाहेरच्या अंगणात केली होती. गरम गरम सूप आणि इतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन रूममध्ये गेलो. हीटर लावून क्विल्टमध्ये शिरलो. सकाळी खूप लवकर जाग आली. वेटर गरमागरम चहा घेऊन आला. चहाचा tray घेण्यासाठी दरवाजा उघडला आणि समोर हे दृष्य दिसले.
चिनूला हलवून जागे केले. म्हटलं, उठ लवकर, बाहेर बघ डोंगर किती मस्त दिसतोय. तो बिचारा उठला...एव्हढ्या थंडीत कशाला इतक्या लवकर उठवते ही आई! डोंगर काय पळून जाणार आहे का थोड्या वेळाने उठलो तर...असे पुटपुटत, डोळे चोळत बाहेर बघितले आणि झटकन तयार होऊन कॅमेरा घेऊन बाहेर पळाला.
हॉटेलच्या अंगणात खूप छान ऊन पडले होते. सगळे जण त्या ऊन्हात ऊबेला बसले. मग हॉटेलच्या व्यवस्थापकाने न्याहारीची व्यवस्था तिथे अंगणातच केली. त्यावेळी चिन्मयचा कॅमेरा चुकून माझ्या हातात आला...आणि मी लगेच त्याचाच फोटो काढला.
आजचा पूर्ण दिवस प्रवासाचा होता. दिरांग ते तवांग व्हाया सेलापास! आम्हाला सेलापास चे खूप आकर्षण होते. वाटेत एक गाव लागले. त्या गावात सगळ्या घरांच्या सज्जात मक्याची कणसे अशी साठवणीला ठेवली होती.
वाटेत एक सुंदर नदी लागली. त्यावर एक मस्त ब्रिज! अगदी पोस्टर सारखे दिसत होते. तिथे थांबल्याशिवाय पुढे जाणेच शक्य नव्हते. खाली उतरून नदीकिनारी गेलो. नदीच्या पाण्यात हात घातला तर अंगातून शिरशिरी गेली... पाणी इतके थंड होते. माझ्याकडे टँगची भरपूर पाकीटे होती. मग नदीचे पाणी भरून घेऊन मस्त सरबत बनवले. आणि सगळ्यांनी प्यायले.
चिन्मय एक ओढा पार करून फोटो काढायला पुढे गेला. मीही मग त्याच्या मागून गेले. ह्या आया ना, सुखाने काही करू देत नाहीत मुलांना! ...काय गरज होती त्याच्या मागून जायची? ओढा पार करताना माझा अंदाज चुकला आणि माझा एक पाय त्या थंडगार पाण्यात घोट्यापर्यंत बुडला. माझा बूट, आतले वूलन सॉक्स, आणि जीन्स्...त्या थंडगार पाण्यात पार भिजले! आधीच हवा एकदम चिल्ड होती...त्यात हे नसती आफत ओढवून घेतली! शांतपणे चिन्मयचे काळजीयुक्त फायरींग ऐकून घेतले. कारण त्यानंतर आम्ही सेलापासला जाणार होतो जिथे सहसा टेम्परचर सब झिरो असते आणि वेगाने वारे वाहत असतात! अशा भिजलेल्या अवस्थेत तिथे जाणे म्हणजे इन्फेक्शनला आमंत्रण देण्यासारखे होते!
मग गाडीत चिन्मयने तो भिजलेला बूट वर्तमानपत्रात गुंडाळून दाबून त्यातले पाणी पिळून काढले! सॉक्स बॉनेट्वर ठेवला...काय काय उद्योग केले! आमच्या सामानात एक्ट्रा सॉक्स होते, पण सगळ्या बॅगा गाडीच्या कॅरीयरवर ठेवल्या होत्या आणि पावसाने भिजू नयेत म्हणून वरून प्लास्टिकच्या मोठ्या कापडाचे आवरण घातले होते. त्यामुळे ते काढणे फार त्रासदायक होते! मग काय.. एका पायाला प्लास्टर सारखी शाल गुंडाळून गपचूप बसले गाडीत! जबरदस्त थंडी वाजायला लागली!
आताचा रस्ता जास्त वळणांचा आणि चढावाचा होता...त्यात पाऊस सुरू झाला...पुन्हा एकदा कोलीदाच्या driving skill ला दाद देत जमेल तसा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. मनात विचार आला, कुवेती लोक सरळ गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवताना निष्काळजी driving मुळे इतके अपघात करतात! जर अश्या रस्त्यांवरून गाडी घेऊन जायची असेल तर, सेलापास पर्यंत कितीजणं पोहोचतील, कुणास ठाऊक!
क्रमशः
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)