लहान वयातच आईबाबांनी पुस्तकांची ओळख करून दिली . त्यामुळे वाचनाची गोडी लहान वयातच निर्माण झाली. सुरुवात ही चंपक, चांदोबा, किशोर अशा पुस्तकां पासून झाली आणि हळुहळु लेख, कथा, कादंबर्या असे वेगवेगळे वाचनाचे प्रकार आवडायला लागले . वाचन चौफेर असावे हे त्यांचे मत कुठेतरी मनावर बिंबले गेले . त्यामुळे कुठल्याही विषयावरची पुस्तके वाचायला आवडायची . कुठल्या ही विषयाच्या कथा ,कादंबर्या असू दे त्यांनी फरक पडत नव्हता . थोडक्यात काय तर विषय महत्वाचे ठरत नव्हते , वाचणे महत्वाचे होत होते. पुस्तक हातात आले की त्याचा फडशा पाडेपर्यंत दम निघायचा नाही.
पण कसे कोण जाणे त्यात कवितांचा समावेश झाला नव्हता. कविता पण वाचायला, समजायला हव्यात असे कधी वाटले नव्हते. कवितेत उगाचच कठीण शब्द, रूपक, अलंकार वापरतात असे वाटायचे. कविता म्हटलं की वाचायचा कंटाळा यायचा. कविता आवडायला लागली खरे तर प्रा. चंद्रशेकर गोखले ह्यांच्या "चारोळया" वाचल्या पासून. एकदा सहजच चारोळ्या वाचल्या व कविता वाचायची गोडी लागली. कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रमैत्रिणी बरोबर बसून चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळया म्हणायच्या आणि भाव खावून घ्यायचा त्यात काही वेगळी मजा होती. कॉलेजची पुस्तके पाठ नसायची पण त्यांच्या चारोळ्यांची सगळी पुस्तक पाठ झाली होती. त्यांच्या चारोळयाचे पारायण केले होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रा. चंद्रशेकर गोखल्यांच्या वर झालेली टीका आजही आठवते. "चारोळया मुळे कवितेचा दर्जा घसरेल", "अशा काय कविता असतात का !" वगैरे... पण माझ्यासाठी चारोळया ह्या कवित्यांची आवड निर्माण होण्यासाठीची पहिली पायरी होती. म्हणून इथे त्यांच्या काही निवडक चारोळया द्यावशा वाटतात :-
तू भेटलीस आणि मी
नगर वसायाची भाषा करायला लागलो
नगराची वेस म्हणून
क्षितीज रेषाच धरायला लागलो
काही नाती तुटत नाहीत
ती आपल्या नकळत मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरं हातून सुटून जातात
प्रत्येक गावाबाहेर
एक महारवाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे
सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
अचानक पालवी फुटली
त्याला ही कळेना
जगायची जिदद कुठली
डोळ्यांतून अश्रू ओघळला
की तोही आपला रहात नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही
झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की त्याला
इजा होत नाही
सौ. श्रुती हजरनीस
लईच भारी गं.. खरंय.. अशा कित्ती कित्ती कविता आहेत ज्यांची अजून ओळखच नाही... जितके वाचाल तितके कमी आहे... मस्तं वाचायचा योग आणलास... ह्यातील २-३ चारोळ्या आधी मी वाचल्या-ऐकल्या होत्या पण ह्या प्रा. चंद्रशेखर गोखल्यांच्या आहेत हे माहीत नव्हते... सहीच...
उत्तर द्याहटवा