श्रीराम नवमी निमित्त,
इतरेजनांचे माहीत नाही पण आपल्या मराठी लोकांच्या दिवसाची सुरुवातच होते मुळी "राम" प्रहराने ! झुंजू मुंजू झाले की सुरु होतो तो रामप्रहर ! रामप्रहरी उठून जो "कर्म रामाच्या" आराधनेत तल्लीन होतो त्याला गवसते आरोग्याची गुरुकिल्ली, आकळते जीवनाचे मर्म आणि लाभ होतो "दौलत रामाचा"! अजूनही मराठी मुलुखात दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा अभिवादनासाठी जे शब्द उच्चारतात ते असतात "राम राम"!
कधी कोणी व्याधींनी ग्रस्त असेल आजारांनी त्रस्त असेल तर त्याला सुटकेसाठी हवा असतो 'रामबाण' उपाय !
कोणतेही काम होईलच याची जेव्हा खात्री नसते तेव्हा आपण ते सोडून देतो ‘रामभरोसे’ !
नवे नवे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला येतात तेव्हा आपण रमून जातो ‘रामराज्याच्या’ स्वप्नरंजनात !
उपनिषदात एक गोष्ट आहे, देवांचा देव महादेव यांना एकदा सखी पार्वती विचारते की या त्रिलोकात सर्वश्रेष्ठ कोण आहे आणि त्यांचे स्तवन कसे करावे? तेव्हा तिला उत्तर मिळते "राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने" साक्षात भगवान शंकर स्तवन करतात, मानतात तुमच्या आमच्या श्रीरामाला ! ‘रामनाम’ आहे सगळ्यात श्रेष्ठ ! अगणित पापांचा धनी असलेला वाल्या कोळी या ‘रामनामामुळे’ पापातून मुक्तच नव्हे तर वाल्मिकी ऋषी म्हणून अजरामर झाला. सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे 'राम'! मर्यादापुरुषोत्तम गौरवला आहे 'राम'! आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श भ्रतार 'राम' ! एकपत्नी, एकवचनी, एकबाणी 'राम' !
एखाद्याला कंटाळा आला, आयुष्य नीरस वाटू लागले की तो सहज म्हणून जातो माझ्या जीवनात काssही "राम" उरला नाही आता ! पण असे म्हणून तो काही अस्वस्थ बसून रहात नाही तर लगेच सुरुवात करतो जीवनात राम आणण्यासाठी ! कारण व्यस्त राहील्यानंतर मस्त आराम केला की जीवनात "राम" लाभतो हे आपल्या सर्वांनाच पटलेले असते आपण नास्तिक असलो व रामाला ईश्वर, भगवान अथवा देव मानत नसलो तरीही !
आणि जेव्हा तो अखेरच्या निर्वाणाचा क्षण येतो तेव्हाही 'आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा "राम राम" घ्यावा' असे म्हणूनच निरोप घेतला जातो, "रामनाम सत्य आहे" हेच तर जीवनाचे अंतिम सत्य ! नाम आहे आदी अंती एक ‘राम’ नाम, जय जय ‘श्रीराम’ !
Ramnavami chya divshi tumche 'ramkathan" vachun jivala aa'ram' vatala :)
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहेस अर्चना !!
उत्तर द्याहटवाअर्चनाजी वाल्याचा वाल्मिकी हा श्रीरामा मुळेच झाला त्याला राम... मरा, मरा असा त्रागा करताना भेटले... हा विरोधाभास रामाच्या गुणाच्या विपरीत हराम आणि आराम या शब्दात ही दिसतो... सारांश काय तर राम हा सरळ सोपा आणि चांगल्या-वाईटात ही दिसतो. आणि हाच असा राम तुमच्या लेखात दिसतोय... रोजच्या जीवनात असा समोर येणारा राम किती आपलासा केलाय या वाकप्रचारांमुळे, हो नं?
उत्तर द्याहटवा