सुट्टीतली भटकंती म्हटले की अगदी लहान थोरांच्या अंगात उत्साह संचारतो, आम्ही दुबईची तयारी अगदी डिसेंबर २०११ पासून केली होती. दुबईचे तिकीट, अटलांटिस, बुर्ज खलिफा, डॉल्फिन शो, सगळ्यांचे आरक्षण करून ठेवले होते आणि वाट बघत होतो, ओमची परीक्षा संपण्याची. परीक्षा संपली मात्र आणि आम्ही १७ मार्चला फ्लाय दुबई ने निघालो. अगमनोत्तर विसा घेऊन कधी एकदा आगमन कक्षातून बाहेर पडतो असं झालं होतं. आत्तापर्यंत जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष अनुभवलं, विसा मिळविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अमिराती लोक चांगले सहाय्य करतात (मुख्य म्हणजे खडूसपणे अरेबिकच न बोलता व्यवस्थित इंग्रजी बोलतात) अर्ध्या तासात आम्हाला विसा मिळालेही.
बरेच दिवस एकाच परिघात फिरून फिरून कंटाळा आला होता. त्यामुळे भ्रमंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर किंबहुना पडतानाच हुरूप आला होता. पोहोचल्याबरोबर प्रथम उत्सुकता होती ती म्हणजे हॉटेल अटलांटीस. एवढ्या मोठ्या प्रशस्त हॉटेलमध्ये राहायला मिळणार याचाच खूप आनंद होता.
हॉटेल कडे जाण्याचा रस्ता खूप छान होता, आणि समोर हॉटेलची प्रशस्त, सुंदर वास्तू, पोर्च मध्ये गाडीतून उतरताना आम्हालाच जरा बुजल्यासारखे वाटले. हॉटेलचा स्वागत कक्ष आणि तिथली सजावट बघूनच थक्क झालो. हॉटेलला पूर्व पश्चिम असे दोन भाग आहेत, आम्ही मुद्दामहून अक्वावेन्चर च्या जवळचा पश्चिमेकडचा मागून घेतला. रूम चे दार उघडले आणि मुले समोर दिसणारा समुद्र आणि तरणतलाव बघून खूपच खुश झाली. रूम मधला टीव्ही चालू केला तर आमच्या नावाने स्वागतपर मेसेज येत होता. मुख्य खोलीतून बाथरूम मध्ये जायचा दरवाजा खूपच सुरेख होता, तो एक छान वार्डरोब वाटत होता. खरा तो सरकवायचा दरवाजा होता, ही कल्पना मला खूप आवडली. मग ताजेतवाने होऊन भटकंती सुरु झाली. पर्यटकांची बरीच गर्दी त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती बघायला मिळाल्या. अम्बेसेडर लगून मधले मोठे मोठे माशांचे टैंक आणि अगणित रंगीत मासे, डोळे थक्क करणारे माशांचे प्रकार पाहिले. ह्या माश्यांना बघणारी जगभरातून आलेली आणि प्रेक्षणीय पेहेराव केलेली माणसेही पहिली ( लोकांनी बघावे म्हणून ते किती कष्ट घेतात, न बघून अन्याय का करा?) खूप एन्जॉय केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच आधी Lost चेम्बर बघितले मग एक्वावेन्चरला गेलो, तिथे मस्त मुलां बरोबर मुलं होऊन मनमुराद पाण्यात खेळलो, कसे बसे मुलांना बाहेर काढले. अरे एक राहिलेच, अटलांटिसच्या भागात आम्हाला कावळे दिसले. कुवेतचे कावळे आणि बगळे (थव्याने फिरणारे बुरखाधारी स्त्रिया आणि दिशदाशावाले पुरुष) नाहीत, तर भारतात दिसतात ते पक्षी, काय आश्चर्य! कधी पाहिलेत कुवेतला कावळे?
नंतर आमचा मुक्काम हलवला हॉटेल प्रीमियर ईनमध्ये. तिथेही छान सोय होती. विशेष म्हणजे रोजचा स्वयंपाकाचा ताण नव्हता. दररोज हॉटेलात खायचं-प्यायचं मजाच चालली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं. लगेचच तयार होऊन मिर्दीफ मध्ये सिटी सेंटर मॉल मध्ये आयफ्लाय साठी गेलो. ह्याच्यात तुम्हाला शून्य गुरुत्वाकर्षण अनुभवता येते. एका मोठ्या ट्यूब मध्ये खालून जोरात हवेचा दाब सोडतात आणि त्यावर तुम्ही तरंगायचे, ह्यासाठी आधी तुम्हाला छोटेसे प्रशिक्षण देतात. आम्ही तिघेही घाबरलो.
आमच्या अहोंनी मात्र ते केले.आम्ही घाबरत घाबरत त्यांचे शुटींग करत होतो. तिथून जवळच हत्ता रोड वर Dragon मार्ट आहे, सगळे चीनचे समान मिळते खऱ्या अर्थाने पिन ते कार, प्रचंड मोठा मॉल आहे. वेळ कमी पडल्याने पुन्हा सावकाश येऊ म्हणून स्वतःला समजावून बाहेर काढले. अल करामा भागात जाऊन यथेच्छ अगदी मुंबईमध्ये मिळते तसे भोजन केले.
सकाळीच डॉल्फिन शो साठी निघालो. ११.०० चा शो होता. परिसर खूपच सुंदर होता. मध्ये मध्ये फोटो काढणं चालूच होतं. डॉल्फिन शो आधी बघितले असल्याने, फार काय वेगळे असणार? असे वाटले होते पण दुबईक्रीक मधला डॉल्फिनेरीयमचा शो खरच छान आहे. ह्या शोची, वी आई पी तिकिटे आधी इंटरनेट वरून बुक केल्याने अगदी समोरच्या खुर्च्यावरून बघता आला, खूप मजा आली.
मग मोर्चा दुबई मॉलकडे वळविला. तिथले मत्स्यालय आणि झू बघितले आणि मग बुर्ज खलिफा च्या मार्गी लागलो. जगातली अत्युच्च इमारत बुर्ज खलिफा बघायला खूप उतावीळ झालो होतो. हातातील सर्व सामानासह प्रत्येकाचे स्क्यानिंग होऊन आत प्रवेश देण्यात येत होता. इमारत बघताना बांधकाम कौशल्य, विज्ञानाची प्रगती ह्या सगळ्याचे नवल वाटत होते. जायच्या वाटेवर दुबईच्या प्रगतीचा आलेख चित्र रूपाने दाखविला आहे. आम्ही एकशे चोविसाव्या मजल्यावरील प्रेक्षागारातून दुबईचे दृश्य पहिले पण सौदी कडून कुवैतला आलेले धुळीचे वादळ एव्हाना तिथेही पोहोचले होते, त्यामुळे थोडी निराशा झली. इमारत बघून खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर तिथेच खाली सांगीतिक कारंजी पहिली. शो होता पाच मिनिटांचा पण त्यासाठी प्रतीक्षा केली ४५ मिनिटांची.
एक ठिकाण, त्याबद्दल ह्यांनी डिस्कवरी टीव्ही वर ऐकले होते ते चिल-औट बार, हे ठिकाण दुबईमध्ये फारसे प्रसिद्ध नसल्याने शोधण्यास बराच वेळ गेला, पण इच्छयाशक्ती इतकी दांडगी कि शेवटी मिळालेच. हा बार पूर्णपणे बर्फाचा बनविलेला आहे, म्हणजे भिंती, सोफे, टेबल, डीश, आतल्या शोभेच्या वस्तू, फ्रेम सगळे सगळे. तिथे प्रत्येकी साधारण पाच केडी प्रवेश फी घेतात आणि मोबदल्यात तुम्हाला थंडीचे कपडे(तात्पुरते) आणि आत चहा / कॉफी / सरबत (फळांचे) देतात. खूप वेगळा अनुभव होता तो!! एव्हढ्या मेहनतीने शोधले पण काहीतरी नवीन बघायला मिळाल्याने मजा आली. हे ठिकाण किंग झायेद रस्त्यावर अल क़ौज़ भागात टाईम्स स्क़्वेअर मॉल मध्ये आहे आणि हा मॉल, मॉल ऑफ एमिरेट्सच्या थोडा अलिकडे आहे. नंतर मॉल ऑफ एमिरेट्सच्या स्कीदुबई मध्ये गोठेस्तोवर बर्फात खेळलो, तिथे डोक्याची टोपी सोडून बाकी थंडीचे कपडे आणि बूट प्रवेशफीच्या रकमेत मिळतात. टोपी चार पाच केडीला विकत मिळते म्हणून जाताना इथूनच घेतलेली बरी.
सर्वात थरारक अनुभव म्हणजे संध्याकाळची डेझर्ट सफारी. आत्तापर्यंत जे छायाचित्रात बघितले होते ते वाळवंट प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले. तोच रंग तश्याच रेतीत तयार झलेल्या लाटा, विश्वासच बसत नव्हता. रेतीच्या प्रचंड टेकड्या, त्यावरून जाणारी आमची गाडी आणि आमच्या गाडीच्या मागे येणारा वीस पंचवीस गाड्यांचा कारवा दृश्य खरंच बघण्यासारखं!! पण छातीत धड-धड वाढवणारं! म्हणजे मजा आणि धड-धड यांचे काही वेगळेच मिश्रण. दीड दोन तासांची मस्ती करून झाल्यावर कॅम्पला गेलो. तिथे मुलांनी उंटावरून फेरी मारली अरेबिक पोशाख घालून मनसोक्त छायाचित्रे काढली. मग चहापाणी झालं त्यानंतर तानुरा आणि बेली नृत्य, बरोबर बुफेचा आस्वाद! परत रात्री साफारीवाल्याने आणून हॉटेलवर सोडले.
सकाळ झाली आणि आम्ही परत निघालो पुढच्या मोहिमेवर, आज अल आईन. हे अबुदाबितले एक शहर आहे. दुबईहून साधारण दीड तास गाडीने प्रवास करून तिथे पोहोचलो. आधी अल आईन चे प्राणीसंग्रहालय बघितले, छान आहे. तिथला गोरिला खूपच रुसला होता. काही केल्या आमच्याकडे तोंड करत नव्हता. (त्याचे ही बरोबर होते म्हणा रोज रोज किती जणांना दर्शन देणार?) आम्ही जरा नजरेआड झालो कि हळूच तिरक्या डोळ्यांनी बघायचा आणि जरा समोर गेलो कि परत तोंड फिरवायचा, देवी ओम खूप हसले. पुढे ग्रीन मुबझ्हरा नावाचे ओएसिस आणि गरम पाण्याचा झरा पहिला, छान गरम पाणी आहे जरा वेळ पाय टाकून बसलो आणि थकवा घालवला.
नंतर जबील हाफित डोंगर चढून वर गेलो, ह्याची उंची १३०० मीटर आहे, एवढा उंच डोंगर तोही वाळवंटा मधे बघून नवल वाटले. प्रथमच गल्फमध्ये घाट अनुभवला, डोंगरमाथ्याहून संपूर्ण अल आईन चे विहंगम दृश्य दिसते. परतीच्या वाटेवर अल आईन राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आणि राजवाडा पहिला.
हॉटेल मध्ये परत येऊन जरा ताजेतवाने झालो तर क्रुझ डिनर साठी गाडी आली. मरीना क्रुझ मध्ये हा डिनर घेतला. हे जरा कंटाळवाणेच होते.
बाकी राहिलेले एक आकर्षण म्हणजे वंडर बस. वंडर बस खरोखरच वंडरफुल होती. अर्धा तास जमिनीवर व एक तास तीच बस, बर आणि डेरा दुबई मधल्या खाडीत असा दीड तासाचा तो प्रवास होता. बसमध्ये एक गाईड होता तो सगळी माहिती देत होता. वंडर बसची कल्पना खूप छान वाटली.
आता राहिली होती खरेदी, जुना, नवा गोल्ड सुक पाहिले, खरेदीही केली, पण माहिती साठी एक गोष्ट; तिथे करणावळ जास्त आहे, साधारण १ ग्रामला कमीतकमी १ केडी. आता निघायचा दिवस आला, मग ड्रॅगन मार्टला गेलो, पण कोण निराशा ( आणि ह्यांचे फावले) शुक्रवार असल्याने जेमतेम काही दुकाने उघडली होती आणि बाकीची संध्याकाळी उघडणार होती. जमेल तशी आणि तेवढी खरेदी केली आणि घाईघाईने हॉटेलला परतलो कारण लगेचच सामान उचलून चेक इनला धावायचे होते.
सर्व गाशा गुंडाळून मग परतीचा प्रवास चालू झाला. एक आठवडा कसा गेला कळलेच नाही. खूप मजा आली. पुढच्या चाकोरीबद्ध जीवनासाठी फ्रेश होऊन आलो.
सौ. गीता मधुसूदन मुळीक |
गीता ,
उत्तर द्याहटवाउत्तम लिहिले आहेस .फोटो पण मस्त ....
दुबईला पुनःश्च जाण्याची इच्छा प्रबळ करणारा प्रवाही लेख !
उत्तर द्याहटवाअशीच चालू राहू द्या मुशाफरी आणि छान छान प्रवासवर्णने !
खूप छान लिहिलं आहेस गीता !! अशीच लिहिती रहा :)
उत्तर द्याहटवा