शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

तव स्मरण



एक प्रांजळ कबुली द्यायची आहे स्वतःची स्वतःलाच ! लो. टिळक, स्वा. सावरकर, आगरकर, रानडे, गोखले आपले वाटायचे, फार फार आत्मीयता वाटायची या सर्वांबद्दल ! मिळेल तशी माहिती

स्मरणात साठवली जायची अगदी विनासायास ! 'माझा आवडता नेता' यासारख्या निबंधात हमखास 'खास' मार्क्स मिळवण्यासाठी! म.गांधी,लाल बहादूर शास्त्री, पं.जवाहरलाल नेहरू आदींबद्दलही माहिती गोळा केली जायची ऑकटो.नोव्हे.मध्ये,जयंती साजरी करताना ! पण Dr. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते १४ एप्रिलला, वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर किंवा उन्हाळ्याची सुट्टी तरी सुरु झालेली त्यामुळे शालेय जीवनात या जयंतीच्या वाट्यालाही उपेक्षाच आली. सजगतेने कधी विचारच केला गेला नाही Dr. आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाचा ! त्यांच्या कर्तुत्वाचा विशाल पट न्याहाळताना सुचलेल्या या काही ओळी.....


तमाच्या तळाशी जणू दिवे लागले

संभवामी युगे युगे शब्द सत्य झाले

बहुजन समाजाचे करावया भले

भीमराव आंबेडकर जन्माला आले


रस्त्याच्या कडेचे दिव्याचे खांब

हेच तर होते अभ्यासाचे ठिकाण

ध्यानी मनी एकच निदिध्यास

रात्रांदिवस फक्त व फक्त अभ्यास


लंडन असो वा अमेरीकेतील कोलंबिया

सहजी पाडली आपल्या विद्वत्तेची छाप

डॉकटरेट व Barister पदव्या लीलया

चालून आल्या मग अगदी आपोआप


स्वदेशी स्वकीयांमध्ये केली जागृती

ज्ञानग्रहणाची त्यांना पटवली महती

'मूकनायक' पाक्षिकापाठोपाठ केली

'बहिष्कृत भारत' ची निर्मिती


पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या

अन्यायाला फोडली वाचा

मुखोद्गत होत्या त्यांच्या

वेद उपनिषदातील साऱ्या ऋचा


चवदार तळे वा मंदिर प्रवेशावेळीही

अवलंबिला सनदशीर मार्ग

नष्ट करून विषमतेला

जन्मभूचा करावयाचा होता स्वर्ग


भारतीय घटनेचे शिल्पकार बनून

निभावले यथासांग उत्तरदायित्व

फक्त मर्यादित आरक्षण पुरस्कृत करून

जाणले होते स्वावलंबनाचे महत्व


साऱ्याच स्वप्नांना लाभत नाही पूर्णत्व

जरी लावले पणाला या प्रज्ञावन्ताने सारे स्वत्व

इतरेजनांनी जरी आणले मूल्यांना न्यूनत्व

चिरंतन राहील स्मरणी या महामानवाचे कर्तुत्व

स्वतःचे सारे आयुष्य स्वकीयांच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान ज्ञानी विचारवंताला भावपूर्ण आदरांजली.


 अर्चना देशमुख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा