शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

वाडा आठवणींचा (भाग-२)

आम्ही ह्या गांधी वाड्यात राहायला आलो १९६९ साली; मला हे एकदा न्ह्वे अनेकदा ऐकविण्यात आलंय. जसं जसा मी मोठा होत गेलो, तसं तसं वेळोवेळी शेजाऱ्यां कडून ऐकलंय "मधूची आई, मधु केवढा मोठ्ठा (म्हणजे मोटा न्हवे!!!) झाला... नाही? दोन महिन्यांचा होता इथे आलात तेव्हा". आम्ही चार भावंडं विजय (अण्णा), सुनंदा (मोठी ताई ), सुषमा (छोटी ताई) आणि मी शेंडेफळ. माझं नाव मधुसूदन पण वाडा आणि ओळखीचे डोबिवलीकर ह्यांच्या साठी मी मधुच, आणि आमची आई "मधुची आई"; थोडी अतिशयोक्ती केली तर, साने गुरुजींच्या श्याम नंतर मधुच! आणि श्यामच्या आई नंतर मधूची आईच!!

वाड्यात सगळ्या भाडेकरूंना दोन दोन खोल्या आणि तिन्ही घरांना मिळून मोठ्ठा ओटा. आम्ही राहायचो तळमजल्यावरच्या एक नंबरच्या घरात. मी म्हणे, बालपणी कधी रांगलोच नाही, एकदम बसायलाच लागलो आणि चालाण्याआधी फिरायचो कसा माहीत आहे? बसून मांडी घालायची, दोन्ही हात खांद्याच्या पातळीत सरळ पुढे धरायचे आणि मग असेच मांडी घातलेल्या अवस्थेत पुढे पुढे सरकायचे. हे उपद्व्याप बघण्यासाठी सारे शेजारी माझ्या मागे. ते सांगतात, मी असा वेगाने ओटाभर फिरायचो आणि पार्श्वभाग सोलून निघायचा. आम्ही सगळीच भावंडे लहानपणापासून तब्ब्येत राखून, त्यामुळे वाड्यातल्या सगळ्यांना भारी कौतुक, जो तो यायचा आणि घरी खेळायला न्यायचा.

आमच्या या दोन खोल्यांच्या घरात आम्ही चार भावंडं, आई, वडील, आणि आजी असे सातजण राहायचो. आत्ता विचार केला तर वाटत, कसे राहायचो आपण? आणि बरं जागा लहान पडते असं कधीच जाणवले नाही. अर्थात तेव्हा आम्ही लहानही होतो म्हणा, पण तळमजल्यावरचे घर, सगळेजण बोलके (जरा जास्तच माणसाळलेले), उत्साही, आई आणि बहिणींना विविध छंद , सगळ्या बिऱ्हाडांच्या किल्ल्या, घरी नसलेल्यांचे किराणा सामान / ग्यॅस सिलिंडर ह्यामुळे घरात कायम माणसांचा राबता. त्यावेळी प्रायव्हसी, मुलांचा अभ्यास ह्याचे अवडंबर नव्हते. आमचे वडील एका जर्मन कंपनीत नोकरीला होते. त्यांना शिफ्ट असायच्या आणि उरलेल्या वेळेत ते प्लंबिंगचा व्यवसाय करायचे. त्यामुळे सगळ्यांना मुक्तांगण, त्यांच्या दुपारच्या आणि रात्र पाळीला रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे.

अहो पूर्वी वाडासंस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली नव्हती, तेव्हा किती सोशल लाईफ होतं बघा, वाड्यात कोणीही, कधीही, कुणाहीकडे जायचं. मदतीसाठी किंवा कामासाठीच नाही हं! अगदी सहज, “काय चाललंय? जेवण झालं का? येता का जरा बाहेर? जरा दोन कांदे द्या हो”, इतक्या सहजपणे. वेळप्रसंगी मदत तर आपोआप यायची.. ती मागावी लागायची नाही. मुलांना शिस्त लावणे, रीतीभाती शिकवणे, कौतुक करणे वेळप्रसंगी ओरडणे, पाठीत धपाटा घालणे हे त्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता शेजारच्यांकडून नकळत व्हायचे. गंमत होती की नाही? घरी गोड धोड केलं की वाटीभरून शेजारी दिल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नसे. वाड्यात कुणाकडचेही कार्य म्हणजे वाड्याचेच व्हायचे. शेजारचे काका, काकू, मामा, मामी अगदी सहजपणे, ‘’मधु जरा दुकानातून काडेपेटी आणून देना, पोस्टातून चार कार्ड आणणं. कधीही कुणाचेही काम करतांना; आपण ह्यांची कामं का करायची? हे आपल्यालाच का सांगतात? असा प्रश्न आम्हा भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मनाला कधीही शिवला नाही. सगळेचजण एकमेकांना अशी मदत करायचे. असे आपण हल्ली करु शकतो का? मुलांना काही कळण्याआधीच पालकांच्या मनात वरचे दहा प्रश्न येतात आणि मग मुलं कित्येक अनुभवांपासून वंचित राहतात.

मला आठवतंय आम्ही मुलं काकवा, मावश्यांना उडदाच्या पापडांचे पीठ खलबत्यात कुटून द्यायचो आणि लाट्या हक्कानं खायचो, कुणाहीकडे कुरडया केल्या की चिक खायला जायचो, बदल्यात कुरड्या, चिकवड्या, बटाट्याचा खीस ह्या वाळवणांची राखणं करायचो. वाड्यातल्या झाडाच्या कैऱ्या तोडून सगळ्यांना वाटायचो.

आमच्यापेक्षा मोठ्ठे म्हणजे माझा भाऊ, बहिणी, त्यांचे मित्र ह्यांनीच आम्हा मुलांना विहिरीत पोहायला शिकवलं. शिकवणं म्हणजे, अक्षरशः घाबरून पळणाऱ्या मुलांना उचलायचे आणि तसेच रडत ओरडत असतांना विहिरीत फेकून द्यायचे, खाली बाकीचे तयारच असायचे. असे आम्ही पोहायला, सायकल चालवायला कधी शिकलो कळलंच नाही. हो! आणि हे सगळे करण्यावर पालकांचाही आक्षेप नसायचा हे विशेष.

अशा या आमच्या वाड्यात सगळे सण साजरे व्हायचे, म्हणजे होळी, धुळवड, गणपती, दसरा, दिवाळी वगैरे. आमच्या मालकांकडचा गणपती हे सर्व डोंबिवलीकरांचे मोठे आकर्षण होते. त्यांचा एक मुलगा जे जे कला महाविद्यालयाचा कलाकार आहे, ते मोठ्ठी आरास करायचे. त्यांनी केलेली ताज हॉटेल, हिमालय याची आरास माझ्या अजूनही स्मरणात आहे. आरास बघण्यासाठी खूप गर्दी व्हायची आणि मग रांगा लावणे, प्रसाद देणे ही कामे वाड्यातली मुलं करायची. साहजिकच अशा प्रसंगातून आम्ही बरेच काही शिकलो.

पूर्वी हल्लीसारखी, अशी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शाळा नसायची, ती सकाळचे वर्ग आणि दुपारचे वर्ग अशी दोन वेळा असायची, त्यामुळे सकाळी शाळेतून आलो की अभ्यास करून संध्याकाळी खेळण्यासाठी मोकळे आणि दुपारची शाळावाले संध्याकाळी खेळून रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करायचे. वाड्यातल्या मैदानात आम्ही भरपूर खेळायचो. कधी कधी तर लगोरी, डबाऐसपैस, आट्यापाट्या हे खेळ आम्हा मुलांच्या आयाही आमच्या बरोबर खेळायच्या, खरंच खूपच मजा यायची. छोट्या ताईला भातुकली खूप आवडायची. ती आम्हा मुलांना गोळा करायची आणि आम्ही काड्याकुडया गोळाकरून मातीच्या छोट्या चुलीवर भात करायचो, खरा खरा ! आंब्याच्या दिवसात, वाड्यातल्या झाडाचे आंबे तोडून रस करायचो, प्रत्येकाने स्वतःची ताट, वाटी आणि पोळ्या घरून आणायच्या आणि मग मस्त अंगत पंगत. खरंच आम्ही नशीबवान म्हणूनच असे बालपण मिळाले, हल्लीच्या मुलांकडे बघून वाटते ह्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नाही, की ह्यांनी काय गमावले आहे.

(क्रमशः)


मधुसूदन मुळीक

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

क्रोशे

२०११ हे वर्ष महाराष्ट्र मंडळामुळे फारच बिझी होतं. कार्यक्रमांचं आयोजन आणि execution करण्यामध्ये वर्ष कधी सुरु झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. खूप मजा आली. ह्या वर्षी नव्या कमिटीला कार्यभार सोपवल्यावर आलेलं रिकामपण अक्षरशः अंगावर यायला लागलं. वेळ कसा घालवायचा......... घालवायचा म्हणण्यापेक्षा कसा सत्कारणी लावायचा ह्याचा विचार करता करता अचानक क्रोशे विणताना मैत्रिणीला बघितलं, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा जुनं प्रेम उफाळून यावं तसं झालं. मग काय ..... घरात उरलेली लोकर आणि नेटवरून मिळालेलं डिझाईन ह्याची सांगड घालून एक टेबल रनर करायला घेतलं.

आधी छोटे छोटे चौकोन करून मग ते जोडले आणि तयार झालं हे टेबल रनर.



 
 














 जयश्री अंबासकर















रविवार, २२ एप्रिल, २०१२

श्रीमती सुधा गुप्ता

श्रीमती सुधा गुप्ता   पूर्वाश्रमीच्या पुष्पा गोविंदराव  शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रात नंदूरबार येथे झाला. मुंबई ला बी.ए. पर्यंतचे शिक्षण व नंतर थोडे दिवस पोस्ट-टेलिग्राफ खात्यामधे टेलीफोन ऑपरेटर म्हणुन मुंबईतच नोकरी करून लग्नानंतर त्या कुवेत ला आल्या व परिवारासोबत कुवेतला स्थायिक झाल्या. १९७३ नंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले.

१९५९ साली स्थापन झालेल्या व साधारण १०० सदस्य असलेल्या Kuwait Ladies Association मधे त्यांनी कोषाध्यक्षा म्हणून काम सुरू केले. ह्यात महीन्यात एकदा सर्व महिला भेटत, खेळ व निरनिराळ्या स्पर्धांचे त्यात आयोजन केले जात असे. तसेच ही संस्था kidney transplant वगैरे संबंधित रोग्यांना पैशाने पण मदतीचा हातभार लावित असे.

श्रीमती गुप्ता राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय (Ladies International League (LIL), ज्यात १४ देशांच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी Co-Chairperson चे पद भूषविले होते.

श्रीमती सुधा गुप्ता ह्यांचा महाराष्ट्र मंडळ कुवेत सुरू करण्यात मोलाचा वाटा आहे.

त्या तीनदा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. मंडळातील सभासदांच्या मुलांना संस्कृत व मराठी भाषचे ज्ञान असावे म्हणुन सतत प्रयत्नशील होत्या. महाराष्ट्राच्या परंपरा जपल्या जाव्यात असे त्यांचे नेहीमी सांगणे असे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील अंध संस्थांना, लातूर भूकंप पीडितांना मदतीचा हातभार महाराष्ट्रमंडळाकडून लावण्यात आला होता.

१९९८ पासून त्या Indian Women’s Association च्या अध्यक्षा होत्या. त्यांनी अडचणीत असलेल्या बऱ्याच भारतीय कामगार स्त्रियांना मदत केली होती. कधी कोणाला खाऊ घालणे तर कधी कोणा गरजवंताला भारताचे तिकीट काढण्यास मदत करणे, अपंगांना सहाय्य तर त्यांचे अविरत चालूच होते.

Indian Women’ League मधे पण त्यांनी काम केले होते.

त्याचबरोबर त्यांचा बाकी भाषीय मंडळांशी पण जवळचा संबंध होता. उपकार ह्या उत्तर प्रदेश च्या मंडळाचे पण कोषाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते.

अशा मंडळांमधे त्यांना सत्यनारायण पूजा करायला बसण्याचा मान मिळाला होता.

कुवेत मधे येणाऱ्या प्रतिष्ठित भारतीय मंडळींमधे अटल बिहारी बाजपेयींना भेटणाऱ्या मंडळींमधे त्यांचा समावेश होता.

अशा ह्या प्रतिभाशाली श्रीमती सुधा गुप्ता ह्यांना १६ जानेवारी २००५ साली देवाज्ञा झाली.

त्यांना महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून विनम्र आदरांजली.
(शब्दांकन दीपिका जोशी)

श्रीमती सुधा गुप्ता
श्रीमती सुधा गुप्ता





श्री रामचंद्र गुप्ता

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

वाडा आठवणींचा (भाग पहिला)

नमस्कार, महाराष्ट्र मंडळ कुवेतचा प्रतिभाकुंज हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम, ह्यामुळे अनेक चित्रकार, कवी, लेखक प्रकाशमान झाले. माझा ह्यात लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. मंडळी कुवेतमध्ये नवरे लोकांना रोजची दोन मुख्य कामे असतात. एक म्हणजे रोजीरोटी साठी जाणे आणि दुसरे घरी आले कि मुलं आणि बायको ह्यांची अनुक्रमे विविध शिकवण्या वर्ग / वाढदिवस / ममंकुच्या कार्यक्रमांचा सराव, सौंदर्य प्रसाधनगृह / किटी पार्टी ह्यांना ने-आण करणे. ह्यातून माझीही सुटका नाही, त्यामुळे मनात असूनही लिखाणास जरा वेळच झाला. माझी इच्छा आहे 'वाडा आठवणींचा' हे साप्ताहिक सदर द्यायची, त्यासाठी मी माझी पत्नी सौ. गीता हिची मदत घेणार आहे (आणि तसे तिने सध्यातरी कबूल केले आहे) मी हस्तलिखित देणार आणि ती त्याचे शुद्धलेखन, टंकलेखन करून प्रतिभाकुंजला पाठविणार. बघूया आपला उत्साह.

(माझा लिहायचा, सौ चा टंकलेखनाचा आणि तुमचा वाचण्याचा) कितीसा टिकतोय?


                                                   वाडा आठवणींचा (भाग पहिला)

आपल्या सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा, अगदी हृदयात कोरला गेलेला काळ असतो, तो बालपणीचा. तो कसाही असो, कितीही सुखात, दुखात पण तो काळ अगदी स्वच्छ आठवतो. आणि जसे जसे वय वाढते तसा-तसा त्याबद्दलचा जिव्हाळा आणखीच वाढत जातो. हाच काळ मला घट्ट धरून ठेवायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करतो आहे त्याला शब्दात पकडण्याचा. बघा तुम्हीही जरा...भूतकाळात गेलात, आणि आठवले ना बालपण? आपले जुने घर, शेजारी, शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक, तुमची खेळणी? आणि तुमच्या एक लक्षात आलंय का? कि आपल्याला सुरवातीचे म्हणजे इयत्ता पहिली ते साधारण चौथी पाचवी ह्यावेळचे मित्र, वर्गशिक्षक ह्यांची नावे, चेहेरे खूप चांगले लक्षात आहेत आणि तेच जास्त जवळचे वाटतात पण तसे महाविद्यालय आणि त्यापुढचे नाहीत. म्हणूनच हा वाडा आठवणींचा. माझे सगळे बालपण ह्या वाड्यातच गेलं. डोंबिवली पूर्वेला प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ असलेला गांधी वाडा. तेव्हा डोंबिवली खूप छान होती. गर्दी रहदारी इमारती सगळेच कमी होते. वाड्यासमोर एक मोठी बाग होती आणि बागेला लागून रेल्वे लाईन. आमचा वाडा म्हणजे एका मजल्यावर तीन अशी तीन मजली बिल्डींग, मालकांचा बंगला, बंगल्यात तळमजल्यावर तीन भाडेकरू आणि बंगल्याच्या जिन्याखाली एक ब्रम्हचारी भाडेकरू, मोठ्ठं मैदान आणि एकाबाजूला चौकोनी विहीर. मोठ्ठं मैदान असल्याने आमचा वाडा हा आजूबाजूच्या मुलांचा खेळाचा अड्डाच होता. विहीरही साग्रसंगीत होती बरं का! दोन बाजूला रहाट, कपडे धुवायचा मोठ्ठा दगड, मोरी, त्यावर सिमेंट चा पत्रा आणि कडेला शौचालय. मालकांच्या बंगल्याला पहिल्या मजल्यावर छोटी बाल्कनी होती, त्यावरचा रहाट बरोबर यायचा विहिरीवर. वाड्यात गुलमोहर, रातराणी, पांढरा आणि हिरवा चाफा, बकुळ, तगर, अनंत, प्राजक्त, आंबा, पेरू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, जाम,शेवगा इतकी सगळी झाडं. मालकांची (गांधी आडनांव नावापुरतेच, अजूनही त्यांचा उल्लेख मालक म्हणूनच) छोटी आणि तळमजल्यावरच्या बिराडांच्या स्वतःच्या छोट्या छोट्या बागा. हे सगळे इतके तपशीलवार ह्यासाठी कि पुढे पुढे हे सगळे येणार आहेत आपल्या भेटीला. तर मंडळी आज ह्या वाड्याबद्दलच, आपण पुढेपुढे भेटणार आहोत ह्या वाड्यातील माझ्या बालपणाला आणि एकेका शेजाऱ्याला.

मला हे लिहिताना खरच माझ्या बालपणात आणि वाड्यात गेल्यासारखं वाटतंय. अहो किती लहान झालो, मी ह्या प्रस्तावनेतच. तुम्हीही वाचा आणि जा हरवून तुमच्या बालपणात.


क्रमशः


मधुसूदन मुळीक 
 





बुधवार, १८ एप्रिल, २०१२

काकडीचे (तवशाचे) मोहरी घालून लोणचे

साहित्य :- १) १ माध्यम आकाराची काकडी (तवसं)
२) पाव चमचा (छोटा) मेथी दाणे
३) दीड चमचा (छोटा) मोहोरी....शक्य असेल तर लाल मोहरी
४) २-३ सुक्या लाल मिरच्या
५) दही
६) २ मोठे चमचे नारळ खरवडून
७) चवी नुसार मीठ

कृती :-

  • प्रथम काकडी सोलून बारीक फोडी करून घेणे
  • मेथी थोडयाशा तेलावर परतून घेणे
  • त्यातच मिरच्या पण परतणे
  • मिक्सर मध्ये नारळ मेथी दाणे मोहरी आणि मिरच्या हे बारीक वाटावे. ( मोहरी चा १ झणका आला पाहिजे)
  • हे सर्व काकडी च्या फोडीना लाऊन घेणे त्यात दही आणि चवीनुसार मीठ घालून निट कालवणे
  • थोड्या तेलाची मोहरी हिंग आणि हळद घालून खमंग फोडणी करून वरील काकडी च्या मिश्रणाला देणे.




मृण्मयी आठलेकर














सोमवार, १६ एप्रिल, २०१२

रंगाच्या छटेत पुन्हा एकदा...

प्रतिभाकुंज साठी बऱ्याच वर्षांनी रंग-कुंचले हाती घेतलेत. रंगाच्या छटेत रममाण होता होता ही कलाकृति तयार झाली.




 उमा पटवर्धन

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

तव स्मरण



एक प्रांजळ कबुली द्यायची आहे स्वतःची स्वतःलाच ! लो. टिळक, स्वा. सावरकर, आगरकर, रानडे, गोखले आपले वाटायचे, फार फार आत्मीयता वाटायची या सर्वांबद्दल ! मिळेल तशी माहिती

स्मरणात साठवली जायची अगदी विनासायास ! 'माझा आवडता नेता' यासारख्या निबंधात हमखास 'खास' मार्क्स मिळवण्यासाठी! म.गांधी,लाल बहादूर शास्त्री, पं.जवाहरलाल नेहरू आदींबद्दलही माहिती गोळा केली जायची ऑकटो.नोव्हे.मध्ये,जयंती साजरी करताना ! पण Dr. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते १४ एप्रिलला, वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर किंवा उन्हाळ्याची सुट्टी तरी सुरु झालेली त्यामुळे शालेय जीवनात या जयंतीच्या वाट्यालाही उपेक्षाच आली. सजगतेने कधी विचारच केला गेला नाही Dr. आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाचा ! त्यांच्या कर्तुत्वाचा विशाल पट न्याहाळताना सुचलेल्या या काही ओळी.....


तमाच्या तळाशी जणू दिवे लागले

संभवामी युगे युगे शब्द सत्य झाले

बहुजन समाजाचे करावया भले

भीमराव आंबेडकर जन्माला आले


रस्त्याच्या कडेचे दिव्याचे खांब

हेच तर होते अभ्यासाचे ठिकाण

ध्यानी मनी एकच निदिध्यास

रात्रांदिवस फक्त व फक्त अभ्यास


लंडन असो वा अमेरीकेतील कोलंबिया

सहजी पाडली आपल्या विद्वत्तेची छाप

डॉकटरेट व Barister पदव्या लीलया

चालून आल्या मग अगदी आपोआप


स्वदेशी स्वकीयांमध्ये केली जागृती

ज्ञानग्रहणाची त्यांना पटवली महती

'मूकनायक' पाक्षिकापाठोपाठ केली

'बहिष्कृत भारत' ची निर्मिती


पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या

अन्यायाला फोडली वाचा

मुखोद्गत होत्या त्यांच्या

वेद उपनिषदातील साऱ्या ऋचा


चवदार तळे वा मंदिर प्रवेशावेळीही

अवलंबिला सनदशीर मार्ग

नष्ट करून विषमतेला

जन्मभूचा करावयाचा होता स्वर्ग


भारतीय घटनेचे शिल्पकार बनून

निभावले यथासांग उत्तरदायित्व

फक्त मर्यादित आरक्षण पुरस्कृत करून

जाणले होते स्वावलंबनाचे महत्व


साऱ्याच स्वप्नांना लाभत नाही पूर्णत्व

जरी लावले पणाला या प्रज्ञावन्ताने सारे स्वत्व

इतरेजनांनी जरी आणले मूल्यांना न्यूनत्व

चिरंतन राहील स्मरणी या महामानवाचे कर्तुत्व

स्वतःचे सारे आयुष्य स्वकीयांच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान ज्ञानी विचारवंताला भावपूर्ण आदरांजली.


 अर्चना देशमुख


मंगळवार, १० एप्रिल, २०१२

आमची दुबई सफर


सुट्टीतली भटकंती म्हटले की अगदी लहान थोरांच्या अंगात उत्साह संचारतो, आम्ही दुबईची तयारी अगदी डिसेंबर २०११ पासून केली होती. दुबईचे तिकीट, अटलांटिस, बुर्ज खलिफा, डॉल्फिन शो, सगळ्यांचे आरक्षण करून ठेवले होते आणि वाट बघत होतो, ओमची परीक्षा संपण्याची. परीक्षा संपली मात्र आणि आम्ही १७ मार्चला फ्लाय दुबई ने निघालो. अगमनोत्तर विसा घेऊन कधी एकदा आगमन कक्षातून बाहेर पडतो असं झालं होतं. आत्तापर्यंत जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष अनुभवलं, विसा मिळविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अमिराती लोक चांगले सहाय्य करतात (मुख्य म्हणजे खडूसपणे अरेबिकच न बोलता व्यवस्थित इंग्रजी बोलतात) अर्ध्या तासात आम्हाला विसा मिळालेही.

बरेच दिवस एकाच परिघात फिरून फिरून कंटाळा आला होता. त्यामुळे भ्रमंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर किंबहुना पडतानाच हुरूप आला होता. पोहोचल्याबरोबर प्रथम उत्सुकता होती ती म्हणजे हॉटेल अटलांटीस. एवढ्या मोठ्या प्रशस्त हॉटेलमध्ये राहायला मिळणार याचाच खूप आनंद होता.

हॉटेल कडे जाण्याचा रस्ता खूप छान होता, आणि समोर हॉटेलची प्रशस्त, सुंदर वास्तू, पोर्च मध्ये गाडीतून उतरताना आम्हालाच जरा बुजल्यासारखे वाटले. हॉटेलचा स्वागत कक्ष आणि तिथली सजावट बघूनच थक्क झालो. हॉटेलला पूर्व पश्चिम असे दोन भाग आहेत, आम्ही मुद्दामहून अक्वावेन्चर च्या जवळचा पश्चिमेकडचा मागून घेतला. रूम चे दार उघडले आणि मुले समोर दिसणारा समुद्र आणि तरणतलाव बघून खूपच खुश झाली. रूम मधला टीव्ही चालू केला तर आमच्या नावाने स्वागतपर मेसेज येत होता. मुख्य खोलीतून बाथरूम मध्ये जायचा दरवाजा खूपच सुरेख होता, तो एक छान वार्डरोब वाटत होता. खरा तो सरकवायचा दरवाजा होता, ही कल्पना मला खूप आवडली. मग ताजेतवाने होऊन भटकंती सुरु झाली. पर्यटकांची बरीच गर्दी त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती बघायला मिळाल्या. अम्बेसेडर लगून मधले मोठे मोठे माशांचे टैंक आणि अगणित रंगीत मासे, डोळे थक्क करणारे माशांचे प्रकार पाहिले. ह्या माश्यांना बघणारी जगभरातून आलेली आणि प्रेक्षणीय पेहेराव केलेली माणसेही पहिली ( लोकांनी बघावे म्हणून ते किती कष्ट घेतात, न बघून अन्याय का करा?) खूप एन्जॉय केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच आधी Lost चेम्बर बघितले मग एक्वावेन्चरला गेलो, तिथे मस्त मुलां बरोबर मुलं होऊन मनमुराद पाण्यात खेळलो, कसे बसे मुलांना बाहेर काढले. अरे एक राहिलेच, अटलांटिसच्या भागात आम्हाला कावळे दिसले. कुवेतचे कावळे आणि बगळे (थव्याने फिरणारे बुरखाधारी स्त्रिया आणि दिशदाशावाले पुरुष) नाहीत, तर भारतात दिसतात ते पक्षी, काय आश्चर्य! कधी पाहिलेत कुवेतला कावळे?


नंतर आमचा मुक्काम हलवला हॉटेल प्रीमियर ईनमध्ये. तिथेही छान सोय होती. विशेष म्हणजे रोजचा स्वयंपाकाचा ताण नव्हता. दररोज हॉटेलात खायचं-प्यायचं मजाच चालली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं. लगेचच तयार होऊन मिर्दीफ मध्ये सिटी सेंटर मॉल मध्ये आयफ्लाय साठी गेलो. ह्याच्यात तुम्हाला शून्य गुरुत्वाकर्षण अनुभवता येते. एका मोठ्या ट्यूब मध्ये खालून जोरात हवेचा दाब सोडतात आणि त्यावर तुम्ही तरंगायचे, ह्यासाठी आधी तुम्हाला छोटेसे प्रशिक्षण देतात. आम्ही तिघेही घाबरलो.

आमच्या अहोंनी मात्र ते केले.आम्ही घाबरत घाबरत त्यांचे शुटींग करत होतो. तिथून जवळच हत्ता रोड वर Dragon मार्ट आहे, सगळे चीनचे समान मिळते खऱ्या अर्थाने पिन ते कार, प्रचंड मोठा मॉल आहे. वेळ कमी पडल्याने पुन्हा सावकाश येऊ म्हणून स्वतःला समजावून बाहेर काढले. अल करामा भागात जाऊन यथेच्छ अगदी मुंबईमध्ये मिळते तसे भोजन केले.

सकाळीच डॉल्फिन शो साठी निघालो. ११.०० चा शो होता. परिसर खूपच सुंदर होता. मध्ये मध्ये फोटो काढणं चालूच होतं. डॉल्फिन शो आधी बघितले असल्याने, फार काय वेगळे असणार? असे वाटले होते पण दुबईक्रीक मधला डॉल्फिनेरीयमचा शो खरच छान आहे. ह्या शोची, वी आई पी तिकिटे आधी इंटरनेट वरून बुक केल्याने अगदी समोरच्या खुर्च्यावरून बघता आला, खूप मजा आली.

मग मोर्चा दुबई मॉलकडे वळविला. तिथले मत्स्यालय आणि झू बघितले आणि मग बुर्ज खलिफा च्या मार्गी लागलो. जगातली अत्युच्च इमारत बुर्ज खलिफा बघायला खूप उतावीळ झालो होतो. हातातील सर्व सामानासह प्रत्येकाचे स्क्यानिंग होऊन आत प्रवेश देण्यात येत होता. इमारत बघताना बांधकाम कौशल्य, विज्ञानाची प्रगती ह्या सगळ्याचे नवल वाटत होते. जायच्या वाटेवर दुबईच्या प्रगतीचा आलेख चित्र रूपाने दाखविला आहे. आम्ही एकशे चोविसाव्या मजल्यावरील प्रेक्षागारातून दुबईचे दृश्य पहिले पण सौदी कडून कुवैतला आलेले धुळीचे वादळ एव्हाना तिथेही पोहोचले होते, त्यामुळे थोडी निराशा झली. इमारत बघून खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर तिथेच खाली सांगीतिक कारंजी पहिली. शो होता पाच मिनिटांचा पण त्यासाठी प्रतीक्षा केली ४५ मिनिटांची.


एक ठिकाण, त्याबद्दल ह्यांनी डिस्कवरी टीव्ही वर ऐकले होते ते चिल-औट बार, हे ठिकाण दुबईमध्ये फारसे प्रसिद्ध नसल्याने शोधण्यास बराच वेळ गेला, पण इच्छयाशक्ती इतकी दांडगी कि शेवटी मिळालेच. हा बार पूर्णपणे बर्फाचा बनविलेला आहे, म्हणजे भिंती, सोफे, टेबल, डीश, आतल्या शोभेच्या वस्तू, फ्रेम सगळे सगळे. तिथे प्रत्येकी साधारण पाच केडी प्रवेश फी घेतात आणि मोबदल्यात तुम्हाला थंडीचे कपडे(तात्पुरते) आणि आत चहा / कॉफी / सरबत (फळांचे) देतात. खूप वेगळा अनुभव होता तो!! एव्हढ्या मेहनतीने शोधले पण काहीतरी नवीन बघायला मिळाल्याने मजा आली. हे ठिकाण किंग झायेद रस्त्यावर अल क़ौज़ भागात टाईम्स स्क़्वेअर मॉल मध्ये आहे आणि हा मॉल, मॉल ऑफ एमिरेट्सच्या थोडा अलिकडे आहे. नंतर मॉल ऑफ एमिरेट्सच्या स्कीदुबई मध्ये गोठेस्तोवर बर्फात खेळलो, तिथे डोक्याची टोपी सोडून बाकी थंडीचे कपडे आणि बूट प्रवेशफीच्या रकमेत मिळतात. टोपी चार पाच केडीला विकत मिळते म्हणून जाताना इथूनच घेतलेली बरी.

सर्वात थरारक अनुभव म्हणजे संध्याकाळची डेझर्ट सफारी. आत्तापर्यंत जे छायाचित्रात बघितले होते ते वाळवंट प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले. तोच रंग तश्याच रेतीत तयार झलेल्या लाटा, विश्वासच बसत नव्हता. रेतीच्या प्रचंड टेकड्या, त्यावरून जाणारी आमची गाडी आणि आमच्या गाडीच्या मागे येणारा वीस पंचवीस गाड्यांचा कारवा दृश्य खरंच बघण्यासारखं!! पण छातीत धड-धड वाढवणारं! म्हणजे मजा आणि धड-धड यांचे काही वेगळेच मिश्रण. दीड दोन तासांची मस्ती करून झाल्यावर कॅम्पला गेलो. तिथे मुलांनी उंटावरून फेरी मारली अरेबिक पोशाख घालून मनसोक्त छायाचित्रे काढली. मग चहापाणी झालं त्यानंतर तानुरा आणि बेली नृत्य, बरोबर बुफेचा आस्वाद! परत रात्री साफारीवाल्याने आणून हॉटेलवर सोडले.

सकाळ झाली आणि आम्ही परत निघालो पुढच्या मोहिमेवर, आज अल आईन. हे अबुदाबितले एक शहर आहे. दुबईहून साधारण दीड तास गाडीने प्रवास करून तिथे पोहोचलो. आधी अल आईन चे प्राणीसंग्रहालय बघितले, छान आहे. तिथला गोरिला खूपच रुसला होता. काही केल्या आमच्याकडे तोंड करत नव्हता. (त्याचे ही बरोबर होते म्हणा रोज रोज किती जणांना दर्शन देणार?) आम्ही जरा नजरेआड झालो कि हळूच तिरक्या डोळ्यांनी बघायचा आणि जरा समोर गेलो कि परत तोंड फिरवायचा, देवी ओम खूप हसले. पुढे ग्रीन मुबझ्हरा नावाचे ओएसिस आणि गरम पाण्याचा झरा पहिला, छान गरम पाणी आहे जरा वेळ पाय टाकून बसलो आणि थकवा घालवला.



नंतर जबील हाफित डोंगर चढून वर गेलो, ह्याची उंची १३०० मीटर आहे, एवढा उंच डोंगर तोही वाळवंटा मधे बघून नवल वाटले. प्रथमच गल्फमध्ये घाट अनुभवला, डोंगरमाथ्याहून संपूर्ण अल आईन चे विहंगम दृश्य दिसते. परतीच्या वाटेवर अल आईन राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आणि राजवाडा पहिला.

हॉटेल मध्ये परत येऊन जरा ताजेतवाने झालो तर क्रुझ डिनर साठी गाडी आली. मरीना क्रुझ मध्ये हा डिनर घेतला. हे जरा कंटाळवाणेच होते.

बाकी राहिलेले एक आकर्षण म्हणजे वंडर बस. वंडर बस खरोखरच वंडरफुल होती. अर्धा तास जमिनीवर व एक तास तीच बस, बर आणि डेरा दुबई मधल्या खाडीत असा दीड तासाचा तो प्रवास होता. बसमध्ये एक गाईड होता तो सगळी माहिती देत होता. वंडर बसची कल्पना खूप छान वाटली.

आता राहिली होती खरेदी, जुना, नवा गोल्ड सुक पाहिले, खरेदीही केली, पण माहिती साठी एक गोष्ट; तिथे करणावळ जास्त आहे, साधारण १ ग्रामला कमीतकमी १ केडी. आता निघायचा दिवस आला, मग ड्रॅगन मार्टला गेलो, पण कोण निराशा ( आणि ह्यांचे फावले) शुक्रवार असल्याने जेमतेम काही दुकाने उघडली होती आणि बाकीची संध्याकाळी उघडणार होती. जमेल तशी आणि तेवढी खरेदी केली आणि घाईघाईने हॉटेलला परतलो कारण लगेचच सामान उचलून चेक इनला धावायचे होते.

सर्व गाशा गुंडाळून मग परतीचा प्रवास चालू झाला. एक आठवडा कसा गेला कळलेच नाही. खूप मजा आली. पुढच्या चाकोरीबद्ध जीवनासाठी फ्रेश होऊन आलो.


सौ. गीता मधुसूदन मुळीक





रविवार, ८ एप्रिल, २०१२

पिकलेल्या केळ्यांची आणि कॉन निब्लेटची चटपटीत भाजी

साहित्य:-
४ पिकलेली केळी, थोडे मक्याचे दाणे, खोवलेला नारळ, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:- 
१) केळ्याचे गोल काप करावेत (फार पातळ नकोत), त्यात बाकीच साहित्य मिसळून ठेवावे.
२) एका कढइत तेलाची खमंग फोडणी करून त्यावर वरील मिश्रण घालावे आणि अलगद ढवळावे.
(केळ्याचे काप तुटता काम नयेत ह्याची काळजी घ्यावी).
३) एक वाफ आली की भाजी तयार. पाहिजे असल्यास फ्लेम बंद करून भाजीवर वरून लिंबू पिळावे.

हि आंबट गोड भाजी खूप चविष्ट लागते...आणि ५ मिनिटात तयार होते.




मृण्मयी आठलेकर

रविवार, १ एप्रिल, २०१२

श्रीराम नवमी


श्रीराम नवमी निमित्त,

इतरेजनांचे माहीत नाही पण आपल्या मराठी लोकांच्या दिवसाची सुरुवातच होते मुळी "राम" प्रहराने ! झुंजू मुंजू झाले की सुरु होतो तो रामप्रहर ! रामप्रहरी उठून जो "कर्म रामाच्या" आराधनेत तल्लीन होतो त्याला गवसते आरोग्याची गुरुकिल्लीआकळते  जीवनाचे मर्म आणि लाभ होतो "दौलत रामाचा"! अजूनही मराठी मुलुखात दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा अभिवादनासाठी  जे शब्द  उच्चारतात ते असतात "राम राम"!

कधी कोणी व्याधींनी ग्रस्त असेल आजारांनी त्रस्त असेल तर त्याला सुटकेसाठी हवा असतो 'रामबाण' उपाय !
कोणतेही काम होईलच याची जेव्हा खात्री नसते तेव्हा आपण ते सोडून देतोरामभरोसे’ !
नवे नवे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला येतात तेव्हा आपण रमून जातो ‘रामराज्याच्या’ स्वप्नरंजनात !

उपनिषदात एक गोष्ट आहे, देवांचा देव महादेव यांना एकदा सखी पार्वती विचारते की या त्रिलोकात सर्वश्रेष्ठ कोण आहे आणि त्यांचे स्तवन कसे करावे? तेव्हा तिला उत्तर मिळते "राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने" साक्षात भगवान शंकर स्तवन करतात, मानतात तुमच्या आमच्या श्रीरामाला ! ‘रामनाम’ आहे सगळ्यात श्रेष्ठ ! अगणित पापांचा धनी असलेला वाल्या कोळी यारामनामामुळे’ पापातून मुक्तच नव्हे तर वाल्मिकी ऋषी म्हणून अजरामर झाला. सर्व  पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे 'राम'! मर्यादापुरुषोत्तम गौरवला आहे 'राम'! आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श भ्रतार 'राम' ! एकपत्नी, एकवचनी, एकबाणी 'राम'

एखाद्याला कंटाळा आला, आयुष्य नीरस वाटू लागले की तो सहज म्हणून जातो माझ्या जीवनात काssही "राम" उरला नाही आता ! पण असे म्हणून तो काही अस्वस्थ बसून रहात नाही तर लगेच सुरुवात करतो जीवनात राम आणण्यासाठी ! कारण व्यस्त राहील्यानंतर मस्त आराम केला की जीवनात "राम" लाभतो हे आपल्या सर्वांनाच पटलेले असते आपण नास्तिक असलो रामाला ईश्वर, भगवान अथवा देव मानत नसलो तरीही !

आणि जेव्हा तो अखेरच्या निर्वाणाचा क्षण येतो तेव्हाही 'आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा "राम राम" घ्यावा' असे म्हणूनच निरोप घेतला जातो, "रामनाम सत्य आहे" हेच तर जीवनाचे अंतिम सत्य ! नाम आहे आदी अंती एक राम’ नाम, जय जय श्रीराम’ !

अर्चना देशमुख  
तोपर्यंत मन राम’ रंगी रंगले म्हणून आपापल्या 'राम रंगात’ (कर्तव्य,छंद, मौज,मस्ती,सहली,चित्रपट, नाटके,नवी नवी आव्हाने  ..) रंगून जाऊ या.