गार्गी आणि मैत्रेयीची ख्यातनाम आहे ज्ञानलालसा
खंडित झाला तरीही, नव्याने रुजवला आहे हा वारसा
अहिल्या, दौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
प्रात:स्मरणी मिळवून स्थान, देती पातिव्रत्याची संथा
सन्माननीय मातृत्वाने धन्य झाली कूस जिजाईची
संस्कारांमुळेच तिच्या, शक्य झाली स्थापना हिंदवी स्वराज्याची
“माझी झाशी देणार नाही” हा बाणा जपणारी झाशीची राणी
अतुल्य धाडस, लढाऊ वृत्तीने अजरामर हिची कहाणी
परकी भूमी, परके आचारविचार, परक्या भाषा, संस्कृतीशी
जुळवून झाली यशस्वी, पहिली भारतीय नारी डॉ.आनंदी जोशी
बालवयीही बाहुलीऐवजी देशप्रेमाने भारलेली इंदिरा
कठीण बनून वज्रासारखी रक्षिली तिने धरा
सूरस्वामिनी, स्वरमोहिनी, गानकोकिला लता मंगेशकर
मांडवापासून सरणापर्यंत सोबत निनादतो हिचाच स्वर
मॅगसेसे एवॉर्ड, एशियन नोबेल पीस ऍवार्ड विजेती डॉ.किरण बेदी
बदलून चेहरा तिहार जेलचा, दाखवले आदिमायेचे रुप पोलादी
आकांक्षा पुढती गगन ठेंगणे, ही उक्ती सार्थ करणारी कल्पना चावला
अद्भुतरम्य साहस हिचे, घातली गवसणी अवकाशाला
जगभरातील प्रभावशाली व्यक्तीमत्वात सामिल झाली इंद्रा नुयी
C.E.O पेप्सीकोची, भारतीयांसाठी ठरली किती गौरवदायी
अर्थशास्त्र, बँकींग सारख्या जटील विश्वातही स्त्रियांनी मारली आहे बाजी
M.D. आणि C.E.O झाली आहे चंदा कोचर I.C.I.C.I. बँकेची
विविध क्षेत्रातील भारतीय स्त्रियांचे हे उल्लेखनीय योगदान बघितल्यावर पूर्वीचे स्त्री चे वर्णन करणारे शब्द,
“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमॄत, नयनी पाणी”
या ऐवजी
“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, लाथ मारेल तेथे काढेल पाणी”
असेच करायला हवे.
या सार्या स्त्रियांना मन:पूर्वक अभिवादन !!
खरंच, मला अभिमान आहे, मी भारतीय नारी असल्याचा !
Sundar ...mala abhiman aahe mi 1 stri aahe hyacha.......
उत्तर द्याहटवा