मी नेहमीप्रमाणे कामावर निघालो असता
तू तुझ्या दुडक्या पावलांनी धावत आलास
माझ्या पायाला तुझ्या इवल्याशा हातांनी
घट्ट मिठी मारलीस अन म्हणालास
"बाबा, आज संध्याकाळी मला कारमधून फिरायला नेशील?”
मी 'हो' म्हणताच तुझ्या डोळ्यात उठलेल्या आनंदतरंगात
माझं मन नखशिखांत भिजलं, पुरतं न्हाऊन निघालं
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
त्या दिवशी घड्याळालाही जणू पाय फुटले होते
वेळेची गती बघून त्याचे ते काटे ही सटपटले होते
कामाच्या वेगाने तेव्हा मलाही झपाटले होते
तुझे नयन मात्र माझी वाट बघून बघून ताठले होते
तू खूप वाट बघितलीस, मग चिडलास
चिडून चिडून रडलास, रडून रडून दमलास
दमूनच तसाच मग मुटकुळं करून झोपी गेलास
तुझ्या झोपेतील स्वप्नं मात्र माझ्या
कारच्या बंद खिडकीत डोकावून गेलं,
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
तू नंतर मोठा झालास, शाळेत ही जाऊ लागलास
शाळेतील गमतीजमती येऊन आईला सांगू लागलास
मी ऐकायला कधीच नव्हतो, होतो तेव्हां तू सांगितलं नाहीस
ना खेळून आल्यावर कधी तू घाम टिपलास माझ्या बाहीस
त्यानंतर कितीदातरी आपण कारमधून फिरायला गेलो
किती मजा करायला गेलो, डोंगरदर्या पहायला गेलो,
तुझ्या लक्षात आहे की नाही हे मला माहित नाही,
पण दरवेळी माझ्या मनात मात्र तो दिवस डोकावून गेला
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
आता तर तुझे विश्व निराळे, तू त्यात हरवून जातोस
नवे मित्र, नवे छंद, नवी गीते, नवे तराणे गातोस
पण अजूनही जेव्हां अधूनमधून थोडासा भांबावून जातोस
तेव्हां आईच्या कुशीत शिरूनच तर तू आपले गार्हाणे गातोस
तुला जवळ घेण्यासाठी माझीही मिठी आसुसलेली असते
तू येत नाहीस हे पाहून माझी कार मात्र हळूच हसते
तुझ्या माझ्यातील पूल सांधता कळते त्याखालून तर
सारं आयुष्य वाहून गेलं
सोनुल्या, तुला मात्र त्या दिवशी फिरायला न्यायचं राहूनच गेलं!
डॉ.निरंजन जोशी
khupach chaan
उत्तर द्याहटवाati sundar!
उत्तर द्याहटवाnever knew this talent of yours doc!!
मनाला खा॓लवर भिडलेली एक कविता! खरच, भूतकाळात गेल्यावरच कित्येक साध्या गा॓ष्टीच खर मा॓ल कळ्त!!! अप्रतीम !!!!
उत्तर द्याहटवामातृहृदय म्हणून आईच्या मायेचा पिटला जातो डांगोरा
उत्तर द्याहटवाबापाच्याही हृदयात असतो हळवा भिजरा कोपरा
ही संवेदनशीलता जपणारी कविता !!