मंगळवार, २९ मार्च, २०११

प्रलय

प्रलय आला, प्रलय आला
सागराचा कोप झाला
अक्राळ-विक्राळ लाटांनी ह्या
धरतीचा तुकडा गिळला
गाई-गुरे अन्‌ प्राणी, पक्षी
माणसेही नाही निराळी
कोसळला इमला सारा
धरतीचा अन्‌ भार वाढला
दर्याच्या ह्या लाटांनी
क्षणार्धात की हलका केला
ओसरता हे खारे पाणी
भग्न चित्र ते उभे राहिले
तुटकी दारे, पडके वाडे
रिती मने अन्‌ विझले डोळे
संपले का हो सगळे आता
आटली इथली जीवनसरिता
दगडविटांच्या राशीखाली
श्वास कोंडला जीव निमाला
काय अचानक हे दिसले
राखेमधुनी कोंब फुटे
विझलेल्या या राखेखाली
शांत चिमुकला जीव दिसे
नसे दु:ख त्या, नसे निराशा
नसे कालचे रडगाणे
नव्या जगाचा पाईक म्हणुनी
उठेल ह्या राखेमधुनी
उठेल ह्या राखेमधुनी









नीलिमा दिवेकर

४ टिप्पण्या: