शुक्रवार, २५ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ६)

मंडळी…वाड्यातले सगळे भाडेकरू कित्येक वर्षे एकोप्याने राहत होते, आम्हीच सगळ्यात शेवटी आलेले कुटुंब. सगळ्यांच्यात छान घरोबा होता, प्रत्येक जण आपलं सुख दु:ख इतरांबरोबर वाटून घ्यायचा, मन मोकळं करायला हक्काची अशी आपली माणसं होती. सगळ्यांना सगळ्यांचे गुण-अवगुण, सवयी, खोड्या माहिती होत्या आणि त्याच्या त्या गुणा-अवगुणांसकट बाकीच्यांनी त्याला स्वीकारलेलं असायचं.


अहो कित्ती बारीक-सारीक सवयी माहिती झाल्या होत्या माहित आहे? तुम्ही म्हणाल काहीही लिहितात, पण खरंच हे ही अनुभवलंय ह्या वाड्यात. वाड्यात तळ आणि पहिल्या मजल्यावरच्या बिऱ्हाडांसाठी सामुदाईक शौचालयं होती. त्यामुळे कोण कधी, किती वेळा जातो? किती वेळ लावतो? कोणाच्या नंतर जायचे नाही, कोण येताना दिसलं की धावत जाऊन आधी नंबर लावायचा, ही गणितं पक्की होती, पण ह्या बाबतीतही कधी कधी सौजन्य दाखवायचे बरका! पहले आप ! पहले आप ! ......सहन होईस्तोवरच.

तर आता भेटूया आमच्या काही शेजाऱ्यांना, अशाच त्यांच्या गुणा-अवगुणांसकट (हे मी अतिशय आदराने लिहितो आहे, केवळ आठवणी म्हणून, तरीही कृपया गैरसमज नसावा.)

आमचे सख्खे शेजारी म्हणजे हर्डीकर, नाना आणि रेखाच्या आई (सगळे असेच संबोधायचे) आणि रेखा, अरुणा, नंदू ही त्यांची तीन मुलं. नाना काही वर्षे आर्मीत होते, त्यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानी सेनेत काम केले होते. आर्मीतून आल्यामुळे कडक शिस्त, स्वच्छता आणि टापटीपपणा नानांच्या अंगात मुरलेला. पांढरे शुभ्र कपडे घालून, लाकडी आराम खुर्चीत टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र वाचत, सिगरेट पीत बसलेले नाना अजूनही तसेच्या तसे डोळ्यासमोर येतात. रेखाच्या आई आणि नाना ह्यांनी व्यवसायात जम बसविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. घरोघरी जाऊन तेल, साबण विकले, वेळप्रसंगी रद्दी विकून आलेल्या पैशावर वेळ निभावली. नानांनी तयार केलेलं "बडगा" हे ढेकणावरचं औषध अजूनही आठवतंय. त्याला प्रचंड दुर्गंधी होती, त्यामुळे खूप जालीम असूनही ते बाजारात खपलं नाही. ह्या बडग्याची मोठी चीनी मातीची बरणी मागच्या दारात पडून होती, आम्ही मुलं मुद्दामून तिचं झाकण उघडून वास घ्यायचो, अजूनही तो वास नाकात बसलाय. रेखाच्या आईंच्या साथीने नानांनी धंद्यात जम बसवला. ते पुण्याहून तिखट, हळद, श्रीखंडाच्या गोळ्या, मसाला सुपारी आणून मुंबई, ठाण्यातल्या दुकानदारांना पुरवायचे. जोडीला रेखाच्या आई घरी बायका ठेवून त्यांच्या कडून लोणचं मसाला, गोडा मसाला, उपवासाची, थालीपीठाची, चकलीची भाजणी करून घेऊन पुरवायच्या. संक्रांतीच्या मोसमात तिळगूळ बनवायच्या, आम्ही मुलं लाडू वळायला, पाकीटं भरायला जायचो आणि बदल्यात तिळगूळ खायचो. रेखाच्या आई हा व्याप सांभाळून विणकाम, भरतकामही उत्साहाने करायच्या.

रेखाच्या आई कधी कधी आम्हा मुलांना खूप त्रास द्यायच्या, ओरडायच्या. दुपारच्या वेळेत आम्ही अंगणात क्रिकेट, लगोरी, आबादुबी खेळत असतांना कधी कधी चेंडू त्यांच्या घरात जायचा. मग झालं चेंडू जप्त! द्यायच्याच नाहीत. एकदोनदा तर चेंडू विळीवर अर्धे चिरून बाहेर फेकले होते.

नानांना दम्याचा त्रास होता. पुढे जाऊन हृदयविकारही झाले, त्यात १९८१-८२ साली त्यांचे निधन झाले. रेखाच्या आई खूप कणखर आणि व्यवहारिक, व्यवसायात असणारा कर्ता पुरुष गेल्यावर कुठलीही साधारण स्त्री हतबल होऊन खचून गेली असती. पण त्यांनी मुलाला Apprenticeship साठी पुण्यात टेल्कोला ठेवले, पुढे तो तिथेच नोकरीस लागला. त्यांनी व्यवसायाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुण्याहून माल आणण्यासाठी अमृत, बाळा पाटील, जोशी ही माणसं त्यांच्याकडे कामाला होती. त्यांच्या कडून माल आणून घेणे, ते परस्पर धंदा करत नाहीत ना ? ह्याची खबरदारी घेणे, त्यांच्या मार्फत पैश्याचे व्यवहार सांभाळणे, हे त्या काटेकोरपणे लक्षं ठेऊन करायच्या. घरी मसाले, भाजण्या तयार करण्यासाठी पत्की बाई, कल्पना, भावे आजी, आशा ह्या बायका यायच्या. मुलगा पुण्यात, दोन्ही मुली लग्नं झालेल्या आणि नोकरीला, त्या एकटीने सगळे सांभाळायच्या. आमचाही हात भार लागला त्यांना व्यवसायात. किराणा माल, गिरणी वाल्याने आणलेली पीठ, भाजण्या उतरवून घे, घरी येणाऱ्या गिऱ्हाइकाला माल दे, अशी बरीच कामं आमच्या घराने केली. आमची मोठी ताई रोज त्यांना सोबत म्हणून रात्री झोपायला जायची, तिचे लग्न झाल्यावर छोटी ताई जात असे. रेखाच्या आई स्वतः सगळा माल द्यायला ठाण्याला जायच्या त्याही सकाळी ९.२७ ची जलद लोकल पकडून, भर गर्दीच्या वेळी. एकदा अशीच लोकल पकडतांना त्या पडल्या आणि हात फ्रॅक्चर झाला पण त्यांनी हार काही मानली नाही, तात्पुरते माल टाकायला एका बाईला कामावर ठेवले, हात बरा होताच काम चालू. व्यवसायाचा व्याप सांभाळत, आपले छंद जोपासत, नोकरी करणाऱ्या मुलीच्या मुलालाही त्यांनी सांभाळले. त्यांचा दिनक्रम अगदी घडयाळाच्या ठोक्यावर, किंबहुना त्यांच्या कामानुसार घड्याळ लावले इतका वक्तशीरपणा. त्यांचे आणि मैत्रिणींचे रोजचे भेटायचे ठिकाण म्हणजे डोंबिवली स्थानकाचा जुना चार नंबरचा फलाट. रोज न चुकता म्हणजे अगदी पावसाळ्यात सुद्धा बरोबर संध्याकाळी सहा वाजता चार नंबरला, त्या आणि मैत्रिणी कोंडाळे करून बसलेल्या असायच्या. आम्हीही जायचो कधी कधी गाड्या बघायला. हे थोडी थोडकी नव्हे तब्बल वीस वर्षाहून जास्त, टी.सी.न्नाही हे माहिती होते, एवढ्या काळात कधीही त्यांना कोणी तिकीट विचारले नाही, नंतर नंतर गर्दी वाढली, वयानुसार सगळ्यांना झेपेनासं झालं, तेंव्हा हे मंडळ बंद झालं.

साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत त्यांनी व्यवसाय केला. सगळे सांगायचे, रेखाच्या आई आता बंद करा धंदा, त्या म्हणायच्या, “होतं तोवर करत राहायचं”. त्यांनी स्वतः करता म्हातारपणाची पुंजी जमा केली, आपला उदरनिर्वाह व्यवस्थित होईल ह्याची खात्री झाल्यावर व्यवसाय बंद केला. त्यांची प्रचंड मेहनत, धीर, उत्साह आणि आत्मविश्वास बघून काहीजण त्यांना विचारायचे की तुम्ही कधीच रडत, कुढत, खचून गेलेल्या दिसला नाहीत? त्यावर त्या म्हणायच्या, मी माझ्या आजूबाजूला असे रडणारे, हतबल लोकं गोळाच होऊ दिले नाहीत, मैत्री केली तीही माझ्यासारख्या धडपड्या, आशावादी लोकांशी, संकटाला घाबरणाऱ्यांशी नाही. अजूनही वयाच्या पंच्याऐंशी – सत्याऐंशीव्या वर्षी स्वतः चे स्वतः करतात आणि गांधी वाड्यात त्या एकट्या राहतात.

आमचे दुसरे शेजारी "हाटे" त्यांना आम्ही हाटे मामा आणि हाटे मामी म्हणायचो. हाटे मामांना माझे भारी कौतुक, मला कायम माधवराव नावानेच बोलवायचे. मला हाटे मामींच्या हातची डाळींब्याची उसळ आवडायची, केली की त्या घरी द्यायच्या. त्यांच्याकडचा तूप, वरण भातही मला आवडायचा, लहान असताना मी त्यांच्याकडे जेवायचो. हाटे मामांच्या भावाच्या लग्नाला मी त्यांच्या बरोबर जाऊन राहिलो देखील होतो. हाटे मामा रेल्वेत नोकरीला होते, ते आणि हाटे मामी बरेचदा फर्स्ट क्लासने फिरायला जायचे, तेंव्हा त्याचे फार अप्रूप वाटायचे. ते दोघेही छान दिसायचे, हाटे मामी म्हणजे आशालता वाबगावकरच. आमच्या छोट्या ताईने केलेल्या बँकेच्या जाहिरातीत ते तिचे आई वडील दाखविले होते. प्रदीप, विनोदिनी आणि राजू ही हाटेमामांची मुलं. सगळेजण आपापल्या नोकरी संसारात स्थिरावले. नंतर डोंबिवली जिमखान्याजवळ बंगला बांधून हाटे कुटुंबीय तिथे राहण्यास गेले. प्रदीप पुढे राजकारणात जाऊन महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्षही होता.

आमच्या वाड्यात तीन पळसुले बंधू राहायचे, रामचंद्र, वसंत आणि अनंत. त्यातले एक अण्णा, सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. अण्णा आणि आशा वहिनी. आशा वहिनी आम्हा मुलांचे छान छान कार्यक्रम बसवायच्या. आंब्याच्या मोसमात आमरस पोळीचे जेवण, मुलांचे स्नेह संमेलन, वाडा साफ सफाईची मोहीम म्हणजे अगदी झाडू मारून, ह्या त्यांच्याच कल्पना. त्यांचे घरही मोठे होते, तिथेच आमचे स्नेहसंमेलन झाले होते. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी उज्वला, प्रीती सागरचे "माय हार्ट इज बीटिंग" हे गाणं स्टाईल मध्ये म्हणायची, त्यातल्या इंग्रजीमुळे वाड्यातली मुलं एकदम भारावून जायची. त्या काळात टेलीविजन देखील दूर्मिळ असतांना अण्णांनी प्रोजेक्टर आणून वाड्यातल्यांना घरातल्या भिंतीवर चित्रपट दाखविला होता. आशा वहिनींकडे मुलं रमायची, त्या आमच्या बरोबर पत्ते खेळायच्या, पेटी वाजवून गाणी म्हणायच्या. अण्णा, आशावहिनी दोघांनाही पर्यटनाची खूप आवड, बहुतेक त्यांचे संपूर्ण भारत भ्रमण झाले असावे. आम्हा मुलां साठी अजूनही एक आकर्षण असायचं ते म्हणजे, त्यांनी जगन्नाथपुरीहून आणलेलं छोटसं पोपटाचं पिल्लू. हे पिल्लू पुढे खूप मोठं झालं आणि मस्त बोलायचं. ह्या दोघांची खासियत म्हणजे, नायलॉन च्या जाळीची मच्छरदाणी. सुरवातीला डोंबिवलीत अशी मच्छरदाणी शिवणारे ते एकमेव होते. अण्णा नोकरीला जी.पी.ओ. त (पोस्टात) होते, ते ऑफिसहून आले की शिवणकामही करायचे. अण्णांची अजून एक सवय म्हणजे, ते स्वतः रोज पहाटे दूध आणि पेपर आणायचे, पट्ट्या पट्ट्याचा लेंगा आणि बाह्यांचे बनियन असे ते डेअरीतून दूध घ्यायचे, हातात कोपराला पिशवी अडकवायची मग नाक्यावर वृत्तपत्र घ्यायचे आणि ते पूर्ण उघडून दोन्ही हातात धरून रस्त्याने वाचत घरापर्यंत यायचे. पेपरच्या पलीकडे रस्त्यावरचे काहीही दिसायचे नाही आणि त्यांना चिंताही नसायची, तेंव्हा रहदारी नसायची आणि लोकांनाही अण्णांची सवय माहिती झाली होती. जसे जसे पुढे गर्दी वाढली, सोसायट्या आल्या तसा तसा अण्णांच्या पेहेरावात आणि सवयीत फरक पडला. पांढरा लेंगा, शर्ट, दुधाची किटली असं होत होत मध्यंतरी शर्ट, पँट घातलेले अण्णा कापडी पिशवीतून प्लास्टिकची दुधाची पिशवी घेऊन, घडी केलेला पेपर न वाचता नेतांना दिसले.

तर मंडळी पुढच्या भागात भेटूया अजून काही शेजाऱ्यांना आणि आठवणीतल्या वाडयाला.

(क्रमशः)



 मधुसूदन मुळीक


३ टिप्पण्या:

  1. लेख नेहमीप्रमाणेच छान. कमी ज्यास्तं प्रमाणांत पूर्वी शेजाऱ्यांशी असंच नातं असायचं... जिव्हाळ्याचं.. आपला सगळ्यांचाच अनुभव थोड्या फार प्रमाणांत तुमच्यासारखाच असेल. शेजारी असावेत तर असेच अपुलकीचे..
    झक्कास...

    उत्तर द्याहटवा
  2. kharach ....mast asayche shejari .....agadi sakhya nate vaikanpeksha javalache ....mast lihitay ...

    उत्तर द्याहटवा
  3. Dear Madhu,

    Thanks for writing about my Parents...Mulik Family have been a REAL neighbour to us, especially after my father's death in 1978...My mother could do lot of things just because of you all..thanks so much!!

    Love, Arunatai

    उत्तर द्याहटवा