शुक्रवार, १८ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ५)


 मंडळी असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हल्लीच हे जाणवलं. ओम, आमचा मुलगा काहीतरी खेळणे बनवत होता, म्हणजे त्याचे त्याचे उद्योग चालू होते. आम्ही दोघेही त्याला ओरडलो आणि अभ्यासाला बसविले. थोडा विचार केल्यावर वाटलं, इतिहासाची पुनरावृत्तीच तर होती ती… पण आता त्याकडे बघणारे बदलले आहेत. बदललेल्या शैक्षणिक पद्धती, जीवनशैली सगळ्याच क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धा ह्यामुळे मुलांना शिक्षण आणि पालकांनी स्वतःच्या इच्छापूर्ती साठी लावलेल्या विविध शिकवण्या ह्यातून स्वतःचे उद्योग करायला वेळच मिळत नाही. ह्या प्रसंगाने आमचे सारे "उद्योग" आठवले, तर ह्या भागात आमच्या "उद्योगांबद्दल" म्हणजे खऱ्या आणि उपरोधात्मक दोन्ही अर्थाने.

खरे तर आम्ही विदर्भातले, शेगाव जवळच्या खामगावचे. आमचे वडिल त्यांच्या तरुणपणी, म्हणजे विशीच्या आतच डोंबिवलीत आले, एकटेच, इथे कोणीही नातेवाईक, मित्र नसतांना. त्यांनी सुरुवातीला अगदी दुकानांतही काम केले. नंतर मध्य रेल्वे, नॅशनल रेओन असं करत बी.ए.एस.एफ. ह्या जर्मन कंपनीत नोकरी करत होते. नुसती नोकरी करूनही ते व्यवस्थित राहू शकले असते, पण उद्यमशील स्वभाव. त्यामुळे त्यांनी शिफ्टची नोकरी सांभाळून प्लंबिंगचा व्यवसाय केला. ते डोंबिवलीतील सुरवातीच्या मोजक्या लायसनस्ड प्लंबर्स पैकी एक. आमचं बाजीप्रभू चौकात अगदी मोक्याचं दुकान होतं, ते बरेच वर्षांनी मालकांना परत द्यावे लागले. आमची आईही फार उद्योगी. फावल्या वेळात शांत बसणं, दुपारचं झोपणं असं कधीच नाही. आम्ही लहान असतानाही सगळं आवरले की आई पाण्याची मीटर्स दुरुस्त करायची. पाण्याची मीटर दुरुस्त करणारी आमची आई ही बहुदा एकमेव महिला असावी. आमचाही हातभार लागायचा ह्या मीटर दुरुस्तीला. मीटर पूर्ण नीट झालं की त्याचे सगळे काटे / नंबर शून्यावर आणावे लागायचे. आम्ही ती छोटी छोटी चक्र फिरवून ते शून्यावर आणायचो. दुरुस्त केलेली मीटर्स गिऱ्हाईकाला देण्यापूर्वी कुर्ल्याहून प्रमाणित करून आणावी लागायची. वडिलांना वेळ नसला की अण्णा (मोठा भाऊ) हे काम करायचा. वडिलांनी ह्या व्यवसायाबरोबर जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय केला आणि जागेत गुंतवणूकही केली. डी एन सी शाळे जवळच्या आमच्या जागेवर १९७५ साली त्यांनी एक बिल्डिंगही बांधून घेतली. डोंबिवलीचा हा भाग तेंव्हा लांब वाटायचा त्यामुळे आम्ही तिकडे न राहता ह्या "मुळीक बिल्डींग" मध्ये सहा भाडेकरू ठेवले. म्हणजे बघा, आम्ही मालक, राहात होतो भाड्याच्या घरात. नंतर नंतर प्लंबिंग कमी करून वडिलांनी शेअर मार्केट मध्ये चांगली गुंतवणूक केली. शेअर्स बद्दल सल्ला घ्यायला वडिलांचे बरेच मित्र घरी यायचे. आमची आई अजूनही शेअर्स मध्ये उलाढाल करते बरं का!

आमच्या आईने फक्त मीटर नाही दुरुस्त केली, ती क्लासला जाऊन शिवण शिकली, आणि अजून पर्यंत शिवणाची कामं करते. पूर्वी खूप शिवायची, कॉटन साड्यांच्या गोधड्या ही तिची खासियत. आता सांगून सांगून शिवणकाम कमी केलंय, अगदी ओळखीच्यांचेच शिवते. वाड्यातला माहोलच वेगळा असायचा. कोणीतरी काहीतरी शिकून /बघून यायचं आणि झालं, सगळ्या महिला दुपारी त्याच्या मागे. असे करत करत छंदाचे रुपांतर व्यवसायात व्हायचे. आमच्या आईने मण्याचे प्राणी, पक्षी, फळं, वेल्वेटची फुलं, फूलवाती, नायलॉनच्या दोऱ्याच्या पिशव्या, बटवे, लोकरीची तोरणं, क्रोशाचे टेबल क्लोथ, प्लास्टिक वायरच्या रिंगचे पडदे अशा कित्येक वस्तू करून विकल्या आहेत. घराच्या मागेच गणपती मंदिर, आजी तिथे कीर्तनाला जायची, आईने शिवलेली तिची चंची बघून आजीच्या मैत्रिणी चंची शिवायला यायच्या. शेजारच्या मैत्रिणी सोबत आईने लसूण चटणी आणि अनारशाचे पीठही करून विकले आहे. आमच्या घरच्या उद्योगांना दूधवाल्याचाही हातभार लागला. आमचा भय्या अगदी ताजं, शुद्ध दूध घालायचा, त्यामुळे घरात भरपूर साय, सायीचं दही आणि दह्याच लोणी व्हायचं (हे इतक्या सखोल सांगण्याचं कारण नव्या पिढीला लोणी आणि तूप घरी बनवता येतं हे बहुदा माहित नसावं) लोणी आणि तूप घरात खाऊन उरायचं, मग करायचं काय? आम्ही लोणीही विकायचो, अगदी शुद्ध आणि बाजारभावापेक्षा बरेच स्वस्त. अगदी ठरलेली गिऱ्हाईकं होती. बहुतेक भय्याला कळलं असावं, दीड दोन वर्षांनी त्याच्या दूधाची प्रत बिघडली. ती जुनी गिऱ्हाईकं भेटली की विचारतात, अजूनही लोणी देता का? हल्ली कुठे तसे दूध, आता मिळते ते भेसळयुक्त, दोन दिवसांपूर्वी पाकीटबंद केलेले दूध. आईच्या सगळ्या उद्योगात आमचाही खारीचा वाटा असायचा. वेल्वेटला फेविकोल लावून दे, पाकळ्या कांप, तारा चिकटव, वायरच्या रींग बनव अशी कामं आम्ही करायचो. ह्यात, तू मुलगा आहेस, हे करू नको असं कधी झालं नाही, ह्यामुळे आम्ही बरेच शिकलो.

आमच्या भावंडांचे उद्योग म्हणाल तर आम्ही तसे फार व्रात्य नव्हतो त्यामुळे फार काही नाहीत. डोंबिवलीत दातारांची श्री लाँड्री प्रसिद्ध आहे, त्यांच्या काही शाखा आहेत. एका होळीला अण्णाने वाड्यातल्या मित्रांबरोबर जाऊन त्यांच्या भय्याची लाकडी खाट उचलून आणून होळीत टाकली. झालं... भय्याला कळल्यावर तो आरडा ओरडा करत वाड्यात, पण तोवर ती जळून खाक झाली होती. थोड्याफार भांडणानंतर सगळं शांत झालं. असं आत्ता झालं असतं तर? सगळ्या वाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज बनवून, चर्चेच गुऱ्हाळं मांडून, मोठ्ठं राजकारण माजवलं असतं. आमचा अण्णा धाडसी, वडिलांची राजदूत मोटारसायकल तो सातवीत आठवीत असतांना चालवायचा आणि रस्त्याने लोक बघत राहायचे. त्याचा अजून एक उद्योग म्हणजे मासे पाळणे. आमच्या छोट्याश्या घरात एवढ्या माणसांसोबत फिशपाँडही होता. मासे पाळायचे, पाँड विहिरीवर जाऊन धुवायचा, माश्यांनी पिल्लं घातली की वेगळी काढायची, त्याला ह्या सगळ्याची खूप आवड होती.

त्याचे अजून एक आवडते काम म्हणजे विहिरीत मुटका मारायचे. तो मुटका मारायला गेला की सगळे जमा व्हायचे, मुटका म्हणजे मांडी घालून उडी मारून पाण्यात पाठीवर पडायचे. मुटका बरोबर बसला की खूप पाणी उडायचे. अण्णा शाखेतही जायचा, रामजन्मभूमी साठी तो अयोद्धेलाही गेला होता. त्यांना मधेच एका शासकीय विश्राम गृहात स्थानबद्ध करून ठेवले होते. नंतर काही दिवसांनी जबरदस्तीने गाडीत चढवून परत पाठविले होते. त्यावेळी आम्ही सगळेच तणावाखाली होतो.

आमची मोठी ताई उद्योगी नव्हती, ती खऱ्या अर्थाने ताई होती. तिने कॉलेज मध्ये असतांना जनगणनेचा उद्योग केला आणि मग ठिक-ठिकाणच्या पाण्यामुळे बरीच आजारी पडली होती. आमची छोटी ताई म्हणजे माझ्याहून मोठी पण मोठ्या ताईहून छोटी बहिण, ही फार उद्योगी. ती वाड्यातली एकमेव मुलगी असेल जी मालकांच्या बंगल्याच्या रहाटावरून (साधारण दुसऱ्या मजल्यावरून) विहिरीत उडी मारायची. तिला चित्रकला, शिवण, पाककला ह्याची खूप आवड आहे. कॉलेज मध्ये असतानाच ती पंजाबी, बंगाली, चायनीज असे पदार्थ शिकली आणि घरी त्याचे क्लास सुरु केले. लग्नाची मेहेंदी, मेकप करायला जायची. अण्णाला फोटोग्राफीची आवड होती म्हणून एक एस एल आर कॅमेरा घेतला होता, ताई त्याने लग्नाचे फोटो काढायला जायची. पाककलेची हौस त्यामुळे काही जणांना खाद्यपदार्थही पुरविले होते.

माझे "उद्योग" म्हणाल तर, दोन प्रसंग अजूनही जसेच्या तसे डोळ्यापुढे येतात.

आमच्या वाड्यासमोर रस्त्याच्या पलीकडे माटेवाडा होता, त्याच्या शौचालयांची मागची बाजू रस्त्याच्या बाजूला यायची. एकदा आम्ही मुलांनी बेचकी तयार केली आणि स्पर्धा लावली, माटेवाड्याच्या शौचालयाच्या खिडकीतून दगड आत मारायचा. मी एक-दोन दगड बरोबर नेम धरून आत मारले आणि झालं. लाल्या (जे आमच्याहून बरेच मोठे होते, पण सगळे त्यांना लाल्या म्हणायचे) आरडा ओरडा करत आमच्या मागे धावत. काय झालं हे कळलं आणि पुढे काय होणार हे ही! जे रस्त्यावर धावत सुटलो. आमच्याकडे तेव्हा आत्या आणि आत्तेभावंडं आली होती, आत्तेभाऊ संजू माझ्या मागे आणि मी पुढे असे बराच वेळ रस्त्यावर धावत होतो. शेवटी त्याने मला पकडून घरी आणलं आणि मग मस्त...............

दुसरा उद्योग, अगदी सगळ्यांच्याच लक्षात राहिलेला. मी आठवी नववीत असेन, मे महिना होता. झाडाला खूप कैऱ्या लागल्या होत्या. बरोबर झाडाखाली, विहीरीवरच्या मोरीचा सिमेंटचा पत्रा होता, बिल्डींगच्या जिन्यावरून ह्या पत्र्यावर चढता यायचे. आम्ही सगळी मुलं पत्र्याच्या आवाजाकडे कान लावून असायचो. धप्प..............आवाज झाला आणि मी सुसाट जिन्यावर, तिथून पत्र्यावर आणि...............धाड धाड धाड........ पुढचं मला बघ्यांकडून नंतर समजले. मी पत्रा तोडून, पत्र्यावरचा कचरा आणि पालापाचोळा पांघरून पडलो होतो मोरीवरच्या कपडे धुवायच्या मोठ्ठ्या दगडाच्या अगदी बाजूला, थोडक्यात बचावलो होतो. सगळा वाडा मधु पडला ! मधु पडला ! म्हणून गोळा झाला, मला आत उचलून नेले. काही वेळाने मी भानावर आलो.

अशीच एक आठवण म्हणजे बाजूच्या वाड्यात सगळ्या मुलांची, आशा मावशी रहायची, तिने आम्हा मुलांना चित्रकला शिकवली, ती स्वतः कला महाविद्यालयाची चित्रकार आहे आणि तेंव्हा ती शिक्षिका होती. आम्ही मुलं केवळ तिच्या मुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजीयेट परीक्षा पास झालो. तिने शिवलीलामृताच्या पारायणाचे व्रत केले होते. मी असेन सातवीत वगैरे, न चुकता सगळ्यांबरोबर त्याचे पारायण केले, मला फार काही कळत नव्हते, पण चिल्या बाळाची गोष्ट ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावायचे.

मी सातवीत असतांना आमच्या स.वा.जोशी विद्यालयाची सहल राजस्थानला गेली होती. जयपूरला आम्ही युथ होस्टेलमध्ये उतरलो होतो. त्या वयात परदेशी गोऱ्यांचे फार आकर्षण होते. आम्ही उतरलेल्या हॉटेल मध्ये आम्हाला एक गोरा भेटला, तो आमच्याशी बोलू

पाहत होता. वासरात लंगडी गाय........सगळे इंग्रजीत बोलायला लाजत होते, कोणीच पुढे होत नव्हते. मग मी जाऊन त्याच्याशी बोललो. त्याचे नाव, पत्ता लिहून घेतला, बरोबर फोटो काढले. मग काय वट....कॉलरताठ. घरी पोहोचल्यावर खास परदेशी पाठवायचे पत्र (ग्रीनलंड) आणून त्याला पत्र पाठविले. काही दिवसांनी परदेशी टपाल तिकिटे असलेले पाकीट आले, वर नाव होते "दानिएल एबरहार्द". बापरे.......केवढा आनंद! नुसता जल्लोष! मागच्या वाड्यातल्या, सहलीला बरोबर आलेल्यांना जोर जोरात हाका, अतुल......., अनघा........ दनिएलच पत्र आलं ! ही पत्रमैत्रि एक-दोन वर्ष चालली. हा इसम शिक्षक होता आणि जगभर फिरस्ती करायचा. हल्ली…आठवण आल्यावर फेसबुकला शोधलं पण शोध काही लागला नाही.

आमच्या छोट्या ताईने आणि मी केलेला अजून एक उद्योग म्हणजे मॉडेलिंग, आम्ही दोघांनीही काही जाहिराती केल्या. ताई होती क्यॅनरा की महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीत आणि मी औषधाच्या दोन तीन जाहिराती केल्या. आमच्या मालकांचा मुलगा श्री अनिल गांधी हे ह्या व्यवसायात आहेत, त्यांनीच आम्हाला ब्रेक दिला. मला आठवतंय... जाहिरातीच्या पैशातून मला पहिली फुल प्यैंट आणि फुल शर्ट घेतले होते.

छोट्या ताईने आणि मी बटिक, बांधणीची कापडं तयार केली होती. बहिणीने त्याचे ड्रेस शिवले, तिच्या शिवणकामाचा फायदा तिला तिच्या ड्रेपरीच्या व्यवसायात होतोय. तिने तिचे उद्योग खऱ्या अर्थाने चालू ठेवले आहेत, डोंबिवलीत तिचे नावारूपाला आलेले दुकान आहे.

तर असे हे आमचे उद्योगाचे बाळकडू आणि "उद्योग", ह्यामुळे कामाशिवाय नुसते बसणे, दुपारची वामकुक्षी, चित्रपटगृहात जाऊन तीन तीन तास पडद्यासमोर घालवणे हे कधी जमलेच नाही. आई वडिलांचे कष्ट बघून एक जाणीव झाली की त्यांनी शून्यातून सुरु करून काही वर्षात एवढं मिळवलं तर आपणही जे मिळाले ते शून्य समजुन पुढचा टप्पा गाठायला हवा.

 मधुसूदन मुळीक



५ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर. तुमच्या आई-वडिलांची..नंतर बाकी सगळ्या बहीण-भावांची... कमाल आहे. अशा प्रोत्साहनाने आणि संस्कारांनी पुढच्या पीढ्या नक्कीच आचार-विचारांनी संपन्न घडतात. लेखनशैली साधी सरळ पण मस्तं..

    उत्तर द्याहटवा
  2. क्या बात है.. फारच उद्योगी होतात तुम्ही सगळे जण !! ग्रेट !!
    लिखाण अतिशय ओघवतं आहे....... आता तर आम्ही वाट बघतो पुढच्या भागाची :) लिहिते रहा !!

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या आई बाबांना ' प्रणाम ' ...मस्त लिहिताय ....

    उत्तर द्याहटवा
  4. मधु ... तो पत्रा अजूनही तसाच "तुटलेल्या " अवस्थेत आहे ..
    तुमच्या ह्याचं "उद्योगी " पणाची आम्हाला मजा वाटायची .... विशेषतः तुझ्या आणि दीदीच्या ' उद्योग ' आम्ही जास्त Enjoy केले आहेत ...

    Esp... Cake decorations... कोनातल उरलेलं " Iceing " खाणे ..

    उत्तर द्याहटवा
  5. Hello Madhu,

    You write so well!!!!!!!!! You are taking me back into memory lane..one suggestion... Please put all parts together once you finish writing on the subject and make a book...I will buy..at any price as what you write is Priceless...I am very proud of you Madhu... keep it up.

    Love, Arunatai

    उत्तर द्याहटवा