शुक्रवार, ११ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ४)


वाड्यातल्या मागच्या भागातल्या आठवणी होत्या, नित्यनेमाने येणाऱ्या चतुष्पादांच्या आणि आता वाड्यातले "बाहेरचे".

मंडळी तुम्हाला असे नाही का वाटत की, हल्ली हे बाहेरचे, भूत, आत्मे यांचे ग्लैमर जरा कमी झालंय? अहो पूर्वी किती कथा ऐकायचो? हल्ली कोणी ह्या विषयावर बोलतही नाही. कित्येक जणांना चकवा, मुंजा असे शब्द देखील माहित नसतील.

आठवा आपल्या मे महिन्याच्या, दिवाळी, गणपतीच्या सुट्ट्या, आपली चुलत, आते, मामे भावंडं कुठल्या कुठल्या गावाहून यायची नाहीतर आपण जायचो त्यांच्या कडे, नुसतं भेटायला नाही हं! मस्त आठ पंधरा दिवस हक्काने रहायला. अंगणात, गच्चीत गादीवर पडल्या पडल्या गप्पा रंगायच्या, ह्या “बाहेरच्यांबद्दल” कधी कधी मामा,काका,काकू,आत्या हे ही ह्यांच्या कथा रंगवून रंगवून सांगायचे.

आमच्या वाड्यातही होते बरं का हे "बाहेरचे"! अर्थात हे सगळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून ऐकलेले.

एकदा म्हणे, तिन्ही सांजेला एक बाई वाड्यात आली, छान हिरवी साडी नेसून, नटून थटून. शेजारच्या काकू ओट्यावर काही निवडत बसलेल्या. ती बाई आली आणि काकूंना कुठलासा पत्ता विचारला. त्यांनी तिला सांगितले....अशी जा.. मग उजवीकडे वळ वगेरे. त्यांना काही तरी वेगळे जाणवले त्यांनी परत त्या बाई कडे पहिले तरती गायब!!

अशीच वाड्यातली दुसरी "बाहेरची" म्हणजे विहीरीवरची. आमचे एक शेजारी होते त्यांना दम्याचा त्रास होता. खोकल्याची जास्त उबळ आली की ते रात्री अपरात्री बिछान्यात उठून बसायचे. एके रात्री त्यांना खोकल्याची खूप उबळ आली अन ते उठून वाऱ्यावर खिडकी जवळ बसले. खिडकीतून बाहेर बघितले तरएक बाई विहिरीच्या रहाटा जवळ उभी राहून त्यांना बोलवत होती. असं म्हणतात त्यानंतर त्यांची तब्येत बरीच खालावली, त्यांना इस्पितळात भरती करावे लागले आणि काही दिवसांतच ते गेले.

असे विषय जेंव्हा निघायचे तेंव्हा वातावरण हळू हळू गूढ व्हायचे, प्रत्येकाकडे सांगायला अशा ऐकीव घटना असायच्या. वाड्यात ऐकलेल्या आणि अजूनही स्मरणात असलेल्या अजून दोन गोष्टी.

एकदा म्हणे दोन मित्र शेगावला जायला निघाले, जातांना सावधगिरीचा इशारा म्हणून त्यांच्या मित्राने तिथल्या भूताबद्दल सांगितले. ही जोडगोळी भर दुपारी शेगाव स्थानकात उतरली, टांग्यात बसली आणि मुक्कामी निघाली. दोघांच्याही मनांत ऐकलेल्या भूताबद्दल धाकधूक होतीच! थोडावेळ गेल्यावर, एकाने धीर करून टांगेवाल्याशी बोलायला सुरुवात केली."काय हो, इथे म्हणे एक टांगा चालविणारे भूत आहे, त्याचे हात पाय उलटे आहेत आणि ते खूप लांब लांब होतात.’’हे ऐकताच टांगेवाल्याने आपला लांब हात संपूर्ण फिरवून मागे टाकला आणि विचारले, "असा का?"….मंडळी आम्ही सुन्न व्हायचो अशा गोष्टी ऐकून.

दुसरी गोष्ट बरेचदा ऐकली, काही डोंबिवलीकरांनीही ती ऐकली असेल. तेंव्हा सांगायचे की, मुंबई कडून कर्जत कडे जाणाऱ्या शेवटच्या लोकलच्या, महिलांच्या डब्ब्यात एक श्वेतांबरा येऊन बसते. बायकांशी बोलण्याच्या ओघात आपले नांव पत्ता सांगते आणि गाडी मुंब्र्याच्या खाडीवर आली की खाडीत उडी घेते. एवढंच नाही तर म्हणे काही बायका तिने सांगितलेल्या पत्त्यावर सांगत गेल्या की, तुमच्या मुलीने गाडीतून उडी मारली, तर म्हणे घरचे सांगायचे, ती बऱ्याच वर्षापूर्वीच. मग ह्याच बायका तापाने फण फणायाच्या. ती श्वेतांबरा म्हणजे म्हणे, मंदा पाटणकर तिने खाडीत उडी मारून आपला प्रवास कायमचा संपवला होता. मोठ्ठं झाल्यावर जेंव्हा कधी शेवटच्या कर्जत लोकलला चढायला मिळून उभा रहायला दरवाज्याची जागा मिळाली तेंव्हा आवर्जून पाहिलं, पण कोणीच उडी मारली नाही. कदाचित मंदा पाटणकरला मुक्ती मिळाली असावी, नाहीतर लोकलच्या गर्दीला ती कंटाळली असावी.

विशेषतः कोकणातून येणाऱ्या पाहुण्यांकडे असे बरेच किस्से असायचे. रात्रीच्यावेळी असे किस्से ऐकले आणि काळोखात, मिणमिणती मेणबत्ती घेऊन शौचालयात जायची वेळ आली की झालं! त्यातून ती मेणबत्ती आतजाईपर्यंत चारदा विझायची, मग आईला नाहीतर ताईला ताकीद द्यायची तुम्ही बाहेर उभे रहा. हे सगळे आठवले की आता हसू येते.

कधी कधी फजितीही झाली बरंका! आमच्या बाहेरच्या खोलीला एक खिडकी आहे, अगदी जुन्या प्रकारची, म्हणजे मोठी खिडकी, मध्ये एक उभा गज आणि आडवे चार पाच गज. कोणाचाही संपूर्ण हात ह्या गजामधून आत येईल असे. एके रात्री घरातले सगळे गाढ झोपले होते. मला झोप लागत नव्हती, पडल्या पडल्या चुळबूळ चालू होती. तेवढ्यात माझं लक्ष खिडकीकडे गेलं, खिडकीत कोणीतरी माणूस उभा होता. पटकन चादर डोक्यावर घेतली, परत थोडा कोपरा बाजूला करून बघितले तर तो माणूस तिथेच उभा. बरेचदा बघितलं तरी तो तिथेच, आता तर त्याने हात खिडकीतून आत घातला, थोड्यावेळाने हात हलवू लागला. मला खूप भीती वाटत होती, ओरडायला आवाजही फुटत नव्हता, काय करू सुचत नव्हते, घामाघूम झलो........पण आडनिडं वय होतं, स्वतःलाच आपण घाबरतोय ह्याची आणि त्यातून आई, अण्णांना सांगायची लाज वाटत होती. तो माणूस काही चोरत नाही ना ! तसाच चादर थोडी बाजूला करून बघत राहिलो. काही वेळाने उजाडू लागलं आणि मोठ्ठा निःश्वास टाकला. अहो, खिडकीच्या बाजूच्या बारवर हैंगरला एक पांढरा शर्ट टांगला होता! एक डुलकी काढली आणि कोणालाही काहीही न सांगता सकाळी उठून शाळेत गेलो. त्या रात्रीनंतर सगळे हैंगर आत, खिडकी पासून लांब सरकवून झोपायची संवय मात्र लागली.

अशा "बाहेरच्यांच्या" गोष्टी ऐकून आम्हीही निगरगट्ट झालो, इतके की पुढे दहावीत वगेरे असतांना ह्या "बाहेरच्यांना" आम्ही पछाडलं, खरंच! कसं माहित आहे? "प्लान्चेट"...................

आम्ही भावंड, त्यांचे मित्र, त्यांची भावंडं असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, खूप सहली काढल्या. कधी कधी कोणाच्यातरी डोक्यात यायचं चला प्लान्चेट करूया! मग सगळेजण रात्री एखाद्याच्या घरी जमायचो. मोठ्ठा चित्र काढायचा कागद घेऊन त्यावर ए ते झेड अक्षरं, बाजूला शून्य ते नऊ आकडे लिहायचे, बरोबर मधोमध "बाहेरच्या" पाहुण्यांसाठी आणि आजू बाजूला "हो"-"नाही" चे गोल काढायचे. उदबत्ती आणि काचेचा ग्लास हे सामान. भूताच्या गोष्टी ऐकून ऐकून पक्कं माहित झालेलं की देवगण वाल्यांना भूत काही करत नाही. त्यामुळे प्लान्चेट सफल संपूर्ण करण्यासाठी तीन देवगणवाले, त्यातला एक मी. प्लान्चेट सुरु करताना काचेच्या ग्लासमध्ये उदबत्तीचा धूर भरायचा, तो ग्लास कागदावर मधे उपडा टाकून तीन सारथ्यांनी उजव्या हाताची दोन बोटं ग्लासवर अलगद ठेवायची. मग त्यातल्या एकाने अतिशय नम्रपणे ह्या "बाहेरच्याला" आवाहन करायचे की तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची ( खूपच गहन...)उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी "हो" वर जा. मंडळी... ग्लास अलगद फिरत "हो" वर जायचा! एकदा का हा परलोकवासी "हो" वर गेला की झाली त्याची परवड सुरु. मग मुख्य सारथी सगळ्यांतर्फे प्रश्न विचारायचा. प्रश्न काय माहित आहे? अमुक अमुक मोठेपणी कोण होणार? कुठला अभियन्ता होणार? नोकरी करणार की धंदा? कुठल्या गावाला?आमच्या मोठ्या बहिणी, मैत्रिणींची लग्न ठरवली प्लान्चेटने. आम्ही विचारायचो, त्यांच्या भावी नवऱ्याचे नाव काय? स्पेलिंग करून दाखवा, कुठल्या गावाचा असेल? काय शिकलेला असेल? वगैरे वगैरे. आम्ही ग्लासमध्ये कोणा कोणाला बोलाविले माहित आहे? ताजे ताजे गेलेले आत्मे लवकर यायचे, त्यामुळे राजीव गांधी, किशोर कुमार, संजीवकुमार,इंदिरा गांधी, संजय गांधी असे, पंडित नेहरू, गांधीजी हे यायचे पण जरा वेळ लावायचे. असं करून ह्यातली भीती पार निघून गेली होती, प्रश्न तरी किती आणि काय विचारणार मग आम्ही ह्या बाहेरच्यांची फिरकी घ्यायचो, त्यांची लफडी, अंडी पिल्ली बाहेर काढायचो, आमच्यातले काही जण गंभीर... बाकी नुसते हसून लोट पोट. असं करता करता ग्लास पडायचा मग सगळे गंभीर ("बाहेरचा" सुटला तर?) कित्येक जणांना बोलावलं पण कोणाच्या नातेवाईकांना मात्र नाही, आले आणि गेलेचं नाही तर काय घ्या?

असंच एका रात्रि, प्लान्चेटसाठी गिऱ्हाईक शोधता शोधतामित्र म्हणाला, "अरे आमचा खडूस, म्हातारा मालक हल्लीच गेलाय", सगळे खूष ! ताजा, ताजा.......झालं त्यांना बोलावलं, ते लगेचच आले, ते पेशाने वकील होते, भाडेकरूंना खूप त्रास द्यायचे आणि आत्ता आमच्या ग्लासमध्ये. मग हवे नको ते विचारून त्यांची उलट तपासणी घेतली. बराच वेळ असं ग्लासमध्ये कोंडून फिर फिर फिरवलं, नंतर ग्लास चा वेग खूप वाढला आणि झाली की हो गडबड ....ग्लास थांबायलाच तयार नाही. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली.वकील साहेब खूपच भडकले होते आणि आम्ही सगळे चिडीचूप्प, हसणं एकदम बंद. सारथ्यांनी खूप विनवण्या केल्या, आम्ही चुकलो, माफ करा वगैरे वगैरे. थोड्यावेळाने स्वारी शांत झाली आणि सांगितल्या प्रमाणे "गेलो" हे कळण्यासाठी मधल्या गोलावर थांबली. ह्या प्रसंगानंतर आम्ही परत प्लान्चेट केलं नाही. प्लांन्चेट म्हणजे प्लान ऑफ चीटिंग.

तर असे हे, माझ्या आठवणीतले वाड्यातले "बाहेरचे" विश्व.

मधुसूदन मुळीक

३ टिप्पण्या:

  1. .....अहो खरच थोडा वेळ का होईना लहान पण ची ती भीती पण वाटून गेली ..... मस्त लिहिताय ....

    उत्तर द्याहटवा
  2. केवढ्या तरी जुन्या आठवणी फेर धरून नाचू लागल्या.....

    भूत, हडळ, डाकीण, समंध आणि मुंजा

    हीच तर होती त्यावेळची करमणूक व मज्जा !!

    उत्तर द्याहटवा
  3. :) सही !! ते प्लांचेट वगैरे आम्ही सुद्धा केलं होतं. प्रश्न सुद्धा अगदी तेच ......... :)
    काहीही म्हणा..... आपलं बालपण अतिशय निरागस होतं आणि तेच दिसतंय तुमच्याही आठवणींमधून !!

    उत्तर द्याहटवा