नाटकामध्ये वादग्रस्त भूमिका साकारणारी, वादातीत मस्त केतकी ! एका बाजूला डॉ. मोहन आगाशेंसारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मी तर दुसरीकडे अनुभवी, हरहुन्नरी संदेश कुलकर्णी यांच्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवू पहाणारी सर्वात छोटी कलाकार म्हणजे केतकी. तिच्या सौन्दर्याची मोहिनी फक्त मराठी जनमनावर पडली असे नाही तर कुवेतमधल्या दिग्गज कलाकारांवरही (Sr. Painter & Sculptor, आधुनिक विचारसरणीचे व पाश्चिमात्य वेशभूषा परिधान केलेले) हिची अशी काही छाप पडली की त्यांनी पूर्वपरवानगी घेवून हिच्यासह साऱ्या ग्रुपचे फोटो काढले, आपल्याबद्दलची माहिती दिली. झाले असे की Hotel Le Royal च्या बाहेर का.त्रि.च्या ग्रुपबरोबर पार्क केलेल्या गाडीची प्रतिक्षा करत आम्ही उभे होतो. तेथेच कॅफेच्याबाहेर हे उपरीनिर्दिष्ट कलाकार विचार विमर्षात गर्क होते पण जसे त्यांनी केतकीला
पाहिले, त्यांना वेधून घेतले केतकीच्या आकर्षक भारतीय पेहेरावाने ! ही नजर होती कौतुकभरली, एका विशुध्द कलाकाराला हवे हवेसे काही गवसलेली ! अगदी निर्मल ! त्यानंतर झालेल्या संभाषणात आधुनिक भारतीय पेहेराव व दागदागिन्यांमुळे ते कसे प्रभावित झाले याबद्दल ते भरभरून बोलू लागले आणि अर्थातच एक भारतीय म्हणून, मराठी कलाकाराचे कौतुक झालेले पाहून माझे मराठमोळे मन खूपच सुखावले, केतकीच्या या कौतुकाने मला झालेल्या आनंदात तुम्हा सर्वांनाही सहभागी करून घ्यावे म्हणून येथे लिहावेसे वाटले.
मोकळ्या स्वभावाची, Ice Cream व थंडगार दहीवडे खाल्ल्यावरही कोणतेही आढेवेढे न घेता सुश्राव्य गाणे म्हणणारी केतकी, प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद लुटणारी. रूप असूनही रुपगर्विता नसलेली, दिलखुलास बोलणारी, छोट्यांमध्ये छोटी होऊन जाणारी केतकी, सा रे ग म प मध्ये अंतिम पंचरत्नात निवड झालेली, मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत व Spanish या पंचभाषांवर प्रभुत्व असणारी सकलकलासंपन्न केतकी ! तिचे कौतुक न करण्याचा करंटेपणा कसा करावा ? तिचा वाढदिवस आज १२ मे ला आहे तेव्हा तिचे वर्णन करणारी व तिला शुभेच्छा देणारी ही कविता.........
नावासारखा केतकी वर्ण
लाभली रूपसंपदा देखणी
अभिनयकौशल्याला लाभे
ओघवती अस्खलित वाणी
बालनाट्यानी अंकुरले गेले बीज
तयाचा वेलू गेला रुपेरी पडद्यावरी
मराठी, हिंदी, संगीत रंगभूमीसह
प्रायोगिक नाटकातही असे मातब्बरी
भावगीत असो, असो भारुड
वा बैठकीची खडी लावणी
तालासुराचे अचूक ज्ञान
करतेस मैफिल दिवाणी
A. R. रेहेमानच्या संगीताची
असे अपूर्व तुजवर मोहिनी
त्यामुळेच तर तमिळ भाषेतही
रंगवते रागिणी मधुर स्वरांनी
कधी भरतनाट्यमच्या पदन्यासांनी
Jazz, सालसा, ballroom dance नी
प्रेक्षकांवरती साऱ्या टाकते भुरळ
कलागुणांच्या आकर्षक आविष्कारांनी
ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
या बोलांची येते प्रचिती तुझ्या दर्शनानी
कलागुणांच्या नित्यनूतन उन्मेषांनी
विराजमान व्हावेस रसिकांच्या मनी
हीच ईच्छा आज तुझ्या वाढदिवसादिनी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.......
-अर्चना देशमुख
Received email from Ketki Thatte.
उत्तर द्याहटवानमस्कार!
मै शब्दात मांडू शकत नाहीये की मला आत्ता ही कविता वाचून कित्ती कित्ती छान वाटतंय! एकूणच हा लेख, ही कविता आणि अर्थातच तुम्हा सर्वांचा स्नेह, प्रेम, आपुलकी... या साऱ्यांनीच मला इतका मोहवून टाकलं आहे! खूप आभार! खरंतर आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात.. पण तरीही. कुवैत सारख्या देशात आम्हाला तुम्ही अगदी घरच्यासारखी सुरक्षितता दिलीत. हा स्नेहबंध असाच जुळून राहो हीच इच्छा!
अर्चना मावशीना माझ्याकडून खूप प्रेम सांगा. आणि आभार! माझ्या वाढदिवशी ही सर्वात सुंदर भेट त्यांनी दिलीये मला! :)
कळावे, लोभ वृद्धिंगत व्हावा, हीच इच्छा!
आपली,
केतकी.