शुक्रवार, २५ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ६)

मंडळी…वाड्यातले सगळे भाडेकरू कित्येक वर्षे एकोप्याने राहत होते, आम्हीच सगळ्यात शेवटी आलेले कुटुंब. सगळ्यांच्यात छान घरोबा होता, प्रत्येक जण आपलं सुख दु:ख इतरांबरोबर वाटून घ्यायचा, मन मोकळं करायला हक्काची अशी आपली माणसं होती. सगळ्यांना सगळ्यांचे गुण-अवगुण, सवयी, खोड्या माहिती होत्या आणि त्याच्या त्या गुणा-अवगुणांसकट बाकीच्यांनी त्याला स्वीकारलेलं असायचं.


अहो कित्ती बारीक-सारीक सवयी माहिती झाल्या होत्या माहित आहे? तुम्ही म्हणाल काहीही लिहितात, पण खरंच हे ही अनुभवलंय ह्या वाड्यात. वाड्यात तळ आणि पहिल्या मजल्यावरच्या बिऱ्हाडांसाठी सामुदाईक शौचालयं होती. त्यामुळे कोण कधी, किती वेळा जातो? किती वेळ लावतो? कोणाच्या नंतर जायचे नाही, कोण येताना दिसलं की धावत जाऊन आधी नंबर लावायचा, ही गणितं पक्की होती, पण ह्या बाबतीतही कधी कधी सौजन्य दाखवायचे बरका! पहले आप ! पहले आप ! ......सहन होईस्तोवरच.

तर आता भेटूया आमच्या काही शेजाऱ्यांना, अशाच त्यांच्या गुणा-अवगुणांसकट (हे मी अतिशय आदराने लिहितो आहे, केवळ आठवणी म्हणून, तरीही कृपया गैरसमज नसावा.)

आमचे सख्खे शेजारी म्हणजे हर्डीकर, नाना आणि रेखाच्या आई (सगळे असेच संबोधायचे) आणि रेखा, अरुणा, नंदू ही त्यांची तीन मुलं. नाना काही वर्षे आर्मीत होते, त्यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानी सेनेत काम केले होते. आर्मीतून आल्यामुळे कडक शिस्त, स्वच्छता आणि टापटीपपणा नानांच्या अंगात मुरलेला. पांढरे शुभ्र कपडे घालून, लाकडी आराम खुर्चीत टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र वाचत, सिगरेट पीत बसलेले नाना अजूनही तसेच्या तसे डोळ्यासमोर येतात. रेखाच्या आई आणि नाना ह्यांनी व्यवसायात जम बसविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. घरोघरी जाऊन तेल, साबण विकले, वेळप्रसंगी रद्दी विकून आलेल्या पैशावर वेळ निभावली. नानांनी तयार केलेलं "बडगा" हे ढेकणावरचं औषध अजूनही आठवतंय. त्याला प्रचंड दुर्गंधी होती, त्यामुळे खूप जालीम असूनही ते बाजारात खपलं नाही. ह्या बडग्याची मोठी चीनी मातीची बरणी मागच्या दारात पडून होती, आम्ही मुलं मुद्दामून तिचं झाकण उघडून वास घ्यायचो, अजूनही तो वास नाकात बसलाय. रेखाच्या आईंच्या साथीने नानांनी धंद्यात जम बसवला. ते पुण्याहून तिखट, हळद, श्रीखंडाच्या गोळ्या, मसाला सुपारी आणून मुंबई, ठाण्यातल्या दुकानदारांना पुरवायचे. जोडीला रेखाच्या आई घरी बायका ठेवून त्यांच्या कडून लोणचं मसाला, गोडा मसाला, उपवासाची, थालीपीठाची, चकलीची भाजणी करून घेऊन पुरवायच्या. संक्रांतीच्या मोसमात तिळगूळ बनवायच्या, आम्ही मुलं लाडू वळायला, पाकीटं भरायला जायचो आणि बदल्यात तिळगूळ खायचो. रेखाच्या आई हा व्याप सांभाळून विणकाम, भरतकामही उत्साहाने करायच्या.

रेखाच्या आई कधी कधी आम्हा मुलांना खूप त्रास द्यायच्या, ओरडायच्या. दुपारच्या वेळेत आम्ही अंगणात क्रिकेट, लगोरी, आबादुबी खेळत असतांना कधी कधी चेंडू त्यांच्या घरात जायचा. मग झालं चेंडू जप्त! द्यायच्याच नाहीत. एकदोनदा तर चेंडू विळीवर अर्धे चिरून बाहेर फेकले होते.

नानांना दम्याचा त्रास होता. पुढे जाऊन हृदयविकारही झाले, त्यात १९८१-८२ साली त्यांचे निधन झाले. रेखाच्या आई खूप कणखर आणि व्यवहारिक, व्यवसायात असणारा कर्ता पुरुष गेल्यावर कुठलीही साधारण स्त्री हतबल होऊन खचून गेली असती. पण त्यांनी मुलाला Apprenticeship साठी पुण्यात टेल्कोला ठेवले, पुढे तो तिथेच नोकरीस लागला. त्यांनी व्यवसायाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुण्याहून माल आणण्यासाठी अमृत, बाळा पाटील, जोशी ही माणसं त्यांच्याकडे कामाला होती. त्यांच्या कडून माल आणून घेणे, ते परस्पर धंदा करत नाहीत ना ? ह्याची खबरदारी घेणे, त्यांच्या मार्फत पैश्याचे व्यवहार सांभाळणे, हे त्या काटेकोरपणे लक्षं ठेऊन करायच्या. घरी मसाले, भाजण्या तयार करण्यासाठी पत्की बाई, कल्पना, भावे आजी, आशा ह्या बायका यायच्या. मुलगा पुण्यात, दोन्ही मुली लग्नं झालेल्या आणि नोकरीला, त्या एकटीने सगळे सांभाळायच्या. आमचाही हात भार लागला त्यांना व्यवसायात. किराणा माल, गिरणी वाल्याने आणलेली पीठ, भाजण्या उतरवून घे, घरी येणाऱ्या गिऱ्हाइकाला माल दे, अशी बरीच कामं आमच्या घराने केली. आमची मोठी ताई रोज त्यांना सोबत म्हणून रात्री झोपायला जायची, तिचे लग्न झाल्यावर छोटी ताई जात असे. रेखाच्या आई स्वतः सगळा माल द्यायला ठाण्याला जायच्या त्याही सकाळी ९.२७ ची जलद लोकल पकडून, भर गर्दीच्या वेळी. एकदा अशीच लोकल पकडतांना त्या पडल्या आणि हात फ्रॅक्चर झाला पण त्यांनी हार काही मानली नाही, तात्पुरते माल टाकायला एका बाईला कामावर ठेवले, हात बरा होताच काम चालू. व्यवसायाचा व्याप सांभाळत, आपले छंद जोपासत, नोकरी करणाऱ्या मुलीच्या मुलालाही त्यांनी सांभाळले. त्यांचा दिनक्रम अगदी घडयाळाच्या ठोक्यावर, किंबहुना त्यांच्या कामानुसार घड्याळ लावले इतका वक्तशीरपणा. त्यांचे आणि मैत्रिणींचे रोजचे भेटायचे ठिकाण म्हणजे डोंबिवली स्थानकाचा जुना चार नंबरचा फलाट. रोज न चुकता म्हणजे अगदी पावसाळ्यात सुद्धा बरोबर संध्याकाळी सहा वाजता चार नंबरला, त्या आणि मैत्रिणी कोंडाळे करून बसलेल्या असायच्या. आम्हीही जायचो कधी कधी गाड्या बघायला. हे थोडी थोडकी नव्हे तब्बल वीस वर्षाहून जास्त, टी.सी.न्नाही हे माहिती होते, एवढ्या काळात कधीही त्यांना कोणी तिकीट विचारले नाही, नंतर नंतर गर्दी वाढली, वयानुसार सगळ्यांना झेपेनासं झालं, तेंव्हा हे मंडळ बंद झालं.

साधारण वयाच्या सत्तरी पर्यंत त्यांनी व्यवसाय केला. सगळे सांगायचे, रेखाच्या आई आता बंद करा धंदा, त्या म्हणायच्या, “होतं तोवर करत राहायचं”. त्यांनी स्वतः करता म्हातारपणाची पुंजी जमा केली, आपला उदरनिर्वाह व्यवस्थित होईल ह्याची खात्री झाल्यावर व्यवसाय बंद केला. त्यांची प्रचंड मेहनत, धीर, उत्साह आणि आत्मविश्वास बघून काहीजण त्यांना विचारायचे की तुम्ही कधीच रडत, कुढत, खचून गेलेल्या दिसला नाहीत? त्यावर त्या म्हणायच्या, मी माझ्या आजूबाजूला असे रडणारे, हतबल लोकं गोळाच होऊ दिले नाहीत, मैत्री केली तीही माझ्यासारख्या धडपड्या, आशावादी लोकांशी, संकटाला घाबरणाऱ्यांशी नाही. अजूनही वयाच्या पंच्याऐंशी – सत्याऐंशीव्या वर्षी स्वतः चे स्वतः करतात आणि गांधी वाड्यात त्या एकट्या राहतात.

आमचे दुसरे शेजारी "हाटे" त्यांना आम्ही हाटे मामा आणि हाटे मामी म्हणायचो. हाटे मामांना माझे भारी कौतुक, मला कायम माधवराव नावानेच बोलवायचे. मला हाटे मामींच्या हातची डाळींब्याची उसळ आवडायची, केली की त्या घरी द्यायच्या. त्यांच्याकडचा तूप, वरण भातही मला आवडायचा, लहान असताना मी त्यांच्याकडे जेवायचो. हाटे मामांच्या भावाच्या लग्नाला मी त्यांच्या बरोबर जाऊन राहिलो देखील होतो. हाटे मामा रेल्वेत नोकरीला होते, ते आणि हाटे मामी बरेचदा फर्स्ट क्लासने फिरायला जायचे, तेंव्हा त्याचे फार अप्रूप वाटायचे. ते दोघेही छान दिसायचे, हाटे मामी म्हणजे आशालता वाबगावकरच. आमच्या छोट्या ताईने केलेल्या बँकेच्या जाहिरातीत ते तिचे आई वडील दाखविले होते. प्रदीप, विनोदिनी आणि राजू ही हाटेमामांची मुलं. सगळेजण आपापल्या नोकरी संसारात स्थिरावले. नंतर डोंबिवली जिमखान्याजवळ बंगला बांधून हाटे कुटुंबीय तिथे राहण्यास गेले. प्रदीप पुढे राजकारणात जाऊन महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्षही होता.

आमच्या वाड्यात तीन पळसुले बंधू राहायचे, रामचंद्र, वसंत आणि अनंत. त्यातले एक अण्णा, सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. अण्णा आणि आशा वहिनी. आशा वहिनी आम्हा मुलांचे छान छान कार्यक्रम बसवायच्या. आंब्याच्या मोसमात आमरस पोळीचे जेवण, मुलांचे स्नेह संमेलन, वाडा साफ सफाईची मोहीम म्हणजे अगदी झाडू मारून, ह्या त्यांच्याच कल्पना. त्यांचे घरही मोठे होते, तिथेच आमचे स्नेहसंमेलन झाले होते. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी उज्वला, प्रीती सागरचे "माय हार्ट इज बीटिंग" हे गाणं स्टाईल मध्ये म्हणायची, त्यातल्या इंग्रजीमुळे वाड्यातली मुलं एकदम भारावून जायची. त्या काळात टेलीविजन देखील दूर्मिळ असतांना अण्णांनी प्रोजेक्टर आणून वाड्यातल्यांना घरातल्या भिंतीवर चित्रपट दाखविला होता. आशा वहिनींकडे मुलं रमायची, त्या आमच्या बरोबर पत्ते खेळायच्या, पेटी वाजवून गाणी म्हणायच्या. अण्णा, आशावहिनी दोघांनाही पर्यटनाची खूप आवड, बहुतेक त्यांचे संपूर्ण भारत भ्रमण झाले असावे. आम्हा मुलां साठी अजूनही एक आकर्षण असायचं ते म्हणजे, त्यांनी जगन्नाथपुरीहून आणलेलं छोटसं पोपटाचं पिल्लू. हे पिल्लू पुढे खूप मोठं झालं आणि मस्त बोलायचं. ह्या दोघांची खासियत म्हणजे, नायलॉन च्या जाळीची मच्छरदाणी. सुरवातीला डोंबिवलीत अशी मच्छरदाणी शिवणारे ते एकमेव होते. अण्णा नोकरीला जी.पी.ओ. त (पोस्टात) होते, ते ऑफिसहून आले की शिवणकामही करायचे. अण्णांची अजून एक सवय म्हणजे, ते स्वतः रोज पहाटे दूध आणि पेपर आणायचे, पट्ट्या पट्ट्याचा लेंगा आणि बाह्यांचे बनियन असे ते डेअरीतून दूध घ्यायचे, हातात कोपराला पिशवी अडकवायची मग नाक्यावर वृत्तपत्र घ्यायचे आणि ते पूर्ण उघडून दोन्ही हातात धरून रस्त्याने वाचत घरापर्यंत यायचे. पेपरच्या पलीकडे रस्त्यावरचे काहीही दिसायचे नाही आणि त्यांना चिंताही नसायची, तेंव्हा रहदारी नसायची आणि लोकांनाही अण्णांची सवय माहिती झाली होती. जसे जसे पुढे गर्दी वाढली, सोसायट्या आल्या तसा तसा अण्णांच्या पेहेरावात आणि सवयीत फरक पडला. पांढरा लेंगा, शर्ट, दुधाची किटली असं होत होत मध्यंतरी शर्ट, पँट घातलेले अण्णा कापडी पिशवीतून प्लास्टिकची दुधाची पिशवी घेऊन, घडी केलेला पेपर न वाचता नेतांना दिसले.

तर मंडळी पुढच्या भागात भेटूया अजून काही शेजाऱ्यांना आणि आठवणीतल्या वाडयाला.

(क्रमशः)



 मधुसूदन मुळीक


शुक्रवार, १८ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ५)


 मंडळी असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हल्लीच हे जाणवलं. ओम, आमचा मुलगा काहीतरी खेळणे बनवत होता, म्हणजे त्याचे त्याचे उद्योग चालू होते. आम्ही दोघेही त्याला ओरडलो आणि अभ्यासाला बसविले. थोडा विचार केल्यावर वाटलं, इतिहासाची पुनरावृत्तीच तर होती ती… पण आता त्याकडे बघणारे बदलले आहेत. बदललेल्या शैक्षणिक पद्धती, जीवनशैली सगळ्याच क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धा ह्यामुळे मुलांना शिक्षण आणि पालकांनी स्वतःच्या इच्छापूर्ती साठी लावलेल्या विविध शिकवण्या ह्यातून स्वतःचे उद्योग करायला वेळच मिळत नाही. ह्या प्रसंगाने आमचे सारे "उद्योग" आठवले, तर ह्या भागात आमच्या "उद्योगांबद्दल" म्हणजे खऱ्या आणि उपरोधात्मक दोन्ही अर्थाने.

खरे तर आम्ही विदर्भातले, शेगाव जवळच्या खामगावचे. आमचे वडिल त्यांच्या तरुणपणी, म्हणजे विशीच्या आतच डोंबिवलीत आले, एकटेच, इथे कोणीही नातेवाईक, मित्र नसतांना. त्यांनी सुरुवातीला अगदी दुकानांतही काम केले. नंतर मध्य रेल्वे, नॅशनल रेओन असं करत बी.ए.एस.एफ. ह्या जर्मन कंपनीत नोकरी करत होते. नुसती नोकरी करूनही ते व्यवस्थित राहू शकले असते, पण उद्यमशील स्वभाव. त्यामुळे त्यांनी शिफ्टची नोकरी सांभाळून प्लंबिंगचा व्यवसाय केला. ते डोंबिवलीतील सुरवातीच्या मोजक्या लायसनस्ड प्लंबर्स पैकी एक. आमचं बाजीप्रभू चौकात अगदी मोक्याचं दुकान होतं, ते बरेच वर्षांनी मालकांना परत द्यावे लागले. आमची आईही फार उद्योगी. फावल्या वेळात शांत बसणं, दुपारचं झोपणं असं कधीच नाही. आम्ही लहान असतानाही सगळं आवरले की आई पाण्याची मीटर्स दुरुस्त करायची. पाण्याची मीटर दुरुस्त करणारी आमची आई ही बहुदा एकमेव महिला असावी. आमचाही हातभार लागायचा ह्या मीटर दुरुस्तीला. मीटर पूर्ण नीट झालं की त्याचे सगळे काटे / नंबर शून्यावर आणावे लागायचे. आम्ही ती छोटी छोटी चक्र फिरवून ते शून्यावर आणायचो. दुरुस्त केलेली मीटर्स गिऱ्हाईकाला देण्यापूर्वी कुर्ल्याहून प्रमाणित करून आणावी लागायची. वडिलांना वेळ नसला की अण्णा (मोठा भाऊ) हे काम करायचा. वडिलांनी ह्या व्यवसायाबरोबर जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय केला आणि जागेत गुंतवणूकही केली. डी एन सी शाळे जवळच्या आमच्या जागेवर १९७५ साली त्यांनी एक बिल्डिंगही बांधून घेतली. डोंबिवलीचा हा भाग तेंव्हा लांब वाटायचा त्यामुळे आम्ही तिकडे न राहता ह्या "मुळीक बिल्डींग" मध्ये सहा भाडेकरू ठेवले. म्हणजे बघा, आम्ही मालक, राहात होतो भाड्याच्या घरात. नंतर नंतर प्लंबिंग कमी करून वडिलांनी शेअर मार्केट मध्ये चांगली गुंतवणूक केली. शेअर्स बद्दल सल्ला घ्यायला वडिलांचे बरेच मित्र घरी यायचे. आमची आई अजूनही शेअर्स मध्ये उलाढाल करते बरं का!

आमच्या आईने फक्त मीटर नाही दुरुस्त केली, ती क्लासला जाऊन शिवण शिकली, आणि अजून पर्यंत शिवणाची कामं करते. पूर्वी खूप शिवायची, कॉटन साड्यांच्या गोधड्या ही तिची खासियत. आता सांगून सांगून शिवणकाम कमी केलंय, अगदी ओळखीच्यांचेच शिवते. वाड्यातला माहोलच वेगळा असायचा. कोणीतरी काहीतरी शिकून /बघून यायचं आणि झालं, सगळ्या महिला दुपारी त्याच्या मागे. असे करत करत छंदाचे रुपांतर व्यवसायात व्हायचे. आमच्या आईने मण्याचे प्राणी, पक्षी, फळं, वेल्वेटची फुलं, फूलवाती, नायलॉनच्या दोऱ्याच्या पिशव्या, बटवे, लोकरीची तोरणं, क्रोशाचे टेबल क्लोथ, प्लास्टिक वायरच्या रिंगचे पडदे अशा कित्येक वस्तू करून विकल्या आहेत. घराच्या मागेच गणपती मंदिर, आजी तिथे कीर्तनाला जायची, आईने शिवलेली तिची चंची बघून आजीच्या मैत्रिणी चंची शिवायला यायच्या. शेजारच्या मैत्रिणी सोबत आईने लसूण चटणी आणि अनारशाचे पीठही करून विकले आहे. आमच्या घरच्या उद्योगांना दूधवाल्याचाही हातभार लागला. आमचा भय्या अगदी ताजं, शुद्ध दूध घालायचा, त्यामुळे घरात भरपूर साय, सायीचं दही आणि दह्याच लोणी व्हायचं (हे इतक्या सखोल सांगण्याचं कारण नव्या पिढीला लोणी आणि तूप घरी बनवता येतं हे बहुदा माहित नसावं) लोणी आणि तूप घरात खाऊन उरायचं, मग करायचं काय? आम्ही लोणीही विकायचो, अगदी शुद्ध आणि बाजारभावापेक्षा बरेच स्वस्त. अगदी ठरलेली गिऱ्हाईकं होती. बहुतेक भय्याला कळलं असावं, दीड दोन वर्षांनी त्याच्या दूधाची प्रत बिघडली. ती जुनी गिऱ्हाईकं भेटली की विचारतात, अजूनही लोणी देता का? हल्ली कुठे तसे दूध, आता मिळते ते भेसळयुक्त, दोन दिवसांपूर्वी पाकीटबंद केलेले दूध. आईच्या सगळ्या उद्योगात आमचाही खारीचा वाटा असायचा. वेल्वेटला फेविकोल लावून दे, पाकळ्या कांप, तारा चिकटव, वायरच्या रींग बनव अशी कामं आम्ही करायचो. ह्यात, तू मुलगा आहेस, हे करू नको असं कधी झालं नाही, ह्यामुळे आम्ही बरेच शिकलो.

आमच्या भावंडांचे उद्योग म्हणाल तर आम्ही तसे फार व्रात्य नव्हतो त्यामुळे फार काही नाहीत. डोंबिवलीत दातारांची श्री लाँड्री प्रसिद्ध आहे, त्यांच्या काही शाखा आहेत. एका होळीला अण्णाने वाड्यातल्या मित्रांबरोबर जाऊन त्यांच्या भय्याची लाकडी खाट उचलून आणून होळीत टाकली. झालं... भय्याला कळल्यावर तो आरडा ओरडा करत वाड्यात, पण तोवर ती जळून खाक झाली होती. थोड्याफार भांडणानंतर सगळं शांत झालं. असं आत्ता झालं असतं तर? सगळ्या वाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज बनवून, चर्चेच गुऱ्हाळं मांडून, मोठ्ठं राजकारण माजवलं असतं. आमचा अण्णा धाडसी, वडिलांची राजदूत मोटारसायकल तो सातवीत आठवीत असतांना चालवायचा आणि रस्त्याने लोक बघत राहायचे. त्याचा अजून एक उद्योग म्हणजे मासे पाळणे. आमच्या छोट्याश्या घरात एवढ्या माणसांसोबत फिशपाँडही होता. मासे पाळायचे, पाँड विहिरीवर जाऊन धुवायचा, माश्यांनी पिल्लं घातली की वेगळी काढायची, त्याला ह्या सगळ्याची खूप आवड होती.

त्याचे अजून एक आवडते काम म्हणजे विहिरीत मुटका मारायचे. तो मुटका मारायला गेला की सगळे जमा व्हायचे, मुटका म्हणजे मांडी घालून उडी मारून पाण्यात पाठीवर पडायचे. मुटका बरोबर बसला की खूप पाणी उडायचे. अण्णा शाखेतही जायचा, रामजन्मभूमी साठी तो अयोद्धेलाही गेला होता. त्यांना मधेच एका शासकीय विश्राम गृहात स्थानबद्ध करून ठेवले होते. नंतर काही दिवसांनी जबरदस्तीने गाडीत चढवून परत पाठविले होते. त्यावेळी आम्ही सगळेच तणावाखाली होतो.

आमची मोठी ताई उद्योगी नव्हती, ती खऱ्या अर्थाने ताई होती. तिने कॉलेज मध्ये असतांना जनगणनेचा उद्योग केला आणि मग ठिक-ठिकाणच्या पाण्यामुळे बरीच आजारी पडली होती. आमची छोटी ताई म्हणजे माझ्याहून मोठी पण मोठ्या ताईहून छोटी बहिण, ही फार उद्योगी. ती वाड्यातली एकमेव मुलगी असेल जी मालकांच्या बंगल्याच्या रहाटावरून (साधारण दुसऱ्या मजल्यावरून) विहिरीत उडी मारायची. तिला चित्रकला, शिवण, पाककला ह्याची खूप आवड आहे. कॉलेज मध्ये असतानाच ती पंजाबी, बंगाली, चायनीज असे पदार्थ शिकली आणि घरी त्याचे क्लास सुरु केले. लग्नाची मेहेंदी, मेकप करायला जायची. अण्णाला फोटोग्राफीची आवड होती म्हणून एक एस एल आर कॅमेरा घेतला होता, ताई त्याने लग्नाचे फोटो काढायला जायची. पाककलेची हौस त्यामुळे काही जणांना खाद्यपदार्थही पुरविले होते.

माझे "उद्योग" म्हणाल तर, दोन प्रसंग अजूनही जसेच्या तसे डोळ्यापुढे येतात.

आमच्या वाड्यासमोर रस्त्याच्या पलीकडे माटेवाडा होता, त्याच्या शौचालयांची मागची बाजू रस्त्याच्या बाजूला यायची. एकदा आम्ही मुलांनी बेचकी तयार केली आणि स्पर्धा लावली, माटेवाड्याच्या शौचालयाच्या खिडकीतून दगड आत मारायचा. मी एक-दोन दगड बरोबर नेम धरून आत मारले आणि झालं. लाल्या (जे आमच्याहून बरेच मोठे होते, पण सगळे त्यांना लाल्या म्हणायचे) आरडा ओरडा करत आमच्या मागे धावत. काय झालं हे कळलं आणि पुढे काय होणार हे ही! जे रस्त्यावर धावत सुटलो. आमच्याकडे तेव्हा आत्या आणि आत्तेभावंडं आली होती, आत्तेभाऊ संजू माझ्या मागे आणि मी पुढे असे बराच वेळ रस्त्यावर धावत होतो. शेवटी त्याने मला पकडून घरी आणलं आणि मग मस्त...............

दुसरा उद्योग, अगदी सगळ्यांच्याच लक्षात राहिलेला. मी आठवी नववीत असेन, मे महिना होता. झाडाला खूप कैऱ्या लागल्या होत्या. बरोबर झाडाखाली, विहीरीवरच्या मोरीचा सिमेंटचा पत्रा होता, बिल्डींगच्या जिन्यावरून ह्या पत्र्यावर चढता यायचे. आम्ही सगळी मुलं पत्र्याच्या आवाजाकडे कान लावून असायचो. धप्प..............आवाज झाला आणि मी सुसाट जिन्यावर, तिथून पत्र्यावर आणि...............धाड धाड धाड........ पुढचं मला बघ्यांकडून नंतर समजले. मी पत्रा तोडून, पत्र्यावरचा कचरा आणि पालापाचोळा पांघरून पडलो होतो मोरीवरच्या कपडे धुवायच्या मोठ्ठ्या दगडाच्या अगदी बाजूला, थोडक्यात बचावलो होतो. सगळा वाडा मधु पडला ! मधु पडला ! म्हणून गोळा झाला, मला आत उचलून नेले. काही वेळाने मी भानावर आलो.

अशीच एक आठवण म्हणजे बाजूच्या वाड्यात सगळ्या मुलांची, आशा मावशी रहायची, तिने आम्हा मुलांना चित्रकला शिकवली, ती स्वतः कला महाविद्यालयाची चित्रकार आहे आणि तेंव्हा ती शिक्षिका होती. आम्ही मुलं केवळ तिच्या मुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजीयेट परीक्षा पास झालो. तिने शिवलीलामृताच्या पारायणाचे व्रत केले होते. मी असेन सातवीत वगैरे, न चुकता सगळ्यांबरोबर त्याचे पारायण केले, मला फार काही कळत नव्हते, पण चिल्या बाळाची गोष्ट ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावायचे.

मी सातवीत असतांना आमच्या स.वा.जोशी विद्यालयाची सहल राजस्थानला गेली होती. जयपूरला आम्ही युथ होस्टेलमध्ये उतरलो होतो. त्या वयात परदेशी गोऱ्यांचे फार आकर्षण होते. आम्ही उतरलेल्या हॉटेल मध्ये आम्हाला एक गोरा भेटला, तो आमच्याशी बोलू

पाहत होता. वासरात लंगडी गाय........सगळे इंग्रजीत बोलायला लाजत होते, कोणीच पुढे होत नव्हते. मग मी जाऊन त्याच्याशी बोललो. त्याचे नाव, पत्ता लिहून घेतला, बरोबर फोटो काढले. मग काय वट....कॉलरताठ. घरी पोहोचल्यावर खास परदेशी पाठवायचे पत्र (ग्रीनलंड) आणून त्याला पत्र पाठविले. काही दिवसांनी परदेशी टपाल तिकिटे असलेले पाकीट आले, वर नाव होते "दानिएल एबरहार्द". बापरे.......केवढा आनंद! नुसता जल्लोष! मागच्या वाड्यातल्या, सहलीला बरोबर आलेल्यांना जोर जोरात हाका, अतुल......., अनघा........ दनिएलच पत्र आलं ! ही पत्रमैत्रि एक-दोन वर्ष चालली. हा इसम शिक्षक होता आणि जगभर फिरस्ती करायचा. हल्ली…आठवण आल्यावर फेसबुकला शोधलं पण शोध काही लागला नाही.

आमच्या छोट्या ताईने आणि मी केलेला अजून एक उद्योग म्हणजे मॉडेलिंग, आम्ही दोघांनीही काही जाहिराती केल्या. ताई होती क्यॅनरा की महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीत आणि मी औषधाच्या दोन तीन जाहिराती केल्या. आमच्या मालकांचा मुलगा श्री अनिल गांधी हे ह्या व्यवसायात आहेत, त्यांनीच आम्हाला ब्रेक दिला. मला आठवतंय... जाहिरातीच्या पैशातून मला पहिली फुल प्यैंट आणि फुल शर्ट घेतले होते.

छोट्या ताईने आणि मी बटिक, बांधणीची कापडं तयार केली होती. बहिणीने त्याचे ड्रेस शिवले, तिच्या शिवणकामाचा फायदा तिला तिच्या ड्रेपरीच्या व्यवसायात होतोय. तिने तिचे उद्योग खऱ्या अर्थाने चालू ठेवले आहेत, डोंबिवलीत तिचे नावारूपाला आलेले दुकान आहे.

तर असे हे आमचे उद्योगाचे बाळकडू आणि "उद्योग", ह्यामुळे कामाशिवाय नुसते बसणे, दुपारची वामकुक्षी, चित्रपटगृहात जाऊन तीन तीन तास पडद्यासमोर घालवणे हे कधी जमलेच नाही. आई वडिलांचे कष्ट बघून एक जाणीव झाली की त्यांनी शून्यातून सुरु करून काही वर्षात एवढं मिळवलं तर आपणही जे मिळाले ते शून्य समजुन पुढचा टप्पा गाठायला हवा.

 मधुसूदन मुळीक



रविवार, १३ मे, २०१२

आई

दिवसाची सुरवात होई तिच्या आवाजाने 
मधुर स्वरांच्या भिजलेल्या प्रेमाने 
कधी लटका राग, कधी विनवणी
धडपड मुलांच्या कल्याणाची 

जवळ असता न  कळे किंमत 
एका आवाजासाठी किती धडपड?
आशीर्वाद सदा पाठीशी 
आठवणींचे   झुले  झुलती 
मग हुरहूर कशाची?

नात्याची किंमत  शिकवलीस सदा 
फुलताना हळुवार फुंकर घातलीस सदा
आठवांचा झरा वाही सदोदित 
वाहणाऱ्या मनाला आवरलेस नेहमी 

दिले जे तू भरभरून 
घेण्याचा प्रयत्न केला 
ओंजळीतून कधी कधी  निसटून गेला 
न खंत न दुखं 
मिळालेल्या क्षणांना  उपभोगण्याची आस.


भावना कुलकर्णी



मातृवंदना



निळ्या अंबराचे जसे निळ्या सागरी बिंब
आकांक्षांचे तुझ्या, माझ्या मनी प्रतिबिंब
वात्सल्यरसात तुझ्या जाहले मी चिंब
तूच केलास माझ्या मूळाक्षरांचा प्रारंभ

ज्ञानचक्षुंनी तुझ्या पाहिले मी जगाकडे
दूर केलेस मार्गातील संकटांचे काटे कुटे
आजारी मी पडता होई तुझी कासाविसी
मनाच्या वेदनांना देशी तव मायेची कुशी

प्रगतीपथावर मम पाऊल पडावे पुढे
सुसंस्कारांचे दिले सदैव मजला धडे
यशासाठी माझ्या घालिशी तू साकडे
जीवनी मम शिंपाया साफल्याचे सडे

आली शंका वा पडता काही कोडे
तुजपाशी येता रहस्य सारे उलगडे
मन आहे माझे अजुनी भाबडे वेडे
 तव चरणांपाशी त्रिभुवनही वाटे थिटे

आई तुझ्या उपकारांचे कधी न ओझे फिटे 
वाहीन मी बहु आनंदे त्या जन्मजन्मान्तरीते !!!

Mother’s Day अर्थात मातृदिनानिमित्त सर्व माऊलींना त्रिवार वंदन !

-अर्चना देशमुख

शनिवार, १२ मे, २०१२

काटकोन त्रिकोणाची महत्वपूर्ण भुजा - केतकी थत्ते


नाटकामध्ये वादग्रस्त भूमिका साकारणारी, वादातीत मस्त केतकी ! एका बाजूला डॉ. मोहन आगाशेंसारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मी तर दुसरीकडे अनुभवी, हरहुन्नरी संदेश कुलकर्णी यांच्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवू पहाणारी सर्वात छोटी कलाकार म्हणजे केतकी. तिच्या सौन्दर्याची मोहिनी फक्त मराठी जनमनावर पडली असे नाही तर कुवेतमधल्या दिग्गज कलाकारांवरही (Sr. Painter & Sculptor, आधुनिक विचारसरणीचे व पाश्चिमात्य वेशभूषा परिधान केलेले) हिची अशी काही छाप पडली की त्यांनी पूर्वपरवानगी घेवून हिच्यासह साऱ्या ग्रुपचे फोटो काढले, आपल्याबद्दलची माहिती दिली. झाले असे की Hotel Le Royal च्या बाहेर का.त्रि.च्या ग्रुपबरोबर पार्क केलेल्या गाडीची प्रतिक्षा करत आम्ही उभे होतो. तेथेच कॅफेच्याबाहेर हे उपरीनिर्दिष्ट कलाकार विचार विमर्षात गर्क होते पण जसे त्यांनी केतकीला 
पाहिले, त्यांना वेधून घेतले केतकीच्या आकर्षक भारतीय पेहेरावाने ! ही नजर होती कौतुकभरली, एका विशुध्द कलाकाराला हवे हवेसे काही गवसलेली ! अगदी निर्मल ! त्यानंतर झालेल्या संभाषणात आधुनिक भारतीय पेहेराव व दागदागिन्यांमुळे ते कसे प्रभावित झाले याबद्दल ते भरभरून बोलू लागले आणि अर्थातच एक भारतीय म्हणून, मराठी कलाकाराचे कौतुक झालेले पाहून माझे मराठमोळे मन खूपच सुखावले, केतकीच्या या कौतुकाने मला झालेल्या आनंदात तुम्हा सर्वांनाही सहभागी करून घ्यावे म्हणून येथे लिहावेसे वाटले.

मोकळ्या स्वभावाची, Ice Cream व थंडगार दहीवडे खाल्ल्यावरही कोणतेही आढेवेढे न घेता सुश्राव्य गाणे म्हणणारी केतकी, प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद लुटणारी. रूप असूनही रुपगर्विता नसलेली, दिलखुलास बोलणारी, छोट्यांमध्ये छोटी होऊन जाणारी केतकी, सा रे ग म प मध्ये अंतिम पंचरत्नात निवड झालेली, मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत व Spanish या पंचभाषांवर प्रभुत्व असणारी सकलकलासंपन्न केतकी ! तिचे कौतुक न करण्याचा करंटेपणा कसा करावा ? तिचा वाढदिवस आज १२ मे ला आहे तेव्हा तिचे वर्णन करणारी व तिला शुभेच्छा देणारी ही कविता.........



नावासारखा केतकी वर्ण 
लाभली रूपसंपदा देखणी 
अभिनयकौशल्याला लाभे
ओघवती अस्खलित वाणी 

बालनाट्यानी अंकुरले गेले बीज
तयाचा वेलू गेला रुपेरी पडद्यावरी
मराठी, हिंदी, संगीत रंगभूमीसह
प्रायोगिक नाटकातही असे मातब्बरी

भावगीत असो, असो भारुड
वा बैठकीची खडी लावणी
तालासुराचे अचूक ज्ञान
करतेस मैफिल दिवाणी 


A. R. रेहेमानच्या संगीताची
असे अपूर्व तुजवर मोहिनी 
त्यामुळेच तर तमिळ भाषेतही 
रंगवते रागिणी मधुर स्वरांनी 

कधी भरतनाट्यमच्या पदन्यासांनी
Jazz, सालसा, ballroom dance नी
प्रेक्षकांवरती साऱ्या टाकते भुरळ
कलागुणांच्या आकर्षक आविष्कारांनी

ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
या बोलांची येते प्रचिती तुझ्या दर्शनानी
कलागुणांच्या नित्यनूतन उन्मेषांनी
विराजमान व्हावेस रसिकांच्या मनी

हीच ईच्छा आज तुझ्या वाढदिवसादिनी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.......

-अर्चना देशमुख


शुक्रवार, ११ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ४)


वाड्यातल्या मागच्या भागातल्या आठवणी होत्या, नित्यनेमाने येणाऱ्या चतुष्पादांच्या आणि आता वाड्यातले "बाहेरचे".

मंडळी तुम्हाला असे नाही का वाटत की, हल्ली हे बाहेरचे, भूत, आत्मे यांचे ग्लैमर जरा कमी झालंय? अहो पूर्वी किती कथा ऐकायचो? हल्ली कोणी ह्या विषयावर बोलतही नाही. कित्येक जणांना चकवा, मुंजा असे शब्द देखील माहित नसतील.

आठवा आपल्या मे महिन्याच्या, दिवाळी, गणपतीच्या सुट्ट्या, आपली चुलत, आते, मामे भावंडं कुठल्या कुठल्या गावाहून यायची नाहीतर आपण जायचो त्यांच्या कडे, नुसतं भेटायला नाही हं! मस्त आठ पंधरा दिवस हक्काने रहायला. अंगणात, गच्चीत गादीवर पडल्या पडल्या गप्पा रंगायच्या, ह्या “बाहेरच्यांबद्दल” कधी कधी मामा,काका,काकू,आत्या हे ही ह्यांच्या कथा रंगवून रंगवून सांगायचे.

आमच्या वाड्यातही होते बरं का हे "बाहेरचे"! अर्थात हे सगळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून ऐकलेले.

एकदा म्हणे, तिन्ही सांजेला एक बाई वाड्यात आली, छान हिरवी साडी नेसून, नटून थटून. शेजारच्या काकू ओट्यावर काही निवडत बसलेल्या. ती बाई आली आणि काकूंना कुठलासा पत्ता विचारला. त्यांनी तिला सांगितले....अशी जा.. मग उजवीकडे वळ वगेरे. त्यांना काही तरी वेगळे जाणवले त्यांनी परत त्या बाई कडे पहिले तरती गायब!!

अशीच वाड्यातली दुसरी "बाहेरची" म्हणजे विहीरीवरची. आमचे एक शेजारी होते त्यांना दम्याचा त्रास होता. खोकल्याची जास्त उबळ आली की ते रात्री अपरात्री बिछान्यात उठून बसायचे. एके रात्री त्यांना खोकल्याची खूप उबळ आली अन ते उठून वाऱ्यावर खिडकी जवळ बसले. खिडकीतून बाहेर बघितले तरएक बाई विहिरीच्या रहाटा जवळ उभी राहून त्यांना बोलवत होती. असं म्हणतात त्यानंतर त्यांची तब्येत बरीच खालावली, त्यांना इस्पितळात भरती करावे लागले आणि काही दिवसांतच ते गेले.

असे विषय जेंव्हा निघायचे तेंव्हा वातावरण हळू हळू गूढ व्हायचे, प्रत्येकाकडे सांगायला अशा ऐकीव घटना असायच्या. वाड्यात ऐकलेल्या आणि अजूनही स्मरणात असलेल्या अजून दोन गोष्टी.

एकदा म्हणे दोन मित्र शेगावला जायला निघाले, जातांना सावधगिरीचा इशारा म्हणून त्यांच्या मित्राने तिथल्या भूताबद्दल सांगितले. ही जोडगोळी भर दुपारी शेगाव स्थानकात उतरली, टांग्यात बसली आणि मुक्कामी निघाली. दोघांच्याही मनांत ऐकलेल्या भूताबद्दल धाकधूक होतीच! थोडावेळ गेल्यावर, एकाने धीर करून टांगेवाल्याशी बोलायला सुरुवात केली."काय हो, इथे म्हणे एक टांगा चालविणारे भूत आहे, त्याचे हात पाय उलटे आहेत आणि ते खूप लांब लांब होतात.’’हे ऐकताच टांगेवाल्याने आपला लांब हात संपूर्ण फिरवून मागे टाकला आणि विचारले, "असा का?"….मंडळी आम्ही सुन्न व्हायचो अशा गोष्टी ऐकून.

दुसरी गोष्ट बरेचदा ऐकली, काही डोंबिवलीकरांनीही ती ऐकली असेल. तेंव्हा सांगायचे की, मुंबई कडून कर्जत कडे जाणाऱ्या शेवटच्या लोकलच्या, महिलांच्या डब्ब्यात एक श्वेतांबरा येऊन बसते. बायकांशी बोलण्याच्या ओघात आपले नांव पत्ता सांगते आणि गाडी मुंब्र्याच्या खाडीवर आली की खाडीत उडी घेते. एवढंच नाही तर म्हणे काही बायका तिने सांगितलेल्या पत्त्यावर सांगत गेल्या की, तुमच्या मुलीने गाडीतून उडी मारली, तर म्हणे घरचे सांगायचे, ती बऱ्याच वर्षापूर्वीच. मग ह्याच बायका तापाने फण फणायाच्या. ती श्वेतांबरा म्हणजे म्हणे, मंदा पाटणकर तिने खाडीत उडी मारून आपला प्रवास कायमचा संपवला होता. मोठ्ठं झाल्यावर जेंव्हा कधी शेवटच्या कर्जत लोकलला चढायला मिळून उभा रहायला दरवाज्याची जागा मिळाली तेंव्हा आवर्जून पाहिलं, पण कोणीच उडी मारली नाही. कदाचित मंदा पाटणकरला मुक्ती मिळाली असावी, नाहीतर लोकलच्या गर्दीला ती कंटाळली असावी.

विशेषतः कोकणातून येणाऱ्या पाहुण्यांकडे असे बरेच किस्से असायचे. रात्रीच्यावेळी असे किस्से ऐकले आणि काळोखात, मिणमिणती मेणबत्ती घेऊन शौचालयात जायची वेळ आली की झालं! त्यातून ती मेणबत्ती आतजाईपर्यंत चारदा विझायची, मग आईला नाहीतर ताईला ताकीद द्यायची तुम्ही बाहेर उभे रहा. हे सगळे आठवले की आता हसू येते.

कधी कधी फजितीही झाली बरंका! आमच्या बाहेरच्या खोलीला एक खिडकी आहे, अगदी जुन्या प्रकारची, म्हणजे मोठी खिडकी, मध्ये एक उभा गज आणि आडवे चार पाच गज. कोणाचाही संपूर्ण हात ह्या गजामधून आत येईल असे. एके रात्री घरातले सगळे गाढ झोपले होते. मला झोप लागत नव्हती, पडल्या पडल्या चुळबूळ चालू होती. तेवढ्यात माझं लक्ष खिडकीकडे गेलं, खिडकीत कोणीतरी माणूस उभा होता. पटकन चादर डोक्यावर घेतली, परत थोडा कोपरा बाजूला करून बघितले तर तो माणूस तिथेच उभा. बरेचदा बघितलं तरी तो तिथेच, आता तर त्याने हात खिडकीतून आत घातला, थोड्यावेळाने हात हलवू लागला. मला खूप भीती वाटत होती, ओरडायला आवाजही फुटत नव्हता, काय करू सुचत नव्हते, घामाघूम झलो........पण आडनिडं वय होतं, स्वतःलाच आपण घाबरतोय ह्याची आणि त्यातून आई, अण्णांना सांगायची लाज वाटत होती. तो माणूस काही चोरत नाही ना ! तसाच चादर थोडी बाजूला करून बघत राहिलो. काही वेळाने उजाडू लागलं आणि मोठ्ठा निःश्वास टाकला. अहो, खिडकीच्या बाजूच्या बारवर हैंगरला एक पांढरा शर्ट टांगला होता! एक डुलकी काढली आणि कोणालाही काहीही न सांगता सकाळी उठून शाळेत गेलो. त्या रात्रीनंतर सगळे हैंगर आत, खिडकी पासून लांब सरकवून झोपायची संवय मात्र लागली.

अशा "बाहेरच्यांच्या" गोष्टी ऐकून आम्हीही निगरगट्ट झालो, इतके की पुढे दहावीत वगेरे असतांना ह्या "बाहेरच्यांना" आम्ही पछाडलं, खरंच! कसं माहित आहे? "प्लान्चेट"...................

आम्ही भावंड, त्यांचे मित्र, त्यांची भावंडं असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, खूप सहली काढल्या. कधी कधी कोणाच्यातरी डोक्यात यायचं चला प्लान्चेट करूया! मग सगळेजण रात्री एखाद्याच्या घरी जमायचो. मोठ्ठा चित्र काढायचा कागद घेऊन त्यावर ए ते झेड अक्षरं, बाजूला शून्य ते नऊ आकडे लिहायचे, बरोबर मधोमध "बाहेरच्या" पाहुण्यांसाठी आणि आजू बाजूला "हो"-"नाही" चे गोल काढायचे. उदबत्ती आणि काचेचा ग्लास हे सामान. भूताच्या गोष्टी ऐकून ऐकून पक्कं माहित झालेलं की देवगण वाल्यांना भूत काही करत नाही. त्यामुळे प्लान्चेट सफल संपूर्ण करण्यासाठी तीन देवगणवाले, त्यातला एक मी. प्लान्चेट सुरु करताना काचेच्या ग्लासमध्ये उदबत्तीचा धूर भरायचा, तो ग्लास कागदावर मधे उपडा टाकून तीन सारथ्यांनी उजव्या हाताची दोन बोटं ग्लासवर अलगद ठेवायची. मग त्यातल्या एकाने अतिशय नम्रपणे ह्या "बाहेरच्याला" आवाहन करायचे की तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची ( खूपच गहन...)उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी "हो" वर जा. मंडळी... ग्लास अलगद फिरत "हो" वर जायचा! एकदा का हा परलोकवासी "हो" वर गेला की झाली त्याची परवड सुरु. मग मुख्य सारथी सगळ्यांतर्फे प्रश्न विचारायचा. प्रश्न काय माहित आहे? अमुक अमुक मोठेपणी कोण होणार? कुठला अभियन्ता होणार? नोकरी करणार की धंदा? कुठल्या गावाला?आमच्या मोठ्या बहिणी, मैत्रिणींची लग्न ठरवली प्लान्चेटने. आम्ही विचारायचो, त्यांच्या भावी नवऱ्याचे नाव काय? स्पेलिंग करून दाखवा, कुठल्या गावाचा असेल? काय शिकलेला असेल? वगैरे वगैरे. आम्ही ग्लासमध्ये कोणा कोणाला बोलाविले माहित आहे? ताजे ताजे गेलेले आत्मे लवकर यायचे, त्यामुळे राजीव गांधी, किशोर कुमार, संजीवकुमार,इंदिरा गांधी, संजय गांधी असे, पंडित नेहरू, गांधीजी हे यायचे पण जरा वेळ लावायचे. असं करून ह्यातली भीती पार निघून गेली होती, प्रश्न तरी किती आणि काय विचारणार मग आम्ही ह्या बाहेरच्यांची फिरकी घ्यायचो, त्यांची लफडी, अंडी पिल्ली बाहेर काढायचो, आमच्यातले काही जण गंभीर... बाकी नुसते हसून लोट पोट. असं करता करता ग्लास पडायचा मग सगळे गंभीर ("बाहेरचा" सुटला तर?) कित्येक जणांना बोलावलं पण कोणाच्या नातेवाईकांना मात्र नाही, आले आणि गेलेचं नाही तर काय घ्या?

असंच एका रात्रि, प्लान्चेटसाठी गिऱ्हाईक शोधता शोधतामित्र म्हणाला, "अरे आमचा खडूस, म्हातारा मालक हल्लीच गेलाय", सगळे खूष ! ताजा, ताजा.......झालं त्यांना बोलावलं, ते लगेचच आले, ते पेशाने वकील होते, भाडेकरूंना खूप त्रास द्यायचे आणि आत्ता आमच्या ग्लासमध्ये. मग हवे नको ते विचारून त्यांची उलट तपासणी घेतली. बराच वेळ असं ग्लासमध्ये कोंडून फिर फिर फिरवलं, नंतर ग्लास चा वेग खूप वाढला आणि झाली की हो गडबड ....ग्लास थांबायलाच तयार नाही. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली.वकील साहेब खूपच भडकले होते आणि आम्ही सगळे चिडीचूप्प, हसणं एकदम बंद. सारथ्यांनी खूप विनवण्या केल्या, आम्ही चुकलो, माफ करा वगैरे वगैरे. थोड्यावेळाने स्वारी शांत झाली आणि सांगितल्या प्रमाणे "गेलो" हे कळण्यासाठी मधल्या गोलावर थांबली. ह्या प्रसंगानंतर आम्ही परत प्लान्चेट केलं नाही. प्लांन्चेट म्हणजे प्लान ऑफ चीटिंग.

तर असे हे, माझ्या आठवणीतले वाड्यातले "बाहेरचे" विश्व.

मधुसूदन मुळीक

सोमवार, ७ मे, २०१२

गुरुवार, ३ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ३)


आमचा वाडा हे एक मोठ्ठं कुटुंबच होतं. इतक्या सगळ्या माणसांच्या सहवासात लहान वयातच इतके अनुभव आले! आज, आमच्या वाड्यात नित्य नेमाने येणाऱ्या लोकांबद्दल. वाड्यात जवळ जवळ रोज येणारे असे काही प्राणी होते. प्राणी ह्या साठी की त्यात मनुष्य आणि चतुष्पाद असे दोन्ही होते.

एक पांढऱ्या रंगाची गाय, तिची वेळ ठरलेली ती बरोबर बारा वाजण्याच्या सुमारास वाड्यात यायची आणि तळमजल्यावरच्या प्रत्येक घरासमोर जाऊन उभी रहायची. सगळेच तिला किमान पोळी तरी द्यायचे. बघा ! म्हणजे रोज गोग्रास घातल्याचे पुण्य. असे बरेच वर्षे चालू होते, नंतर अचानक, तिचे न येणे आम्हा सगळ्यांनाच हूर हूर लावून गेले.

दुसरी अजूनही चांगली स्मरणात राहिलेली, मीठा पिठाचा जोगवा मागणारी जोगवीण !

मीठा पिठाचा जोगवा

द्या ग बायांनो लवकरी

मला बाई जायाच, गुरुवारी

तुळजापूरच्या दरबारी

तुळजापुरला जाईन

आईचं हळदी कुंकू घेईन

आई अंबेला चढवीन

लवकर माघारी येईन

हिरवी नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत लाल कुंकू, हळदीचा मळवट, हातात टोपली, खांद्यावर तेलासाठी टांगलेली बाटली आणि वाड्यात शिरताच लावलेला टिपेचा स्वर ! अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर येते. आम्ही वाड्यात राहायचो तोपर्यंत तिला बघितले. आता खूपच म्हातारी झाली असेल किंवा नसेलही कदाचित. तिला एकदातरी तुळजापूरला जाता आले असेल कि नाही कोण जाणे?

वाड्याच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे एक जुनाट, मोडकळीस आलेला वाडा होता, त्यात काही भाजीवाले, मोलकरणी, पेपरवाले राहायचे. त्यांच्यातल्याच एका कुटुंबातला माणूस, अतिशय किरकोळ शरीरयष्टी, डोक्यावर खूप बारीक केस, अंगात बाह्यांचा बनियन आणि खाकी रंगाची अर्धी चड्डी, तेव्हा त्याच्या चाळीशीत असावा, सकाळ झाली की वाड्याच्या गेट समोर उभा राहायचा आणि सतत कुणाशीतरी जोरात आवाज न फुटता बोलायचा आणि नुसते हातवारे करायचा. हे असं सतत, म्हणजे झोप सोडून का..य.. म..... असे म्हणतात की तो तमाशात ढोलकी खूपच छान वाजवायचा आणि दुसऱ्या फडातल्या माणसांनी दुश्मनीमुळे खाण्यातून काही दिले आणि त्याची वाचा कायमची गेली.

अशीच एक, पाठीत पार वाकलेली गुजराती म्हातारी यायची. तिचा वेश शबरी सारखा असायचा. पांढरी साडी, कपाळाला आणि कानाच्या पाळ्यांना पांढरा गंध आणि खांद्याला गाठोडे. ती वाड्याच्या मध्ये उभी रहायची आणि अगदी पोट तिडकीने विनवणी करायची,

दे माये, गरीब म्हातारीला भाकर तुकडा दे माये

तुझ्या लेकरा बाळाला खूप आयुष्य लाभेल माये

आम्हाला तिची खूप दया यायची.

वाड्यात असाच रोज येणारा मातीवाला पांडू ! साधारण ४०-४५ वय, बरेचसे दात पडलेला, बारीक पण पिळदार शरीराचा पांडू. तो डोंबिवली बाहेरच्या टेकडीवरून लाल माती आणून विकायचा. डोक्यावर मातीने भरलेली गोणी, एका खांद्यावर अडकवलेले फावडे, बनियन आणि अर्धी खाकी चड्डी असा त्याचा अवतार. हाताच्या बोटांना आणि तळपायाला पडलेल्या भेगा, पायाच्या टर्र फुगलेल्या नसा, तो खूप मेहनत करायचा. तो आला की त्याला आम्ही पाणी आणि काही खायला द्यायचो. कधी कधी मात्र तो मोसंबी / नारिंगी घेतल्यासारखा वाटायचा. बरेच वर्षापूर्वी तो गेल्याचे कानावर आले. स्वतः जगवण्याची आणि मुलांना शिकवण्याची धडपड शांत झाली.

वडारी समाजातल्या काही बायका पाट्याला टाकी लावायला यायच्या, त्यांची मुलं बरोबर फिरता फिरता आजूबाजूच्या वाड्यात भिक मागायची. ती मुलं आली की मोठी मुलं, वाड्यातल्या कुत्रीला त्यांच्यावर छु ...करायची.

एक बोहारीण, ती जुन्या कपड्यांवर भांडी द्यायची. खरे पाहता तिला द्यायला कुणाकडे रोज जुने कपडे निघणार? , तरीही ती नित्यनेमाने यायची. पाणी मागून प्यायची. कधी कोणी कपडे द्यायला काढले की सगळ्या महिला एकीने सौदा करायच्या. लहान डबा नको, एक साईज मोठा डबा दे! म्हणून अडून बसायच्या. आठवले की वाटते, आता बहुदा असे व्यवसाय बंदच झाले असतील.

आमचे सख्खे शेजारी हर्डीकर, त्यांची एक मुलगी मुंबईत रहायची आणि नोकरीही तिथेच करायची. रोजचा डबा मात्र जायचा घरून. त्यांचा डबेवाला यायचा बरोब्बर सकाळी नऊ वाजता. कितीही ऊन, पाऊस काहीही असले तरीही डबेवाल्याची वेळ कधी चुकायची नाही. कधी डबा नसेलच तर आम्हा मुलांना सांगितलेलं असायचं, मग आम्ही वाड्याच्या गेटमध्येच डबेवाल्याची वाट बघायचो, तो आला की लगेच सांगायचे "आज डबा नाही". कोणाच्याही वेळेची खोटी होऊ नये, हे तेव्हाच समजलेलं. हा डबेवाला नुसते जेवण नाही न्यायचा, माय लेकी डब्यातून एकमेकींना चिठ्या कधी कधी एखादी लहान वस्तूही पाठवायच्या.

अशी ही माणस, त्यांचे कष्ट, जगण्यासाठी रोजची चाललेली सच्ची धडपड आम्ही बघत आलो, लहानपणापासून. त्यामुळे लोकांबद्दल काही वाटणे, त्यांची दया येणे, त्यांना मदत करणे अशा भावना तयार झाल्या. हल्लीच्या मुलांना अशी सच्ची माणसं, अशी परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला दिसतच नाही. आपण आणि आपले चौकोनी कुटुंब. सगळे स्वतःचे आणि जे काही करायचे ते स्वतःसाठीच. कधी कधी वाटते , हल्लीच्या ह्या व्यावहारिक जगात, भावना आधीच बोथट झालेली ही मुलं भावनाच नाही ना हरवून बसणार?

क्रमशः
 मधुसूदन मुळीक

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र माझा' काही (-) काही (+)

वेगवेगळे भूखंड केले मंत्र्यांनी फस्त

कॅग अहवालाने झाले आता सर्व त्रस्त

करावे वाटते आता कॅग च बरखास्त

तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !


IPL च्या मॅचेसमुळे चिअर्स चा वाढता गोंगाट

स्टेडीयममध्ये रात्रंदिवस विजेचा लखलखाट

ग्रामीण भागात सक्तीच्या लोडशेडींगमुळे

जनतेच्या लल्लाटी मात्र सदैव अंधारवाट


वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेशाचे

निकष बदलत रहातात वेळोवेळी

अतिरिक्त ताण नि अभ्यासाची

शिक्षा मात्र विद्यार्थ्यांच्या भाळी


कसाब भोवती जेलमध्ये जरी भारी गस्त

बिर्याणीची , मटणाची ताटे होती फस्त

इकडे अवर्षणग्रस्त उपासमारीने त्रस्त

तरीही महाराष्ट्र आहे माझा मस्त !


सरतेशेवटी नाही घेतली

पुणेकर होण्याची मुभा

थोडी तरी राखली प्रतिभांनी

राष्ट्रपती पदाची आभा


अमेरिकेत झळकते आमचे IT चे ज्ञान

वैद्यक क्षेत्र असो की क्रिकेटचे मैदान

मराठी माणसाची रोजच वाढते आहे शान

असा आहे माझा महाराष्ट्र महान


शाळा, बालगंधर्व तसेच ताऱ्यांचे बेट

देऊळला लाभली रा.पुरस्काराची भेट

सृजनशील कलावंतांचे सुफळ होती कष्ट

असे आहे माझे महान राष्ट्र उत्कृष्ट


चित्रपट तारे तारकांनाही पडते ज्याची भुरळ

उज्वल भविष्यासाठी ज्याला सारे करती जवळ

बुद्धिवंतांना लाभे जेथे शारदेचा वरदहस्त

असा आहे लोकहो, महाराष्ट्र माझा मस्त


कितीही सर्वांनी केली दरखास्त.............. (अर्ज,फिर्याद)

मराठीचा, म.दिनाचा होऊ दे अस्त

कोणालाही नसली याची वास्तपुस्त

तरीही म्हणेन मी महाराष्ट्र माझा मस्त


महाराष्ट्र माझा खूप खूप मस्त !!!!!!!!!

जय महाराष्ट्र ! जय जय महाराष्ट्र


अर्चना देशमुख