कविलीया .... सौ अदिती जुवेकर
युगामागुनी चालली युगे ही
करावी भास्करा किती वंचना
किती काल कक्षेत राहू तुझ्या मी
किती ही करू प्रीतीची याचना
माणूस आणि जीवन यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या या उदात्त कवीच्या कविता वाचल्यावर मनात विचार येतो की कवितेला जन्म देण्यासाठी लागणारी संवेदनशीलता,
तरलता,
सृजनशीलता ही प्रत्येक व्यक्तीत थोड्याफार फरकाने असतेच मग प्रत्येकजण हा कवी का होऊ शकत नाही? का प्रत्येकजण आपल्या भावना कवितेतून व्यक्त करू शकत नाही? का येते जाणीव आणि अभिव्यक्तीत अंतर? का सामान्यांना पृथ्वी आणि सूर्य दोन ग्रह वाटतात आणि कवीला प्रेमीयुगुलं ?
हा फरक आहे जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा आणि संवेदना व्यक्त करण्याच्या माध्यमाचा. सामान्यांना श्रावण उपवासाचा, व्रतवैकल्यांचा,
सणासुधीचा मास वाटतो तर कवीला तो हसरा, लाजरा,
जरासा साजरा, तांबूस पाऊले टाकीत येणाऱ्या मोरासारखा वाटतो. सामान्यांना प्रेम भंग म्हणजे सर्वस्व हरवल्याची जाणीव, अगतिकता,
कुतरओढ आणि शेवटी भावनांना अश्रुद्वारे वाट…. पण हीच भावना व्यक्त करताना कवी म्हणतो …
मस्तक ठेवुनी गेलीस तेव्हा
अगतिक माझ्या पायांवरती
या पायांना अगम्य ईच्छा
ओठ व्हायची झाली होती ….
जीवनात सर्वकाही गमावल्याने हताश झालेला सामान्य जीव म्हणतो आता माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही … पण त्याच्यातला दुर्दम्य आशावाद त्याला समजावतो, अरे तू एकटाच नाहीस, तुझ्यासारखे अनेक या बोटीत आहेत …. हाच राग आळवतना एखाद्या नवकवीला मग वेगळाच सूर सापडतो …. तो म्हणतो
आजकाल मी मोजकीच गाणी गात असतो,
जी मला पाठ आहेत.
पण दुसर कोणीतरी माझं गाणं गायला लागतो,
त्या शून्य चेहऱ्यात दिसतो मला माझा वेगळा चेहरा ,
आणि कळत की मी एकटाच नाही,
इथे तर प्रत्येकाची गाण्याची वही हरवली आहे ….
मैत्रीचं वर्णन करताना मित्र म्हणतो, तू तर माझा सख्खा मित्र आहेस यार … नातं तेच, भावना तीच …. पण कवी म्हणतो…
मैत्री म्हणजे तू, तू म्हणजे माझा श्वास,
मैत्री म्हणजे मी, मी म्हणजे तुझा श्वास.
निरोप घेताना प्रेयसी प्रियकराला म्हणते … I
love you …. I will miss you …पण हीच व्याकुळता व्यक्त करताना कवी म्हणतो …
निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी ,
डोळ्यातील मोती मनाचे, अंगण जाते मग भरुनी …
आईच्या प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करताना सामान्य माणूस म्हणतो …माझी आई सावली सारखी माझ्या मागे असते. तर हेच कवी गाताना म्हणतो,
थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळ वृक्ष म्हणून उभा राहतो….
मी त्याला आई म्हणून हाक मारतो.
रांधा , वाढा, उष्टी काढा म्हणून थकलेली मुलगी स्वतःला विचारते कधी संपणार हे सारं? तिला समजावताना एखादी बहिणाबाई म्हणते …
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर …
तेंव्हा माणसातल्या कवीला घडवते ती त्याच्यातली तरल संवेदनशीलता,
नसल्यातही सगळ असल्याची आणि असल्यातही काहीही नसल्याची जाणीव ….
कवी म्हणजे इतरांआधी स्वतःशी संवाद साधणारा मानव आणि मानवी जीवनाच्या कंगोऱ्याची जाण असणारा , स्वतःचे गुण आणि दोष या दोघांवरही अतीव प्रेम करणारा, जीवनाबरोबर मृत्यूशीही नातं जोडणारा असा अवलियाच असतो ….
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा