क्षितिजावरती उषेचे दूत ललकारी देऊ लागतात आणि मी सज्ज होतो खूप सार्या मैत्रिणींच्या स्वागतासाठी. खूप सार्या मैत्रिणी म्हटल्यावर चमकला असाल ना ? (जोर का झटका का ?) पण खरं सांगतो, अजिबात अतिशयोक्ती नाही. पतंग जसा झेपावतो ज्योतीवर, सरीता जशी सागराच्या ओढीने खळाळत झेपावते तशा या देशोदेशीच्या , प्रांतोप्रांतीच्या विविध ललनांचा कंठमणी शोभावा असा मी..... अगदी अभिसारिकेच्या आतुरतेने ओढाळतात माझ्याकडे. त्यांना येताना ना कृत्रिम रंगरंगोटीची गरज असते, ना भारी भारी वस्त्रप्रावरणांची, ना डिझायनर ज्वेलरीची. मी ना त्यांचा आर्थिक स्तर पाहतो, ना शैक्षणिक, ना सामाजिक ! माझ्याशी मैत्री करायला ना भाषेचे बंधन, ना धर्माचे कुंपण, ना जातींच्या सीमा.
कोणतीही आणि कोणाचीही तमा न बाळगता येतात सार्याजणी अन् करतात गुजगोष्टी,
कोणीच ना राहते दु:खीकष्टी.
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग
हिमाचल प्रदेशी, बिहारी, राजस्थानी, अरेबिक, फिलिपिनो संग
सौंदर्याचं वरदान लाभलेल्या रुपसंपन्न ललना
तर काहींचा ’घेर’ नजरेत अगदी मावेना...... !
पण या सार्या सखी सोबतीणींचा मी जीवश्च, कंठश्च सवंगडी. माझ्याकडे चर्चिल्या जाणार्या विषयांची विविधता आणि व्याप्ती दोन्हीही अगाध आहेत. जगभरातल्या महत्वाच्या गोष्टींच्या चर्चेपासून रोजच्या धबडग्यातल्या रुटीन गोष्टींचे येथे चर्वितचर्वण होते. करियर पासून करप्शन पर्यंत, स्टॉक मार्केटपासून फिश, भाजी मार्केट पर्यंत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण..... काहीच वर्ज्य नसतं इथं. कधी नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दल मतमतांतरे होतात तर कधी जुन्या क्लासिक चित्रपटांच्या आठवणीत मन रमतं. कधी नव्या गाण्याच्या धूनी तर कधी जुनी नाट्यगीतं वा गजलांच्या सुरावटी. कधी पारंपारिक सणसमारंभांचं वर्णन तर कधी आधुनिक पार्ट्यांचं आयोजन. त्या अनुषंगानं आपोआपच जुन्या-नव्या रेसिपीजची देवाणघेवाण आणि ओळख विविध प्रांतातल्या रितीरिवाजांची. माझाही ऊर भरुन येतो जेव्हा माझ्या सख्यांची मुले विविध क्षेत्रात प्रगतीची नवी नवी शिखरं पादाक्रांत करतात तेव्हा. कधी कोणी क्वीज मधे जिंकतं तर कोणी चित्रकला स्पर्धेत. कधी International Level ची स्कॉलरशीप मिळवलेली असते तर कोणी कुवेतमधल्या स्थानिक स्पर्धांमधे बाजी मारलेली असते. कधी येथे मिळतात बालसंगोपनाचे धडे तर कधी कधी तेवढ्याच हिरीरीने अनुचित गोष्टींचे वाभाडेही काढले जातात. पतीराजांची मर्जी कशी राखावी हे ही कळतं आणि अनाहुतांची वाट लावून खफा मर्जीचाही प्रत्याय घेता येतो.
गप्पांमधे कधी कधी होतं औदासिन्यांचं प्रगटन
पण दिलासादायक शब्दांचं होतं त्यावर सिंचन
कधी होते खुसखुशीत विनोदाची पखरण
क्रिडा जगतातल्या विक्रमांनी फुलून येतं मन
म्हणूनच जेव्हा सचिनची शतकी खेळी होते तेव्हा क्रिडाप्रेमींसकट सार्यांचेच चेहेरे आनंदाने खुललेले असतात. स्त्रीशक्तीची विविध रुपं मला पहायला मिळतात. नवपरिणितांची जीवनाबद्दलची आसक्ती, पुरंध्रींची ईशभक्ती, सुखी संसारासाठी स्वेच्छेने, स्वखुशीने पत्करलेली सेवानिवृत्ती, संध्याछायेत वावरणार्यांची विरक्ती. सबल ललनांची सारीच रुपं मला मोहवतात. सगळ्यांची सुख-दु:खं, यश-अपयश, मान-अपमान, हर्ष-शोक, समरसतेनं वाटून घेतो मी आणि सर्वांची जीवनयात्रा सुफल संपूर्ण व्हावी म्हणून मनापासून म्हणत असतो ’शुभास्ते पंथान: सन्तु’
माझ्याकडे सांगण्यासारखं आहे खूप काही पण तुमच्या सहनशक्तीची परिसीमा किती ताणायची ! पण एक ऋणनिर्देश मात्र करावाच लागेल की पतीराज आणि मुलांची पाठवणी करुन लगबगीने मला भेटायला येणार्या या सार्या मैत्रिणींमुळेच मला विविधरंगांनी फुललेल्या सृष्टीच्या वैभवाचा परिचय होतो आणि मी ’अबु हलिफा’ चा ’वॉकिंग ट्रॅक’ स्वत:ला धन्य समजतो.
(क्लेमर- या लेखात उल्लेखलेल्या सर्व घटना अथवा गोष्टी खर्याच आहेत आणि संदर्भही सर्वानांच लागू होणारे आहेत.)
प्रेरणास्त्रोत - अबु हलिफा वॉकिंग ट्रॅकच्या माझं मौन आणि माझं भाष्य साहणार्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आणि इतर सर्व अनोळखी सख्या)
Good.Liked it!!
उत्तर द्याहटवाmast...
उत्तर द्याहटवावा वा मस्तंच...
उत्तर द्याहटवा