प्रेमदिन – अर्थातच Valentine Day!!
फेब्रुवारी महिना सुरु झाल्या झाल्या वेध लागतात व्हॅलेन्टाईन डे चे. पहिला आठवडा संपला की माझी फ़िल्डींग सुरु होते. टिव्ही, नेट, मासिकं……. जिथे कुठे ह्या प्रेमदिनाची जाहिरात दिसेल तिथे त्या जाहिरातीचं analysis करायला सुरवात करायची म्हणजे संभाषणाची गाडी बरोबर रुळावर येते (मला हव्या त्या दिशेला
) . मग हळूच …..
” अवी…माझ्या मैत्रिणीला ना (बरेचदा काल्पनिक) तिच्या नवर्याने व्हॅलेन्टाईन डे ला ना…..इतकं मस्त सरप्राईज दिलं”
“आम्ही मैत्रिणी आज व्हॅलेन्टाईन डे बद्दल बोलत होतो ना…..( असे लाडिक ‘ना’ लावले की नकार यायची शक्यता जराशी कमी होते म्हणून ह्या ‘ना’ चा वापर जास्त
) तेव्हा त्या सगळ्या म्हणाल्या, “तुझा नवरा तर नेहेमीच मस्त गिफ़्ट्स देतो” (खरं तर ह्या ‘देतो’ ह्या शब्दाऐवजी ‘तू लुबाडते’ असा शब्दच चपखल बसतो
)”
नवर्याचा अशावेळी अत्यंत सावध हुंकार येतो. म्हणजे आता ह्यावर्षी बाईसाहेबांच्या अपेक्षा ‘माफक’ ह्या शब्दाच्या किती पुढे गेल्या आहेत ह्याचा अंदाज घेत घेत आमच्या एकतर्फ़ी संभाषणाला continue करतो.
“अवी, ह्यावेळी काय करायचं हो?” माझा ३-४ दिवस आधीचा पवित्रा
“कशाबद्दल….?” कळूनही न कळल्याचा आव….दुसरं काय? पण मी ही त्यांचा ‘तो’ भाव न कळल्यासारखं अगदी साळसुदीने बोलते…..अहो करणार काय….एक अच्छे गिफ़्ट का सवाल है ना….. थोडा तो झेलनाही पडेगा
“अहो, व्हॅलेन्टाईन डे येतोय ना….”
“हं….!
“अवी……….” माझा ‘अवी’ नंतरचा pause ह्यांना नेहेमीच फार खर्चिक पडलाय त्यामुळे तो टॉपिक लवकरात लवकर बंद करावा म्हणून म्हणाले,
“अगं….. बघूया…….. अजून वेळ आहे ना !”
“WOWWWWW…. म्हणजे सेलिब्रेशन नक्की तर…!” माझ्या ह्या excitement ची पण ह्यांना चोवीस वर्षात इतकी सवय झालीये ना की ज्यादा हलचल नही होती
मग १-२ दिवस गेल्यावर…….
“So…….. Whats the plan Dear?”
“कशाबद्दल…?” ह्यांचा अनभिज्ञता दाखवायचा आटोकाट प्रयत्न अजूनही जोमात सुरुच. पण मी माघार घेणार्यातली थोडीच आहे. अगदी शांतपणे त्याचा तो प्रयत्न हाणून पाडत हा interesting topic पुन्हा पुन्हा संभाषणात आणायचा अथक प्रयत्न माझाही सुरुच…..!
“अवी, व्हॅलेन्टाईन डे हो…….फ़क्त दोनच दिवस राहिलेत. “
“अवी….तुमच्या ऑफ़िसमधे काय काय प्लॅन्स आहेत लोकांचे ?” व्हॅलेन्टाईन डे हा अगदी जागतिक आणि गहन प्रश्न असल्यासारखं मी विचारते.
“ऑफ़िसमधे आम्ही काऽऽऽऽम करतो”
“हो……. पण म्हणून काय बाकी बोलायचंच नसतं की काय….”
“बाकी बोलतो ना………. पण हा महत्वाचा विषय राहूनच गेला…..”
कळतात हो टोमणे….. पण इतका त्रास तर सहन करायलाच हवा ना………. Dont let it go Jayu….come on….!
“शी…….अगदीच बोअरिंग लोक आहेत तुमच्या ऑफ़िसमधले.” मी शिक्कामोर्तब करुन मोकळी.
नवरा सोईस्करपणे ह्या माझ्या रिमार्ककडे दुर्लक्ष करतो.
अशीच खिंड लढवत राहते. अगदी १४ फ़ेब्रुवारी उजाडेपर्यंत और इतनी मेहेनत करुंगी……. तो फल तो मिलेगाही ना………! आणि मग पुढचा व्हॅलेन्टाईन डे येईपर्यंत त्या सुखद आठवणी कुरवाळत बसायच्या. तशा ह्या सुखद आठवणी येतंच असतात मधून मधून…म्हणजे आणायच्याच असतात. जसं……… वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, नवीन वर्ष, मदर्स डे…….!
आज एक छोटीशी (?) कविता लिहिलीये………. त्यांना मेलने पाठवणार…….मग बघूया कसा साजरा होतो ह्यावर्षीचा माझा…….सॉरी आमचा व्हॅलेन्टाईन डे
दिवस उगवला हळुवार
अलार्म पण किणकिणला नाजुक
कूस वळवून बघते तर
नवरा उभा हसतमुख
हातातलं गुलाबाचं फुल त्याच्या
गालावरुन फिरलं पिसासारखं
“How romantic Jaanu…..”
मन नाचलं थुईथुई मोरासारखं.
लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं
हातात हात घेऊन
“Tea ….Your Highness” म्हणाला
चहाचा कप देऊन.
मूडात होती भलतीच स्वारी
म्हटलं घ्यावा थोडा भाव खाऊन
जे जे वाटतंय करवून घ्यावं
ते ते घ्यावं करवून.
“कैसे मिजाज़ है आपके जानम ?”
सवाल जेव्हा आला…….
म्हटलं, “जायचंय आज मला…..
‘गुजारिश’ बघायला.”
एरव्ही ह्याला पिक्चरची त्या
कायम असते ऍलर्जी
आज मात्र चक्क बोलला,
“जैसी आपकी मर्जी”
हॉलवरची झुंबड बघताच
जीव माझा चरकला
पण ब्लॅक मधे तिकिट मिळवून
मूड त्याने बनवला.
पिक्चरनंतर शाही जेवण
Dessert मात्र राहिलंच बाई…..!
“शॉपिंगला नेतो” म्हणताच त्यानं
कसं राहिल लक्षात काही…?
डिझायनर साडी शोकेसमधली
कधीपासून होती खुणावत
मॅचिंग ज्वेलरी त्याच्यासोबत
वाढवत होती नजाकत
मनातले भाव माझ्या सारे
दाखवत होता चेहेरा
मनासारखं शॉपिंग होऊन
खुलत होता चेहरा
डोळ्यामधे सवाल होता
“आता पुढे काय….?”
“Long Drive ला जाऊ या का….
क्या है आपकी राय ?”
अपुन तो साला खल्लाऽऽऽऽस…….!!
मंद सुरावट गाडीमधली
सारं बोलून गेली
नयनामधली भाषा नयनी
सारे समजून गेली
तृप्तीची त्या पेंग छानशी
आली का अवेळी………
डोळे झाले जड
लागली ब्रम्हानंदी टाळी
दचकून उठले गाली होता
स्पर्श रेशमी करांचा
नवरा हलके उठवत होता
गुच्छ घेऊनी सुमनांचा
स्वप्नामधूनी जागी झाले
वास्तव होते स्वप्न परी
प्रेमदिनाची पहाट होती
आता मात्र खरीखुरी.
जयश्री अंबासकर