गुरुवार, २२ मार्च, २०१२

आयुष्य

रमादानचे दिवस असल्याने सकाळी ऑफिसला लवकर जायची घाई नव्हती. त्यातच ओजसला शाळेतही सोडायचे नसल्याने सकाळी जरा आरामातच होतो. टीवीवर च्यॅनेल चाळत असताना एनिमल प्लानेटवर स्थिरावलो. 'व्हिएतनाम मधील भातशेती आणि जनजीवन' या विषयावर डॉक्युमेंटरी दाखवली जात होती. शाळेला जाण्यापूर्वी काळी म्हशीला चरायला घेऊन जाणारा व्हिएतनामी शेतकऱ्याचा आठ-दहा वर्षाचा मुलगा आणि एकंदरीत त्या मुलाचे म्हशीबरोबरचे नाते बघताना मला माझे बालपण आठवले.

ऑफिसला निघायची तयारी करता करता नजरे समोर एक एक चित्र उभे राहिले.

'बाळ्या' बैल, 'टिकल्या' बैल, 'पंडी गाय' आणि तिची आई 'जांभळी' गाय, 'पंडी' चा पाडा 'पंड्या' बैल... जणू काय काल परवाच सर्व घडत असल्या सारखे... वाड्यातला आणि कावनातला आजोबा आणि काकांचा वावर, 'पंड्या' पाड्याला जोतासाठी वजवताना आजोबा आणि भाऊ यांची झालेली घालमेल, आईचे दररोज सकाळी वाडा आणि कावनातील शेण साफ करणे, भाऊचे तनशीचे गवत काढून घालणे... अगदी कुटुंबातील घटकासारखी आम्हा सर्वांची त्या सर्व गायबैलांवरील माया... शाळेला जाण्यापूर्वी 'म्हार्वडात' आणि 'म्हसनवटातील' पडक्या वाप्यात 'पंडी' आणि तिच्या पाडसांना चरून आणणारा मी... पावसाळ्यात कुजलेल्या पायांना आंबाड्याच्या पानांचा लेप लाऊन धग घेत गेलेले बालपण...

तेव्हा गावातल्या क्षितीजापलीकडे आयुष्य नव्हते.. आणि कंदिलाच्या भवती पडेल तेवढाच उजेड असायचा... सगळी माणसे हाकेवर असायची...

आता दिशा रुंदावल्यात... माणसे पांगलीत... केवळ गावातून शहरातच नव्हेत तर परदेशातही.. गावात गाय बैल राहिले नाहीत...

घरात म्हातारी एकटी आई.. टीवी समोर बसून दिवस घालवणारी... आणि लेकरांच्या फोनची वाट पाहणारी...
सर्व आठवत असताना ऑफिसपर्यंत कधी पोहोचलो समजलेच नाही. मी चालवत असलेल्या पजेरोतील सीडी प्लेयरवर आता "मस्ती मे झुमेंगे हम.." गाणे सुरू होते...

'बाळ्या' बैलाच्या अखेरच्या दिवशीची त्याच्या डोळ्यातील असहायता आठवून माझ्या डोळ्यात अश्रू साचत होते...!

दिलीप सावंत




माझ्या कुंचल्यातून


नीलिमा दिवेकर   

पालक मेथी परोठे / पुऱ्या

 साहित्य:
१ जुडी पालक, १/२ जुडी मेथी, ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जिरे, तीळ, कणिक, तेल,
आणि चवीनुसार मीठ.
कृतीः
पालकाची आणि मेथीची पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. मिक्सर मध्ये पालक आणि मेथीची पाने, जिरे, लसूण, मिरच्या आणि मीठ घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. तयार पेस्ट मध्ये भिजेल एवढी कणिक आणि चवीनुसार मीठ घालून घालून वरून तीळ घालून घट्ट कणिक भिजवावी.
( टीप: शक्यतो पाणी घालू नये आणि कणिक घट्ट भिजवावी कारण पालकाला पाणी सुटते.)
तयार कणकेच्या सारख्या आकाराच्या लाट्या करून पराठे लाटावेत आणि तेल सोडून खमंग भाजावेत. आणि ह्या गरम गरम पराठ्यांची मजा साजूक तुपाबरोबर अधिकच खुसखुशीत लागतात.


ह्याच कृतीच्या पुऱ्या सुद्धा छान लागतात.


मृण्मयी आठलेकर

अनुदिनीचे एक पान

१६ मार्च २०१२, शुक्रवार
गुरुवारची रात्र, स्नेह भोजनासाठी एकत्र जमलो होतो,चविष्ट जेवण आणि तशाच खुसखुशीत खमंग गप्पागोष्टी ! मग वेळेचे भान कोणाला, तरीही सहज घड्याळाकडे नजर गेली तर सगळे काटे ऊर्ध्व दिशेने मध्यभागी एकाच काट्यावर, 'आता वाजले की बारा' चा निर्देश करत होते. शुक्रवार सुरु झाला, आपली कुवेतवासियांची साप्ताहिक हक्काची सुट्टी ! म्हणून तर'शुक्रवार आमच्या आवडीचा'! पण या शुक्रवारी पहिल्यांदाच पतीराजांना सुट्टी नव्हे तर ड्युटी होती, त्यामुळे मी होते दुःखी कष्टी ! गेल्या २० वर्षातला आणि कुवेत वास्तव्यातला आमचा पहिला शट डाऊन! त्यामुळे वाफाळत्या कॉफीचा मोह सोडून 'घराकडे अपुल्या' प्रयाण करणे क्रमप्राप्त होते. निरोपाचे संभाषण शक्य तेवढे आटोपते घेऊन नाईलाजाने निघालो.

आणि अशी सुरुवात झाली माझ्या पहिल्या वहिल्या कंटाळवाण्या शुक्रवारची ! बारा तासांची ड्युटी शिवाय स्नेह भोजनामुळे झालेला उशीर, तरीही गजर लावून पतीराज तर रवाना झाले, साप्ताहिक सुट्टीमुळे प्रभात फेरीलाही सुट्टी, नो walk त्यामुळे नो Talk ! तसेही आज प्रणवदा बजेट सादर करणार होते, अर्थविषयक सर्व निरर्थक, निरस चर्चांमध्ये रस घेऊन पाहिला. सर्व मैत्रिणी मस्तपैकी व्यस्त असतानाही काहींना महत्वाच्या कामाचा बहाणा करून फोन करून थोडासा Time पास केला, खरे तर एरवीही एकटीच तर असते की दिवसभर पण मुभा असते ना तेव्हा मनात येईल तेव्हा मैत्रिणींकडे डोकावण्याची अथवा डोके खाण्याची ! आणि शुक्रवार तर हक्काचा, हक्काच्या माणसाचे डोके खाण्याचा ! म्हणूनच फार फार आवडीचा ! शुक्रवार आत्तापर्यंत कधीच एकटीने काढण्याची वेळ न आल्यामुळे उगीचच भकास, कंटाळवाणे, उदासवाणे वाटत होते. म्हणून मायदेशी लेकीला फोन लावला तर ती सुध्दा म्हणे खूप्पच busy होती. तेवढ्यात वाजली फोनची घंटी ! पतीराजांचे क्रिकेट प्रेम सर्वज्ञात असल्यामुळे, त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यापर्यंत बहुमोल बातमी पोचवली होती सचिनच्या महाशतकी खेळीची ! आणि हे कुशल, मंगल मला कळवण्यासाठी त्यांनी फोन केला आणि तात्काळ ठेवून दिला !

जशी काही जादूची छडीच फिरली की हो ! छू मंतर होऊन गेली सारी उदासी, सारा कंटाळा ! आणि आसमंत आनंदाने न्हाऊन निघाला. गेले वर्षभर आपण सारे भारतीय ज्या क्षणाची अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो तो क्षण आला होता. 'न भूतो न भविष्यती' असे वर्तमान घडले होते. संपूर्ण पृथ्वीतलावरील, क्रिकेट विश्वात घडला होता शतकांच्या महाशतकाचा महाविक्रम ! आणि या विक्रमकर्त्याचा कर्ताकरविता होता नव्हे आहे एक भारतीय, एक महाराष्ट्रीयन, एक मराठी माणूस, आपल्या सर्वांचा लाडका सचिन !

'आनंद पोटात माझ्या मावेना गं मावेना ! अशी स्थिती झाली अगदी माझी ! डोळे आनंदाश्रूंनी भरून आले, वेदना असेल दुःख असेल तर ते पोटात ठेवता येते,पण आनंदाचे काय करायचे ? इतके कौतुक मनी दाटून आले की सांगता सोय नाही, आणि मुख्य म्हणजे सांगण्यासाठी तरी कोणी हवे ना आसपास ! मग शेवटी घेतला कागद आणि केले हे कौतुक कवन आपल्या सचिनसाठी !

सचिनच्या झंझावातापुढे बॉलने पत्करली सपशेल शरणागती

आणि शतकांच्या महाशतकी खेळीची जाहली अखेर स्वप्नपूर्ती

नोंद झाली इतिहासात एकमेवाद्वितीय विश्वविक्रमाची

न्हाऊन निघाली अतिव आनंदाने मने साऱ्या भारतीयांची

कधीच ना केली पर्वा साराच्या तीर्थरूपांनी टीकाकारांच्या टीकेची

अर्जुनच्या या पित्याने दाखवली कमाल मनोबलाची व एकाग्रतेची

रमेश तेंडुलकरांच्या आत्म्याला स्वर्गातही लाभली संतुष्टी

'या सम हाच' फक्त पती अंजलीचा गर्जते आहे सारी समष्टी

सुखावली अस्मिता विशेष, देशी, विदेशी, मराठी जनांची, मनांची

अमित प्रभा झळकली विश्वावर, क्रिकेटमधल्या या तेजोनिधीची

शतकानुशतकात एकमेव अशा सचिनची निर्मिती करते नियती

खरेच आहे भाग्य की या सोनेरी क्षणाचे आपणही आहोत सोबती

माझा उदासवाणा शुक्रवार कमालीच्या उल्हासात पालटवून टाकणाऱ्या किमयागार सचिनला आपल्या सर्व कुवेतवासियांकडून खूप खूप शुभेच्छा.


अर्चना देशमुख
 
















सोमवार, १९ मार्च, २०१२

कोंड

बागांची कोंड, घनसाची कोंड, दादर्याची कोंड... अश्या काही कोंडी मनात घर करून आहेत...सरळ सोटअर्थ म्हणाल तर कोंड म्हणजे डोह.. पण डोह म्हटल्यावर जास्तीत जास्त मनात काय येत असेल तर खोल खोल पाणी. अगदी ओक बोक... माझ्या मनातील कोंड मात्र खोल नाहीये. तिला वलय आहे अदभुततेचे... ह्या कोंडीच्या घळणी वर नेहमीच घनदाट झाडी असायची किवा एखादा जुनाट पसरलेला वृक्ष.

या झाडीत म्हणे खूप वर्षा पासून रहात असलेली एक नाग जोडी असते आणि त्या वृक्षावर देवचार असतो. कोणी म्हणायचे तिथे भोवरा आहे आणि तो ओढून घेतो तिथे पोहायला गेल्यावर. कोणी म्हणायचे तिथे खोल आत मगर आहे...

हे सर्व चित्र माझ्या गावातले... माझ्या बालपणीचे... म्हणजे ३५ -४० वर्षा पूर्वीचे. आज कोंडी बुजून गेल्यात, घळणी वरची झाडे गायब झालीत आणि त्या ओक्या बोक्या झाल्यात. देवाचाराने तर नक्कीच स्थलांतर केले असेल.


आज हे सर्व आठवते आहे हा फोटो बघताना... तो काढलाय गेल्या वर्षी वॉशिंग्टनला मित्रा कडे गेलो होतो तेव्हा...


दिलीप सावंत