गुरुवार, २२ मार्च, २०१२

अनुदिनीचे एक पान

१६ मार्च २०१२, शुक्रवार
गुरुवारची रात्र, स्नेह भोजनासाठी एकत्र जमलो होतो,चविष्ट जेवण आणि तशाच खुसखुशीत खमंग गप्पागोष्टी ! मग वेळेचे भान कोणाला, तरीही सहज घड्याळाकडे नजर गेली तर सगळे काटे ऊर्ध्व दिशेने मध्यभागी एकाच काट्यावर, 'आता वाजले की बारा' चा निर्देश करत होते. शुक्रवार सुरु झाला, आपली कुवेतवासियांची साप्ताहिक हक्काची सुट्टी ! म्हणून तर'शुक्रवार आमच्या आवडीचा'! पण या शुक्रवारी पहिल्यांदाच पतीराजांना सुट्टी नव्हे तर ड्युटी होती, त्यामुळे मी होते दुःखी कष्टी ! गेल्या २० वर्षातला आणि कुवेत वास्तव्यातला आमचा पहिला शट डाऊन! त्यामुळे वाफाळत्या कॉफीचा मोह सोडून 'घराकडे अपुल्या' प्रयाण करणे क्रमप्राप्त होते. निरोपाचे संभाषण शक्य तेवढे आटोपते घेऊन नाईलाजाने निघालो.

आणि अशी सुरुवात झाली माझ्या पहिल्या वहिल्या कंटाळवाण्या शुक्रवारची ! बारा तासांची ड्युटी शिवाय स्नेह भोजनामुळे झालेला उशीर, तरीही गजर लावून पतीराज तर रवाना झाले, साप्ताहिक सुट्टीमुळे प्रभात फेरीलाही सुट्टी, नो walk त्यामुळे नो Talk ! तसेही आज प्रणवदा बजेट सादर करणार होते, अर्थविषयक सर्व निरर्थक, निरस चर्चांमध्ये रस घेऊन पाहिला. सर्व मैत्रिणी मस्तपैकी व्यस्त असतानाही काहींना महत्वाच्या कामाचा बहाणा करून फोन करून थोडासा Time पास केला, खरे तर एरवीही एकटीच तर असते की दिवसभर पण मुभा असते ना तेव्हा मनात येईल तेव्हा मैत्रिणींकडे डोकावण्याची अथवा डोके खाण्याची ! आणि शुक्रवार तर हक्काचा, हक्काच्या माणसाचे डोके खाण्याचा ! म्हणूनच फार फार आवडीचा ! शुक्रवार आत्तापर्यंत कधीच एकटीने काढण्याची वेळ न आल्यामुळे उगीचच भकास, कंटाळवाणे, उदासवाणे वाटत होते. म्हणून मायदेशी लेकीला फोन लावला तर ती सुध्दा म्हणे खूप्पच busy होती. तेवढ्यात वाजली फोनची घंटी ! पतीराजांचे क्रिकेट प्रेम सर्वज्ञात असल्यामुळे, त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्यापर्यंत बहुमोल बातमी पोचवली होती सचिनच्या महाशतकी खेळीची ! आणि हे कुशल, मंगल मला कळवण्यासाठी त्यांनी फोन केला आणि तात्काळ ठेवून दिला !

जशी काही जादूची छडीच फिरली की हो ! छू मंतर होऊन गेली सारी उदासी, सारा कंटाळा ! आणि आसमंत आनंदाने न्हाऊन निघाला. गेले वर्षभर आपण सारे भारतीय ज्या क्षणाची अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो तो क्षण आला होता. 'न भूतो न भविष्यती' असे वर्तमान घडले होते. संपूर्ण पृथ्वीतलावरील, क्रिकेट विश्वात घडला होता शतकांच्या महाशतकाचा महाविक्रम ! आणि या विक्रमकर्त्याचा कर्ताकरविता होता नव्हे आहे एक भारतीय, एक महाराष्ट्रीयन, एक मराठी माणूस, आपल्या सर्वांचा लाडका सचिन !

'आनंद पोटात माझ्या मावेना गं मावेना ! अशी स्थिती झाली अगदी माझी ! डोळे आनंदाश्रूंनी भरून आले, वेदना असेल दुःख असेल तर ते पोटात ठेवता येते,पण आनंदाचे काय करायचे ? इतके कौतुक मनी दाटून आले की सांगता सोय नाही, आणि मुख्य म्हणजे सांगण्यासाठी तरी कोणी हवे ना आसपास ! मग शेवटी घेतला कागद आणि केले हे कौतुक कवन आपल्या सचिनसाठी !

सचिनच्या झंझावातापुढे बॉलने पत्करली सपशेल शरणागती

आणि शतकांच्या महाशतकी खेळीची जाहली अखेर स्वप्नपूर्ती

नोंद झाली इतिहासात एकमेवाद्वितीय विश्वविक्रमाची

न्हाऊन निघाली अतिव आनंदाने मने साऱ्या भारतीयांची

कधीच ना केली पर्वा साराच्या तीर्थरूपांनी टीकाकारांच्या टीकेची

अर्जुनच्या या पित्याने दाखवली कमाल मनोबलाची व एकाग्रतेची

रमेश तेंडुलकरांच्या आत्म्याला स्वर्गातही लाभली संतुष्टी

'या सम हाच' फक्त पती अंजलीचा गर्जते आहे सारी समष्टी

सुखावली अस्मिता विशेष, देशी, विदेशी, मराठी जनांची, मनांची

अमित प्रभा झळकली विश्वावर, क्रिकेटमधल्या या तेजोनिधीची

शतकानुशतकात एकमेव अशा सचिनची निर्मिती करते नियती

खरेच आहे भाग्य की या सोनेरी क्षणाचे आपणही आहोत सोबती

माझा उदासवाणा शुक्रवार कमालीच्या उल्हासात पालटवून टाकणाऱ्या किमयागार सचिनला आपल्या सर्व कुवेतवासियांकडून खूप खूप शुभेच्छा.


अर्चना देशमुख
 
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा