गुरुवार, २२ मार्च, २०१२

आयुष्य

रमादानचे दिवस असल्याने सकाळी ऑफिसला लवकर जायची घाई नव्हती. त्यातच ओजसला शाळेतही सोडायचे नसल्याने सकाळी जरा आरामातच होतो. टीवीवर च्यॅनेल चाळत असताना एनिमल प्लानेटवर स्थिरावलो. 'व्हिएतनाम मधील भातशेती आणि जनजीवन' या विषयावर डॉक्युमेंटरी दाखवली जात होती. शाळेला जाण्यापूर्वी काळी म्हशीला चरायला घेऊन जाणारा व्हिएतनामी शेतकऱ्याचा आठ-दहा वर्षाचा मुलगा आणि एकंदरीत त्या मुलाचे म्हशीबरोबरचे नाते बघताना मला माझे बालपण आठवले.

ऑफिसला निघायची तयारी करता करता नजरे समोर एक एक चित्र उभे राहिले.

'बाळ्या' बैल, 'टिकल्या' बैल, 'पंडी गाय' आणि तिची आई 'जांभळी' गाय, 'पंडी' चा पाडा 'पंड्या' बैल... जणू काय काल परवाच सर्व घडत असल्या सारखे... वाड्यातला आणि कावनातला आजोबा आणि काकांचा वावर, 'पंड्या' पाड्याला जोतासाठी वजवताना आजोबा आणि भाऊ यांची झालेली घालमेल, आईचे दररोज सकाळी वाडा आणि कावनातील शेण साफ करणे, भाऊचे तनशीचे गवत काढून घालणे... अगदी कुटुंबातील घटकासारखी आम्हा सर्वांची त्या सर्व गायबैलांवरील माया... शाळेला जाण्यापूर्वी 'म्हार्वडात' आणि 'म्हसनवटातील' पडक्या वाप्यात 'पंडी' आणि तिच्या पाडसांना चरून आणणारा मी... पावसाळ्यात कुजलेल्या पायांना आंबाड्याच्या पानांचा लेप लाऊन धग घेत गेलेले बालपण...

तेव्हा गावातल्या क्षितीजापलीकडे आयुष्य नव्हते.. आणि कंदिलाच्या भवती पडेल तेवढाच उजेड असायचा... सगळी माणसे हाकेवर असायची...

आता दिशा रुंदावल्यात... माणसे पांगलीत... केवळ गावातून शहरातच नव्हेत तर परदेशातही.. गावात गाय बैल राहिले नाहीत...

घरात म्हातारी एकटी आई.. टीवी समोर बसून दिवस घालवणारी... आणि लेकरांच्या फोनची वाट पाहणारी...
सर्व आठवत असताना ऑफिसपर्यंत कधी पोहोचलो समजलेच नाही. मी चालवत असलेल्या पजेरोतील सीडी प्लेयरवर आता "मस्ती मे झुमेंगे हम.." गाणे सुरू होते...

'बाळ्या' बैलाच्या अखेरच्या दिवशीची त्याच्या डोळ्यातील असहायता आठवून माझ्या डोळ्यात अश्रू साचत होते...!

दिलीप सावंत




२ टिप्पण्या:

  1. विस्तारलेल्या क्षितीजाबद्दल हार्दिक अभिनंदन. साऱ्या आठवणी अजूनही साठवून ठेवलेल्या दिसतात. तुमच्यातील सहॄद्यतेला सलाम !

    उत्तर द्याहटवा