मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

माझ्या रांगोळ्या


आजकाल संस्कारभारतीच्या रांगोळ्या कार्य समारंभात सर्रास काढल्या जातात आणि वेगळेपणामुळे फार उठून दिसतात.  ही रांगोळी काढतांना त्यात वापरण्यात आलेली चिन्ह फार महत्वाची असतात.  ठराविक चिन्हांचा वापर करुन काढण्यात येणार्‍या रांगोळ्या काढणं फारसं कठीण नसतं.  कुठलीही रांगोळी कितीही मोठी काढता येऊ शकते.  अर्थात कुवेतमधे ही रांगोळी काढतांना बरीच बंधनं येतात.  मी माझ्या घरच्या कार्यप्रसंगात काढलेल्या काही रांगोळ्यांचे फ़ोटो इथे देतेय.














अर्चना पुराणिक

भूपेशच्या कॅमेर्‍यातून

Looking through The Lens...




By Bhupesh Hajarnis

अंड्याचे बफ्फेट



साहित्य:

४ चमचे तेल
५-६ अंडी
२ कांदे
१ टोमॅटो
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा तिखट
मीठ चवीप्रमाणे
थोडी कोथिंबीर

कृती:

१. मंद गॅसवर एका पसरट भांड्यामध्ये तेल टाका.
२. त्यात बारीक चिरलेला कांदा हळद, तिखट आणि थोडं मीठ घालून चांगला परतवा.
३. कांदा मग भांड्यात सारखा पसरवून त्यावर टोमॅटोच्या गोल चकत्या कापून अशा रितीने लावा की कांदा झाकला जाईल


४. एक एक अंड पसरट वाटीमध्ये फोडून हळूच भांड्यात सोडा. अंडी सोडताना काळजी घ्या की अंड्याचा बलक फुटणार नाही.
५. सगळी अंडी भांड्यात अशा रितीने सोडा की टोमॅटोच्या चकत्या झाकल्या जातील.



६.. अंडी भांड्यात सोडून झाली की वरून थोडं मीठ आणि मिरी भुरभुरा.
७. भांड्यावर झाकण ठेवून वाफ काढा.
८. अंडी शिजली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा.



९. अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर ही अंड्याची फार सोपी, दिसायला छान आणि खायला लज्जतदार अशी वेगळी डिश आहे.

टीप- सर्व कृती करताना ग्यास मंदच असु दे अशाने कांदा जळणार नाही.




मुग्धा सरनाईक

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

मी

लहान वयातच आईबाबांनी पुस्तकांची ओळख करून दिली . त्यामुळे  वाचनाची गोडी लहान वयातच निर्माण झाली. सुरुवात ही   चंपक, चांदोबा, किशोर अशा  पुस्तकां पासून झाली आणि हळुहळु  लेख, कथा, कादंबर्‍या असे वेगवेगळे वाचनाचे प्रकार आवडायला लागले . वाचन चौफेर असावे  हे त्यांचे मत कुठेतरी मनावर बिंबले गेले . त्यामुळे कुठल्याही विषयावरची पुस्तके वाचायला आवडायची . कुठल्या ही विषयाच्या कथा ,कादंबर्‍या  असू दे  त्यांनी फरक पडत नव्हता . थोडक्यात काय तर विषय महत्वाचे ठरत नव्हते ,  वाचणे महत्वाचे  होत  होते. पुस्तक हातात आले की त्याचा फडशा पाडेपर्यंत दम निघायचा नाही.

पण कसे कोण जाणे त्यात कवितांचा समावेश झाला नव्हता. कविता पण वाचायला, समजायला हव्यात असे कधी वाटले नव्हते. कवितेत उगाचच कठीण शब्द, रूपक, अलंकार वापरतात असे वाटायचे. कविता म्हटलं की वाचायचा कंटाळा यायचा. कविता आवडायला लागली खरे तर प्रा. चंद्रशेकर गोखले ह्यांच्या "चारोळया" वाचल्या पासून. एकदा सहजच चारोळ्या वाचल्या व कविता वाचायची गोडी लागली. कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रमैत्रिणी बरोबर  बसून चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळया म्हणायच्या आणि भाव खावून घ्यायचा त्यात काही वेगळी मजा होती. कॉलेजची पुस्तके पाठ नसायची पण त्यांच्या चारोळ्यांची सगळी पुस्तक पाठ झाली होती. त्यांच्या चारोळयाचे पारायण केले होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. प्रा. चंद्रशेकर गोखल्यांच्या वर झालेली टीका आजही  आठवते.  "चारोळया मुळे कवितेचा दर्जा घसरेल", "अशा काय कविता असतात का !" वगैरे... पण माझ्यासाठी  चारोळया ह्या कवित्यांची  आवड निर्माण होण्यासाठीची  पहिली पायरी होती. म्हणून इथे त्यांच्या काही निवडक चारोळया द्यावशा वाटतात  :- 

तू भेटलीस आणि मी 
नगर वसायाची भाषा करायला लागलो
नगराची वेस म्हणून 
क्षितीज रेषाच धरायला लागलो  

काही नाती तुटत नाहीत 
ती आपल्या नकळत मिटून जातात 
जशी बोटांवर रंग ठेवून 
फुलपाखरं हातून सुटून  जातात 
   
प्रत्येक गावाबाहेर 
एक महारवाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र 
समानतेचा धडा आहे  

सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला 
अचानक पालवी फुटली 
त्याला ही कळेना 
जगायची जिदद कुठली 

डोळ्यांतून अश्रू ओघळला 
की तोही  आपला रहात नाही 
वाईट याचंच वाटतं की 
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही  

झाडावरून प्राजक्त ओघळतो 
त्याचा आवाज होत नाही 
ह्याचा अर्थ असा नाही की त्याला 
इजा होत नाही

 








सौ. श्रुती हजरनीस

बुधवार, १२ जानेवारी, २०११

कोलंबीचे लोणचे




साहित्य:

१ चिमुट  हिंग
१ टी स्पून मोहरी
१  टेबल स्पून तेल
१ छोटा चमचा हळद
१ १/2 टी स्पून तिखट
चवीप्रमाणे मीठ
२ चमचा केप्र किवा बेडेकर चा लोणच्याचा मसाला
१ कप पाणी
चवीप्रमाणे लिंबाचा रस
अर्धा किलो कोलंबी (दोरे काढून)


कृती:

१. कोलंबीला मीठ, हळद, तिखट लावून ठेवा.
२. गॅसवर  एका भांड्यात तेल टाकून त्यात हिंग आणि मोहरी ची फोडणी करा.
३. त्यात कोलंबी आणि लोणच्याचा मसाला घालून  परतवा.
४. पाणी घालून ढवळा आणि भांड्यावर झाकण ठेवून शिजवा.
५, कोलंबी शिजली की गॅस बंद करून भांडं खाली उतरवा आणि थंड होऊ द्या.
६. थंड झाल्यावर लिंबाचा रस घाला.
७. पराठ्यासोबत एकदम झकास लागतं.














सौ. मुग्धा सरनाईक