मंगळवार, २७ मार्च, २०१२

रेझोनन्स

नेहमी सारखाच आज एक दिवस. आठवड्याच्या सुट्टीचा दिवस असल्याने जरा निवांत. दिनक्रमानुसार आता संध्याकाळी फिरायला बाहेर पडलोय.

घरातून बाहेर पडल्यावर दोन मिनिटात गल्फ रोड. हा हायवे क्रॉस केला कि पाच मिनिटात समुद्र किनारी पोहोचतो.
आज छान हवा आहे. नेहमीचा दमटपणा हवेत नाहीय. तासाभराचा फेरफटका मारल्यावरही फारसा घाम नाही कि थकवा नाही. आपल चालण आज लवकर आटोपलं अस काहीस वाटल. थोडावेळ बसायचा मोह झाला.
एव्हाना अंधार पडला होता. झुळझुळ वारं सुटल होतं. समुद्र तलावासारखा शांत पसरला होता. झिलमील झिलमील वाऱ्याच्या लहरी आणि त्यात लवलवणारी स्ट्रीटलाईट्सची प्रतिबिंब. पलीकडच्या बेटावरचे लुकलुकणारे दिवे.

का कोण जाणे मला परवा दूरदर्शनवर पाहिलेली एक मुलाखत आठवली. मुलाखत होती एका प्रसिद्ध शास्त्रीय संगीत तज्ञाची. जेव्हा मुलाखतकाराने त्यांना एखाद्या अविस्मरणीय घटनेबद्दल सांगाल का असे विचारले, त्यांनी सवाई गंधर्व महोत्सवातील पंडित मल्लीकार्जुनांच्या एका मैफलीबद्दल सांगितले. तीनचार तास चाललेल्या त्या मैफलीतील चार पाच मिनिटे अशी होती कि पंडितजींचे गाणे, तंबोरा, आणि श्रोते सर्व काही एक झाले होते. अवघं वातावरण एक सूर झाले होते.

त्यानंतर आठवला तो भौतिकशास्त्रातला कधीतरी अभ्यासलेला रेझोनन्सचा सिद्धांत...

निसर्ग, संगीताची मैफल आणि आयुष्य... या तिघात या बाबतीत साम्य आहे असे वाटते.
समुद्र किनाऱ्यावरचा नेहमीचा कोलाहल... आणि कधी कधी अनुभवला येणारा आजच्यासारखा आल्हाददायक निसर्ग...

चार तासांच्या मैफलीत बऱ्याच परिश्रमानंतर कधीतरी लागणारा स्वर्गीय स्वर...
आयुष्यही तसेच... उतार चढाव, खाच खळगे, दमछाक आणि कधी कधी क्वचितच साधणारा रेझोनन्स...
वाटते... आयुष्यभर असा रेझोनन्स साधता आला तर?

तर खास प्रयत्न करून गात्र शिथिल सोडत दीर्घ श्वास घ्यायची कधी गरजच पडली नसती...!


दिलीप सावंत

माझे Crayon Painting -Flowers Series-2


झिनीया



कमळ


सुर्यफुल

धनंजय सेवलकर

गुरुवार, २२ मार्च, २०१२

आयुष्य

रमादानचे दिवस असल्याने सकाळी ऑफिसला लवकर जायची घाई नव्हती. त्यातच ओजसला शाळेतही सोडायचे नसल्याने सकाळी जरा आरामातच होतो. टीवीवर च्यॅनेल चाळत असताना एनिमल प्लानेटवर स्थिरावलो. 'व्हिएतनाम मधील भातशेती आणि जनजीवन' या विषयावर डॉक्युमेंटरी दाखवली जात होती. शाळेला जाण्यापूर्वी काळी म्हशीला चरायला घेऊन जाणारा व्हिएतनामी शेतकऱ्याचा आठ-दहा वर्षाचा मुलगा आणि एकंदरीत त्या मुलाचे म्हशीबरोबरचे नाते बघताना मला माझे बालपण आठवले.

ऑफिसला निघायची तयारी करता करता नजरे समोर एक एक चित्र उभे राहिले.

'बाळ्या' बैल, 'टिकल्या' बैल, 'पंडी गाय' आणि तिची आई 'जांभळी' गाय, 'पंडी' चा पाडा 'पंड्या' बैल... जणू काय काल परवाच सर्व घडत असल्या सारखे... वाड्यातला आणि कावनातला आजोबा आणि काकांचा वावर, 'पंड्या' पाड्याला जोतासाठी वजवताना आजोबा आणि भाऊ यांची झालेली घालमेल, आईचे दररोज सकाळी वाडा आणि कावनातील शेण साफ करणे, भाऊचे तनशीचे गवत काढून घालणे... अगदी कुटुंबातील घटकासारखी आम्हा सर्वांची त्या सर्व गायबैलांवरील माया... शाळेला जाण्यापूर्वी 'म्हार्वडात' आणि 'म्हसनवटातील' पडक्या वाप्यात 'पंडी' आणि तिच्या पाडसांना चरून आणणारा मी... पावसाळ्यात कुजलेल्या पायांना आंबाड्याच्या पानांचा लेप लाऊन धग घेत गेलेले बालपण...

तेव्हा गावातल्या क्षितीजापलीकडे आयुष्य नव्हते.. आणि कंदिलाच्या भवती पडेल तेवढाच उजेड असायचा... सगळी माणसे हाकेवर असायची...

आता दिशा रुंदावल्यात... माणसे पांगलीत... केवळ गावातून शहरातच नव्हेत तर परदेशातही.. गावात गाय बैल राहिले नाहीत...

घरात म्हातारी एकटी आई.. टीवी समोर बसून दिवस घालवणारी... आणि लेकरांच्या फोनची वाट पाहणारी...
सर्व आठवत असताना ऑफिसपर्यंत कधी पोहोचलो समजलेच नाही. मी चालवत असलेल्या पजेरोतील सीडी प्लेयरवर आता "मस्ती मे झुमेंगे हम.." गाणे सुरू होते...

'बाळ्या' बैलाच्या अखेरच्या दिवशीची त्याच्या डोळ्यातील असहायता आठवून माझ्या डोळ्यात अश्रू साचत होते...!

दिलीप सावंत




माझ्या कुंचल्यातून


नीलिमा दिवेकर   

पालक मेथी परोठे / पुऱ्या

 साहित्य:
१ जुडी पालक, १/२ जुडी मेथी, ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जिरे, तीळ, कणिक, तेल,
आणि चवीनुसार मीठ.
कृतीः
पालकाची आणि मेथीची पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. मिक्सर मध्ये पालक आणि मेथीची पाने, जिरे, लसूण, मिरच्या आणि मीठ घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. तयार पेस्ट मध्ये भिजेल एवढी कणिक आणि चवीनुसार मीठ घालून घालून वरून तीळ घालून घट्ट कणिक भिजवावी.
( टीप: शक्यतो पाणी घालू नये आणि कणिक घट्ट भिजवावी कारण पालकाला पाणी सुटते.)
तयार कणकेच्या सारख्या आकाराच्या लाट्या करून पराठे लाटावेत आणि तेल सोडून खमंग भाजावेत. आणि ह्या गरम गरम पराठ्यांची मजा साजूक तुपाबरोबर अधिकच खुसखुशीत लागतात.


ह्याच कृतीच्या पुऱ्या सुद्धा छान लागतात.


मृण्मयी आठलेकर