पावसाळा आला, पाऊस मात्र नाही
आभाळ भरुन आलं, पण कोसळलंच नाही
पावसाचा देव म्हणे रुसला होता
माझं गाव सोडून, बाकी बरसला होता
वेशीपल्याड सारं काही भिजवत होता
मला मात्र मुद्दाम विसरत होता
देवाकडे जेव्हा मी गा-हाणं केलं
तेव्हा त्याने त्याचं भांडार…. खुलं केलं
खेळी मात्र पावसाने अशी काही केली
आई माझी आभाळात उचलून नेली
केलं पार पोरकं त्याने भर पावसात
विश्व केलं उध्वस्त, फक्त काही क्षणात
बांध फुटला डोळ्यांचा, आवरेना पाऊस
तेव्हा मात्र सोबत माझ्या, रडला पाऊस
आता फक्त पावसाळा, दुसरा ऋतू नाही
भिजलं अंग पुसायला, आई मात्र नाही
पावसाच्या देवा पुन्हा असं नको करुस
बदल्यात पावसाच्या कुणाची, आई नको नेऊस
आज आईला जाऊन एक महिना झाला........ !! जेव्हा हे जाणवतं की आता आई फक्त आठवणीतच राहणार त्यावेळी मात्र जीव कासावीस होतो....काही काही सुचेनासं होतं. सगळी सुखं असूनही फार एकटं आणि भकास वाटतं. तिचा कौतुकाने पाठीवर फिरणारा हात, काळजीने डोक्यावरुन फिरलेला हात....सगळं सगळं अगदी तसंच जाणवतं... अंग शहारतं. मग तिच्या आजारपणात तिच्या डोक्यावरुन हात फिरवतांना झालेला तिच्या रुपेरी केसांचा उबदार स्पर्श आठवतो..... सरणावर जातांना तोच स्पर्श किती थंड असतो ..... !!
आई.................
.....
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???
जयश्री अंबासकर
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???
जयश्री अंबासकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा