१० डिसेंबरला मंडळाचा वार्षिक कार्यक्रम झाला आणि कोरीओग्राफिच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर मला नवर्याची (गौतमची) आठवण झाली. तो ऑफिसच्या कामानिमित्त नोव्हेंबरच्या शेवटीच टांझानियाला गेला होता. आफ्रिकेतील टांझानिया....काय बघणार तिकडे जाऊन ?? पण माझा हा विचार किती चुकीचा आहे हे मला इंटरनेटवर सर्फिंग करून लवकरच कळलं. सेरेन्गेती पार्क..लोक जिकडे जाऊन वाईल्ड लाईफ बघायची वर्षानुवर्ष स्वप्नं बघतात ती संधी आम्हाला आयती चालून आली होती. आणि ती मला नक्कीच सोडायची नव्हती.
माझ्या वडिलांना वाईल्ड लाईफचं खूप वेड. त्यांच्याबरोबर भारतातील कान्हा National पार्क, रॉयल चितवनची सैर लहानपणीच केली असल्याने ती आवड मलापण लागली. तसे झू मध्ये पण सगळे प्राणी हमखास आणि कमी पैशात बघता येतात. पण वाईल्ड लाईफ सफारी मध्ये वन्य प्राणी मुक्तपणे संचार करताना बघणं ही एक पर्वणीच असते.
पूर्व तयारी म्हणून कुवेतमध्ये Yellow fever ची vaccination १० दिवस आधीच घेऊन ठेवली होती. परत आफ्रिकेत भारतीयांना व्हिसा ऑन arrival मिळतो. टांझानियाला जायचा विचार पक्का करतेय तोच मला एक धक्कादायक बातमी कळली. गौतमची laptop Bag चोरीला गेली होती आणि त्यात त्याचा पासपोर्ट होता. आता कुवेतमध्ये राहून हायपर होण्यापेक्षा मला तिकडे जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. लगेच तिकीट काढलं आणि पहाटेची flight घेऊन दारेसलाम गाठलं. जाताना माझा सखा laptop सुद्धा बरोबर घेतला होता. तिकडे हॉटेलवर पोहोचल्यावर माझा पहिला दिवस चोरी कशी झाली, कुठे झाली याची शहानिशा करण्यात गेला आणि आता पुढे काय हा प्रश्न सतावू लागला. बाहेर फिरून काही बघावसं पण वाटत नव्हतं. पण मी जेवढी हायपर तेवढाच गौतम कूल. त्यामुळे त्याने मला बाहेर काढलं. जवळच असलेल्या slipway मार्केटला गेलो. आफ्रिकन मसाई लोकांचे मुखवटे, प्राण्यांचे लाकडी शो पिसेस, फ्रेम्स, मोठी गळ्यातली आणि कानातली, मणीवर्कच्या चपला यांच्या दुकानांनी भरलेलं आणि समुद्राकाठी वसलेलं हे मार्केट माझं स्ट्रेस बस्टर ठरलं. थोडं विंडो शॉपिंग करून बाहेर येईपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. आकाश शेंदूरी आणि पिवळ्या रंगाची होळी खेळत होतं. आकाशाचा हा "Yellow Fever" खूप हवा हवासा वाटला. हळुहळु समुद्राने सूर्याला आपल्या कवेत घेतलं आणि अंधार पडू लागला. सूर्यास्ताचे रंग कॅमेरात भरून आम्ही परतलो.
गौतमच कामाचं दिनचक्र सुरु होतं. त्यात पासपोर्ट गेल्यामुळे नवीन पासपोर्टसाठी करावी लागणारी त्याची धावपळही सुरूच होती.
गौतम बिझी असताना माझी फेसबुकशी गट्टी जमली. इमेलवर कुवेतमधील जवळच्या मित्रमैत्रिणींशी टचमध्ये होते. त्यांच्याकडून इमोशनल सपोर्ट मिळत होता. कुवेतमधील काही मित्रांच्या मदतीने टांझानिया मराठी मंडळातील काही लोकांशी ओळख झाली आणि त्यामुळे खूप दिलासा मिळाला. परक्या देशात आपली माणसं भेटणं आणि त्यांनी केलेली मदत हे खूप मोलाचं होतं. त्यांचे आणि कुवेतमधील मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही की आपली माणसं एकत्र आणायचं काम हे त्या त्या देशातील महाराष्ट्र मंडळं करीत आहेत. या त्यांच्या निरपेक्ष कर्तृत्वाला Hats Off .
चारपाच दिवसांनी गौतमच्या हातात नवीन पासपोर्ट आला आणि थोडं हायसं वाटलं. तेवढ्या काळात आम्ही चांगल्या इंडियन हॉटेल्सचा शोध लावला होता. गौतमचं ऑफिसचं काम २ आठवडे चाललं. तेवढ्या काळात आम्ही वीकेंड नाईट आऊट, कसिनो, SeaCliff नावाची happening place हे सगळं एन्जॉय केलं. शॉपिंग सेंटर मधील टांझानाईट gemstone ने मला भुरळ घातली होती. निळ्या रंगाचा थोडी जांभळट झाक असलेला टांझानाईट खडा फक्त आफ्रिकेतील टांझानियातच सापडतो आणि त्याला खूप किंमत आहे.
तिकडच्या लोकांचंही मी बरच निरीक्षण केलं. आफ्रिकन बायकांना बघून अशोकवाटिकेतील शूर्पणखा, महाभारतातील हिडींबा यांची आठवण येत होती. केस विंचरायला या बाथरूममधले खराटे वापरतात की काय अशी शंका आली. दारेसलामला काही गुजराती लोकांच्या पिढ्या न् पिढ्या बरीच वर्ष स्थायिक आहेत ते स्वतःला इंडियन नाही तर तिथले लोकल म्हणून संबोधतात.
आता कुवेतमध्ये प्रवेश कसा करणार हा प्रश्न मधेच डोकं वर काढत होता. गौतमचा व्हिसा ऑफिसने करायला टाकला होता तरीही किती दिवस लागतील याचा भरवसा नव्हता. 31st Decembar जवळ येत होता. पण आपण तेव्हा कुठे असू हे ठरवता येत नव्हतं. इंडिया, कुवेत की टांझानिया?? पण व्हिसा ४-५ दिवसात मिळेल अशी आशा ऑफिसकडून मिळाली आणि आम्ही सेरेन्गेती आणि गोरोन्गोरो क्रेटरची टूर बुक केली. ही टूर म्हणजे आमची चूक नसताना घडलेल्या नकारात्मक गोष्टीतून मिळालेली सुवर्णसंधी होती.
फक्त एक Bag आणि टूरची दैनंदिनी घेऊन आम्ही दारेसलाम टु किलीमांजारो flight पकडली. Laptop आणि बाकीचं सामान दारेसलाम मध्ये झालेल्या ओळखीच्या मित्राकडे ठेवलं. विमानातून उतरल्याबरोबर फेमस किलीमांजारो पर्वताचं दर्शन झालं. Hot Choclate with Whipped Cream on Top असं त्याचं रूप बघून मी खुश झाले. किलीमांजारो हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत असून पर्वताच्या फक्त वरती शेंड्याला बर्फाचं topping आहे.
सामान घेऊन बाहेर आल्या आल्या टूर गाईड ने स्वागत केलं. जवळ जवळ ८ ते ९ तास प्रवास होता आणि अंधार पडायच्या आधी लॉजवर पोचायचं होतं. आरुषा शहर गेल्यानंतर सेरेन्गातीच्या हद्दीत प्रवेश केला आणि प्राण्यांची तसेच निसर्गाच्या सौंदर्याची ऑन रूट मेजवानी सुरु झाली. रस्त्यावर कडे कडेला झेब्रा दिसायला लागले. बरेचदा झेब्रा Crossing अनुभवायला मिळालं. अहो म्हणजे Zebras were actually crossing our road:). काही ठिकाणी झेब्रा आणि वाईल्ड बीस्ट पायात पाय घालून बागडत होते. कितीही फोटो काढले तरी मनाचं समाधान होत नव्हतं. थोड्या वेळाने आम्हाला वाईल्ड बीस्टच्या झुंडीच्या झुंडी एकाच दिशेने पळताना दिसल्या. नजर जितकी लांब चालली होती तितक्या झुंडी दिसतच होत्या. मग गाईडने सांगितलं की हेच ते फेमस मायग्रेशन. खूप आश्चर्य वाटलं बघून की यांना कळतं तरी कसं कुठच्या दिशेने जायचं? कोण गाईड आहे यांचा? पण काही गोष्टी अनाकलनीय असतात.
साधारण साडेसहाच्या सुमारास गाईडने गाडी एका लहान पाय वाटेत घुसवली. थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं की गवतात चित्ता आहे. पण तसा दूरच होता. गाईडने आम्हाला सांगितलं की सहसा ऑन द वे चित्ता कधी दिसत नाही. तेव्हा या बाबतीत तरी आपलं नशीब जोरावर आहे याची खात्री पटली. जरावेळाने तो गवतातून उठून उभा राहिला आणि त्याचं पूर्ण दर्शन आम्हाला झालं. आणखी जवळून उद्या परत दिसेल अशी हमी गाईडने दिल्यावर आम्ही पुन्हा वाट धरली.
हळुहळु काळोख झाला आणि गाडीचे हेड लाइटस चालू झाले. आता फक्त मातीचा रस्ता आणि आजू बाजूला गर्द झाडी दिसत होती. मग कंटाळा येऊ लागला आणि लॉज कधी येते असं झालं. तेवढ्यातच एका झाडीत दोन डोळे चमकले..अगदी गोटीसारखे. मी ओरडले Look there is some animal. गाईड ने सांगितलं की तो चित्ता होता. आता अंधारातला चित्ता पण बघायला मिळाला होता. स्वत: च्या नजरेचं मला कौतुक वाटलं आणि त्या आनंदात असतानाच आम्ही लॉजवर पोचलो सुद्धा. रिसेप्शनवर कळलं की रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत वीज नाही. आम्ही वैतागलो की असं कसं? आता कसं रहायचं? लॉज भर जंगलात असल्याने डास आणि किडे असणारच. पण रूमवर गेल्यावर आमचा भ्रम दूर झाला. स्वच्छ आणि सुंदर लाकडी बांधकाम, खिडकीतून सकाळी दिसणारा मनोहारी सूर्योदय आणि हिरवा गालीचा, खेळकर हवा यामुळे आम्हाला लॉज खूप आवडलं आणि पंख्याची अजिबात गरज भासली नाही. तसंही आम्हाला हॉटेलमध्ये दिवसा राहायचंच नव्हतं आम्ही जाणार होतो आमची वाट बघत असलेल्या आमच्या मित्रांना भेटायला.
दुसर्या दिवशी सकाळी गेम ड्राइव्ह अगदी पार्कच्या मध्यभागात होती. एक तास गेला तरीही काही दिसेना. आपण दुसर्या दिशेने जाऊया असा विचार मनात येतोय तोच एका मोठ्या खड्कावर द लायन किंग आरामात बसलेला दिसला. अजून जवळून बघूया म्हणून गाइडने गाडी जरा जवळ नेली तर राजा गाडीचा आवाज ऐकून खडकावरील झुडुपात जाऊन बसला. सिंह जवळून बघायची इच्छा अपुरी रहिली म्हणून मन खट्टू झालं.
थोड्या वेळाने रस्त्यावर पायाचे मोठे ठसे दिसू लागले. तसंच काही झाडांच्या फांद्या अर्ध्या मोडून वाकवलेल्या दिसत होत्या. तेव्हा हत्तींचा मोठा कळप तिकडून गेल्याची खात्री पटली. मधेच हरणं पळताना दिसत होती. नंतर बराच वेळ गेला आणि कंटाळा येतो तोच एका मोठ्ठ्या खडकावर मला एक सिंहीण तिच्या २ छाव्यांबरोबर झोपलेली दिसली. तो खडक अगदी आमच्या १० फुटांवर होता. ही संधी सोडणं मूर्खपणाचं होतं आणि आम्ही ती उठायची वाट बघायचं ठरवलं. १० मिनिटांनी ती उठली आणि हळुहळु खडक उतरू लागली. जणू काही ती खाली उतरून माझ्याशी शेक हॅंड करायला येत होती. जरा खाली आल्यावर स्तब्ध उभी राहून तिने आम्हाला न्याहाळलं. तिचे डोळे जेव्हा माझ्या डोळ्यांना भिडले तेव्हा मनातून एक भीतीची लहर सळसळत गेली. तेव्हा गाईडने सांगितलं की ती काही करणार नाही कारण लायन इज peaceful animal. उगीच कोणाच्या वाट्याला जात नाही. पण जर त्याला कोणी मुद्दाम त्रास दिला तर तो हल्ला करतो. मी सिंह राशीची असल्याने हा गुण माझ्या व्यक्तिमत्वाशी अगदी मिळताजुळता होता. आम्हाला एकटक बघून तिने एकदम अबाऊट टर्न केलं आणि ती मागच्या दिशेला उतरून गायब झाली. कदाचित तिच्या पिलांसाठी ती खायला आणायला गेली असावी. मग ते छावे आई गेल्यावर उठून खडकावर बागडू लागले. जवळ जवळ अर्धा तास त्यांना डोळे भरून पाहिल्यावर आम्ही गाडी पुढे घेतली. परत थोड्या वेळाने आम्हाला एका झाडाखाली १ सिंह, २ सिंहिणी आणि ४ छावे पहुडलेले दिसले. हा नजारा लांब होता पण दुर्बिणीच्या सहाय्याने आम्ही तो चांगला catch केला. तर असा तो दिवस फक्त लायन किंग ला डेडिकेटेड होता.
तिसर्या दिवशी सकाळी आम्ही गोरोन्गोरोला कूच केलं. रस्त्यात आम्हाला बरेचदा तरस (Hyena ) दिसलं. त्यात दोन प्रकार असतात एक spotted आणि दुसरा striped. Spotted Hyena आम्हाला ३-४ दिसले. पण Striped Hyena एकच. जो मी एकटीने spot केला. गाईडने माझे आभार मानले की Striped Hyena त्याने सुद्धा इतकी वर्ष गाईड असून पहिल्यांदाच बघितला कारण तो दिसणं खूप दुर्मिळ असतं.
मध्येमध्ये झेब्रा, जिराफ आणि वाईल्ड बीस्ट यांची भेट होतच होती. एक जिराफ तर आमच्या अगदी गाडीसमोर येऊन उभा राहिला जणू काही त्याने वाटच अडवून धरली होती. एका ठिकाणी ३ वाईल्ड बफ्फेलो एकच hair style करून बसल्या होत्या. जाताना एक छोटा तलाव लागला त्याचं आरस्पानी सौंदर्य काही औरच होतं. झाडाची प्रतिबिंब पडलेल्या त्या पाण्यात बरेच पाणघोडे मस्त डुंबत होते. त्यांचा आळशीपणा बघून हेवा वाटला. एकाने मधेच मोठ्ठा आ वसला आणि मी तो kodak moment कॅमेरात catch केला. वाटेत मसाई लोकांची वस्ती असलेलं छोटसं गाव लागलं. तिथे त्यांचं पारंपारिक नृत्य पाहून मजा वाटली. आम्ही गोरोन्गोरोला ५-६ तासात कधी पोहोचलो ते कळलं पण नाही. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून क्रेटरमध्ये अर्धा दिवस गेम ड्राइव्ह करून पुन्हा किलीमांजारो airport गाठायचं होतं. अर्धा दिवस काय दिसणार अशा भ्रमात मी होते. पण तो अर्धा दिवस सेरेन्गेतीपेक्षाही जबरी होता.
क्रेटर म्हणजे नैसर्गिकरीत्या तयार झालेला मोठ्ठा जमिनीवरील खड्डा. त्यात पाण्याचा मोठा तलाव, सपाट हिरवळ आणि मध्ये मध्ये झाडं. क्रेटरच्या आजूबाजूला उंच कपारी आणि डोंगर असल्याने तिकडे बरेच प्राणी अडकून आहेत.
रस्त्यातच आम्हाला एक खूप छोटा चित्ता दिसला. आमच्या गाडीच्या अगदी जवळून चालणारा मी म्हटलं चित्त्याच पिल्लू की काय पण ती मांजर होती चित्ता जमातीतली.. अगदी हुबेहूब चित्याचं रूप पण आकार लहान मांजरी एवढा. तिचं नाव Sabo Cat आहे हे लगेच गाईडने सांगितलं. क्रेटरमध्ये शिरताच २ चित्ते एका मागोमाग संथपणे चालताना दिसले. लगेच टूरीस्टच्या २-३ गाड्या गोळा झाल्या. पण त्याचं त्यांना काहीही सोयरसुतक नव्हतं. त्यांची शतपावली चालूच होती. एकाने मधेच एका छोट्या दगडावर चढून मॉडेलिंगसाठी पोझ दिली आणि सर्वांचे कॅमेरे सरसावले. नंतर सावकाश त्या दोघांनी आमच्या गाड्यांची पर्वा न करता समोरून रस्ता ओलांडला. जवळून पाहिल्यावर कळलं की जरी चित्त्याच्या अंगावर पूर्ण ठिपके आहेत तरी त्याची शेपूट मात्र अर्धी पट्टेरी आहे.
नंतर जरा पुढे जातो तर २ शहामृग माना वर करून उभे होते. एक काळा होता आणि दुसरा राखाडी. आणि दोघंही थोडं अंतर राखून उभे. जणू एकमेकांची सावलीच दिसत होते. त्यांना टाटा करून आम्ही तलावाकडे आलो. तलावाने एका बाजूला गळ्यात मोत्याची माळ घातली होती. नीट पाहिल्यावर कळलं की ते पांढरे शुभ्र बगळे आहेत काठावर रांगेत बसलेले. आकाशात २ घारी घिरट्या घालत होत्या. तलावाच्या दुसर्या बाजूला काही झेब्रे चरत होते. हे सर्व दृश्य एखाद्या सुंदर पेंटिंगप्रमाणे भासलं. थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. जरा वेळाने रस्त्याच्या बाजूच्या हिरवळीतून एक मोठ्ठा हत्ती समोरून झुलत येताना दिसला. हत्ती जरी एरवी पाहिलेला असला तरी या ऐटीत चाललेल्या गजराजावरून नजर हटत नव्हती.
इतक्यात गाईडला इशारा आला आणि त्याने गाडी हलवली. एका ठिकाणी ७-८ गाड्या थांबलेल्या दिसल्या. त्याही विभागून थोड्या थोड्या अंतरावर. आम्ही जिथे थांबलो तिकडून साधारण १५-२० फुटांवर एक मोठ्ठं झाड होतं आणि त्यावर एक चित्ता बसला होता. त्याला दुर्बिणीने बघून आम्ही पुढे थांबलेल्या गाड्यांकडे गाडी नेली. तिकडे तर फुल मेजवानी होती. परत १५-२० फुटांवर एक झाड होतं आणि त्याच्या फांद्यांवर सिंहांचा कळप पहुडलेला होता. अनेक शेपट्या खाली लटकत होत्या. कुठची कोणाची तेच कळत नव्हतं. मी मग शेपटी आणि सिंहांच्या जोड्या जुळवू लागले आणि लक्षात आलं की तब्बल ७ सिंह होते. सिंहांचा पण कळप असतो ही माझ्या ज्ञानात भर पडली. डोळे दिपले एवढं सगळं बघून. चला आता सिंह बघून कंटाळा आला असं चक्क तोंडून बाहेर पडलं. तरीही ये तो सिर्फ पिक्चर था climax तो अभी बाकी था.
चला आता परतीचा रस्ता धरायचा असं गाईडने सांगितलं आणि क्रेटर मधून बाहेर पडायला आम्ही सज्ज झालो. रस्ता बदलल्यावर पुन्हा २ गाड्या थांबलेल्या दिसल्या. काय आहे म्हणून बघतो तर रस्त्याचा अगदी कडेला असलेल्या झुडुपाशेजारी २ चित्ते बसले होते. मग काय थांबलीच आमची गाडी. आता तर अगदी ५ फुटावर होते दोघं. मी खिडकीची काच खाली केली आणि कॅमेरा ऑन केला. इतक्यात माझ्या बाजूचा गाडीचा दरवाजा खाडकन उघडला. आता चित्ते आणि माझ्यात काहीही अडथळा नव्हता. बाजूच्या गाडीतील लोकं Oh My God म्हणून ओरडले. मला तर खून भारी मांग आठवला. पण चित्ते जाम आळशी निघाले आणि प्रसंगावधान राखून मी आणि गौतमने गाडीचा दरवाजा ओढून घेतला. गाडीचा तो दरवाजा खिळखिळा होता हे प्रवासात एकदोनदा गाईडला आधी सांगूनपण त्याने ऐकलं नव्हतं. त्याचा हा परिणाम होता. काळजाचा ठोका चुकवणार्या या अनपेक्षित थ्रिलिंग अनुभवाने आमच्या टूरची सांगता झाली आणि आम्ही किलीमान्जारोच्या दिशेला घूम जाव केलं.
Airport मध्ये शिरायचा अवकाश..गौतमला त्याचा व्हिसा झाल्याची बातमी मिळाली आणि आमच्या आनंदात भर पडली. त्याने कुवेतची तिकिट ऑफिसला कनफर्म करायला सांगितली. एका तासात दारेसलामला पोहोचलो. पण Bad Luck काही पाठ सोडायला तयार नव्हतं. आमची bag गायब होती. Complaint फॉर्म भरून आणि bag मिळाली नाही तर कॉमपेन्सेशन क्लेम करायची धमकी देऊन आम्ही चडफडत हॉटेलला आलो. पण Good Luck आणि Bad Luck यांचा पाठशिवणीचा खेळ चालूच होता. दुसर्या दिवशी आम्हाला bag परत मिळाली आणि आम्ही ती घेऊन कुवेतला जायला चेक इन केलं. बोर्डिंग पास मिळायला तसेच immigration clearance ला गौतमला परत त्रास झाला. पण शेवटी कुवेतला सुखरूप पोचलो एकदाचे आणि जीव भांड्यात पडला.
टांझानियाला जरी फिरून Tan झालो, डोक्याने तणतणलो तरी एकंदर ट्रीप मात्र एकदम टणाटण झाली. कभी ख़ुशी कभी गम च्या see -saw वर बसून केलेली ही टांझानियाची ट्रीप आम्हाला दोन टोकाचे अविस्मरणीय अनुभव देऊन गेली. ते एक वेगळंच थ्रील होतं. आयुष्यात आपण थ्रील नाही अनुभवलं तर ते मिळमिळीत रहातं. वाईट अनुभव आपल्याला खंबीर बनवतात आणि चांगले प्रसंग आपल्या गोल्डन मेमरीज बनून आयुष्यभर साथ करतात. हे टांझानिया टशन असंच माझ्या मेमरीमध्ये राहणार आहे...जन्मभर. आशा करते की ही कागदावरची टांझानिया टूर तुम्हालाही आवडली असेल आणि तुमच्याकडून टांझानियाच्या टूरिझमला हातभार लावेल .
चीअर्स!!!
सौ. मुग्धा गौतम सरनाईक
Photos at :
Video Links :
सौ. मुग्धा गौतम सरनाईक