शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

माझी मराठी  ....  राघव साडेकर Mr. Raghav Sadekar

जागतिक मराठी भाषा दिवसाच्या सर्वाना, हार्दिक शुभेच्छा !

मला गर्व आहे की मी मराठी आहे. पण नुसता गर्व असून चालणार नाही, तर आपली भाषा जिवंत ठेवायचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. या आपल्या मायबोलीला आपल्या नसानसात भिनवली पाहिजे. आजचा हा कार्यक्रम असाच एक प्रयत्न आहे.

आपली मराठी भाषा आपल्याला आपल्या आई कडून मिळते, म्हणून ती मायबोली होते. 

आपल्या माय-मराठीला अनेक रत्नांनी खुलवली आहेत, ज्या मध्ये किती तरी संत, कवी आणि साहित्यिकांची वर्णी लागते. या सरस्वतीचा उपसकामुळे आपली मायमराठी प्रगल्भ झाली आहे. अंतरा अंतरावर मराठी ची गोडी अजून वाढत गेली, प्रत्येक राज्यात मराठी ला वेगळे वळण दिले गेले, पण मूळ प्रवाह एकच राहिला. प्रत्येक राज्यातील मराठी भाषिकांनी गद्ययातून व पद्यातून तिला असाधारण महत्व दिले – तुकारामांचे अभंग सुद्धा गोड साध्या मराठी भाषेतले, तर बहिणाबाईचे खानदेशी अहिरणी भाषेतल्या ओव्या ही तेवढ्याच गोड; भाषा एक, पण त्यातला गोडवा किती वेगळा...

आज या मराठी भाषा दिनाचे एक वेगळे महत्व म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार ने सम्मानित आपले वी.व.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस, म्हणजे दुग्धशर्करा योगच. माननीय तात्यासाहेब शिरवाडकरानचा “विशाखा” हा काव्यसंग्रह आणि “नटसम्राट” हे नाटक आपण विसरूच शकत नाही, तर अशा या सरस्वतीचा उपासकाचा जन्मदिनी आपण सर्वजण मिळून, आज कुवेत मध्ये हा मराठी दिन आपण आनंदानी साजरा करत आहोत आणि दरवर्षी असेच सुरु ठेवण्याचा प्रयत्न करूया.

माझे एकच म्हणणे आहे कि, इतर भाषानवर जरूर प्रेम करा पण भावना व्यक्त करताना मायबोली मराठीचाच उपयोग अवश्य करा. 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

माझे गाव



माझे गाव ...दिलीप सावंत
अमेरिकेतल्या आर्थिक मंदीच्या सुरुवातीचा काळ. तिथे स्थायिक असलेल्या माझ्या मित्राशी मी बोलत होतो. संजीव आणि मी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र होतो. पदवी प्राप्त केल्यानंतर जवळ जवळ सतरा वर्षांनी संजीवचा संपर्क झाला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने अमेरिकेत येऊन M.S. केले आणि नोकरीत अगदी उच्च पदापर्यंत पोहोचला होता आणि आता मंदीचा त्यालाही फटका बसला होता. संजीव सांगत होता तो आता भारतात जायचा विचार करतोय. मला थोडे आश्चर्य वाटले आणि अवघड ही. अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना भारतात कसे जुळवून घेता येईल वगैरे.
तेव्हा माझ्या मनात सहज   आलेला प्रश्न मी त्याला विचारला होता “संजीव, भारतात तुझे गाव कुठे?”. त्याचे तेव्हाचे उत्तर मला खोलवर लागले होते. “दिलीप, वडील शासकीय नोकरीत असल्याने दर दोन तीन वर्षांनी बदल्या होत गेल्या, नवीन ठिकाण-नवीन शासकीय निवास स्थान- नवीन शाळा, अशी आमची गावे बदलत गेली. आता मला जाणवतेय की सांगावे असे मला माझे गावच नाही.”
मी ही कल्पनाच करू शकत नव्हतो. गाव कसे मनात आणि उरात कोरलेले असते.
माझे बालपण कोंकणातल्या गावात गेलेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझे गाव. घराच्या पुढच्या दारात उंबरठ्यावर  सकाळी बसल्यावर समोर दिसणार्या सह्याद्रीच्या उंच कड्याने आयुष्यात नेहमीच कणखर बनण्यासाठी प्रेरणा दिली. शेतातून पायपीट करत शाळा गाठताना शेतातल्या बांधांनी तेव्हाच आयुष्यात पुढे येणाऱ्या चढ उतारांची तयारी करून घेतली.
गावातली झाडे तर अशी लक्षात राहिलीत-“झाडे सावली देतात .. झाडांचे संदर्भ प्रवासात दिशा देतात .. तळ्याकाठची झाडे अंतर्मुख करतात .. माळरानावरची झाडे उन्हात करपतात; क्षितीज उलगडतात.. ...डोंगरातली झाडे खंबीर असतात .. झाडे सावली देतात; झाडे जीव लावतात..वय वाढून मोठे झाल्यावर आणि गावापासून दूर राहायला लागल्यावर माणसांच्या गर्दीत माणूस शोधताना या झाडांनीच घालून दिलेले मापदंड उपयोगात आले.
भावंडांबरोबर नदीत डुंबत घालवलेल्या सुट्ट्या, पावसाळ्यातल्या एखाद्या अतिवृष्टीच्या दिवशी नदीच्या किनार्यावर उभे राहून त्याच नदीचे रोद्ररूप बेभान होऊन बघत घालविलेले तासन तास आजही किनार्याचे भान ठेवायची शिकवण देतात. कधी कधी शाळेतून यायला उशीर होणार असला की आजोबा शाळेपाशी सोबतीला थांबायचे... म्हणे वाटेवरच्या त्या झाडावर भूतांचे वास्तव्य असायचे, पण विशेष असे की  आजोबांनी नेहमी असेच सांगितले होते “त्या झाडावरचे भूत जागे असते आपल्याला सोबत देण्यासाठी”.
तर असे हे गाव ..आठवणीतले  माझे गाव.
सहा महिन्यांपूर्वी भारतात गेलो होतो तेव्हा संजीवला भेटायला गेलो.
संजीव गेली दहा वर्षे औरंगाबादला असतो. संजीवच्या घरी एक दिवस मुक्कामाला होतो. त्याची मुलगी कत्थक नृत्य शिकलीय. मुलगा तबला वाजवतो. ज्या गावात संजीवचा भाऊ आणि त्याचे कुटुंब स्थाईक आहेत. आणि संजीव सांगत होता त्याच्या मुलांना आजी आणि आजोबांसोबत सुद्धा वेळ घालवायला मिळाला. त्याच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. त्याने त्याच्या मुलांना ‘त्यांचे गाव’ दिले होते.
प्रत्येकाला असते एक गाव .. त्याचे गाव .. माझे गाव .. जिथे नाही फक्त आपली माणसे असतात तर तिथला निसर्ग सुद्धा तेव्हढाच आपला असतो.