सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

बायको म्हणजे..... बायको असते

बायको म्हणजे ....बायको असते 
नवीन नवीन लग्न झाल्यानंतर तर सासू सासर्‍यांच्या आज्ञेत आणि नवर्‍याच्या गळ्यातला ताईत असते.
उठता बसता विचारपूस करते.  आल्या गेल्यांचे कसे छान स्वागत करते
नवर्‍याकरता वटपौर्णिमा, हरतालिका सारे उपास तापास करते
अहो, सासरच्यांना तर तिचे किती कौतुक असते.
काहींची माधुरी, काहींची ऐश्वर्या तर काहींची अगदी "गाडीत गाडी डेक्कन क्वीन,  .... माझी ब्युटी क्वीन असते.
नवर्‍याच्या फसलेल्या प्रेमप्रकरणातील ती पूर्वाश्रमीची मैत्रिण, तिच्यापुढे पार फिकी वाटते
त्याला अगदी हवी तशी मिळालेली ती छान मैत्रिण असते.
एक-दोनच वर्ष लोटतात, बायको सर्वांगाने स्थिरावलेली असते, आत्तापर्यंत तिला घराचा पूर्ण अंदाज आलेला असतो, मग ती आपली मूठ आवळायला लागते आणि मग.....
मंडळी, बायको म्हणजे मास्तरीण होते
ती रोज नवर्‍याची शाळा घेते.
हे असंच का ? ते तसंच का ? मीच का? मलाच का ?
सगळ्यांनी तिच्यापुढे नांगी टाकलेली असते, पण तिच्या मते ती अबला, घरातली कामवालीच असते.
होच मुळी.  ती कशी गोड बोलून सगळ्यांकडून मस्त कामं करवून घेते. 
आता ती नेहमीच मुलांची आई आणि कधीतरीच नवर्‍याची असते.
मंडळी, बायको म्हणजे....बायको असते.
नवरा बायकोच्या भांडणात पाहुणे रावळे, लग्न समारंभ, मानापमान, माहेरचे नातेवाईक आणि मुलांच्या मार्कांची फोडणी पडते.
क्रिकेट बंद, मित्र बंद, पार्ट्या बंद.
घरात तिचीच अधोरेखित संचारबंदी असते.
एकच  असल्याने, नवर्‍याचेही तिच्यावाचून अडणारे असते. त्यामुळे प्रत्येक युद्ध जिंकणारी ती रणरागिणी ठरते.
पुढे काही वर्ष अशीच काढल्यावर देघेही परिपक्व झालेले असतात.
मुलंही मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागलेली असतात आणि मग......
मंडळी...बायको म्हणजे.........बायको असते.
कितीही झालं तरी वृद्ध सासू-सासर्‍यांची ती काळजी घेते.
मुलांनी शिक्षण, नोकरीसाठी घर सोडले तरीही तिचे चित्त पिल्लांपाशी असते
कष्ट, काटकसर करत संसाराची घडी तिने बसवलेली असते.
आता ती खर्‍या अर्थाने नवर्‍याची सहचारिणी असते.
पुढे बहुतेकदा दोघांच्याही आई-वडीलांचे छत्र हरपलेले असते.
मुले दूरदेशी आपल्या नोकरी धंद्यात, संसारात मग्न असतात.  नातेवाईक आपापला संसार रेटत असतात.
तेव्हा दोघांना एकमेकांचा आधार सुखावत असतो. 
स्वत:ची विसरुन ती नवर्‍याच्या पथ्याची, औषधाची रोजच आठवण करुन देते.  
हल्ली तिची झोप कमी झालेली असते.  मधेच उठून नवर्‍याच्या छातीवर हात ठेवते.  त्याचा श्वास ठीक चाललाय कळल्यावर समाधानाने डोळे मिटते.  नवराही जागाच असतो.  आपलं भाग्य म्हणून आपल्या सोबत आपला जोडीदार अजूनही आहे याचे त्याला समाधान असते.
मंडळी,  अशीही तरुणाईतली पट्टराणी, संसाराची सारथी आणि म्हातारपणीची काठी... बायको म्हणजे..... बायकोच असते.


मधुसूदन मुळीक

२ टिप्पण्या: