बुधवार, २५ मे, २०११

आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलॅंड - भाग २


आमच्या या १३ दिवसांच्या टूरचे मुख्य आकर्षण होते, अरुणाचल प्रदेशमधील तवांग. नामेरीहून आम्ही निघालो, ते साधारण ३६५-३८० कि.मी. वर असलेल्या तवांगला जायलाच. परंतु हा सर्व प्रवास डोंगराळ प्रदेशातून होता. रस्तेही कच्चे आणि खराब होते. त्यामुळे नामेरीपासून १८० कि.मी. असलेल्या दिरांग या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता. आम्ही आसाम-अरुणाचलच्या बॉर्डरवरील भालूकपॉन्ग या गावी पोहोचलो. दुपारचे साधारण १२ वा़जले होते. पुढच्या प्रवासात हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने आम्ही इथे जेवून घेतले.  इथे आमची Inner Line Permits तपासण्यात आली. सगळ्या गाड्यांची नोंदणी करण्यात आली, आणि आम्ही अरुणाचलमध्ये प्रवेश केला. इतका वेळ दूर दूर दिसणारे डोंगर आता जवळ दिसायला लागले. हळूहळू चढावाला सुरुवात झाली.  नागमोडी वळणाचे रस्ते सुरू झाले. त्यामुळे गाडीचा वेग बराच मंदावला. सुरूवातीला चांगले असणारे रस्ते आता आपले खरे स्वरूप दाखवायला लागले. अरुणाचल प्रदेशात पाण्याचे स्त्रोत विपुल प्रमाणात आहे. डोंगरातून हे पाणी ओहोळ, झरे या स्वरूपात सारखे रस्त्यांवर येत असते. हे पाणी आपल्याबरोबर माती, लहान दगड घेऊन येते.  त्यामुळे रस्त्यावर कायम चिखल होतो. कितीही चांगले रस्ते  काही काळानंतर खराब होतात. आपले BRO (Border Road Organisation)  हे रस्ते नीट ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असते. आधी एवढ्या अवघड डोंगररांगातून रस्ते तयार करणं हे शिवधनुष्य पेलल्यासारखे आहे. BRO ला त्यासाठी शेकडो सलाम! एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला दरी, मधोमध रस्ता. सगळीकडे हिरवीगार गच्च झाडी दिसत होती. मधे मधे रानकेळी फोफावल्या होत्या. पोपटी हिरव्या पासून गर्द हिरव्या रंगाच्या विविध छटा बघायला मिळत होत्या. जिथे नजर टाकावी तिथे हिरवा शेला ल्यायलेले डोंगर दिसत होते.



जसे जसे आम्ही वर जात होतो, तशा पलिकडच्या डोंगररांगा नजरेस पडायला लागल्या. आजचा प्रवास जरी १८० कि.मी.चाच असला, तरी त्याला ८ तास लागणार होते. २-३ तास प्रवास झाल्यावर चिन्मयने सहजच आमच्या driver ला विचारले, दिरांग नक्की कुठे आहे? आमचा driver अगदी सहज म्हणाला, ' ये सामने का पहाडी है नाये पार करनेका, उसके बाद  और दो पहाडी आएगा...वो भी चढके उतरने का, उसके बाद एक पहाड चढने का...बस...दिरांग आ जायेगा | '  हा भयंकर पत्ता ऐकल्यावर काकांनी विचारले..'आगे का रस्ता भी ऐसा ही है?' तेव्हा अगदी उत्साहाने कोलीदा (आमचा driver) वदले...'नही, नही...इससेभी खराब है!' रात्री पाठीच्या कण्याची काय हालत होणार आहे याचा अंदाज बांधत सगळे गप्प झाले! 

या सर्व रस्त्यावर आपल्याला एरवी दिसतात तसे धाबे वगैरे काहीही नव्हते. गावेही फारशी लागत नव्हती. आर्मीचे कॅम्प्स मात्र बर्‍याच ठिकाणी होते. वाटेत न्याकमडाँग वॉर मेमोरिअल बघायला थांबलो. त्या वॉर मेमोरियलच्या बाहेरचा बोर्ड वाचून डोळ्यात पाणी आले.



आम्ही प्रवास करत असलेला अरुणाचल प्रदेश मधील सगळा भाग १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनच्या ताब्यात गेला होता. चीनची बॉर्डर जवळ असल्याने, आणि अतिसंवेदनाशील भाग असल्याने त्या भागांमध्ये फोटो काढण्याची परवानगी नव्हती.

सुर्यास्त लवकर झाला, त्यानंतरचा प्रवास काळोखात असल्याने, कंटाळवाणा वाटायला लागला. कोलीदा मजेत गाडी चालवत होता. मी आणि चिनू काहीतरी बोलत होतो. मग हळूहळू आशाताई आणि गोंधळेकर काकाही त्यात सामिल झाले. पुढचा एक- दीड तास मस्त गप्पा रंगल्या. बोलण्याच्या नादात दिरांग कधी आले ते कळलेच नाही. संध्याकाळचे ७ वाजले होते. हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा पाठीचे पार भरीत झाले होते.  हॉटेलची रूम एकदम मस्त होती. खूप मोठ्ठा राउंड बेड, भरपूर उश्या, उबदार क्वील्ट्स.  सामान रूममध्ये टाकून जेवणासाठी बाहेर आलो.  हॉटेलचे आवार सोडले तर बाकी सर्व मिट्ट काळोख होता. पण वाहत्या पाण्याचा खळाळता आवाज येत होता, त्यावरून नदी जवळच आहे एव्हढे समजत होते.  रात्र जशी वाढत होती, तशी थंडीदेखील वाढत होती. जेवणाची व्यवस्था बाहेरच्या अंगणात केली होती. गरम गरम सूप आणि इतर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन रूममध्ये गेलो. हीटर लावून क्विल्टमध्ये शिरलो. सकाळी खूप लवकर जाग आली. वेटर गरमागरम चहा घेऊन आला. चहाचा tray घेण्यासाठी दरवाजा उघडला आणि समोर हे दृष्य दिसले.



चिनूला हलवून जागे केले. म्हटलं, उठ लवकर, बाहेर बघ डोंगर किती मस्त दिसतोय. तो बिचारा उठला...एव्हढ्या थंडीत कशाला इतक्या लवकर उठवते ही आई!  डोंगर काय पळून जाणार आहे का थोड्या वेळाने उठलो तर...असे पुटपुटत, डोळे चोळत बाहेर बघितले आणि झटकन तयार होऊन कॅमेरा घेऊन बाहेर पळाला.
हॉटेलच्या अंगणात खूप छान ऊन पडले होते. सगळे जण त्या ऊन्हात ऊबेला बसले. मग हॉटेलच्या व्यवस्थापकाने न्याहारीची व्यवस्था तिथे अंगणातच केली.  त्यावेळी चिन्मयचा कॅमेरा चुकून माझ्या हातात आला...आणि मी लगेच त्याचाच फोटो काढला. 


आजचा पूर्ण दिवस प्रवासाचा होता. दिरांग ते तवांग व्हाया सेलापास! आम्हाला सेलापास चे खूप आकर्षण होते. वाटेत एक गाव लागले. त्या गावात सगळ्या घरांच्या सज्जात मक्याची कणसे अशी साठवणीला ठेवली होती.


वाटेत एक सुंदर नदी लागली. त्यावर एक मस्त ब्रिज! अगदी पोस्टर सारखे दिसत होते. तिथे थांबल्याशिवाय पुढे जाणेच शक्य नव्हते. खाली उतरून नदीकिनारी गेलो. नदीच्या पाण्यात हात घातला तर अंगातून शिरशिरी गेली... पाणी इतके थंड होते. माझ्याकडे टँगची भरपूर पाकीटे होती. मग नदीचे पाणी भरून घेऊन मस्त सरबत बनवले. आणि सगळ्यांनी प्यायले.


चिन्मय एक ओढा पार करून फोटो काढायला पुढे गेला. मीही मग त्याच्या मागून गेले. ह्या आया ना, सुखाने काही करू देत नाहीत मुलांना! ...काय गरज होती त्याच्या मागून जायची?  ओढा पार करताना माझा अंदाज चुकला आणि माझा एक पाय त्या थंडगार पाण्यात घोट्यापर्यंत बुडला. माझा बूट, आतले वूलन सॉक्स, आणि जीन्स्...त्या थंडगार पाण्यात पार भिजले! आधीच हवा एकदम चिल्ड होती...त्यात हे नसती आफत ओढवून घेतली! शांतपणे चिन्मयचे काळजीयुक्त फायरींग ऐकून घेतले. कारण त्यानंतर आम्ही सेलापासला जाणार होतो जिथे सहसा टेम्परचर सब झिरो असते आणि वेगाने वारे वाहत असतात! अशा भिजलेल्या अवस्थेत तिथे जाणे म्हणजे इन्फेक्शनला आमंत्रण देण्यासारखे होते!
मग गाडीत चिन्मयने तो भिजलेला बूट वर्तमानपत्रात गुंडाळून दाबून त्यातले पाणी पिळून काढले!  सॉक्स बॉनेट्वर ठेवला...काय काय उद्योग केले! आमच्या सामानात एक्ट्रा सॉक्स होते, पण सगळ्या बॅगा गाडीच्या कॅरीयरवर ठेवल्या होत्या आणि पावसाने भिजू नयेत म्हणून वरून प्लास्टिकच्या मोठ्या कापडाचे आवरण घातले होते. त्यामुळे ते काढणे फार त्रासदायक होते! मग काय.. एका पायाला प्लास्टर सारखी शाल गुंडाळून गपचूप बसले गाडीत! जबरदस्त थंडी वाजायला लागली! 

आताचा रस्ता जास्त वळणांचा आणि चढावाचा होता...त्यात पाऊस सुरू झाला...पुन्हा एकदा कोलीदाच्या driving skill ला दाद देत जमेल तसा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. मनात विचार आलाकुवेती लोक सरळ गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवताना निष्काळजी driving मुळे इतके अपघात  करतात! जर अश्या रस्त्यांवरून गाडी घेऊन जायची असेल तर, सेलापास पर्यंत कितीजणं पोहोचतील, कुणास ठाऊक!

क्रमशः

अश्विनी देवस्थळी