On the occasion of Kuwait's National day
२००० साली भारतातील १८ वर्षाची शासकीय नोकरी सोडून स्वतःला ग्लोबल जगाला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. हातात अमेरिकेचा एच वन बी व्हिसा असताना अचानक आलेल्या कुवेत मधील नोकरीच्या संधीला होय म्हणालो.
कारण हि तसेच होते. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारामुळे महिन्याच्या शेवटाला कराव्या लागणाऱ्या गोळाबेरजेला कंटाळलो होतो. त्यात अमेरिकेत भराव्या लागणाऱ्या भरमसाठ करांची कल्पना होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतला चुलत भाऊ म्हणाला होता "एकदा अमेरिकेत आलास कि तू कुठेच जाणार नाहीस .. त्यापेक्षा गल्फ मध्ये काही वर्षे काढून नंतर इकडे ये".
आता इथे कुवेत मध्ये एक तप उलटून गेले. आता उलट अशी म्हणायची वेळ आलीय कि "कुवेत मध्ये एकदा पाय ठेवला कि इथून पाय निघणे अशक्य आहे"..... कुवेत एवढे स्वास्थ देते.
मुंबईतून निघताना डोक्यात बरेच प्रश्न रेंगाळत होते -
-- बायको मुलांना आपल्याजवळ येण्यात किती वेळ लागेल ?
-- तुलनेने छोटे पगाराचे दिनार मधील आकडे ...आपल्या हाती काही उरेल का ?
-- वाळवंटात आपले मन रमेल का ?
-- इतकी वर्षे शासकीय नोकरीत घालवल्यावर परदेशातील नोकरीत आपला तग लागेल का ?
-- ब्यांकेचे कर्ज , मित्रांची उधारी
-- कौटुंबिक आयुष्य, घरगुती जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण , आणि एकंदरीतच आपले भविष्य ... असे अनेक प्रश्न
मला आठवतो १४ मे २००० चा दिवस. ऑफिसच्या गाडीत बसून कुवेत विमानतळावरून निघाल्यावर रणरणत्या उन्हात तापून गरम झालेल्या गाडीत लागलेली जळजळीत धग... पण खर सांगू .. जशी पाच मिनिटात ती क्याम्री गाडी एअर कंडीशनर्ने थंड करून टाकली, तसेच काही, माझ्या डोक्यातले सारे प्रश्न एक एक करत कधीच लोप पावले.
मी मुळचा कोकणातला. त्यामुळे कुवेत मधील सुंदर समुद्र बघून प्रथम दर्शनीच एकदम हायसे वाटले. या समुद्रासार्खीच विशाल हृदयाची काही माणसे अगदी सुरुवातीलाच भेटली आणि या शहराने मला नकळतच कधीच आपलेसे करून टाकले काही समजले नाही.
कामावरच्या कुवेती मुदीरने (म्यानेजर) माझ्या मुलाखती दरम्यान दिलेल्या शब्दाला जागत कुटुंबासाठीचा व्हिसा एका महिन्यातच माझ्या हाती दिला. गल्फमध्ये ड्रायविंग लायसेन्स मिळवणे किती अवघड आहे याचे बरेच किस्से कानी आले होते, पण तीन महिन्याच्या आतच ड्रायविंग लायसेन्स हाती आले.
मुंबईत रोजच तीन चार तासांचा बस ट्रेन चा प्रवास, त्यातून होणारी जीवाची घालमेल ... आणि आता ऑफिस साठी फक्त २० मिनिटांचा प्रवास .. आणि तोही सुरेख गल्फ रोड चा आस्वाद घेत.
सुरुवातीला विशिष्ट पेहराव आणि विशिष्ट अशी भाषेची लकब यामुळे परके वाटणारे ऑफिस मधील कुवेती सोबती काही दिवसातच मऊशार हिरवळीसारखे वाटू लागले.
कोकणातल्या एका खेडेगावात बालपण गेलेले. आईवडील आणि भावंडासोबत फक्त कष्टाचे दिवस बघितलेले. एस एस सी ला बोर्डात, अभियान्त्रीकेची पदवी विशेष प्राविण्यासह ... भारतातल्या अठरा वर्षांच्या नोकरीत एकच खंत मनाला निराशा द्यायची ... एवढे शिक्षण घेऊन सुध्धा मी माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थेर्य देऊ शकत नव्हतो.
आज कुवेतमधील एका तपाच्या वास्तव्यानंतर मी स्वतःला खरोखर धन्य मानतो आणि कुवेत बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आयुष्यातली बहुतेक सारी स्वप्ने फक्त आणि फक्त कुवेत मुळेच शक्य झाली. ब्यांकेचे कर्ज फेडले, मित्रांची देणी दिली, गावात घर झाले, जे मला शक्य झाले नव्हते ते अमेरिकेतील शिक्षणाचे स्वप्न मुलांच्या मार्फत पुरे केले ... आणि असे बरेच काही ...
कधी कधी वाटते ... या कुवेतचे आणि आपले काही तरी पूर्व जन्मीचे कृनानुबंध असावेत ... त्या शिवाय काय कुवेत ने माझ्या आयुष्याला एवढा आधार दिलाय?
दिलीप सावंत |