शुक्रवार, ८ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग- ८)

वाड्यात आमच्या बिल्डींग मधले इतर शेजारी होते लेले, दिवाण, भिडे आणि रामचंद्र व वसंत पळसुले हे बंधू. दिवाणांकडच्या एका घटनेने आम्हा भावंडांना नवीन काम लावून दिले. त्यांच्या प्रकाशचे लग्न होते, ते सगळे बाहेर गावी असताना रात्री त्यांचे घर फोडले, बराच ऐवज चोरीस गेला. ह्या चोरी नंतर वाड्यातले कोणीही घर बंद ठेवून गावाला निघाले की आम्हाला "सुपारी" द्यायचे. अहो "सुपारी" झोपायची, घर सांभाळायची. सुरुवातीला अण्णा जायचा. तो नोकरीला लागल्यावर मी जायला लागलो. असे जवळ जवळ सगळ्यांच्या घरात मी झोपलो आहे. ह्यात पण व्यक्ती तितक्या प्रकृती! काही जण सांगायचे, 'घरात फ्रीज मध्ये फळं आहेत, खा तुला हवी तर', काही जण फ्रीजला कुलूप लावायचे, असे बरेच अनुभव आले.

हनुमान स्टोअरवाले 'भिडे' हेही आमचे शेजारी, त्यावेळी हनुमान स्टोअर हे स्टेशनला लागून असलेले प्रसिद्ध दुकान होते. त्यांच्याकडे सगळ्या वस्तू मिळायच्या आणि अशी दुकानं डोंबिवलीत तेंव्हा फार थोडी होती. भिड्यांचा राजू फार तडतड्या होता, बाबांना खूप घाबरायचा. त्याने मस्ती केली की त्याचे बाबा त्याला उचलून दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून 'खाली टाकेन' म्हणून लटकवत धरायचे. राजूच्या आई खूप साध्या होत्या, त्यांना भिडे काका कायम अक्का (अक्काबाई) म्हणूनच बोलायचे.

वाड्याच्या गेट जवळ, एका छोट्या लाकडी खोपटात तारे काका रहायचे. वाकेन पण मोडणार नाही! अशा स्वभावाचा हा माणूस. ते सुतारकाम करायचे, परिस्थिती कठीण म्हणावी अशीच. त्यांचा घटस्फोट झाला असावा, ते वाड्यात आणि बायको अंबरनाथला रहायची. तारे काकांनी हट्टाने मुलींचा ताबा घेतला होता. पिंकी आणि मनी ह्या मुली, पिंकी माझ्या पेक्षा ५-६ वर्षांनी लहान आणि मनी त्याहून. तारे काकांना कसला ताठा होता माहित नाही, ते त्यांच्याच तोऱ्यात असायचे. बिचाऱ्या मुली! ना बालपण अनुभवता आले ना कधी त्यांचे लाड झाले. त्या शाळेतही गेल्या नाहीत, पण बहुदा घरी त्यांच्या त्या शिकत असाव्यात, त्यांना लिहिता वाचता यायचे. पिंकी अगदी लहान असल्यापासून घरातली सगळी काम करायची, आणि मनी तिला मदत करायची. परिस्थितीने दोघींना लहानपणीच खूप मोठं केलं होतं. दसरा दिवाळीलाही ना गोड धोड, ना नवीन कपडे, दया यायची आणि आम्हीच फराळाचे वगैरे द्यायचो. त्या दोघी आमच्याकडे टी.व्ही. बघायला यायच्या, त्याही घाबरत घाबरत, त्यांना तारे काकांनी खूप धाकात ठेवले होते. आम्ही काही खायला दिले तर भीतीने खूप आग्रह केला तर घ्यायच्या, पण खुश व्हायच्या. त्यांना इतर मुलां प्रमाणे कपडे, खेळणीच काय, मुलभूत असे शिक्षण, आईचे प्रेमही मिळाले नाही. त्यांची आई शिक्षिका होती, चार पाच वेळा त्यांना भेटायला आल्याचे बघितले होते. असे म्हणू नये, पण मुलींचे सुदैव ! पुढे तारे काका आजारी पडले आणि त्यातच गेले. मुलींचे दिवस फिरले, आई त्यांना आपल्याकडे घेऊन गेली. मुलींना शाळेत घातले, बहुदा पिंकी ने बाहेरून दहावी केली असावी. दोन तीन वर्षात तिचे लग्न झाल्याचे कळले.

अजून अशीच एक लक्षात राहिलेली व्यक्ती म्हणजे, सुरवातीच्या भागात उल्लेख केलेल्या मालकांच्या बंगल्याच्या जिन्याखालचा भाडेकरू 'मल्लू'. तो लक्षात आहे एका अजब घटनेमुळे. मंडळी, माणसाचं मरण कसं, कधी, कुठे येईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात. अगदी ते ही अनुभवलं ह्या वाड्यात. झालं काय तर ह्या मल्लूची म्हातारी आई आली होती गावाहून, कन्नडहून. वाड्यात आमची बिल्डींग, मध्ये विहीर आणि पलीकडच्या बाजूला नारळाच्या झाडाचा पार होता. मल्लूची आई उन्हाला ह्या पारावर बसली होती. एका नारळाने तिचा घात केला, तो झाडावरून पडला तो बरोबर तिच्या डोक्यावर, आणि मल्लूची आई तिथल्या तिथे गेली. काय काय पाहिलंय? मालकांचा नोकर मोहन, त्याचे रोज दारू पिऊन बायकोशी भांडण, ह्या भांडणाला वैतागून एक दिवस तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले, आणि तशी पेटलेली जोर-जोरात ओरडत घरातून अंगणात धावत आली. सगळेच घाबरले, तिचा दीर कृष्णा आणि मोहन ने तिला पकडून विझवले. पुढे ती वाचली, मोहनचे पिणे ही थोडेफार कमी झाले. मुलं शिकली, नोकरी व्यवसायाला लागली.

मंडळी माझ्या सदराच्या ह्या सरत्या भागात काही गोष्टी नव्याने आठवत आहेत. विहिरीत गळ टाकायची मजा! वाड्यातल्या विहिरीत बादली पडली की हा गळ टाकून ती शोधायची. बरेचदा बादली गळाला लागयचीही. विहीरीचं पाणी खराब झालं म्हणून पंप लावून पूर्णपणे उपसलेलीही बघितली आहे, तेंव्हा विहिरीचे जिवंत झरे बघितले होते आम्ही भावंडांनी शेण गोळा करून घरा मागचे अंगण सारवले आहे. मालकांच्या काकी, त्यांचे काहीश्या आजाराने कायम उचक्या देणारे वयोवृद्ध काका, लेले आजी त्यांच्या घरात आलेले बुवा, वसंत काकांचे रमी आणि ब्रिजचे डाव त्यांच्या सौ. शीला वाहिनींचे भजनी मंडळ, आमच्या बरोबर वरती राहणारे पळसुले काका, त्यांचे अचानक जाणे, मुलाने कलेवराचेही काढलेले फोटो, वाड्यातले खूप जुने भाडेकरू अध्यापक, घर काम मागायला येणारी, शेवग्याच्या शेंगा विकणारी जंगली, मोहन खोबरे आणि आगरथडे ही कुटुंब सगळे काही आठवते आहे.

वाडा माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग तर आहेच पण त्याच बरोबरीने आमच्या मागची अंबिका बिल्डींग आणि त्यातले गुर्जर, आशा मावशी, बच्चा काका ह्यांचाही सहभाग मोठा आहे. खूप इच्छा असूनही जाणीवपूर्वक हे सदर मी वाड्यापुरतं मर्यादीत ठेवले आहे. ह्या "वाडा आठवणींचा" ने मला पुन्हा एकदा बालपणात नेले. साधारण तीस वर्षापूर्वीचा काळ, व्यक्ती मी आत्ता नव्याने अनुभवल्या. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या एका साधारण माणसाचे बालपण कागदावर उमटले. माझे मला समाधान मिळाले.

माझ्या या साप्ताहिक सदर लिहिण्याच्या प्रयत्नाला खूप जणांचा हातभार लागला. सौ ने त्रागा न करता लिहिण्यास फुरसत दिली, टंकलेखन केले, 'काही ही काय लिहिता' म्हणून पाय ओढले नाहीत. भावंडांनी, वाड्यातल्या काही शेजाऱ्यांनी खूप प्रोत्साहन दिले, काही आठवणी जाग्या करून दिल्या. मंडळाने माझे सदर प्रकाशित करण्याचा धोका पत्करला. विशेषतः कार्यकारी समितीतील सौ. दीपिका जोशी आणि सौ. स्मिता काळे ह्यांनी लेखनातील चुकून राहीलेल्या चुका दुरुस्त केल्या, वाचकांनी लेखी, फोनकरून, समक्ष भेटून प्रतिक्रिया दिल्या, प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे.

धन्यवाद!

(समाप्त)

मधुसूदन मुळीक
















शुक्रवार, १ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग-७)

मंडळी हल्ली आपण आपल्या आजू बाजूला कित्येक "कोषातली" कुटुंब बघतो. "कोषातली" म्हणजे, मी आणि माझं कुटुंब असे. स्वतःला आपल्याच कोषात गुरफटून घेतलेली. अशा लोकांनी स्वतःला आपल्याच कुटुंबातल्या तीन चार जणांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं असतं. आनंद उपभोगायचा, दुख वाटून घ्यायचं तेही अगदी आपल्याच कुटुंबात. आजू बाजूचे कसे आहेत?, कोणाची विचारपूस करावी हे काहीही नाही. कधी कधी विचार येतो, ह्यांना असं वाटतं का? की आपल्याला कोणाचीच गरज नाही आणि कधी लागणारही नाही, की खरंच त्यांना कोणाची गरज लागतच नाही! कधी कोणाकडे भेटले की देखल्या देवा दंडवत, "काय कसे काय?" पण भरभरून बोलणं, मन मोकळं करणं, काही गोष्टी सांगणं, विचारणं, सल्ला देणं/ घेणं नाहीच. आपण बरं अन्आपलं घर बरं, अशी कुटुंब हल्ली सर्रास दिसतात. असेच एक कुटुंब आमच्या वाड्यातही होतं बरंका! पळसुलेंचे शेजारी, वेदक. कुटुंबमोठं असुनही ह्याचं वागणं कोषातलं. बघा हं त्यांच्याकडे कोण कोण होतं ! भाऊ, त्यांची पत्नी भाभी, भाऊंचे लहान बंधु भाई; (भाईंची पत्नी आम्हीवाड्यात रहायला जाण्यापूर्वी बरीच वर्षे आधी गेल्याचे समजले होते) ह्या दोघांची मुलं मीना, अशोक, वंदना, शोभा, रंजना, दीपक, साधना, विवेक, मिलिंद, विकास, मेधा. हा क्रम चुकला असण्याची दाट शक्यता आहे कारण, एकतर हे सगळे वेदक "कोषातले" होते त्यामुळे फार बोलणे, घरी येणे जाणे नसायचे. दुसरे म्हणजे ही सगळी भावंडं माझ्या पेक्षा खूप मोठी होती, मला ह्या सगळ्यांची नावं लक्षात राहिली याचेही काहींना नवल वाटेल. वेदकांचे भाऊ कडक शिस्तीचे होते. घरात एवढी मुलं पण घरात कोणी खेळतंय, दंगा मस्करी चालू आहे असं कधीच बघितलेले आठवत नाही. वाड्यातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, मुलं कधी कोणाशी खेळायला आली आहेत, गप्पा मारत आहेत, कध्धीच नाही. कोण कितवीत आहेत, काय शिकत आहेत, कुठे नोकरी करतात सगळेच गूढ, कोषातले असल्याने कोणी भानगडीतही पडायचे नाही. त्यातल्या त्यात मेधा,विकास आणि मिलिंद ही धाकटी भावंडं कधी कधी बघून हसायची, जुजबी बोलायची. कोणाच लग्न ठरलं, नोकरी लागली अशा गोड बातम्याही घराच्या बाहेर गेल्या नाहीत. त्या काळी एखादा मुलगा अमेरिकेत शिकायला जातो म्हटल्यावर कोण गाजा वाजा व्हावा, पण वेदकांचा विवेक अमेरिकेत जाऊन जुना झाल्यावर बातमी फुटली. वेदकांच्या एका गोष्टीची खबर सगळ्यांना लागायची आणि वाड्यातली सगळी मुलं जमा व्हायची ती म्हणजे कलही लावणे. त्यांच्याकडे नेमाने कलही वाला यायचा, घरातली पितळेची भांडी, ताटं, डबे बाहेर अंगणात अवतरायची आणि कलही लावून चकाचक व्हायची. नुसत्या आठवणीनेही कोळशाचा आणि नवसागराचा वास आता सुद्धा जसाच्या तसा आला नाकात! पुढे हे सगळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत बंगला बांधून तिथे राहायला गेले, ते ही गुपचूप.

त्याकाळच्या वाडा संस्कृती मधले असे हे ‘कोषातले’ कुटुंब, कदाचित घरातल्या एवढ्या माणसांमुळे त्यांना बाहेरच्यांची कधी गरजच वाटली नसावी.

वाड्यातली सगळी कुटुंब तशी सुखवस्तू, मध्यम वर्गातली होती. भाटकरांचे कुटुंबही त्यातलेच. सुरेश, महेश,मंजू आणि अंजू ही त्यांची मुलं. भाटकर मामा रेल्वेत नोकरीला होते, त्यावेळी त्यांना काळजी वाटावी अशी होती ती केवळ त्यांची मुलगी अंजू. अंजूला सगळा वाडा "आवा" म्हणायचा. आवाला थोडंफार ऐकू यायचं पण बोलता यायचं नाही, ती मुकी होती. वाड्यातल्या सगळ्यांनी आवाला सांभाळून घेतले होते. तिची खाणा खुणांची भाषा लहाना थोरांना अवगत होती. आत्ता वाटतं, किती भाव,भावना, विचार असतात आपल्या मनांत, कसे व्यक्त करायचे एवढे सगळे शब्दांविना फक्त समोरच्याला कळतील अशा काही मोजक्या खाणाखुणांनी? तिनेही जमेल तेवढ्या भावना अशाच मांडल्या असतील, पण कित्येक भावना अव्यक्त राहिल्या असतील, कित्येकदा तिच्या हातवाऱ्यांकडे दुर्लक्षही केलं असेल. अशा कोंडलेल्या अवस्थेत, तिला घरात कोणी ओरडलं, फटकारलं की ती जोर जोरात भोकाड पसरून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरातून एकेका पायरीवर थबकत खाली उतरायची. अंगणात मधोमध उभी राहून मनसोक्त रडायची. मग आम्ही तिला विचारायचो काय झाले? कधी कधी सांगायची, कधी आमच्यावरही ओरडायची. आमच्या घरात नाहीतर ओट्यावर बसायची आणि शांत झाली की जायची परत घरात. तिला बोललेले (खुणांनी) सगळे कळायचे, ती मतिमंद नव्हती, काही वर्षे ती विशेष मुलांच्या शाळेतही जायची. गणवेश घालून शाळेत जातांना खूप ऐटीत मानेला , वेणीला झटका देत सगळ्यांच्या घराकडे, ‘आपल्याला कोणी बघतंय का?’ बघायची. शाळेत काही वस्तू केल्या की हौशीने आणून दाखवायची. आमच्या कडे रोज टी.व्ही. बघायला यायची. त्यावेळी भाटकर मामांना काळजी वाटावी अशी फक्त आवा होती असं मी आधी म्हणालो ते एवढ्यासाठी की पुढे पुढे त्यांच्या काळज्या वाढतच गेल्या.

साधरण काय होतं, आई वडील मुलांसाठी खूप कष्ट करतात, मुलांना काही कमी पडू नये म्हणून मन मारत दिवस काढतात. पुढे मुलं मोठी होऊन जमेल तेवढे शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागतात आणि कुटुंबाचे दिवस बदलतात, एखादं मूल अगदीच असामान्य निघाले तर दिवस फिरतातही. भाटकर मामांच्या बाबतीत घडले मात्र उलटेच, परिस्थिती बिघडतच गेली. कधी कधी देवही कसा एकाच कुटुंबाला वेठीस धरतो, नाही? सुरेश, महेश, मंजू ही वयाने अगदी एका मागोमाग, कोणीच फारसं शिकलं नाही. जेमतेम दहावी झाले असावेत. नंतर मोठा मुलगा सुरेश ह्याला कुठेतरी खाजगी नोकरी लागली. पैसा हातात आल्यावर सिगरेट दारूचे व्यसन लागले. कालांतराने व्यसनांपायी पगार कमी पडू लागला. घरात भांडणं तर रोजचीच झाली. हे सगळे बघून शेजारीपाजारी आपोआप दुरावले. सुरेश नंतर जुगारही खेळू लागला, अशातच त्याने नोकरीच्या ठिकाणी काही अफरातफर केली, पकडला गेला, कैद झाली. सुटून आल्यावर दारूच्या पूर्णपणे आधिन झाला आणि एक दिवस कीटक नाशक पिऊन सगळं संपवलं. हे सगळं होत असतांना एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे मंजूच लग्नं झालं. पण........ त्याच सुमारास भाटकर मामींना संधीवाताने ग्रासलं. त्यांचे सांधे आखडायला लागले, हालचाल करणे कठीण होऊ लागलं. खूप औषधोपचार केले पण कशाचाच गुण आला नाही, कशातरी पाय ओढत त्या चालायच्या,त्या एक एक पायरी उतरून शौचालयात यायच्या, पुढे पुढे तर त्या बसून जिना उतरायच्या, त्यांना बघून वाईट वाटायचं. सगळे भाटकर मामींच्या तब्येतीची काळजी करत असतांना, पुढचा धक्का ........ भाटकर मामा गेले. त्यांच्या जागेवर रेल्वेत महेशला नोकरी लागली. भाटकर मामींचा संधिवात वाढतच होता. त्या पाठीतही वाकल्या, चालणं जवळ जवळ बंदच झालं. महेश रेल्वेत स्थिरावला, लग्न केले.जरा बरे दिवस यावेत तर त्याचे, बायकोचे आणि भाटकर मामींचे एकमेकांशी पटेनासे झाले. रोज भांडणं, ह्या सततच्या भांडणामुळे महेश वेगळा राहू लागला. तरीही त्याचे आणि बायकोचे पटेना, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. महेशने दुसरे लग्न केलं. परत ये रे माझ्या मागल्या... सद्य परिस्थिती फारच करुणास्पद आहे. मोठी मुलगी मंजू हिचे पती संसार अर्ध्यावर सोडून गेल्याचे कळले. भाटकर मामी स्वतः उठून बसू शकत नाहीत, अंथरुणाला खिळून आहेत. आवा आता थकली आहे, खूप अशक्त झाली आहे, तिचेही वय पन्नाशीला आलंय. महेश वेगळाच राहतो. घरातली आवक म्हणजे बहुदा भाटकर मामांचे निवृत्ती वेतनच असावी. ज्या आवाला लहानपणी आईने हटकलं असेल तीच आवा आई होऊन त्याचं सगळं करते आहे. आम्ही वाडा सोडून बरीच वर्षे झाली, पण घर अजूनही ठेवले आहे. वाड्यात हल्ली जेव्हा जातो, आवा नेहमीप्रमाणे बाल्कनीत उभी राहून शून्यात बघत असते. मला बघितल्यावर निरपेक्ष आनंदाने हसते, तिच्या भाषेत, कसा आहेस? बायको, मुलं कशी आहेत? विचारते. खूप वाईट वाटतं तिच्याकडे बघून, दया येते, पुढे हिचे काय होणार असेही वाटते. खूप इच्छा होते वरती जाऊन आवाला, भाटकर मामींना भेटायची पण खरं सांगायचे तर त्या भग्नावस्थेतल्या घरात जाऊन भाटकर मामींना बघण्याचे धाडस होत नाही.

ह्या भागात एवढेच, तशीही अक्षरं पाणावली आहेत आणि मति सुन्न झाली आहे.

(ह्या भागातील काही नांवे बदलली आहेत)


(क्रमशः)


मधुसूदन मुळीक