मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

याची देही याची डोळा … … … अनुभवली वारी

पांडुरंग … … कमरेवर हात ठेऊन आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी आसुसलेला सावळा विठ्ठल! ह्या विठू माऊलीचं रूप लहान असताना अगदी जवळून काकड आरतीच्या वेळी निवांतपणे न्याहाळले आणि मनात साठवून ठेवले होते. दर वर्षी जून जुलैमध्ये सुट्टीत भारतात गेलो की पंढरपूरची वारी, दिवे घाटातले फोटो, वारकऱ्यांचे अनुभव आणि आयुष्यात एकदातरी वारी करावी अशा प्रतिक्रिया ऐकायचो. 

गेल्यावर्षी सुट्टी संपवून परत कुवेतला येतांना मी आणि सौ ने ठरवलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनीही पायी पंढरपूरची वारी करायची. डिसेंबर मध्ये पुढील वर्षाचे सुट्टीचे नियोजनही आषाढी एकादशीची तारीख बघून केले. माझ्या मित्राची (श्री गिरीश टेमगिरे;पुणे) आई नित्य नेमाने वारी करत असे, त्यांच्याकडे आमची इच्छा बोलून दाखवली तर त्यांनी खूपच प्रोत्साहन दिले, एवढे करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांच्या दिंडीत आमचे नाव नोंदवले आणि दिंडीतल्या नेहमीच्या सगळ्यांना आम्ही येणार असल्याचे आणि आमची योग्य काळजी घेण्याचेही सांगितले.
 
झालं ! आधीच इथे दिवस फार झर झर सरतात,त्यातून वारीचे वेध लागले होते, बघता बघता एप्रिल मे कधी आला कळलंच नाही. वारीची तयारी म्हणजे खूप चालण्याचा सराव, आम्ही रोज चालण्याचे खूप ठरविले पण… … कुवेतचे बेभरवश्याचे हवामान! ह्या वर्षी इथे उन्हाळ्यात जास्तच धुळवड झाली आणि सराव काही झाला नाही. सुट्टीच्या नेहमीच्या खरेदी बरोबर ह्या वर्षी वारीची खास खरेदी झाली, अगदी राहुटी (तंबू) घेण्याचे ठरले पण त्याची सोय असते हे कळल्यावर बारगळले. बेडिंग, विविध प्रकारची ब्यान्डेजेस,मलम असे सगळे घेतले. मित्राला (गिरीशला) फोन करून वारीचा संपूर्ण प्रोग्राम, काय आणायचे ? काय नाही? हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पण एकच उत्तर, "अरे सगळी सोय केली आहे,तुम्ही भारतात आलात की पुण्याला या, मग तुम्हाला दिंडी चालकांशी भेटवतो, काही काळजी करू नका". वारी साठी आम्ही या वर्षी मुलांची शाळा चार दिवस बुडवली आणि भारतात दाखल झालो. मुलांना आईच्या ताब्यात दिले, मुलगा "ओम" मोठा असल्याने आणि आजीची सवय असल्याने त्याची काहीच काळजी नव्हती (किंबहुना, मनसोक्त हुंदडायला मिळणार म्हणून तो खूष होता) पण मुलगी देवी (वय ६ वर्षे) प्रथमच आम्हा दोघांना सोडून राहणार होती. वारीला निघण्याच्या आदल्या रात्री देवीने अगदी काकुळतीने "तुमच्या पैकी एकाची वारी रद्द नाही का करू शकत?" असे विचारले कशीबशी तिची समजूत घातली आणि वारीच्या आधी दोन दिवस पुण्याला जाऊन आमचे दिंडी चालक श्री शिवाजीराव कराळे (त्यांना सगळे अण्णा संबोधतात) ह्यांची भेट घेतली. अनिवासी भारतीयांच्या (बिघडलेल्या) सवयींमुळे अण्णांना आमचे पायी वारीला येणे जरा 
अप्रूप वाटले. त्यांनी कल्पना दिली की नुसतेच ठरवले म्हणून वारी पूर्ण करण्या एवढी सोपी नाही, चालायचा सराव आहे का? कुठेही ,कसेही राहण्याची, जेवण्याची, झोपण्याची आणि शरीर विधी उरकण्याची तयारी आहे का? नसेल तर यायचा अट्टाहास नको. आम्ही दोघांनी मनाची पूर्ण तयारी केली होती ( तनाची करू शकलो नव्हतो) त्यांना आमचा इरादा पक्का असल्याचे सांगितले. अण्णांनी एक सल्ला दिला की,तुम्ही हडपसरहून वारीत या, कारण आळंदी ते पुणे आणि मग पुणे ते सासवड हे सलग दोन्हीही टप्पे मोठे आहेत तुम्हाला एकदम झेपणार नाहीत आणि कदाचित तुम्ही वारी मधेच सोडून द्याल . तसेही दिंडी तर्फे पुण्यात राहण्याची सोय नसल्याने आम्ही मामांकडे हडपसरला रहाणार होतो. मग ठरलं, आम्ही हडपसरहून वारीत यायचे. आमचे कपडे, बेडिंग असे जड मोठे सामान ट्रकमध्ये टाकण्यासाठी अण्णांकडे सुपूर्द करून आम्ही मामांकडे आलो.

११जुनला दुपारी ४ वाजता आळंदीत मंदिराचा कळस हलला, वारीस प्रस्थानाची अनुमती मिळाली आणि ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन लाखो वैष्णव निघाले सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला. ११ आणि १२ जूनचा मुक्काम होता आळंदीतच, आणि १३, १४ जूनचा पुण्यात भवानी पेठेत. आम्ही आधीच येऊन हडपसरला राहिल्याने कधी एकदा आधीचे मुक्काम संपून दिंडी हडपसरला येते? आणि आमची वारी सुरु होते ? असे झाले होते. अण्णांनी सांगितले होते १५ जूनला सकाळी ९ वाजता हडपसर गाडीतळावर आपल्या दिंडीत सामील व्हा. अण्णांना हल्ली एवढे चालणे झेपत नसल्याने ते ट्रक मध्ये बसून वारी आणि वारीचे नियोजन करतात. दिंडीतल्या एका दोघांचे भ्रमणध्वनी त्यांनी दिले होते, आमचा साधारण ९० जणांचा छोटा ग्रुप (कराळे ग्रुप) दिंडी क्रमांक १० (रथाच्या पुढे) चा एक भाग होता. वारीत सुरुवातीला मानाचा नगारा असतो, त्याच्या मागे मानाच्या २७ दिंड्या असतात ( माऊलींच्या रथा पुढच्या ) नंतर माऊलींच्या पादुका घेऊन आळंदी देवस्थानाची दिंडी असते आणि रथाच्या मागे साधारण २०० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीचा क्रमांक एका उंच दंडाला लावलेल्या पाटीवर दर्शविलेला असतो, पण आमच्या दिंडीला काही कारणाने अशी पाटी नव्हती . एकूण काय, एवढ्या लाखो लोकांमधून, कोणीही माहितीचे नसतांना, आपली दिंडी शोधणे हे एक दिव्यं होते. गिरीशचे भाऊ ,वहिनी हे दरवर्षी सासवड पर्यन्त चालत जातात मग ठरले की सासवड पर्यंत त्यांचे बरोबर जायचे आणि सासवडला ते आमची दिंडीतल्या लोकांशी भेट घालून देतील.

१५ जूनचा दिवस उजाडला, एक मोठे ध्येय समोर होते, मनात धाक धुक होती. मी वारकरयांचा पोशाख , पांढरा गुरुशर्ट, लेंगा आणि टोपी घालून तर गीता सोयीनुसार पंजाबी ड्रेस घालून तयार झालो. आत्तापर्यंत हडपसरचे रस्ते वाहनांसाठी बंद केल्याचे कळले होते. आमचे तीन मामा मोटारसायकल काढून जमेल तेवढे सोडतो म्हणून आम्हाला घेऊन निघाले. थोडे अंतर पार केले, प्रचंड जनसमुदाय माउलींच्या दर्शनासाठी गाडी तळाकडे जात होता, रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. पुढे गाडी जाणे मुश्कील झाले. आम्ही वेळेत गाडीतळावर पोहोचू की नाही?.... भर भर चालत एकदाचे गाडी तळावर पोहोचलो. अलोट गर्दी , मामांनी गीताला सांगितले मधूचा हात अजिबात सोडू नकोस नाहीतर परत शोधणे मुश्कील होईल. एवढ्यात ! नगारयाचा आवाज, माऊली! माऊली! S.....S....S चा घोष आमच्या कानावर आला, दुतर्फा गर्दी केलेल्या बघ्यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पावित्रा घेतला. आम्हाला सासवड मध्ये दिंडीची गाठ घालून देणारे मित्राचे बंधू श्री प्रदीप टेमगिरे भेटलेच नाहीत. भक्तांचा सागर म्हणजे काय ते आवक होऊन बघत होतो, ह्या लाटेत आपणही सामील व्हायचे आहे तेही आपली दिंडी आणि त्यातले कोणीच परिचयाचे नसतांना.... बघता बघता माऊलींच्या रथा पुढच्या २७ दिंड्या निघून गेल्या आम्हाला आमची रथा पुढची दिंडी क्रमांक १० काही दिसली नाही आणि आम्ही मामाला सोडून कधी ह्या भक्तीच्या लाटेवर सवार झालो हे आम्हालाही समजले नाही. आम्ही दोघांनी आमची दिंडी शोधत पुढे जाण्याचे ठरवले, सारखा श्री प्रदीप टेमगीरेंना फोन करत होतो पण भेट काही होत नव्हती. आपली माणसे शोधत, कोठेही न थांबता आम्ही दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकीला पोहोचलो, आता मात्र आम्ही नगारयाच्या बरेच पुढे आलो होतो. आमचे मित्र श्री प्रदीप आम्हाल शोधात येत होते, माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी वडकीला विसावा होता मग आम्हीही तिथेच विसावलो. एक मुलगी आणि तिचा सहकारी ह्या विसाव्याला झर झर संस्कार भारतीची रांगोळी घालतांना दिसले. काही मिनिटात त्यांनी माऊलींच्या पालखीच्या मार्गात रांगोळीच्या सुंदर पायघड्या घातल्या. त्यांच्याशी बोलल्यावर समजले, ते आळंदी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक दर्शनाच्या विसाव्याला अशा रांगोळ्या घालणार आहेत आणि खरंच आम्ही वारीत प्रत्येक विसाव्याला, वारीच्या पुढे पोहोचून रांगोळ्या घालण्याची त्यांची धावपळ आणि सुंदर रांगोळ्या बघितल्या. आमचा उत्साह आणि सगळा माहोल बघून माझ्या दोन मामा, आणि माम्यांनी मुलांसह सासवड पर्यन्त यायचे ठरविले आणि ते वड्कीला आम्हाला भेटले. केवळ भ्रमणध्वनी मुळे काही वेळाने श्री प्रदीप ह्यांची गाठ भेट झाली आणि आता आपली दिंडी आणि त्यातले सहचारी भेटणार ह्या विचाराने जीव भांड्यात पडला ! आम्ही श्री प्रदीप ह्यांचे बरोबर दिवे घाट चढायला सुरवात केली. उन्हाचा तडाखा, घाटाचा चढ आणि अनुभवाअभावी पाठीवर घेतलेली जड स्याक, क्यामेरे...चालणे कठीण वाटत होते पण वारीचे वारे डोक्यात भिनले होते. दिवे घाटातले वारकऱ्यांच्या गर्दीचे दरवर्षी वृत्तपत्रात येणारे फोटो डोळ्यापुढे आले, कित्येक पत्रकार , वृत्त वाहिन्यांची ही दृष्ये टिपण्या साठी चाललेली धडपड आणि आज आम्ही स्वतः या वारीत असल्याचे जाणवून स्वतःचेच कौतुक वाटत होते. मध्ये कोठेही न थांबता आम्ही घाट माथा गाठला. उन्हामुळे खूपच दमछाक झाली होती, जरा वेळ विश्रांती घेऊन पुढे सासवड कडे निघालो. काही लोक सासवड कडून उलटे दिवेघाटाकडे जात होते, असे कळले की माऊलींचे स्वागत करून गावात आणण्या साठी काही सासवडकर जात होते. वारीचा आज आणि उद्याचा असे दोन मुक्काम सासवडला होते. आम्ही अजूनही आमच्या दिंडीत सामील झालो नव्हतो, श्री टेमगिरे कुटुंबीय सासवडहून पुण्याला परतणार होते आणि रात्रीच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी आमची दिंडी शोधणे भाग होते. संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते. पुन्हा एकदा नगरा दुमदुमला, माऊली! माऊली! गजर झाला , सासवडकरांची दर्शनासाठी धूम उडाली आणि श्री प्रदीप ह्यांनी आम्हाला आमच्या दिंडी क्रमांक दहा (रथाच्या पुढे)च्या हवाली केले. दिंडीतल्या सहाचरयांनी क्षणात मला एका लाईन मध्ये येण्याच्या आणि गीताला महिलांच्या लाईन मध्ये जाण्याच्या सूचना केल्या, जागा करून दिली आणि आम्ही एका शिस्तबद्ध, तालात , माऊलींचा गजर करत जाणारया दिंडीचा भाग झालो. पांडुरंग! पांडुरंग!! ... … … लाखो लोकातून आपली दिंडी शोधून त्यात सामील होण्याचे एक मोठे दिव्य श्री टेमगिरेन मुळे शक्य झाले होते. आता पुढचे पंधरा दिवस पंढरी पर्यन्त हेच आमचे कुटुंब असणार होते.

वारी मुक्कामाच्या ठिकाणी आली की माऊलींच्या रथा पुढच्या आणि काही मागच्या दिंड्या एखाद्या ठरलेल्या मोठ्या पटांगणात जमतात. सासवड मध्ये पुरंदर हायस्कूल च्या पटांगणात आम्ही पोहोचलो, हजारो ग्रामस्थ दर्शन आणि आरती साठी गोल रिंगण करून बसले होते. रिंगणाच्या बाहेर माऊलींच्या पालखीचा मार्ग असतो आणि त्या बाहेर दिंडीतील वारकरी उभे राहतात. सासवड हे आमच्या साठी पहिलेच मुक्कामाचे ठिकाण होते. आम्हाला माऊलींचे आगमन , आरती आणि काय, काय प्रथा असतात ह्याचे कुतूहल होते. आम्ही पटांगणात जाऊन जागा घेतली एवढ्यात पालखी आली. हजारोंच्या मुखातून पुन्हा माऊली! माऊली! चा गजर झाला, सगळे लोक पालखीला हात लावायला आणि मग पालखीच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी धडपडत होते. माऊलींची पालखी आळंदी देवस्थान आणते. देवस्थानाचे चोपदार वारीची शिस्त राखत असतात, किंबहुना वारीचे असे अलिखित नियम आहेत जे सगळे वारकरी पाळतात. ह्या हजारो लोकांनी भरलेल्या पटांगणात चोपदारांनी त्यांचा चांदीचा दंडक उंचावला मात्र.........सगळे पटांगण शांत! एका दिंडीच्या वारकरयांनी पुन्हा पखवाज आणि झांजा वाजवण्यास सुरवात केली, कुणा दिंडीचे काही गाऱ्हाणे असल्यास असे करतातअसे समजले. ह्या दिंडीचे गाऱ्हाणे होते की सासवड मध्ये आगमनाच्या वेळी काही तरुण ग्रामस्थांनी अपशब्द बोलून काही वारकऱ्यांना धक्का बुक्की केली होती. चोपदारांनी त्यांची कार्यवाही केली ,मग हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तू आणि व्यक्ती ह्यांची घोषणा झाली, माऊली आपला मुक्काम कधी , किती वाजता तेथून हलविणार हे घोषित केले शेवटी माऊलींची आरती. आता सगळ्यांची आपआपल्या मुक्कामी पोहोचण्याची गडबड सुरु झाली. सासवडचा आमच्या दिंडीचा मुक्काम होता शिक्षकांच्या 'गुरुकुल' वसाहतीतील दाते ह्यांच्या बंगल्यात. चला! पहिला मुक्काम तर छान बंगल्यात होता. भजन झाल्यावर जेवून सगळ्यांनी पथाऱ्या पसरल्या. जास्तच थकल्यामुळे आणि केवळ सतरंजीवर झोपायची सवय नसल्याने झोप लागत नव्हती. माझ्या आणि सौ गीताच्या मनात एक क्षण विचारही आला " कशा साठी हे श्रम करत तंगडतोड करायची? बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना शेतात काम करण्याची, चालायची, वारीची सवय आहे. आपण बघू जर पाय बरे झाले तर पुढे......... नाहीतर सरळ उद्या सकाळी घरी निघू". पुरुष आणि महिलांची राहण्याची सोय वेगळी वेगळी असते, आम्ही एकमेकांना थकल्या बद्दल आणि परत जाण्याबद्दल काहीही बोललो नाही. पांडुरंगाने आम्हाला वारी घडवण्याचे मनावर घेतले होते, सकाळी लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ केली आणि सगळा शीणवटा गेला, आपण काल तीस किलो मीटर चाललो हे अजिबात जाणवत नव्हते. सगळ्यानी सांगितले वारीची हीच खासियत आहे, तुम्ही फक्त प्रपंच मागे टाकून वारीला निघा ...पुढची सगळी काळजी पांडुरंग घेतो, तो रात्री येऊन भक्तांची सेवा करतो..पाय चेपून देतो. खरचं आमचे पुढे जाणे अनाकलनीय होते. वारीचा मुक्काम सासवडला दोन दिवस होता, दुसऱ्या दिवशी ह भ प श्री बाबा महाराज सातारकरांचे प्रवचन अगदी समोर बसून ऐकण्याचा योग आला. संध्याकळी हरिपाठ आणि भजन हे नित्यनेमाने होत असे. दिंडीतल्या सगळ्यांची भजने, हरिपाठ, अभंग,ञानेश्वरी , गीता, संतवचने, गोष्टी असे सगळे तोंडपाठ ऐकल्यावर आपल्या खुजेपणाची जाणीव वेळो वेळी होत होती. सासवड मध्ये दाते कुटुंबियांनी अतिशय आगत्याने सगळ्यांची उत्तम सोय केली होती. काही सोबती तेथून परत गेले तर काही जण तिथून वारीत सामील झाले.

माऊलींनी सकाळी जेजुरी कडे प्रस्थान केले. सगळे वारकरी वारीच्या रस्त्यावर जाऊन दुतर्फा वाट बघतात आणि आपल्या दिंडीचा नंबर आला की वारीत सामील होतात, आम्ही जेजुरीकडे निघालो. सकाळचा आणि दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी डोंगरावरचे खंडोबाचे मंदिर दृष्टीपथात आले, आम्ही जेजुरीत पोहोचलो. रस्त्यात दुतर्फा भाविकांची गर्दी होती, जेजुरीकरांनी भंडारा उधळत ढोल ताश्यांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. माऊलींची आरती झाल्यावर पुढे तीन चार कि .मी चालल्यावर एकदाचा मुक्काम आला. राहुट्या टाकून झाल्या होत्या, आम्ही डीझेल जनरेटर आणि वायरिंग केले,राहुट्यांमध्ये बल्ब लावले. कोणी दात्याने ह्याच वर्षी आमच्या दिंडीला जनरेटर दिला होता , त्यामुळे लाईट आणि मुख्य म्हणजे भ्रमणध्वनी पुनर्भारीत करणे शक्य झाले होते. जेजुरीचा मुक्काम पंढरपूरच्या हमरस्त्याला लागून होता, आजू बाजूस इतरही दिंड्यांच्या राहुट्या होत्या. सगळा माहोल बघून विवंचनेत पडलो, उद्या सकाळचे काय? शरीरविधी उरकायचे कुठे? एक दोघे जाऊन परिसराची टेहाळणी करून आलो. हरिपाठ . भजन ,भोजन केले आणि अंथरूण पसरले. राहुटीमध्ये हा पहिलाच मुक्काम, ढेकाळलेली जमीन, पातळ , आपल्या शरीरापुरते अंथरूण आणि वारकरयांमुळे सतत वाहता रस्ता , झोप लागणे कठीण होते. वारीच्या दिंड्यांमध्ये नसलेले भाविक आपल्याला झेपेल तसे आणि त्या वेळी चालतात, असे जाणाऱ्यांची संख्याही दिंड्यांमधून जाणारया वारकरयान एवढीच असेल. पहाटे तीन वाजता उठून सगळे विधी उरकले, थंडगार पाण्याने ट्यांकर खाली अंघोळ केली,बेडींग आणि राहुट्या गुंडाळून ट्र्क मध्ये टाकले. ट्रकला सगळे समान घेऊन साडेचार पर्यंत निघणे भाग असते नाहीतर एकदा दिंड्या निघाल्या की रस्ते वाहनांसाठी बंद करतात आणि ट्रकला तर पुढे जेवणाच्या मुक्कामी जाऊन स्वयंपाक करायचा असतो. आपले समान गेले की प्लास्टिक पेपर च्या इरल्यावर उघड्यावर पडून नाहीतर बसून उजाडायची वाट बघायची आणि पाच साडे पाच वाजता पुन्हा निघायचे पुढल्या मुक्कामाच्या........ आता वाल्हे गावाच्या दिशेने.

हरिनामाचा गजर, हरिपाठ म्हणत, रस्ता काटत होतो, ठीक ठिकाणी चहा , नाश्ता, फळे ह्यांचे वाटप चालू होते. वारीस दिंडीतून येणारे वारकरी केवळ दिंडीतील आहार घेतात अशा वाटपांकडे ते जात नाहीत. दिंडीत नसलेल्या वारकऱ्यांची जेवणा-खाण्याची सोय होते, पण जागो जागी खूप प्रमाणात होणाऱ्या वाटपांमुळे अन्नाची नासाडी होते असे वाटते, ह्यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. वारीच्या संपूर्ण मार्गालाच जत्रेचे स्वरूप आलेले असते, गावागावातील लोक दर्शनासाठी उभे असतात, फेरीवाले, उपहार गृह जशी जशी वारी पुढे जाते तसे तसे पुढे जाऊन दुकानं थाटतात. बाटलीबंद पाणि आणि उर्जाचे थंड ताक ह्याने रणरणत्या उन्हात आमची तहान भागवली. संध्याकाळी आम्ही वाल्हे गावात पोहोचलो, वाल्मिकी ऋषी झालेल्या वाल्याकोळ्याचे हे गाव. माऊलींची पालखी गावातून प्रदक्षिणा घालून मुक्कामाच्या ठिकाणी आली. आम्ही वाल्मिकी ऋषींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.आमच्या राहुट्या ह्या ठिकाणापासून अजून दोन तीन कि. मी लांब एका खडकाळ टेकडीवर होत्या, ही जागा मस्त होती, विस्तीर्ण टेकडीवर दिंड्या लांबलांब उतरल्याने , सकाळची चिंता नव्हती. राहुट्या, जनरेटर सगळी जमवाजमव करून हरिपाठ , भजन सुरु झाले, सोसाट्याचा वारा आणि उडणारा फोफाटा जेवतांना त्रास होत होता. आमच्याकडचे बाटलीबंद पाणि संपले , दिवसभराची चाल कमी झाली म्हणून की काय ? परत चार पाच कि. मी पायपीट करून पाणि आणले. दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपलो आणि तीन-चार तासात उठ्लोही, भागच होते! 

सकाळी मुक्कामापासून हमरस्त्या पर्यंत अंतर कापून वारीत सामील झालो. आता आजचा मुक्काम लोणंद , जेवणा अगोदर नीरयाला पोहोचलो, नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातले गेले. आम्ही पुणे जिल्हा पार करून सातारा जिल्ह्यात आलो होतो. संध्याकाळी लोणंदला पोहोचलो. इथे दोन दिवस मुक्काम होता. राहुट्या रस्त्याच्या जवळ आणि आजूबाजूला वेड्या बाभळीचे रान होते. दुसऱ्या दिवशी उठून आमच्या दिंडीतील श्री घाडगे ह्यांच्या ओळखीने माऊलींच्या पादुकांचे छान दर्शन घेतले, आळंदीच्या मंदिरातील मुख्य विणेकरी श्री नरहरी बुवा ह्यांचे प्रवचन व नंतर त्यांच्या बरोबर प्रसाद घेण्याचा योग इथे आला.

लोणंद हून निघालो तरड गावाला आज आम्ही चांदोबाचा निंब येथे पहिले उभे रिंगण बघणार होतो. चांदोबाचा निंब जसे जवळ आले तसे रस्त्यात खूप गर्दी वाढू लागली. वारीची पहिले उभे रिंगण , सगळे दिंडीकरी रस्त्यात दोन्ही बाजूला उभे राहिले , वारकऱ्यांचे खेळ, फुगड्या झाले, देवस्थानचे चोपदार येऊन व्यवस्था बघून गेले. माऊली! माऊली! गजर झाला आणि माऊलींचा अश्व वारीच्या सुरुवाती पासून माऊलींच्या पालखी पर्यंत आला, मन झुकवून दर्शन घेतले, प्रसाद खाल्ला आणि परत सुरुवातीला गेला अन पुन्हा एकदा अशीच चक्कर मारली. ह्या अश्वाला हात लावण्यासाठी आणि नंतर त्याच्या मार्गाची धूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी आणि बघे ह्यांची एकच धूम उडाली.

तरड गावच्या पुढचा मुक्काम होता फलटणला श्री लोंढे पाटील यांच्या बंगल्यात. आत्तापर्यंत रणरणत्या उन्हात चालून चालून रापलो होतो, नाकाची, कानाची, हातावरील त्वचा करपून निघत होती, तळ पायाला फोड आले होते. बंगल्यात पोहोचल्यावर कित्येक दिवसांनी घरात आलो आहोत असे वाटत होते, घराची खरी किंमत कळत होती. चार भिंतींच्या आत विधी आणि अंघोळ करण्याचे सुख काही औरच होते. श्री लोंढे पाटलांनी खूपच छान सोय आणि पाहुणचार केला, आम्ही सगळे अंघोळी करून पाणि संपवून निघालो, त्यांच्या घरच्यांना मात्र पाणि येण्याची वाट बघावी लागणार होती.

ह्याच्या पुढचे वारीचे मुक्काम होते बरड आणि नंतर नातेपुते. बरडहून नातेपुतेला जातांना आम्ही सातारा जिल्हा पार करून सोलापूर जिल्ह्यात आलो होतो. रस्त्यात आपल्या ९० वर्षे वयाच्या आईला खांद्यावरून वारी घडवणारा आजच्या युगातील श्रावणबाळ भेटला.

नातेपुते ते माळशिरस च्या मुक्कामात सदाशिव नगरचे पहिले गोल रिंगण होते. प्रत्येक दिंडी धावत धावत रिंगणात प्रवेश करत होती , धावायची सवय नसल्याने आमची दमछाक झाली, मग खेळ, फुगड्या, उंच उड्या, मनोरे ह्या सगळ्यात वृद्ध वारकरीही भाग घेत होते, एवढे चालून आल्यावर त्यांच्यात कुठून शक्ती आणि जोर येतो? असा प्रश्न आम्हाला पडला. रिंगणाच्या मध्ये पालखी असते आणि त्याच्या बाजूला फक्त दिंड्यांच्या विणेकरयांना प्रवेश असतो. माऊलींच्या अश्वाने रिंगणात फेऱ्या मारल्या माऊली! माऊली! चा गजर झाला, पायीची धूळ मस्तकी लावली आणि वारकऱ्यांच्या अन विणेकरयांच्या खेळांना अजून जोर चढला.

माळशिरसचा मुक्काम संपवून आम्ही वेळापूरच्या दिशेने निघालो, वाटेत खुडूस फाट्याला अजून एक गोल रिंगण झाले. वेळापूरच्या प्रवासात धावाबावी येथे जोरदार पावसाने आम्हाला गाठले, प्रत्येकजण डोक्यावर प्लास्टीकचे इरले घेऊन चालत होता , सगळ्यांची इरली सारखीच होती त्यामुळे आपल्या दिंडीतल्या लोकांना ओळखणे कठीण जात होते, पण पाऊस लवकर थांबला. धावबावी ह्या ठिकाणी रस्त्यावर उतार आहे प्रत्येक दिंडी वरती थांबते आणि मग सगळे एकदम माऊलीमाऊलीचा गजर करत उतारावरून धावत येतात.

वेळापूर नंतर मुक्काम होता भन्डी शेगाव ह्या प्रवासात ठाकूरबुवाची समाधी येथे गोल रिंगण झाले. ह्याच मार्गात माऊलींची आणि संत सोपानदेव (सोपान काका) ह्यांची भेट होते. संत सोपानदेवांच्या पादुका पालखीतून काढून त्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घडवतात. मध्यंतरीच्या मुक्कामात महिलांच्या राहुटीत सकाळी उठल्यावर एका आजींच्या अंथरुणा खाली सापडलेले वाळवीचे वारूळ, पहाटे तीन वाजता अंघोळ करतांना अण्णांच्या पायावर विंचू सापडणे अश्या घटनाही अनुभवल्या.

झालं!!! आता पांडूरंगाच्या भेटीचे वेध लागले होते , भन्डी शेगाव ते वाखरी एकच मुक्काम बाकी होता. वाखरीच्या मार्गावर बाजीरावाची विहीर येथे उभेगोल रिंगण होते. आम्ही पुन्हा रिंगणात धावलो, फुगड्या खेळलो. इथेच झी २४ तास च्या वार्ताहराने आम्हाला प्रतिक्रिया विचारण्या करता हेरले आणि आम्ही कुवेतहून येऊन वारी करतो आहोत हे कळल्यावर आमची मुलाखत घेण्यासाठी झी २४ तास, ए बी पी माझा, आय बी एन लोकमत , टी व्ही ९, आणि सकाळ वृत्तपत्र ह्यांनी गर्दी केली. ही मुलाखत २८ जून ला दूरदर्शनवर दाखविली गेली आणि बातमी सकाळ (सोलापूर) वृत्तपत्रात आली. आमच्या दिंडीतील सगळे म्हणाले, बघा पांडुरंगाने वारी घडविली आणि गौरवही केला, खरचं आहे!

आमच्या दिंडीचा, वारीचा शेवटचा टप्पा....वाखरी, पण आता हे अंतर खूप लांब वाटत होते. वाखरीचा मुक्काम आला आणि पांडुरंगाने आम्हास वारी घडवल्याचे खूप समाधान वाटले, एक ईप्सित त्याने आमच्या कडून पूर्ण करून घेतले होते. पंढरपूर वाखरी पासून साधारण ३ कि.मी आहे,आमच्या दिंडीची पंढरपुरात मुक्कामाची सोय नसल्याने आम्ही वाखरीतच रहाणार होतो. दशमीच्या दिवशी आम्ही तुळजापूर, अक्कलकोट येथे गाडीने जाऊन आलो, गाडीने प्रवास करणे काही वेगळेच वाटत होते. २९ जूनला माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल झाली. आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी चालत जाऊन पंढरपुरात मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले, साधारण ७ लाख भक्त तिथे होते, त्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन होणे शक्य नव्हते. पांडुरंगाला भक्तांची आस लागलेली असते त्यामुळे तो ही दर्शन देण्यासाठी गाभाऱ्यात न राहता कळसावर येऊन बसतो असे म्हणतात. द्वादशीला उपवास सोडून आम्ही मुंबईकडे निघालो, गाडी आल्यावर आमचे हे मोठे कुटुंब निरोप देण्यासाठी जमा झाले, सगळ्यांचेच डोळे पाणावले, पुढच्या वर्षी नक्की परत या! निदान एक दोन टप्पे तरी करा! सगळे सांगत होते… … बघूया पुढची आषाढी एकादशी १८ जुलैला आहे… …
… … … पुढे पांडुरंगाची इच्छा!!! 
 
मधुसूदन.ज्यो.मुळीक , सौ गीता मधुसूदन मुळीक

४ टिप्पण्या:

  1. जबरदस्त !! तीव्र इच्छाशक्ती च्या जोरावरच तुम्ही ही वारी करु शकलात. अनुभव फारच छान शब्दबद्ध केलाय. अगदी स्वत: दिंडीमधे आहोत असं वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्य धन्य मुळीक दंम्पती
    पंढरीनाथाची जडली प्रीती
    वारी केली पायी पायी
    श्रद्धा भक्ती ठायी ठायी

    वारी वृत्तान्त खूपच आवडला.


    उत्तर द्याहटवा
  3. एखाद्या मुरलेल्या वार्ताहराच्या वार्तांकना सारखे सुरेख वारीचे भारी शब्दांकन केले आहे, वारीत आपण काहीच करत नाही
    माऊली करवून घेते,

    उत्तर द्याहटवा