शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

अनाथांची माय



माय म्हणजे माई----- सौ .सिंधूताई सपकाळ. मी  सहावीत सातवीत असताना आमच्या शाळेत (राजर्षि शाहू    छत्रपती  विद्यानिकेतन    जि.प.कोल्हापूर ) त्यांना भाषणासाठी बोलावले होते. तेव्हा मी  त्यांना पहिले होते. तेव्हाच त्यांची संघर्षमय  कहाणी  ऐकली  होती.

त्यानंतर आता  खूप वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुताई  सपकाळ आमच्या चर्चेत आल्या.आम्हाला त्याच्या अनाथाश्रमासाठी काही देणगी द्यायची होती.कुवैतहूनच आम्ही त्यांचा पत्ता  मिळवला  होता.१८  ऑगस्ट ला  इंद्रायणीने  पुण्याला गेलो.ऑफिसमध्ये गेलो.तिथे  एक काका होते,त्यांनी बसायला सांगितले.आम्ही इकडेतिकडे बघत बसलो.पुरस्कारांचा खच पडला होता.ते नीट ठेवण्यासाठी  तिथे पुरेशी जागाही नव्हती .तेव्हा मला खूप हसू आले की,आपल्याला कधी काळी मिळालेले हातावर मोजण्या इतके पुरस्कार शोकेस मध्ये ठेवतो आणि तेही सर्वबाजूने लोकांना दिसतील असे.

एक छोटा मुलगा व  एक छोटी मुलगी बागडत आमच्या जवळ येऊन पावणे  आले पावणे आले असं ओरडत आत जाऊन आईला निरोप देऊन आले,व आई तयार होऊन येते आहे असा निरोप आम्हाला देत होते.मी उत्सुकतेने त्या मुलीला नाव विचारले तर तिने स्नेहल सिंधुताई सपकाळ असे सांगितले.तेव्हाच मला त्यांच्या मनात सिंधुताई  किती महत्वाच्याआहेत   ते कळले .कारण त्याच माईंनी   त्यांना  त्यांच्या नकळत्या वयापासून जीव लावला होता.संगोपन केले होते.थोड्या वेळाने आमचे चहापान  झाले.अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुताई बाहेर आल्या.आम्ही उभयतांनी त्यांना नमस्कार केला.हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी विचारले,का रे बाळांनो , काय  काम  काढलंत?कुठून आलात ?वगैरे वगैरे. आमचा येण्याचा  उद्देश कळताच त्यांना खूप आनंद झाला.कौतुक वाटले.आतून एक बाळ खूप रडत  असल्याचा आवाज आला.ते काही केल्या रहात नव्हत.एका मोठ्या मुलीने त्याला माईंकडे  आणून दिले. इतक खवळलेल ते बाळ त्यांच्या मांडीवर येताच हसायला लागलं.हुंकार  देऊन देऊन त्यांच्याशी बोलू लागलं.तेव्हा माईंनी त्या मायलेकरांची करूण कहाणी सांगितली,त्या दोघी  आत्महत्त्या करायला निघाल्या  होत्या.एका हितचिंतकाने फोन करून ही बातमी माईंना सांगितली.ताबडतोब माई तिथे पोहोचल्या आत्महत्तेपासून परावृत्त करून त्या दोघींना आश्रमात घेऊन आल्या.

मग आम्ही त्यांच्या बरोबर नविन आश्रम बघायला गेलो.त्यांनी पावतीवर सौ. सिंधुताई अशी सही केल्यामुळे मी त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारले.तेव्हा त्यांनी ते हयात असल्याचे सांगितले.पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच नव्यराने एके काळी त्यांना मुलगी झाली म्हणून घरातून हाकलले होते, गाईच्या गोठ्यात फेकून दिले होते. इवल्याश्या जीवाची नाळ दगडाने तोडून, त्या गाईच्या गोठ्यात राहिल्या. ज्या गायीच्या दुधाने बाळास जीवदान मिळाले, आणि ज्या गोठ्याने त्यांना आश्रय दिला त्याची आठवण म्हणून दीडशे गाईंचे गोसंरक्षण केंद्र सुरु केले. ह्या केंद्राचा कार्यभार त्यांचा नवरा सांभाळत आहे. तसेच त्यांची ती मुलगी सौ.ममता सध्या एका आश्रमाची जबाबदारी सांभाळत आहे.

गप्पांच्या ओघात आम्ही आश्रमाच्या जवळ आलो. अमेरिकेत भाषणा साठी गेले असताना तेथील लोकांनी दिलेल्या देणगीतून हा आश्रम उभा राहिल्याचे त्यांनी सांगितले. सन्मती बाल संगोपन ची ही वास्तू  तयार  झाल्यावरही मुलांना ह्या आश्रमात आणणे सोपे नव्हते, महाराष्ट्र राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची मदत दिली नव्हती पण परवानगी साठी मात्र एक  अट घातली आणि त्यानुसार माईंनी सरकारला लिहून दिले की, मी सरकारकडे कुठलेही अनुदान मागणार नाही, असा हा अजब सरकारी न्याय! आश्रमाच्या दारात त्या दिसताच आश्रमाचे कर्मचारी माईना सलाम करत होते. आश्रमात चाळीस -पंचेचाळीस मुले होती, त्यांनी लगेच रांग लावून घेतली आणि सिंधुताई गाडीतून उतरताच एक एक जण त्यांच्या पुढे नतमस्तक होत होते. हे दृश्य बघून खरंच डोळे पाणावले. चार माजली आश्रम सुनियोजित वाटला. लहान, मोठ्या मुलांच्या वेगवेगळ्या अभ्यासिका, तसेच बंक बेड सारखी त्यांची झोपायची सोय, संपूर्ण आश्रमाला असलेले कम्पाउन्ड , त्यात त्या मुलांची खेळायची सोय, मोठ्ठा देव्हारा आणि सतत तेवत राहणारा मोठा नंदादीप. आपली आई भाषणासाठी कुठे कुठे जाते, ती घरी सुखरूप परत येऊ दे म्हणून ही मुलंच  दिवा लावून प्रार्थना करतात असे त्यांनी सांगितले. पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांचे कपडे आश्रमात असलेल्या महिला धुतात शाळेत जाणारया मुलांना डबा करून देतात, पाचवी पासूनच्या मुलांना स्वावलम्बनाचे धडे म्हणून त्यांचे त्यांना काम शिकवले जाते. इथे टी.व्ही नाही तसेच लहान मुलांचा अभ्यास घेण्याची  जबाबदारी तेथीलच एका मोठ्या मुला कडे दिली जाते. त्यांच्या आश्रमातून शिकलेली बरीच मुले मोठ्या हुद्यापर्यंत पोहोचली  आहेत. आश्रमातील मुलींची  लग्ने लावून माई थांबत नाहीत, मुली जावयाचे सर्व वर्षसण, बाळंतपण एक खरीखुरी आई आपल्या लेकीसाठी करते किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर जास्तच या माई आपल्या लेकींसाठी करतात.

एक मुलगी तर लग्न होऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन परत आश्रमात आली आहे.या आश्रमाचा कार्यभार सांभाळण्यासाठी ते सेवा देत आहेत.याच्याही पुढे जाऊन ती मुलगी म्हणते की,या आश्रमाने मला एव्हढे  दिले की,मी सासरी रमू शकले नाही.त्यांचे भाषण चालू असताना हळूच व्यासपीठावर लहान अर्भक आणून ठेवतात ,असाही त्यांचा अनुभव आहे.तसेच आश्रमाच्या दारात रात्री अपरात्री बाळ आणून ठेवतात असं ही त्यांनी सांगितले.एकदा त्यांना एक तासाचे बाळ सापडले.ते काळेनिळे पडले होते.त्याला पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेऊन जगविले.तसेच एक बाळ मेलेल्या आई च्या कुशीत सापडले.त्यांच्या या ३२ वर्ष्यांच्या कारकीर्दीत त्यांनी सांभाळ केलेल्या मुलांपैकी एकही मूल दगावलेले नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

सद्ध्या सिंधुताई ६५ वर्ष्यांच्या आहेत.पण त्यांचे हे कार्य तिथे जाऊन बघणाऱ्यांना खरच अचंबा  वाटण्यासारखे आहे.स्वतःची करुण कहाणी आणि मनाची दांडगी हिम्मत यांच्या जोरावरच हा सर्व डोलारा त्यांनी उभा केला आहे.

शेवटी सिंधुताई सपकाळ सर्वांना कळकळीने सांगतात की,"मी अनाथांची माय झालेतुम्ही गणगोत व्हा !!!"

सौ गीता. मधुसूदन. मुळीक  

३ टिप्पण्या:

  1. खरंच अशा आईला मानाचा मुजरा !!
    सिधुताईवर निघालेला " मी सिंधुताई सपकाळ" हा सिनेमा बघितल्यावर तर थक्क व्हायला झालं. कसली बहादूर आहे ही माई ! त्यांचं बोलणंसुद्धा अगदी ऐकत रहावंसं वाटतं. बोलतांना त्या बहिणाबाईच्या ओव्या, सुरेश भटांच्या गझला, उर्दू शेर अगदी सहज वापरतात. जगातले अनेक टक्केटोणपे खाऊन अतिशय कणखर झालेल्या माई तितक्याच वात्सल्याने अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्यांचं कार्य बघून थक्क होतं मन.

    उत्तर द्याहटवा
  2. विठू माऊलीच्या दर्शनानंतर दर्शन घेतले अनाथांच्या माऊलीचे!
    वा !! सामाजिक भानही आहे व देणगी देण्याची दानतही,
    या कृतज्ञ भावनेला सलाम!!!

    उत्तर द्याहटवा
  3. जय माई तुझी किमया नाही फेडल्या जाई

    उत्तर द्याहटवा