शुक्रवार, १ जून, २०१२

वाडा आठवणींचा ( भाग-७)

मंडळी हल्ली आपण आपल्या आजू बाजूला कित्येक "कोषातली" कुटुंब बघतो. "कोषातली" म्हणजे, मी आणि माझं कुटुंब असे. स्वतःला आपल्याच कोषात गुरफटून घेतलेली. अशा लोकांनी स्वतःला आपल्याच कुटुंबातल्या तीन चार जणांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं असतं. आनंद उपभोगायचा, दुख वाटून घ्यायचं तेही अगदी आपल्याच कुटुंबात. आजू बाजूचे कसे आहेत?, कोणाची विचारपूस करावी हे काहीही नाही. कधी कधी विचार येतो, ह्यांना असं वाटतं का? की आपल्याला कोणाचीच गरज नाही आणि कधी लागणारही नाही, की खरंच त्यांना कोणाची गरज लागतच नाही! कधी कोणाकडे भेटले की देखल्या देवा दंडवत, "काय कसे काय?" पण भरभरून बोलणं, मन मोकळं करणं, काही गोष्टी सांगणं, विचारणं, सल्ला देणं/ घेणं नाहीच. आपण बरं अन्आपलं घर बरं, अशी कुटुंब हल्ली सर्रास दिसतात. असेच एक कुटुंब आमच्या वाड्यातही होतं बरंका! पळसुलेंचे शेजारी, वेदक. कुटुंबमोठं असुनही ह्याचं वागणं कोषातलं. बघा हं त्यांच्याकडे कोण कोण होतं ! भाऊ, त्यांची पत्नी भाभी, भाऊंचे लहान बंधु भाई; (भाईंची पत्नी आम्हीवाड्यात रहायला जाण्यापूर्वी बरीच वर्षे आधी गेल्याचे समजले होते) ह्या दोघांची मुलं मीना, अशोक, वंदना, शोभा, रंजना, दीपक, साधना, विवेक, मिलिंद, विकास, मेधा. हा क्रम चुकला असण्याची दाट शक्यता आहे कारण, एकतर हे सगळे वेदक "कोषातले" होते त्यामुळे फार बोलणे, घरी येणे जाणे नसायचे. दुसरे म्हणजे ही सगळी भावंडं माझ्या पेक्षा खूप मोठी होती, मला ह्या सगळ्यांची नावं लक्षात राहिली याचेही काहींना नवल वाटेल. वेदकांचे भाऊ कडक शिस्तीचे होते. घरात एवढी मुलं पण घरात कोणी खेळतंय, दंगा मस्करी चालू आहे असं कधीच बघितलेले आठवत नाही. वाड्यातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, मुलं कधी कोणाशी खेळायला आली आहेत, गप्पा मारत आहेत, कध्धीच नाही. कोण कितवीत आहेत, काय शिकत आहेत, कुठे नोकरी करतात सगळेच गूढ, कोषातले असल्याने कोणी भानगडीतही पडायचे नाही. त्यातल्या त्यात मेधा,विकास आणि मिलिंद ही धाकटी भावंडं कधी कधी बघून हसायची, जुजबी बोलायची. कोणाच लग्न ठरलं, नोकरी लागली अशा गोड बातम्याही घराच्या बाहेर गेल्या नाहीत. त्या काळी एखादा मुलगा अमेरिकेत शिकायला जातो म्हटल्यावर कोण गाजा वाजा व्हावा, पण वेदकांचा विवेक अमेरिकेत जाऊन जुना झाल्यावर बातमी फुटली. वेदकांच्या एका गोष्टीची खबर सगळ्यांना लागायची आणि वाड्यातली सगळी मुलं जमा व्हायची ती म्हणजे कलही लावणे. त्यांच्याकडे नेमाने कलही वाला यायचा, घरातली पितळेची भांडी, ताटं, डबे बाहेर अंगणात अवतरायची आणि कलही लावून चकाचक व्हायची. नुसत्या आठवणीनेही कोळशाचा आणि नवसागराचा वास आता सुद्धा जसाच्या तसा आला नाकात! पुढे हे सगळे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत बंगला बांधून तिथे राहायला गेले, ते ही गुपचूप.

त्याकाळच्या वाडा संस्कृती मधले असे हे ‘कोषातले’ कुटुंब, कदाचित घरातल्या एवढ्या माणसांमुळे त्यांना बाहेरच्यांची कधी गरजच वाटली नसावी.

वाड्यातली सगळी कुटुंब तशी सुखवस्तू, मध्यम वर्गातली होती. भाटकरांचे कुटुंबही त्यातलेच. सुरेश, महेश,मंजू आणि अंजू ही त्यांची मुलं. भाटकर मामा रेल्वेत नोकरीला होते, त्यावेळी त्यांना काळजी वाटावी अशी होती ती केवळ त्यांची मुलगी अंजू. अंजूला सगळा वाडा "आवा" म्हणायचा. आवाला थोडंफार ऐकू यायचं पण बोलता यायचं नाही, ती मुकी होती. वाड्यातल्या सगळ्यांनी आवाला सांभाळून घेतले होते. तिची खाणा खुणांची भाषा लहाना थोरांना अवगत होती. आत्ता वाटतं, किती भाव,भावना, विचार असतात आपल्या मनांत, कसे व्यक्त करायचे एवढे सगळे शब्दांविना फक्त समोरच्याला कळतील अशा काही मोजक्या खाणाखुणांनी? तिनेही जमेल तेवढ्या भावना अशाच मांडल्या असतील, पण कित्येक भावना अव्यक्त राहिल्या असतील, कित्येकदा तिच्या हातवाऱ्यांकडे दुर्लक्षही केलं असेल. अशा कोंडलेल्या अवस्थेत, तिला घरात कोणी ओरडलं, फटकारलं की ती जोर जोरात भोकाड पसरून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरातून एकेका पायरीवर थबकत खाली उतरायची. अंगणात मधोमध उभी राहून मनसोक्त रडायची. मग आम्ही तिला विचारायचो काय झाले? कधी कधी सांगायची, कधी आमच्यावरही ओरडायची. आमच्या घरात नाहीतर ओट्यावर बसायची आणि शांत झाली की जायची परत घरात. तिला बोललेले (खुणांनी) सगळे कळायचे, ती मतिमंद नव्हती, काही वर्षे ती विशेष मुलांच्या शाळेतही जायची. गणवेश घालून शाळेत जातांना खूप ऐटीत मानेला , वेणीला झटका देत सगळ्यांच्या घराकडे, ‘आपल्याला कोणी बघतंय का?’ बघायची. शाळेत काही वस्तू केल्या की हौशीने आणून दाखवायची. आमच्या कडे रोज टी.व्ही. बघायला यायची. त्यावेळी भाटकर मामांना काळजी वाटावी अशी फक्त आवा होती असं मी आधी म्हणालो ते एवढ्यासाठी की पुढे पुढे त्यांच्या काळज्या वाढतच गेल्या.

साधरण काय होतं, आई वडील मुलांसाठी खूप कष्ट करतात, मुलांना काही कमी पडू नये म्हणून मन मारत दिवस काढतात. पुढे मुलं मोठी होऊन जमेल तेवढे शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागतात आणि कुटुंबाचे दिवस बदलतात, एखादं मूल अगदीच असामान्य निघाले तर दिवस फिरतातही. भाटकर मामांच्या बाबतीत घडले मात्र उलटेच, परिस्थिती बिघडतच गेली. कधी कधी देवही कसा एकाच कुटुंबाला वेठीस धरतो, नाही? सुरेश, महेश, मंजू ही वयाने अगदी एका मागोमाग, कोणीच फारसं शिकलं नाही. जेमतेम दहावी झाले असावेत. नंतर मोठा मुलगा सुरेश ह्याला कुठेतरी खाजगी नोकरी लागली. पैसा हातात आल्यावर सिगरेट दारूचे व्यसन लागले. कालांतराने व्यसनांपायी पगार कमी पडू लागला. घरात भांडणं तर रोजचीच झाली. हे सगळे बघून शेजारीपाजारी आपोआप दुरावले. सुरेश नंतर जुगारही खेळू लागला, अशातच त्याने नोकरीच्या ठिकाणी काही अफरातफर केली, पकडला गेला, कैद झाली. सुटून आल्यावर दारूच्या पूर्णपणे आधिन झाला आणि एक दिवस कीटक नाशक पिऊन सगळं संपवलं. हे सगळं होत असतांना एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे मंजूच लग्नं झालं. पण........ त्याच सुमारास भाटकर मामींना संधीवाताने ग्रासलं. त्यांचे सांधे आखडायला लागले, हालचाल करणे कठीण होऊ लागलं. खूप औषधोपचार केले पण कशाचाच गुण आला नाही, कशातरी पाय ओढत त्या चालायच्या,त्या एक एक पायरी उतरून शौचालयात यायच्या, पुढे पुढे तर त्या बसून जिना उतरायच्या, त्यांना बघून वाईट वाटायचं. सगळे भाटकर मामींच्या तब्येतीची काळजी करत असतांना, पुढचा धक्का ........ भाटकर मामा गेले. त्यांच्या जागेवर रेल्वेत महेशला नोकरी लागली. भाटकर मामींचा संधिवात वाढतच होता. त्या पाठीतही वाकल्या, चालणं जवळ जवळ बंदच झालं. महेश रेल्वेत स्थिरावला, लग्न केले.जरा बरे दिवस यावेत तर त्याचे, बायकोचे आणि भाटकर मामींचे एकमेकांशी पटेनासे झाले. रोज भांडणं, ह्या सततच्या भांडणामुळे महेश वेगळा राहू लागला. तरीही त्याचे आणि बायकोचे पटेना, शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. महेशने दुसरे लग्न केलं. परत ये रे माझ्या मागल्या... सद्य परिस्थिती फारच करुणास्पद आहे. मोठी मुलगी मंजू हिचे पती संसार अर्ध्यावर सोडून गेल्याचे कळले. भाटकर मामी स्वतः उठून बसू शकत नाहीत, अंथरुणाला खिळून आहेत. आवा आता थकली आहे, खूप अशक्त झाली आहे, तिचेही वय पन्नाशीला आलंय. महेश वेगळाच राहतो. घरातली आवक म्हणजे बहुदा भाटकर मामांचे निवृत्ती वेतनच असावी. ज्या आवाला लहानपणी आईने हटकलं असेल तीच आवा आई होऊन त्याचं सगळं करते आहे. आम्ही वाडा सोडून बरीच वर्षे झाली, पण घर अजूनही ठेवले आहे. वाड्यात हल्ली जेव्हा जातो, आवा नेहमीप्रमाणे बाल्कनीत उभी राहून शून्यात बघत असते. मला बघितल्यावर निरपेक्ष आनंदाने हसते, तिच्या भाषेत, कसा आहेस? बायको, मुलं कशी आहेत? विचारते. खूप वाईट वाटतं तिच्याकडे बघून, दया येते, पुढे हिचे काय होणार असेही वाटते. खूप इच्छा होते वरती जाऊन आवाला, भाटकर मामींना भेटायची पण खरं सांगायचे तर त्या भग्नावस्थेतल्या घरात जाऊन भाटकर मामींना बघण्याचे धाडस होत नाही.

ह्या भागात एवढेच, तशीही अक्षरं पाणावली आहेत आणि मति सुन्न झाली आहे.

(ह्या भागातील काही नांवे बदलली आहेत)


(क्रमशः)


मधुसूदन मुळीक 

३ टिप्पण्या:

  1. तुमच्या प्रत्येक लेखांत काहीतरी आश्चर्य.. काही तरी प्रेरणा-प्रोत्साहन देणारे... डोळे पाणावणारे... असंच काहीसं असतं.. अतिशय सुंदर. प्रत्येक लेखातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला सलाम आहे. आणि तुमच्या लेखनाला तर फारच ज्यास्तं...

    उत्तर द्याहटवा
  2. खुप िदवसां पासुन ईच्छा होती...ही मालीका वाचायची...आज योग आला..सगळे भाग छान आहेत...जशे काही मधु ला आम्ही मोठ्ठ होतेांना बघतोय...साधी सरळ माणसं आता िमळणे कठीणच...आपलेपणा कुठेतरी हरवलाय...काही गोष्टी डोळ्याला पाणावून गेल्या...पुढच्या भागाचंी वाट बघतोय....

    उत्तर द्याहटवा