गुरुवार, ३ मे, २०१२

वाडा आठवणींचा (भाग ३)


आमचा वाडा हे एक मोठ्ठं कुटुंबच होतं. इतक्या सगळ्या माणसांच्या सहवासात लहान वयातच इतके अनुभव आले! आज, आमच्या वाड्यात नित्य नेमाने येणाऱ्या लोकांबद्दल. वाड्यात जवळ जवळ रोज येणारे असे काही प्राणी होते. प्राणी ह्या साठी की त्यात मनुष्य आणि चतुष्पाद असे दोन्ही होते.

एक पांढऱ्या रंगाची गाय, तिची वेळ ठरलेली ती बरोबर बारा वाजण्याच्या सुमारास वाड्यात यायची आणि तळमजल्यावरच्या प्रत्येक घरासमोर जाऊन उभी रहायची. सगळेच तिला किमान पोळी तरी द्यायचे. बघा ! म्हणजे रोज गोग्रास घातल्याचे पुण्य. असे बरेच वर्षे चालू होते, नंतर अचानक, तिचे न येणे आम्हा सगळ्यांनाच हूर हूर लावून गेले.

दुसरी अजूनही चांगली स्मरणात राहिलेली, मीठा पिठाचा जोगवा मागणारी जोगवीण !

मीठा पिठाचा जोगवा

द्या ग बायांनो लवकरी

मला बाई जायाच, गुरुवारी

तुळजापूरच्या दरबारी

तुळजापुरला जाईन

आईचं हळदी कुंकू घेईन

आई अंबेला चढवीन

लवकर माघारी येईन

हिरवी नऊवारी साडी, कपाळावर ठसठशीत लाल कुंकू, हळदीचा मळवट, हातात टोपली, खांद्यावर तेलासाठी टांगलेली बाटली आणि वाड्यात शिरताच लावलेला टिपेचा स्वर ! अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर येते. आम्ही वाड्यात राहायचो तोपर्यंत तिला बघितले. आता खूपच म्हातारी झाली असेल किंवा नसेलही कदाचित. तिला एकदातरी तुळजापूरला जाता आले असेल कि नाही कोण जाणे?

वाड्याच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे एक जुनाट, मोडकळीस आलेला वाडा होता, त्यात काही भाजीवाले, मोलकरणी, पेपरवाले राहायचे. त्यांच्यातल्याच एका कुटुंबातला माणूस, अतिशय किरकोळ शरीरयष्टी, डोक्यावर खूप बारीक केस, अंगात बाह्यांचा बनियन आणि खाकी रंगाची अर्धी चड्डी, तेव्हा त्याच्या चाळीशीत असावा, सकाळ झाली की वाड्याच्या गेट समोर उभा राहायचा आणि सतत कुणाशीतरी जोरात आवाज न फुटता बोलायचा आणि नुसते हातवारे करायचा. हे असं सतत, म्हणजे झोप सोडून का..य.. म..... असे म्हणतात की तो तमाशात ढोलकी खूपच छान वाजवायचा आणि दुसऱ्या फडातल्या माणसांनी दुश्मनीमुळे खाण्यातून काही दिले आणि त्याची वाचा कायमची गेली.

अशीच एक, पाठीत पार वाकलेली गुजराती म्हातारी यायची. तिचा वेश शबरी सारखा असायचा. पांढरी साडी, कपाळाला आणि कानाच्या पाळ्यांना पांढरा गंध आणि खांद्याला गाठोडे. ती वाड्याच्या मध्ये उभी रहायची आणि अगदी पोट तिडकीने विनवणी करायची,

दे माये, गरीब म्हातारीला भाकर तुकडा दे माये

तुझ्या लेकरा बाळाला खूप आयुष्य लाभेल माये

आम्हाला तिची खूप दया यायची.

वाड्यात असाच रोज येणारा मातीवाला पांडू ! साधारण ४०-४५ वय, बरेचसे दात पडलेला, बारीक पण पिळदार शरीराचा पांडू. तो डोंबिवली बाहेरच्या टेकडीवरून लाल माती आणून विकायचा. डोक्यावर मातीने भरलेली गोणी, एका खांद्यावर अडकवलेले फावडे, बनियन आणि अर्धी खाकी चड्डी असा त्याचा अवतार. हाताच्या बोटांना आणि तळपायाला पडलेल्या भेगा, पायाच्या टर्र फुगलेल्या नसा, तो खूप मेहनत करायचा. तो आला की त्याला आम्ही पाणी आणि काही खायला द्यायचो. कधी कधी मात्र तो मोसंबी / नारिंगी घेतल्यासारखा वाटायचा. बरेच वर्षापूर्वी तो गेल्याचे कानावर आले. स्वतः जगवण्याची आणि मुलांना शिकवण्याची धडपड शांत झाली.

वडारी समाजातल्या काही बायका पाट्याला टाकी लावायला यायच्या, त्यांची मुलं बरोबर फिरता फिरता आजूबाजूच्या वाड्यात भिक मागायची. ती मुलं आली की मोठी मुलं, वाड्यातल्या कुत्रीला त्यांच्यावर छु ...करायची.

एक बोहारीण, ती जुन्या कपड्यांवर भांडी द्यायची. खरे पाहता तिला द्यायला कुणाकडे रोज जुने कपडे निघणार? , तरीही ती नित्यनेमाने यायची. पाणी मागून प्यायची. कधी कोणी कपडे द्यायला काढले की सगळ्या महिला एकीने सौदा करायच्या. लहान डबा नको, एक साईज मोठा डबा दे! म्हणून अडून बसायच्या. आठवले की वाटते, आता बहुदा असे व्यवसाय बंदच झाले असतील.

आमचे सख्खे शेजारी हर्डीकर, त्यांची एक मुलगी मुंबईत रहायची आणि नोकरीही तिथेच करायची. रोजचा डबा मात्र जायचा घरून. त्यांचा डबेवाला यायचा बरोब्बर सकाळी नऊ वाजता. कितीही ऊन, पाऊस काहीही असले तरीही डबेवाल्याची वेळ कधी चुकायची नाही. कधी डबा नसेलच तर आम्हा मुलांना सांगितलेलं असायचं, मग आम्ही वाड्याच्या गेटमध्येच डबेवाल्याची वाट बघायचो, तो आला की लगेच सांगायचे "आज डबा नाही". कोणाच्याही वेळेची खोटी होऊ नये, हे तेव्हाच समजलेलं. हा डबेवाला नुसते जेवण नाही न्यायचा, माय लेकी डब्यातून एकमेकींना चिठ्या कधी कधी एखादी लहान वस्तूही पाठवायच्या.

अशी ही माणस, त्यांचे कष्ट, जगण्यासाठी रोजची चाललेली सच्ची धडपड आम्ही बघत आलो, लहानपणापासून. त्यामुळे लोकांबद्दल काही वाटणे, त्यांची दया येणे, त्यांना मदत करणे अशा भावना तयार झाल्या. हल्लीच्या मुलांना अशी सच्ची माणसं, अशी परिस्थिती त्यांच्या आजूबाजूला दिसतच नाही. आपण आणि आपले चौकोनी कुटुंब. सगळे स्वतःचे आणि जे काही करायचे ते स्वतःसाठीच. कधी कधी वाटते , हल्लीच्या ह्या व्यावहारिक जगात, भावना आधीच बोथट झालेली ही मुलं भावनाच नाही ना हरवून बसणार?

क्रमशः
 मधुसूदन मुळीक

२ टिप्पण्या:

  1. बारीक सारीक सारे तपशील छानच टिपले आहेत अगदी ! जोगावाही खूप भावला ! मजा येते आहे वाचायला !

    उत्तर द्याहटवा
  2. 'जोगवा' म्हणणारी बाई .... आता आता ... पर्यंत येत होती .... हा 'typical जोगवा मलाही आवडायचा ऐकायला ..
    आणि हो .... 'पांडू' ... अंधुकसा आठवतो ...

    ऋचा लेले

    उत्तर द्याहटवा